Wednesday, April 29, 2015

कंबोडिया.. एक भयानक सत्य (भाग २) - संदीप कुलकर्णी

कंबोडिया.. काहीसा दुर्लक्षित आणि बराचसा अनोळखी देश.. सध्या व्हिएतनाममध्ये वास्तव्यास असलेले ‘सकाळ‘चे वाचक संदीप कुलकर्णी यांनी पर्यटनाच्या निमित्ताने कंबोडियाला भेट दिली. अंगकोरवट येथील पुरातन मंदिर पाहून परतताना एका लहानग्या विक्रेत्या मुलीने त्यांना एकतरी पुस्तक विकत घेण्याची विनंती केली.. तिचं मन राखण्यासाठी संदीप यांनी एक पुस्तक घेतलं.. ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर‘ हे ते पुस्तक..! कंबोडियात १९७५ ते १९७९ या चार वर्षांच्या कालावधीत २० लाख नागरिकांची कत्तल झाली.. त्या नरसंहारातून बचावलेल्या एका मुलीची ती आत्मकथा वाचून संदीप कुलकर्णी यांनी मग कंबोडियाचा ‘तो‘ काळा इतिहास वाचून काढला, संबंधित ठिकाणांना भेट दिली आणि त्यातील अनुभव ‘पैलतीर‘साठी शब्दबद्ध केले. हा या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा भाग.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
'किलिंग फील्ड‘ बघून मी ‘एस-२१‘कडे निघालो.. ‘एस-२१‘ हा प्रत्यक्षात तुरुंग नसून ती एक शाळा होती. ही त्या काळातील सर्वांत मोठी सरकारी शाळा होती. यात तीन मोठे ब्लॉक आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये तीन मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर पाच वर्गखोल्या आहेत. पहिल्या मजल्यावरील वर्गांत साधारणत: ६० ते ७० कैद्यांना दिवसभर डांबून ठेवले जात असे. दिवसभरात सर्व कैद्यांना फक्त मारहारणच केली जात असे. हे वर्ग जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. अजूनही त्या वर्गांमध्ये भीषण अत्याचाराच्या खुणा आढळून येतात. या तुरुंगात चार वर्षांत ३०,००० कैद्यांना डांबून ठेवल्याची नोंद आहे. एकदा ‘एस-२१‘मध्ये रवानगी झाली, की मृत्यू अटळच! या तुरुंगात रवानगी होऊनही केवळ नशीब बलवत्तर असल्याने सात जण वाचले. यापैकी दोघांना पाहण्याचा योग आला होता. योगायोगाने, मी गेलो त्याच दिवशी ‘हिस्टरी चॅनेल‘तर्फे तिथे चित्रिकरण सुरू होते. ‘एस-२१‘मधून बचावलेल्यांपैकी दोघे जण त्या चित्रिकरणासाठी आले होते. ‘क्रूर अत्याचार होणारी जागा‘ म्हणूनच या तुरुंगाची ओळख आहे. वर्गातील फळ्यांचा उपयोग कैद्यांची नावे लिहिण्यासाठी केला गेला होता. मी शिक्षक आहे. ‘भावी नागरिक घडविणारी‘ शाळा हीच नागरिक संपविण्यासाठी वापरली गेली, हे बघून मी पुन्हा हताश झालो. सकाळपासून ‘किलिंग फील्ड्‌स‘ आणि ‘एस-२१‘ तुरुंग पाहिल्यानंतर एक प्रश्‍न सतत मनात येत होता. तो म्हणजे, त्या चार वर्षांत कंबोडियामध्ये सुरू असलेल्या या विचित्र गोष्टींचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काय पडसाद उमटत होते?
या प्रश्‍नाचं उत्तर ‘एस-२१‘मधील दोन नंबरच्या ब्लॉकमध्ये मिळाले. हा ब्लॉक म्हणजे त्या काळातील छायाचित्रांचा संग्रह आहे. लेखाच्या पहिल्या भागात नमूद केल्याप्रमाणे, पोल पोटने कंबोडियाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे बाह्य जगाशी कंबोडियाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. कुणीही देशाबाहेर जाऊ शकत नव्हता. अशा पद्धतीने देश चालविणे अवघड जाईल, हे कालांतराने पोल पोटच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने स्वीडनमधील कम्युनिस्ट पक्षाशी संपर्क साधून त्यांच्या नेत्याला कंबोडियामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. १९७८ मध्ये तब्बल चार वर्षांनंतर कंबोडियामध्ये बाहेरील देशातून पहिली व्यक्ती आली. ही व्यक्ती म्हणजे गर्नर बर्गस्त्रोम.. हा नेता दोन दिवस नोम पेनमध्ये थांबला. त्याच्यासाठी ‘खमेर रूज‘च्या अधिकाऱ्यांनी खास मेजवानीचा बेत आखला होता. सर्वत्र ‘शेतात काम करणारे‘ नागरिक त्याला दाखविण्यात आले. ‘कंबोडियाची वाटचाल एका शेतीप्रधान समाजाकडे सुरू असून सर्वजण आनंदी आहेत,‘ असे ‘खमेर रूज‘कडून भासविण्यात येत होते. या समाजबांधणीच्या नव्या प्रयोगात थोडेफार विरोधक असतीलच, त्यांची हत्या झाली; पण ती संख्या थोडीशीच होती आणि देशात सर्व आलबेल आहे, अशी त्याची खोटी समजूत काढण्यात आली. युरोपमध्ये परतल्यानंतर बर्गस्त्रोमने पोल पोट आणि ‘खमेर रूज‘चे कौतुक केले आणि संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ‘कंबोडियाचा नेता‘ म्हणून पोल पोटचे स्थान पक्के झाले. हे सर्व वाचल्यानंतर मी राग येण्याच्या पलीकडच्या अवस्थेत जाऊन पोचलो. 
अक्षरश: जड पावलांनी ‘एस-२१‘च्या बाहेर येऊन टॅक्‍सीने मी हॉटेलवर पोचलो. रात्रीच्या जेवणासाठी भारतीय रेस्टॉरंटचा शोध घेतला आणि पटकन जेवण आटोपून ‘पोल पोटचा शेवट कसा झाला‘ याचे वाचन करण्याचे ठरवले. पलीकडच्या टेबलवर असलेल्या दोन भारतीयांकडे बघून स्मित हास्य केले. त्यांनीही प्रतिसाद दिला आणि आमची चर्चा सुरू झाली. ते पुण्याचे आहेत हे समजल्यावर इंग्रजीतून सुरू झालेले संभाषण पटकन मराठीत आले. त्या भेटीमुळे स्वत:ला खूपच नशीबवान समजतो. कारण, त्या रेस्टॉरंटमध्ये ज्यांच्याशी ओळख झाली, ते भागवत कंबोडियामध्ये गेली दहा वर्षे एका स्वयंसेवी संस्थेतर्फे अहिंसा प्रसाराचे काम करतात. कंबोडियाच्या इतिहासातील माझी गोडी जाणून त्यांनी ‘खमेर रूज‘मध्ये काम केलेल्या सैनिकाची मुलाखत घ्यायला आवडेल का, असे विचारून माझा आनंद त्यांनी द्विगुणित केला. मला तर हे हवेच होते. मी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पुन्हा भेटण्याचे ठरले. ‘त्या व्यक्तीला काय विचारावे‘ अशा अनेक प्रश्‍नांनी रात्रभर मनात गोंधळ चालू होता. त्या भेटीच्या उत्सुकतेपोटी मला नीट झोप लागलीच नाही.
सकाळी ११ वाजता ठरलेल्या ठिकाणी आम्ही भेटलो. ती व्यक्ती तशी वयस्करच होती. मेंग उन हे त्यांचे नाव. आता भागवत हे अस्सल कंबोडियन भाषेत बोलू शकतात. ते आणि त्यांचे सहकारी मनोज यांनी आमच्या मुलाखतीमध्ये द्विभाषिकाची भूमिका पार पाडली. मेंग उन ‘खमेर रूज‘मध्ये काम करत होते, तरीही त्यांना कधीच कुणाला ठार मारण्याचे काम आले नव्हते. केवळ बळजबरीमुळे त्यांना ‘खमेर रूज‘मध्ये सामील व्हावे लागले. पोल पोट तसा त्यांच्या कामावर खुश होता. कारण, त्या काळात प्रामुख्याने मासे मिळण्याचे ठिकाण हे मेंग उन यांचे गाव असल्याने त्या गावातील खूपच कमी लोक मारले गेले होते. पण त्यांच्यासमोर होणाऱ्या हत्या मेंग उन कधीच रोखू शकले नाहीत. केवळ दु:ख व्यक्त करण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीच नव्हते. ते स्वत: शिक्षित होते. तरीही चार वर्षे त्यांनी ओळख लपवून ठेवली. त्यांनी आपले बायबलदेखील एक वर्ष लपवून ठेवले. पण ‘खमेर रूज‘च्या सैनिकांना संशय आला, तेव्हा मेंग उन यांनी सगळ्यात आधी ते बायबल फाडून फेकून दिले. त्यांची दोनदा चौकशीही झाली. त्यांच्या गावातील ‘खमेर रूज‘चा अधिकारी थोडा माणुसकी जपणारा असल्याने ते थोडक्‍यात बचावले. दुसऱ्या चौकशीदरम्यान त्यांना आपला मृत्यू अटळ आहे, असेच वाटले होते. १९७७ नंतर प्रत्येक दिवस हा शेवटचाच, असे म्हणत ते जगले. आपली खरी ओळख कधीही ‘खमेर रूज‘ला कळेल, अशी त्यांची खात्री होती. त्या दरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबालाही याची जाणीव करून दिली होती. हा प्रसंग ऐकताना नकळत माझ्या अंगावर शहारे आले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ‘धर्मग्रंथ आपला जीव घेऊ शकतो‘ हे मानणे मला तर फारच जड गेले.

