ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार "जागतिक मैत्री दिन'
म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी तो 4 ऑगस्ट रोजी तो साजरा केला गेला.
त्यानिमित्त मैत्रीकडं पाहण्याचा हा वेगळाच दृष्टिकोन...
मैत्रीच्या अनेक परी आहेत. पुरुषाची दुसऱ्या पुरुषाशी मैत्री. यात
लंगोटीयार असतात, बालमित्र असतात, वर्गमित्र असतात, खोलीमित्र असतात,
कार्यालयीन मित्र असतात. तीच गत स्त्रियांची. मुली-मुलींची मैत्री असते.
बालमैत्रीण, वर्गमैत्रीण इत्यादी. त्यापुढं जाऊन स्त्री-पुरुषांची मैत्री
येते. अगदी काल-परवापर्यंत अशी भिन्नलिंगी मैत्री म्हटलं, की समाज भुवई वर
करून किंवा डोळे वटारून पाहात असे. आता त्याचंही फारसं काही वाटेनासं
झालंय. स्त्री-पुरुषांनी भेटणं, बोलणं, फिरणं, चित्रपट पाहणं,
चहा-कॉफी-अल्पोपाहार-जेवण यांचा मिळून आस्वाद घेणं आणि त्याच्याही पुढं
जाऊन एकमेकाशी एकरूप होणं, याचीही नवलाई राहिलेली नाही. आपापल्या सोईचं
ठरेल, कौटुंबिक स्तरावर काही त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन हे सारं
होत असतं. मैत्री आणि प्रेम यांच्या सीमारेषा अगदी धूसर असतात, त्यामुळं
त्या कधी ओलांडल्या जातात, हे मित्र-मैत्रिणींनाही कळत नाही.
मानवामानवातल्या मैत्रीनंतर मानवप्राणी आणि मानवेतर प्राणी यांच्यातली
मैत्री येते. कुत्रा, मांजर, गाय, बैल, म्हैस, घोडा अशा पाळीव प्राण्यांशी
आणि पोपटासारख्या पक्ष्यांशी माणसाची मैत्री जडते. काही जण विदेशी पक्षीही
पाळतात. काहींची हत्तीशीही मैत्री जमते. त्यावर काही चित्रपटही आले आणि
गाजले आहेत. काही साहसी स्त्री-पुरुष वाघ, सिंह, गेंडा, सुसर, मगर अशा
हिंस्र प्राण्यांशीही मैत्री करतात. राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांची वाघाशी आणि चित्त्यांशीही मैत्री होती. त्यांच्या वाड्यात
वाघ आणि चित्ते माणसासारखे मोकळे वावरायचे. ही माणसं धन्यच होत! पूर्वी
एखाद-दुसरा असणाऱ्या सर्पमित्रांची संख्याही आता वाढलेली आहे. डॉल्फिन
माशाशी मैत्री करून त्याच्याशी विविध जलक्रीडा करणाऱ्या पाश्चिमात्य
सुंदरींविषयी आपण वाचतो, छोट्या-मोठ्या पडद्यावर त्यांचे खेळही पाहतो.
या मैत्रीच्या पुढं जाऊन आपण पाहतो, तेव्हा "वृक्षवल्ली आम्हां सोयरी' असं
मनोभावे आळवणाऱ्या वृक्षमित्रांची झाडा-झुडपांशी असलेली मैत्री दिसू-जाणवू
लागते. खरंतर प्रत्येक माणसाला झाडं-झुडपं-वेलींविषयी थोडाफार जिव्हाळा
वाटत असतो; पण काहींना वृक्षवल्लींमधल्या रसरसत्या चैतन्याची अनुभूती येत
असते. या मंडळींचं झाडा-वेलींशी इतकं गाढ मैत्र असतं, की त्यांच्याशी
फुलं-फळं तर बोलतातच; पण खोड, फांद्या, पानं आणि काटेसुद्धा बोलतात.
त्यांनी झाडा-वेलीवर हळुवारपणे हात फिरवल्यावर पानन्पान शहारतं,
कळ्या-फुलं हसू लागतात.

एकेक वाहनचालक आपल्या वाहनाला अतिशय जीव लावतात. काही संस्थांची वाहनं
असतात. त्यावर पगारी चालक नेमलेले असतात. त्यातले काही चालक गाडी चालवत
असताना नजाकतीनं चालवतात. त्या गाडीचं मन सांभाळत आणि मर्जी राखतच ते गाडी
चालवतात जणू! ती बंद असताना ते तिची सतत देखभाल करत असतात. ती गाडी
त्यांच्याशी जणू संवाद साधत असावी, आपली सुख-दुःखं सांगत असावी, असं ते
त्या गाडीशी प्रेमानं वागत असतात. राज्य परिवहन महामंडळाचे मी काही चालक
असे पाहिले आहेत, जे बस स्वतःची असल्यासारखी ती काळजीनं चालवतात. ते ही बस
सजवतात, सुंदर बनवतात आणि मैत्रिणीसारखी तिची देखभाल करतात. त्यांची
"विनाअपघात सेवा' ही प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा, आपल्या बसला काही धक्का
लागू नये, यासाठी असते. ती बस, ती गाडी त्यांच्या मालकीची नसते आणि
सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा तिच्याशी कसलाही धागा राहणार नसतो; पण
तरीही त्यांची मैत्री अबाधित असते. कोल्हापुरात फार पूर्वीपासून
"रिक्षासुंदरी' स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी काही मालक
नव्हे, तर चालक रिक्षा सजवतात. रिक्षाला खरीखुरी "सुंदरी' बनवतात.
काही चालक तर स्पर्धा नसतानाही बारा महिने रिक्षा नववधूसारखी सजवून
चालवतात. आपल्या या नखरेल मैत्रिणीची मिजास सांभाळण्यात ते धन्यता मानतात.

त्या वाहनाची हाकही त्यांना ऐकू येते. तो किंवा ती त्याच्यावरून हलकेच हात
फिरवतात. मग घराचं कुलूप काढतात, त्या कुलपाचीही विचारपूस करतात. मग ते आत
पाऊल ठेवतात आणि घराच्या कुशीत शिरतात. जिवलग मित्राच्या सहवासाचं सुख
त्यांच्या मनात स्रवायला लागतं. मग घर झाडता झाडता तो किंवा ती घराशी
बोलायला लागतात. असा त्यांचा संवाद सुरू होतो, सुरू राहतो. ते घर आणि त्यात
राहणारे सारे जण यांचं छानसं मैत्रीचं नातं बहरत जातं.
ज्यांना भावना आहेत, संवेदना आहेत अशा सर्वांची निर्जीवाशीही सुंदर मैत्री
जुळलेली असते. मैत्रीची ही रीत वेगळी असते. इतर सर्व प्रकारच्या
मैत्रीइतकीच ही मैत्रीही तितकीच छान, रसरशीत, सुंदर असते, फुलणारी असते.
- सप्तरंग (सकाळ)
दि. ४ ऑगस्ट २०१३, रविवार
No comments:
Post a Comment