‘खमेर रूज‘चा अस्त!
१९७८ च्या डिसेंबरमध्ये पोल पोटने पारंपरिक शेजारी आणि शत्रू असलेल्या व्हिएतनामला विनाकारण डिवचण्यास सुरवात केली. ही पोल पोटची सर्वांत मोठी चूक होती. पण ही चूक कंबोडियन जनतेच्या पथ्यावर पडली. खऱ्या अर्थाने, पोल पोटच्या साम्राज्याचा अस्त व्हिएतनाममुळेच झाला, असे म्हणावे लागेल. डिवचल्याने चिडलेल्या बलाढ्य व्हिएतनामच्या सैन्याने कंबोडियावर आक्रमण केले. व्हिएतनामच्या सशस्र आणि शक्तिशाली सैन्यासमोर ‘खमेर रूज‘च्या निभाव लागलाच नाही. १५ ते २० दिवसांत ‘खमेर रूज‘मध्ये फूट पडली. येथील काही अधिकारी व्हिएतनामच्या सैन्यास जाऊन मिळाले. पोल पोटसह त्याचे काही निष्ठावंत थायलंड सीमेजवळील जंगलात पळून गेले.
अशा प्रकारे ७ जानेवारी, १९७९ रोजी व्हिएतनामचे सैन्य नोम पेनमध्ये घुसले आणि कंबोडियामधील भीषण अवस्था जगासमोर आली. ‘एस-21‘मधील सडलेल्या मृतदेहांची छायाचित्रे व्हिएतनामच्या सैनिकांनी प्रसिद्ध केली. आजही ही छायाचित्रे ‘एस-21‘मध्ये आहेत. पुढील एक-दोन वर्षांत संपूर्ण जगाला याची ओळख होऊ लागली. बळजबरीने खेडेगावात पाठवलेले नागरिक पुन्हा शहरात दाखल होऊ लागले. आता संपूर्ण कंबोडिया व्हिएतनामच्या अधिपत्याखाली होता. ‘खमेर रूज‘कडून फुटलेल्या काही अधिकाऱ्यांकडेच देशाची सूत्रे सोपविण्यात आली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला..

पोल पोटला कधीच शिक्षा झाली नाही..
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पोल पोटविरुद्ध खटला सुरू झाला. ‘खमेर रूज‘च्याच अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या कंबोडिया सरकारने पोल पोटच्या विरोधात कधीच सशक्त पुरावे दिले नाहीत. १९९८ पर्यंत पोल पोट थायलंड जवळील जंगलात पत्नी, एक मुलगी आणि त्याच्या काही निष्ठावंतांसोबत राहत होता. १९९० पर्यंत पश्‍चिम कंबोडियाच्या जंगलात लपून त्याच्या कारवाया सुरू होत्या. कंबोडियाच्या नव्या सरकारने पोल पोटवर कधीच सरळ खटला भरला नाही. त्यामुळे हा क्रूरकर्मा व्यवस्थित आपले जीवन जगत होता. १५ एप्रिल, १९९८ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी हृदयविकाराने पोल पोटचा झोपेतच मृत्यू झाला. आज त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर नावापुरता खटला चालू असून आता फक्त दोषारोपाचा खेळ सुरू आहे.
या सर्वांनंतर माझ्या मनातून दोन विचार जातच नव्हते. एक म्हणजे, लहानपणी शाळेत आणि घरीही मोठ्यांकडून शिकवली गेलेली म्हण.. ‘जैसी करनी, वैसी भरनी‘ ही म्हण पोल पोटच्या बाबतीत पूर्णपणे खोटी ठरली. त्याला त्याच्या कर्माची फळे मुळीच भोगावी लागली नाहीत. त्याला साधे तुरुंगातही जावे लागले नाही. १९९० पासून त्याला त्याच्या राहत्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले. यापेक्षा कंबोडियाचे दुर्दैव ते कुठले!
दुसरे म्हणजे, केवळ हिंसेच्या बळावर मिळविलेले ‘पोल पोट‘चे साम्राज्य केवळ चारच वर्षे टिकले. केवळ हिंसेच्या बळावर मिळालेली सत्ता किंवा यश हे कधीच कायमस्वरूपी नसते, याची प्रखर जाणीव झाली. अर्थपूर्ण यश मिळवायचे असेल, तर अहिंसा हा महत्त्वाचा मार्ग असतो आणि हिंसेचा मार्ग चुकीचाच असतो, हे कंबोडियाचा भयानक इतिहास समजल्यानंतर अधिकच प्रकर्षाने जाणवू लागले. नकळतच, भारताला अहिंसेच्या मार्गाने मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व वाटू लागले. आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे गुपित निश्‍चितच गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गात आहे, याची मला प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. एका सशक्त आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, याचाही प्रत्यय आला. त्या काळात दुर्दैवाने कंबोडियामध्ये सशक्त नेतृत्वाचा अभाव असल्याने तो देश अमानवीय काळाकडे लोटला गेला, असा माझा निष्कर्ष होता. शेवटी ‘दे दी हमें आझादी बिना खडक बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल‘ हे बोल नकळत ओठांवर आले आणि कंबोडियाच्या अद्‌भूत भेटीमुळे एका नव्या प्रेरणेने मी ‘अहिंसा‘ या विषयाकडे पाहण्यास सज्ज झालो... 
       
- सकाळ (पैलतीर)
दि. २९/०४/२०१५, बुधवार  

Tuesday, April 28, 2015

कंबोडिया.. एक भयानक सत्य! - संदीप कुलकर्णी

मला मुळातच प्रवासाची आवड असल्याने संधी मिळेल तेव्हा पर्यटनाला जातच असतो. व्हिएतनाममध्ये येऊन मला दोन वर्षे होत आली होती. या दोन वर्षांत मी संपूर्ण व्हिएतनाम पिंजून काढला; पण शेजारचा कंबोडिया हा देश मात्र बघायचा राहून गेला होता. पेशाने शिक्षक असल्याच्या अनेक फायद्यांपैकी महत्त्वाचा फायदा हा, की भरपूर फिरता येऊ शकते. कारण, शिक्षक हा वर्षातून साधरणत: २०० दिवसच काम करत असतो. एका आठवड्याचा ‘स्प्रिंग ब्रेक‘ मिळाल्यानंतर मी कंबोडियाचा बेत आखला. ‘गुगल‘वरून माहिती घेतली. त्यावेळी अंगकोरवट येथील विष्णूचे पुरातन मंदिर पाहण्यासारखे आहे, असे समजले. सीम रिप या शहरातील अंगकोरवट मंदिर पाहून पुन्हा व्हिएतनामच्या प्रवासाला निघालो. व्हिएतनाम ते कंबोडिया हा प्रवास बसनेही करता येतो. या प्रवासामध्ये आमची बस एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबली. तिथे एक छोटी मुलगी पुस्तकांचा संच विकण्यासाठी आली होती. ‘एकतरी पुस्तक घ्या‘ अशी विनंती ती करू लागली. त्यामुळे फारसा उत्सुक नसतानाही मी तिच्याकडून एक पुस्तक घेतले. ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर‘ हे त्या पुस्तकाचे नाव. 
सहज म्हणून पुस्तकाचे पहिले पान वाचले आणि चक्रावूनच गेलो. प्रवासातील पुढच्या चार तासांमध्ये ते २४० पानांचे पुस्तक मी वाचून संपवले. कंबोडियामध्ये १९७५ ते ७९ या कालावधीमध्ये प्रचंड नरसंहार झाला. त्या संहारातून बचावलेल्या एका मुलीची आत्मकथा म्हणजे ते पुस्तक. कंबोडिया म्हटले, की बहुतेकांचे आकर्षण अंगकोरवट हेच असते. माणुसकीला लाजवेल, अशा नरसंहाराकडे मात्र साहजिकच दुर्लक्षच होते. व्हिएतनामला परतल्यानंतर एकाच आठवड्यानंतर मी पुन्हा एकदा कंबोडियाला गेलो. त्या नरसंहाराशी निगडीत असलेल्या ठिकाणांना भेट देऊन त्या भयानक सत्याचा जवळून अनुभव घेतला. त्या भीषण संहारामध्ये चार वर्षांतच २० लाख नागरिक मारले गेले. त्यातील दहा लाख नागरिकांची तर अमानुष कत्तल झाली आणि उर्वरित लोक भूकबळी किंवा रोगांचे शिकार झाले. त्यावेळी कंबोडियावर खमेर रूज लोकांचे राज्य होते. ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ कंबोडिया‘च्या सदस्यांना ‘खमेर रूज‘ म्हटले जात असे. अंदाजे दहा लाख लोकांची जिथे हत्या झाली, त्यांना आता ‘किलिंग फिल्ड्‌स‘ म्हणतात. येथे ट्रकमध्ये कोंबून माणसांना आणले जात असे आणि त्यांची हत्या करून पुरले जात असे. अशा जवळपास ३०० जागा कंबोडियात आहेत आणि त्यापैकी केवळ ८५ ‘किलिंग फिल्ड्‌स‘चे उत्खनन झाले आहे. आजही हे काम सुरूच असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सतत वाढतच आहे. या ३०० ‘किलिंग फिल्ड्‌स‘पैकी सर्वांत मोठी जागा कंबोडियाच्या राजधानीमध्येच आहे. या देशाची राजधानी फुनाम पेन्ह ही आहे. इथे आतापर्यंत दोन हजारांहून अधिक मृतांचे अवशेष सापडले आहेत. या सर्वांत मोठ्या ‘किलिंग फिल्ड्‌स‘ला भेट देण्याचे ठरविले. तत्पूर्वी, ‘खमेर रूज‘ अस्तित्वात आले कसे आणि त्यांनी या हे सर्व का केले, याची थोडक्‍यात माहिती घेऊ.
१९५३ मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कंबोडिया हा देश म्हणून उभा राहत होता. १९७० च्या दशकाच्या सुरवातीस देशात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला होता. १९७० मध्ये सिंहौक या पंतप्रधानास पायउतार व्हावे लागले. अमेरिकेच्या मध्यस्थीने लॉन नूल या लष्करी अधिकाऱ्याकडे देशाची सूत्रे सोपविण्यात आली. पण तोदेखील या भ्रष्टाचाराला आळा घालू शकला नाही. सामान्य जनतेचा, विशेषत: ग्रामीण भागातील गरीब कंबोडियन जनतेचा सरकारवर आणि सरकारी कर्मचाऱ्यांवरील राग वाढतच होता. भरीस भर म्हणून व्हिएतनाम-कंबोडियाच्या सीमेवर होणाऱ्या अमेरिकी सैन्याच्या बॉम्बहल्ल्यांमुळे तेथील जनता अधिकच संतापली. या सगळ्याचा फायदा घेत ‘कम्युनिस्ट पार्टी‘ने आपले बस्तान बसवले. त्यांचा प्रमुख होता पॉल पॉट. या पक्षाच्या सैनिकांना ‘खमेर रूज‘ म्हणून ओळखले जात असे.
१७ एप्रिल १९७५ रोजी पॉल पॉटच्या सैन्याने कंबोडियाच्या राजधानीवर सशस्त्र हल्ला करत ताबा मिळवला. यामुळे सुरवातीला अनेकजण आनंदी झाले. पण त्यांचा हा आनंद अगदी काही तासांपुरताच टिकला. कारण, त्या दिवसापासून कंबोडियन जनतेच्या आयुष्यातील सर्वांत भीषण काळाला सुरवात झाली होती. त्या काळात ३० लाख लोकसंख्या असलेले फुनाम पेन्ह हे शहर ४८ तासांत रिकामे करण्यात आले. या सर्व शहरवासीयांना बळजबरीने खेड्यांकडे नेण्यात आले. ज्यांनी विरोध केला, त्यांना सरळ ठार केले जात होते. पॉल पॉटने त्याच्या स्वप्नातला कंबोडिया प्रत्यक्षात आणायला सुरवात केली. पॉल पॉटच्या ‘खमेर रूज‘कडे जेमतेम १५,००० सैनिक होते. त्यातही प्रामुख्याने अशिक्षित आणि ग्रामीण भागातील तरुण होते. ‘शहरात राहणारा, शिकलेला, लॉन नूलच्या काळात कोणत्या ना कोणत्या प्रकारे शासनात काम करणारे, शिक्षक, वकील, डॉक्‍टर, इंजिनिअर हे आपले शत्रू आहेत,‘ अशी पॉल पॉटची ‘थिअरी‘ होती. या सर्वांची हत्या करण्याचे पॉटने आदेश दिले. त्यानंतर कोणतीही चौकशी न करता सर्व शिक्षितांच्या हत्या करण्याचे धोरण ‘खमेर रूज‘ने स्वीकारले. त्यामुळे सर्वसामान्य जनता आपली ओळख लपवायला लागली. पण त्याचा फार काही फायदा झाला नाही. एखाद्याकडे पुस्तक सापडणे, हादेखील त्याच्या शिक्षित असण्याचा पुरावा गृहीत धरला जात असे. त्यामुळे लोकांनी आपापली पुस्तके लपवली, जाळली. चष्मे असणाऱ्यांनी आपले चष्मेही फेकून दिले. पण त्यानंतर चष्मा घातल्याने नाकावर उमटणाऱ्या खुणांद्वारे शिक्षित असल्याचा निष्कर्ष काढून लोकांना ठार करण्यास ‘खमेर रूज‘ने सुरवात केली. १९७५ ते १९७६ या एका वर्षात शहरांत राहणारे जवळपास दोन लाख नागरिक मारले गेले. ‘खमेर रूज‘ने देशाच्या सर्व सीमा बंद केल्याने या कालावधीत कुणीही देशातून बाहेर पळून जाऊ शकत नव्हता. विमानतळ, बस, रेल्वे या सगळ्या सेवा पूर्णपणे बंद केल्या होत्या. मारल्या गेलेल्यांचा दोष एकच.. त्यांना लिहिता-वाचता येत होते किंवा ते शहरात राहत होते.
‘खमेर रूज‘च्या काळात पॉल पॉटने सर्व प्रकारच्या उत्सवांवर बंदी घातली होती. प्रेम, भावना आणि धर्माच्या कुठल्याही गोष्टीवर त्याच्या राज्यात बंदी होती. सर्वांना सारखेच कपडे घालण्याची सक्ती होती. हा ‘गणवेश‘ म्हणजे काळा शर्ट, काळी पॅंट आणि लाल मफलर. ‘शिक्षण घेतल्याने आपली विचारसरणी लोकशाही व स्वातंत्र्यास अनुकूल होते,‘ असे सांगत पॉटने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ बंद केले. ‘कंबोडियामध्ये सर्वजण फक्त तांदुळाचीच शेती करतील आणि प्रत्येकाला दिवसभरात दोन वाटी भात असाच आहार मिळेल,‘ असाही आदेश लागू करण्यात आला. ‘खमेर रूज‘च्या राज्यात सर्वजण सकाळी ७ ते सायंकाळी ७ शेतात काम करतील, हा नियम होता. या दिनक्रमात दुपारी एका तासाची सुटी असे. ‘दिवसभरात मिळणारे अन्न खाऊन काम करण्याची ताकद आपल्यात असलीच पाहिजे; अन्यथा मरायला तयार राहा‘ असा वटहुकूमच पॉल पॉटने काढला होता. या व्यवस्थेला विरोध करणाऱ्याची हत्या निश्‍चित होती. सर्वांनी एकत्रच राहायचे, असाही आदेश होता. त्यामुळे वैयक्तिक घर, मालकी हक्क वगैरे गोष्टी पूर्णपणे नामशेष झाल्या होत्या. कंबोडियाचे चलनही पूर्णपणे नष्ट झाले होते. पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या झोपड्यांमध्ये राहायच्या. अशा प्रकारचे अत्याचार सतत चार वर्षे सुरू होते. त्यातच शिक्षित लोक सापडले, की त्यांच्या हत्या करण्याचे सत्रही सुरूच होते. पण या हत्या करण्यासाठी बंदुकीच्या गोळ्या ‘खर्च‘ होत होत्या. त्यावेळी पिकवलेल्या तांदुळाचा मोबदला म्हणून चीनकडून कंबोडियाला शस्त्रास्त्रे मिळत असत. बंदुकीच्या गोळ्या महाग असल्याने ‘मिळेल त्या हत्याराने हत्या करा‘ असा आदेश पॉल पॉटने ‘खमेर रूज‘ला दिला. त्यामुळे ‘खमेर रूज‘च्या सैनिकांनी कुदळ, फावडे, सुरे यांनीही हत्या करण्यास सुरवात केली. ही हत्यारे आजही फुनाम पेन्हमधील वंशसंहाराच्या संग्राहलयात पाहता येतात. यातील बहुतांश हत्या ‘किलिंग फिल्ड्‌स‘मध्ये केल्या जात असत.  
फुनाम पेन्हमधील एक एकराच्या ‘किलिंग फिल्ड‘मध्ये गेल्यावर प्रथम मी घाबरलोच. एरवी स्मशानभूमीत जातानाही आपण थोडा विचार करतो. ही स्मशानभूमी तर २० हजार प्रेतांची आहे आणि या सर्वांना केवळ चार वर्षांतच ठार मारण्यात आले आहे! या ‘किलिंग फिल्ड‘मध्ये एकूण १३ ‘विशेष जागा‘ आहेत. इथे फिरताना आपल्याकडे एक रिमोट दिला जातो. प्रत्येक ‘स्पॉट‘वर गेल्यानंतर या रिमोटने त्या जागेचा क्रमांक दाबला, की ‘रनिंग कॉमेंट्री‘ सुरू होते. प्रत्येक ठिकाणी काय व्हायचे, याचे वर्णन त्यात केले जात असे. तिथे असलेले ‘स्पॉट‘ खालीलप्रमाणे : 
१. ट्रक स्पॉट : ज्यांची हत्या करायची आहे, त्यांना ट्रकमध्ये भरून आणायचे आणि या ‘स्पॉट‘वर उतरवायचे. 
२. डार्क अँड ग्लूमी डिटेन्शन : सहसा येथे दिवसा उजेडी कैद्यांना आणले जात असे. त्यांना रात्री ठार मारले जायचे. दिवसभर त्यांना या अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवले जात असे. 
३. वर्किंग ऑफिस : ज्यांची हत्या होणार आहे, त्यांच्या नोंदी इथे ठेवल्या जात असत. 
४. केमिकल सब्स्टन्स स्ट्रॉंग रूम : मृतदेहांचा वास येऊ नये म्हणून त्यांच्यावर डीडीटी फवारले जात असे. त्याचा साठा या खोलीत असे. 
५. मास ग्रेव्ह १ : या खड्ड्यात ४५० मृतदेह सापडले. 
६. मास ग्रेव्ह २ : या खड्ड्यात १६६ मृतदेह सापडले. 
७. मास ग्रेव्ह ३ : या खड्ड्यात २०० मृतदेह सापडले. 
८. वॉक ऑन द हॉरर लेक : या तळ्यात अनेक मृतदेह फेकले गेले. त्यातील २०० हून अधिक मृतदेह तरंगत होते. तळ्यात असलेले असंख्य मृतदेह अद्यापही बाहेर काढण्यात आलेले नाहीत.
९. आणि १० ग्लास बॉक्‍स १ आणि २ : येथे ठार मारण्यात आलेल्यांचे कपडे होते. 
१०. चायनीज सेरेमोनियल किओस्क 
११. सर्व्हायव्हर स्टोरी 
१२. मास ग्रेव्ह ४ : या खड्ड्यात डोके उडवलेले १५० मृतदेह सापडले
१३. या ‘किलिंग फिल्ड‘मधील हृदय हेलावणारी जागा म्हणजे ‘किलिंग ट्री‘! : माणूस किती नीच पातळीपर्यंत जाऊ शकतो, याचा अनुभव इथे उभे राहिल्यानंतर येतो. तान्ही बाळं, एक-दोन वर्षांच्या मुला-मुलींना मारण्यासाठी या झाडाच्या खोडाचा उपयोग केला गेला. लहान मुलांना मारण्याचेही पॉल पॉटने विचित्र समर्थन केले होते. ‘एखाद्या कुटुंबातील एका व्यक्तीला मारले, तर ते संपूर्ण कुटुंब संपवलेच पाहिजे. ही लहान मुले सोडून दिली, तर भविष्यात ते बदला घेऊ शकतील,‘ अशी त्याची धारणा होती. या झाडासमोरील ‘कॉमेंट्री‘ ऐकताना मी नकळतच रडू लागलो होतो. आतापर्यंत शंभराहून अधिक लहान मुलांचे सांगाडे येथे सापडले आहेत. ‘खमेर रूज‘च्या एका अधिकाऱ्याने २००९ मध्ये न्यायालयात या हत्यांची जबाबदारी स्वीकारली. त्याची कबुली या ‘कॉमेंट्री‘मध्ये ऐकता येते. ते ऐकल्यानंतर ‘तो अधिकारी माणूस तरी असेल का‘ हाच प्रश्‍न मनात येतो. माझे अश्रू थांबतच नव्हते. तिथल्या एका पर्यटकाने मला सावरले.

येथील एका झाडाचे नाव ‘मॅजिक ट्री‘ आहे. याला असे का म्हटले जाते, हे समजले नाही. ‘खमेर रूज‘चे सैन्य रात्री हत्या करत असे, तेव्हा ‘ग्लूमी डार्क रूम‘मध्ये डांबून ठेवलेल्यांना किंचाळण्याचा आवाज ऐकू जाऊ नये, म्हणून या झाडावर ध्वनिवर्धक टांगून ‘खमेर रूज‘च्या ‘वैभवशाली‘ परंपरेचे गीत मोठ्या आवाजात लावले जात असे. ‘कॉमेंट्री‘मध्ये ते गीत सुरू झाले, तेव्हा छातीत धडकीच भरली. 
शेवटचा ‘स्पॉट‘ म्हणजे ‘मेमोरियल स्तूप‘! उत्खननामध्ये सापडलेले मानवी सांगडे, कवट्या, हाडे हे सर्व काचेच्या एका उंच कपाटात ठेवण्यात आले आहे. त्यात पुरुष, स्त्रिया, लहान मुले, त्यांना कोणत्या पद्धतीने ठार करण्यात आले अशा विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वेक्षणानुसार, त्या चार वर्षांमध्ये दर चार कंबोडियन नागरिकांपैकी दोघे मारले गेले. 
ही भयानक ‘किलिंग स्पॉट्‌स‘ बघितल्यानंतर मी पॉल पॉटचा खासगी तुरुंग पाहण्यास गेलो. इथे कैद्यांचा अमानुष छळ केला जात असे आणि तेथून ‘किलिंग फिल्ड्‌स‘मध्ये पाठविले जात असे. इथे एक विचार सतत मनात येतो.. आपल्याच देशातील नागरिकांचा बळी घेणाऱ्या ‘खमेर रूज‘च्या सैनिकांची माणुसकी चार वर्षांसाठी इतक्‍या खालच्या थरास कशी गेली? आतापर्यंतच्या वाचनानुसार, माझे मत असे होते की जर्मनीत हिटलरने केलेला नरसंहार हा ठाऊक असलेल्या सर्वांत मोठा आणि भयानक होता. पण कंबोडियात पॉल पॉटने केलेला संहार हिटलरपेक्षा कैकपटीने मोठा आणि भीषण होता. या संहारामध्ये ज्यांनी मारले आणि मेले ते एकाच देशाचे नागरिक होते. त्यांचा धर्म, भाषा, त्वचेचा रंग, संस्कृतीही वेगळी नव्हती. फरक एवढाच, की मारले गेले ते शिकलेले होते आणि ज्यांनी मारले ते अशिक्षित. मी स्वत: व्यवसायाने शिक्षक असूनही पहिल्यांदाच असे वाटले, की शिक्षणानेही आपला जीव जाऊ शकतो. त्या काळात कंबोडियातील जनता शिकली नसती, तर कदाचित त्यांचे जीव वाचलेही असते, हा विचारही तरळून गेला. आयुष्यात प्रथमच मला अशिक्षित असण्याचा ‘फायदा‘ जाणवत होता.
(क्रमश:)
 
 

- सकाळ (पैलतीर)
दि. ०८/०४/२०१५, बुधवार
 
   

Thursday, April 16, 2015

संपानंतरच्या गिरणगावाचा कुलूपबंद दस्तावेज! - मंगेश कदम

http://images.loksatta.com/2015/03/lok012.jpg
१९९७ साली आम्ही 'निनाद' संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेत 'वंश' नाटक सादर केलं होतं. लेखक म्हणून जयंत पवारचा आणि दिग्दर्शक म्हणून माझा पूर्ण लांबीचं दोन अंकी नाटक करण्याचा तो पहिलाच प्रयत्न! हे नाटक प्राथमिक आणि अंतिम दोन्ही स्पर्धेत पहिलं आलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे राज्य नाटय़स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं 'निनाद'चंसुद्धा 'वंश' हे पहिलंच नाटक. त्यामुळे आमच्या संस्थेत चैतन्याचं वातावरण होतं. अभिनंदन आणि शाबासकीने आम्ही चिंब झालो होतो. जयंत पवार आणि माझ्याकडून संस्थेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. जयंत मात्र या सगळ्यात तटस्थ होता. एवढं यश मिळूनही आपल्याला जे लिहायचं नव्हतं तेच आपण लिहून बसलो, असं काहीतरी तो बडबडायचा.
मध्यंतरी नामदेव ढसाळांशी जयंतची भेट झाली होती. 'तू टॅलेन्टेड आहेस. शार्प लिहितोस. पण असलं काही मध्यमवर्गीय लिहू नकोस. हे मिड्ल क्लास कल्चर आपलं नाय. आपलं कल्चर वेगळाय..' असं काहीतरी ते म्हणाल्याचं जयंत आम्हाला सांगायचा. आम्हाला ते काही कळत नव्हतं. आम्ही यशात, पाटर्य़ा करण्यात दंग होतो. आणि जयंत अस्वस्थ! त्यानंतर जवळजवळ तीन वर्षे जयंतनं काहीच लिहिलं नव्हतं.
जयंतच्या मागे नवीन नाटक लिहून देण्यासाठी आमचा तगादा चालूच होता. पण तो काही दाद देत नव्हता. मी शक्कल लढवली. माझ्या अशोक शिरगोपीकर नावाच्या मित्राची अंधेरीच्या डी. एन. नगरमधली जागा रिकामी होती. म्हणजे त्याचं लग्न होईपर्यंत ती आमच्यासाठी रिकामी असणार होती. त्याचं मुली बघणं सुरू होतं. दर रविवारी तो स्थळ बघायला जायचा. येऊन 'मुलगी पसंत पडली नाही' असं सांगायचा. आम्ही खूश व्हायचो. आणखी काही दिवस राहायची हमी मिळायची. तर त्या जागेमध्ये महिन्याभरासाठी जयंतने राहायचं आणि छान नाटक लिहून द्यायचं- असा प्लॅन होता. जेवणासाठी समोरच्या 'आरती' हॉटेलची कूपन्स त्याला दिली होती. लेखकाला आणखी काय पाहिजे?
मी काही दिवसांनी त्याला भेटायला गेलो आणि धास्तावलोच. नाटकाची एक ओळही लिहिली नसल्याचं जयंतनं सांगितलं. योगायोगाने त्याच दिवशी आमचा मित्र प्रकाश जाधव सहज आम्हाला भेटायला आला होता. आमची त्या दिवशीची गोची ऐकून थोडासा विचार करून प्रकाश म्हणाला, 'तू तुझ्या 'वाळवी' एकांकिकेचा विचार का करीत नाहीस? तिच्यात नाटकाचं पोटेन्शियल आहे. ते तुझ्या भोवतालचं आहे.. तुझ्या अनुभवातून आलंय. ज्यात तुझा परिसर आहे. त्याचा नाटकासाठी का विचार करीत नाहीस?' एवढंच बोलून प्रकाश थांबला नाही, तर त्याने 'वाळवी'ची झेरॉक्स कॉपीही आणून दिली. जयंतने ती वाचून काढली आणि जयंत एखाद्या भोवऱ्यात घुसावा तसा भसकन् त्यात घुसला. गरगरत आत आत जात राहिला. त्याला आता नाटक सुचायला.. दिसायला लागलं होतं. त्या दिवशी जयंतने नवीन रायटिंग पॅड विकत घेतलं. ही ९० सालातल्या ऑगस्टची गोष्ट आहे.


पण ते नाटक पूर्ण व्हायला १९९६ साल उजाडलं. म्हणजे तब्बल सहा वर्षांचा काळ! जयंतसाठी हा काळ फार खडतर होता. 'वाळवी'चं 'अधांतर' होताना खूप बदल होत गेले. जवळजवळ चार खर्डे झाले. यात 'वाळवी'तल्या धुरी कुटुंबातले पॅरॅलिसिसने आजारी असणारे आणि घरातल्या पार्टिशनच्या मागच्या कॉटवरून ओरडणारे, कण्हणारे मरणासन्न बाबा वारले. एकांकिकेतल्या अविवाहित मंजूचं नाटकात युनियन लीडर राणेबरोबर लग्न होऊन संपामुळे ती परत धुऱ्यांच्या घरात येऊन राहू लागली. खरं तर 'धुरी' ही आडनावाची आयडेंटिटी कुटुंबाला नाटकातच मिळाली. आईला सावर्डेकर मामी, मंजूला चित्रा आणि मोहनला सावर्डेकर मामीचा मुलगा राकेश (हा रंगमंचावर येत नाही!) अशा काऊंटर इमेजेस उभ्या राहिल्या. राणेंच्या मार्फत गिरणीतलं युनियनचं राजकारण नाटकात आलं. शेवटच्या ड्राफ्टनंतर तर आम्हाला परळची 'लक्ष्मी कॉटेज' स्पष्टच दिसू लागली. जयंतने परळचा भौगोलिक परिसर जसाच्या तसा नाटकात आणला. 'साहित्य म्हणजे भौगोलिक-सामाजिक दस्तावेज असतो,' असं नेमाडे म्हणायचे. 'मराठी साहित्यातून मुंबईचं खरं दर्शन होतच नाही,' असं दिलीप चित्रे म्हणायचे. जयंतने के. ई. एम. हॉस्पिटल, डोळ्यांचं बच्चूभाई हॉस्पिटल, परळ नाक्यावरचा गौरीशंकर छितरमल मिठाईवाला, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय असे स्थळ-काळाचे, साहित्यातल्या वादांचे संदर्भ नावं- तपशिलांसकट नाटकात आणले. हा परिसर जसा स्पष्ट दिसायला लागला तशी भाषाही लालबाग-परळच्या बोलीची वैशिष्टय़ं घेऊन तपशिलात यायला लागली. आता प्रत्येक पात्राचा वेगवेगळा आवाज ऐकू येत होता.
नरूच्या रूपाने तर एक मोठं सामाजिक वास्तवच नाटकात आलं. नरू हा बेकार आणि छोटी-मोठी लफडी करत आता अंडरवर्ल्डच्या वाटेवरून निघालेला तरुण. भूमिपुत्राचा जो एक अ‍ॅरोगन्स असतो, तो नरूमध्ये आला. (उस्मान बैदेवाल्याबरोबरचा राडा!) मोहनला क्रिकेटचं वेड. त्याची खेळण्याची जिगर आणि हौस मोठी. पण बॉलच्या काँट्रिब्युशनसाठी द्यायला त्याच्याजवळ पैसे नाहीत, त्यामुळे चाळीतल्या टीममध्ये त्याला घेत नाहीत. नरूला त्याचा 'राडा' आहे, बाबाला त्याचं 'साहित्य' आहे, मंजूला वाण्याचा पोरगा आहे; पण मोहनला काहीच नाही. तो एका जागी जखडला गेला आहे. ती त्याची नियती आहे. मुक्ती तशी कोणालाच नाही; पण मुक्ती न मिळण्याच्या शेवटच्या पायरीवर मोहन आहे.
आईपासून नरूपर्यंत प्रत्येकजण आपल्या बोलण्यातून आपलं स्पेसिफिक जग उभं करत असेल तर बाबाने का जनरल बोलावं? आपल्याकडे नाटकातून चुकून लेखकाचं कॅरेक्टर आलंच, तर तो जीवनावर वगैरे जड, अलंकारिक आणि जनरल बोलतो. 'अधांतर'मधील बाबा थेट आणि आरपार बोलतो. तो साहित्यावर चर्चा करतो. पु. शि. रेगे, आरती प्रभू, ग्रेस, दिलीप चित्रे, नेमाडे यांच्यावर बेछूट शेरेबाजी करतो. त्यात उसना आवेश आहे; पण एक ठसठसही आहे. बाबा भंपक असेल, पण खोटा नाही. त्याचा भंपकपणाही खरा आहे. आतापर्यंत नरूची भाषा जाणवण्याइतपत वेगळी होती; पण आता बाबा आणि मोहनच्या भाषेतला फरकही कळायला लागला. राणे मोहनपेक्षा वेगळं बोलेल- हे लक्षात आलं. आई आणि मंजूच्या तोंडी 'ऊठ'ऐवजी 'ऊट', 'प्रयत्न'ऐवजी 'प्रेत्न' असे शब्दोच्चार येणं- इतकं तपशिलात भाषेवर काम झालं. राणेच्या भाषेत मिलच्या सांकेतिक शब्दांचा वापर होऊ लागला. 'आऱ्या झाला रे, आऱ्या झाला सगळ्यांचा!' असा राणे आक्रोश करतो. आऱ्या म्हणजे सत्यानाश! मिलमध्ये खात्यात काम करताना ह्युमिडिटीत बिघाड होऊन बॉबिनच्या तारा तुटल्या आणि काम ठप्प झालं की त्याला 'आऱ्या झाला' म्हणत. सगळ्याचाच आऱ्या होणं, हे जणू नाटकाचं सूत्रच होऊन गेलं.
जयंताची आणि माझी दोस्ती 'निनाद' संस्थेमुळे झाली. विजय मोंडकर, जयवंत देसाई, प्रेमानंद गज्वी, रघुनाथ मिरगळ, प्रकाश गद्रे, देवीदास फेणाणी, देवदास मासावकर ही सर्व 'निनाद'ची मंडळी बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी सांभाळून नाटकासाठी जिवाचं रान करत होती. संध्याकाळी सहा वाजता ऑफिस सुटलं की ही मंडळी 'विजयदीप' या बी. पी. टी.च्या फोर्टमधल्या बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर कॅन्टीनमध्ये जमायची. तिथेच तालमी होत. कॅन्टीनचा मालक शेट्टी आम्हाला चहा-नाश्ता देई. (बऱ्याचदा फुकट!) 'निनाद'ची सगळी नाटकवाली मंडळी मध्यमवर्गीय- कनिष्ठ मध्यमवर्गीय. गिरणगावातून आलेली. त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, विषय सारखे असत. त्यामुळे त्यांना एकमेकांबरोबर सुरक्षित वाटत असे. मलाही या मंडळींत रुळायला फार वेळ लागला नाही. माझं जरा जास्त सख्य झालं ते जयंतबरोबर. जयंत कविता करायचा. अंधेरी ते व्ही. टी. ट्रेनमध्ये टाइमपास म्हणून मी एस. एम. काशीकर, गुरुनाथ नाईक, बाबुराव अर्नाळकरांची पुस्तकं वाचायचो. जयंतकडे भाऊ पाध्ये, नेमाडे, चित्रे, रेगे, खानोलकर, दळवी, तेंडुलकरांची पुस्तकं असायची. तो ती मला वाचायला द्यायचा. 'महानिर्वाण', 'घाशीराम', 'छबिलदास'ची ओळख जयंतमुळेच झाली. रिहर्सल संपली की मंडळी गप्पा मारत व्ही. टी. वा चर्चगेट स्टेशन गाठायची. मग तिथून वेगवेगळे ग्रुप मार्गी लागत. मी, जयंत, देवदास मासावकर, प्रकाश पेटकर, विश्वास म्हात्रे, वसंत आंजर्लेकर, जन्या सावर्डेकर हा ग्रुप लोअर परळला उतरत असू. पुन्हा गप्पांना ऊत. शेवटच्या गाडीपर्यंत पाव-भाजीच्या गाडीवर नाटक, सिनेमा, पुस्तकं, राजकारणावर खूप गप्पा. मग धावतपळत शेवटची गाडी पकडून घरी. बऱ्याचदा ती चुकायची. (की चुकवायची?) मग मी कधी विश्वास म्हात्रेकडे, कधी आब्याकडे प्रभादेवीला चाळीच्या गॅलरीत झोपायचो. पहाटे उठून घरी! सकाळी आब्याची आई चहा द्यायची, खायला द्यायची. पुढे आंतर-गिरणी स्पर्धेत मी नाटकं-एकांकिका बसवायचो तेव्हाही बऱ्याचदा प्रभादेवीला राहायचो. हळूहळू मी त्यांच्या घरातलाच एक झालो. 'काय रे, बरेच दिवस आमच्याकडे येऊक नाय. आवशिक इसारलंस की काय? आता जेऊनच जा,' असं आब्याच्या आईनं फर्मावलं की संपलंच सगळं! हे सविस्तर सांगायचा उद्देश एवढाच, की मी अंधेरीला डी. एन. नगरमध्ये राहत असलो तरी माझा जीव गुंतला होता तो याच 'निनाद'च्या मित्रांत आणि पर्यायाने लालबाग-परळ एरियात! 'अधांतर'बरोबर माझी नाळ जोडली गेली होती ती अशी!
नाटक  लिहून पूर्ण व्हायच्या प्रोसेसमध्ये खूप घडामोडी घडल्या. आम्ही मित्रमंडळी आपापसात  नाटकाचे वाचन करायचो. पुनर्लेखनात बराच काळ चालला होता. राजीव नाईक माझा चांगला मित्र. त्याच्यासमोर मी 'अधांतर'चा आधीचा ('अजगर' या दीर्घाकाच्या स्वरूपातला) ड्राफ्ट वाचला. राजीवला नाटक आवडलं. पण त्याला ते कुठंतरी अपुरं वाटत होतं. मलाही तसं वाटत होतं. मी जयंतला तसं म्हटलं, 'घाई नको करूस. अजून विचार कर.' तर तो माझ्यावर चिडला. पण मला माहीत होतं- तो माझ्यापेक्षा स्वत:वरच चिडायचा.
एक दिवस जयंतचा फोन आला- 'मला असं वाटतंय, की नाटक आता पूर्ण झालंय. वाचू या.' मी खूश. नाटकाचं वाचन झालं. मला भयानक डिप्रेशन आलं. त्यानंतर तीन-चार दिवस मला 'अधांतर'शिवाय काहीच सुचेना. आता लवकरात लवकर हे रंगभूमीवर यायला हवं, हा एकच ध्यास लागून राहिला. एखाद्या अनुभवी लेखकाला नाटक वाचून दाखवावं असं मला वाटलं. रत्नाकर मतकरींचं घर हक्काचं! एक दिवस त्यांच्याकडे मी नाटक वाचलं. कमलाकर नाडकर्णीही होते. त्यांना खूप आवडलं. 'तुम्ही छबिलदास वगैरेला का करता? हे तुम्ही व्यावसायिकवर करा. तिथे हा विषय चालेल,' असं त्यांचं मत झालं. मी लगेच 'सुयोग'च्या सुधीर भटांकडे नाटक वाचून दाखवलं. ते उलट म्हणाले, 'हे व्यावसायिकवर अजिबात चालणार नाही. नाटक बरं आहे; पण धंद्याचं नाही. तुम्ही 'छबिलदास'ला करताय तेच ठीक आहे.' पुन्हा फुस्स झालं. दरम्यान, वामन केंद्रेनेही सुचवलं, 'हे व्यावसायिकवरच करा.' त्याने चंद्रकांत राऊत या निर्मात्याचं नावही सुचवलं. त्यांच्याकडे वाचन झालं. राऊत तयार झाले. पण एका अटीवर : 'नाटकात शिव्या आहेत, त्या कापा.' पण मी मात्र या शिव्यांबद्दल आणि त्याच्या इम्पॅक्टबद्दल जराही साशंक नव्हतो. त्यावेळेपुरतं मी 'नंतर बघू' असं म्हणून तो विषय संपवला आणि 'श्रीचित्र चित्रलेखा' या संस्थेतर्फे नाटक उभं राहण्याची प्रक्रिया सुरू झाली.
आईच्या भूमिकेसाठी ज्योती सुभाषचं कास्टिंग पहिल्या ड्राफ्टपासून पक्कं झालं होतं. ज्योती उंचीने लहान. आईच्या खांद्यावर अख्ख्या घराची जबाबदारी. घरासाठी तिची अखंड धडपड. त्यातून तिला आलेलं नैराश्य. त्यातून सावरायचा तिचा आटोकाट प्रयत्न. आईचं हे मोठेपण तिच्या छोटय़ा दिसण्यातून प्रभावीपणे ठसायला मदत झाली. संजय नार्वेकरने स्क्रिप्ट वाचली. त्याला ती आवडलीही. आणि भूमिकाही. नरूच्या काही क्वालिटीज् संजयमध्ये आधीच होत्या. विशेषत: त्याची आक्रमकता! भरत जाधव मोहनच्या बाबतीत जरा साशंक होता. त्याचंही बरोबर होतं. संहितेत त्याच्या वाटय़ाला वाक्यं फार कमी होती. मी शांतपणे त्याला मोहनच्या भूमिकेचा 'आवाका' समजावून सांगितला. त्याने माझ्यावर विश्वास ठेवून होकार दिला. आता कधी भरत भेटला आणि 'अधांतर'चा विषय निघाला की मला मिठीच मारतो. त्याच्या प्रत्येक मुलाखतीत 'अधांतर'चा उल्लेख असतोच. लीना भागवत परफेक्ट मंजू! तालमीत तिचे उच्चार ब्राह्मणी आले की मी खालून फक्त 'भागवत' असं ओरडायचो, की लीनाला कळायचं. बाबा किशोर कदम करणार होता, पण त्याला नाही जमलं. अविनाश नारकरही काही दिवस तालमीला आला, पण त्याला त्याचदरम्यान सुयोगचं 'प्रेमपत्र' हे नाटक मिळालं. कुणीतरी राजन भिसेचं नाव सुचवलं. राजन भिसे? मला प्रश्न पडला. त्याचं दिसणं, त्याची भाषा? पण त्याच गोष्टी त्याचं कास्टिंग पक्कं करायला कारणीभूत ठरल्या. बाबाचं घरातलं तुटलेपण, त्याची स्वत:ला घरापासून वेगळं मानायची वृत्ती, आणि राजनचं त्या भावंडांतलं वेगळं दिसणं- (नाटकाच्या उत्तरार्धात तो आईच्या चारित्र्यावर संशय घेतो.) हे सगळं एकात एक मिसळून गेलं आणि मी निर्धास्त झालो. राणे आणि बटरच्या भूमिकेत अनिल गवस आणि आशीष पवार आमचे घरचेच. 'निनाद'वालेच. सविता मालपेकरने दिसणं आणि मालवणी भाषेवरच्या हुकमतीच्या जोरावर सावर्डेकर मामी ठसक्यात उभी केली. प्रदीप सुळेचं नेपथ्य आणि अशोक पत्कींचं पार्श्वसंगीत लालबाग-परळच्या गल्लीत नेऊन सोडायचं.
२ ऑगस्ट १९९७ रोजी दुपारी ४ वाजता ठाण्याला गडकरी रंगायतनमध्ये 'अधांतर'चा पहिला प्रयोग झाला. अप्रतिम झाला. ज्या गोष्टीची निर्मात्याला भीती होती- नाटकातल्या शिव्यांबद्दल- ती फोल ठरली. शिव्या कुणालाही खटकल्या नाहीत. उलट, शिव्यांमुळे आलेल्या इम्पॅक्टबद्दल प्रेक्षक भरभरून बोलत होते. नाटकाचा शेवटचा पडदा पडला. प्रेक्षागृहात काही काळ भीषण शांतता! मग टाळ्यांचा आवाज. त्याही तुरळक. मला कळेना, नाटक प्रेक्षकांना आवडलंय की नाही? पण नंतर रंगपटात भेटायला आलेल्या सुन्न झालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकून मी निर्धास्त झालो. नाटकाच्या शेवटाचा इतका परिणाम व्हायचा, की लोक थिजून जायचे. परिस्थितीमुळे कोंडी झालेल्या या माणसांबद्दल त्यांना कमालीची काळजी वाटायची. समूहाने नाटक पाहणारा प्रेक्षक बाहेर पडताना एकेकटा होऊन बाहेर पडायचा. अंतर्मुख व्हायचा. मनात गिरणगावाबद्दल अपार करुणा आणि आपण या समजाचा भाग असूनही काही करू शकलो नाही, याची हतवीर्यता त्यांच्या बोलण्यातून जाणवायची.
अमोल पालेकरांनी नाटक बघितलं आणि मला व जयंतला घरी बोलवून नाटकावर खूप चर्चा केली. 'मी शिवाजी पार्कला राहिलो. पण पंधरा मिनिटांच्या अंतरावर पलीकडे नायगावात जाऊन तिथल्या लोकांचं जगणं पाहिलं नाही याचा गिल्ट मला आला. तिथे एवढं भयानक आणि विदारक घडत होतं, हे माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवलंत. हे नाटक नाही, तर गिरणगावच्या संपानंतर झालेल्या डिझास्टरचं डॉक्युमेंटेशन आहे,' असं ते म्हणाले. नाटय़निर्माते शांताराम शिंदे आणि समीक्षक अशोक राणे यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात 'अधांतर'वर परिसंवाद आयोजित केला. तुडुंब भरलेल्या त्या सभागृहात विजय तेंडुलकर म्हणाले, 'हे नाटक नाही, हॅपनिंग आहे. जागतिक पातळीवर मी अनेक नाटकं पाहिली; पण 'अधांतर'सारखं मला काही दिसलं नाही. त्यामुळे हे नाटक जागतिकच आहे.' २००५ साली नामदेव ढसाळांनी मुंबईत भरवलेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य परिषदेत निमंत्रित परदेशी साहित्यिकांसाठी 'अधांतर'चा खास प्रयोग रवींद्र नाटय़मंदिरात आयोजित केला होता. गिरणी कामगार संघर्ष समितीतर्फे संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त प्रमुख संघटक दत्ता इस्वलकरांनी 'अधांतर'च्या खास प्रयोगाचं आयोजन केलं. १९९९ साली पहिलं विद्रोही साहित्य संमेलन मुंबईत भरलं होतं. त्याला महाराष्ट्रभरातून आलेली आणि नाटक पाहून सुन्न झालेली तरुण विद्रोही मंडळी तडक आंबेडकर कॉलेजच्या वसतिगृहात गेली. तिथे एका रूममध्ये त्यांनी उत्स्फूर्तपणे 'अधांतर'वर परिसंवाद घेतला. अध्यक्षस्थानी कवी तुळशी परब होते. किशोर ढमाले, राजू कोरडे, संभाजी भगत असे सोळा-सतराजण पहाटेपर्यंत 'अधांतर'वर चर्चा करीत होते.
'अधांतर' नाटकाला त्यावर्षीचे महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांसह ४८ पुरस्कार मिळाले. हा विक्रम अजूनही अबाधित आहे.
'हे मिड्ल क्लास कल्चर आपलं नाय, आपलं कल्चर वेगळंय..' नामदेव ढसाळांनी जयंतला दिलेला हा सल्ला आठवतोय. 'जे तुझं आहे, तुझ्या भोवतालचं, तुझ्या परिसराचं आहे, त्यावर लिही,' असं प्रकाश का म्हणत होता? 'वंश' राज्य नाटय़- स्पर्धेत पहिलं येऊनही कमलाकर नाडकर्णीनी लिहिलं होतं, 'या यशात 'निनाद'वाले आनंद मानत असतील तर ते नर्मदेचे गोटे आहेत असे समजावे.' त्यांनी असं का म्हटलं होतं, ते आता कळतंय. तेव्हा जिंकूनही आम्ही पराभूत झालो होतो का? 'अधांतर'च्याच एका परिसंवादात संजय पवार यांनी 'अधांतर'मधल्या 'बाबा'च्या पराभूततेतलं बोचरेपण नेमकं दाखवलं होतं. 'कामगार वा खालच्या वर्गातल्या अशा संवेदनशील आणि सृजनशील मुलांची ट्रॅजेडीच होते. ते जर स्वत:ला सिद्ध करू शकले नाहीत तर ते एकटे पडतात. कारण घरचे त्यांना कधीच समजून घेऊ शकलेले नसतात. त्यामुळे त्यांचं अपयशही त्यांना समजत नाही. त्यांना कुणाचाच आधार उरत नाही. ते एकटे पडतात. सिनिक होतात. उलट, हाच 'बाबा' जर ब्राह्मण वा उच्चवर्णीय असता तर त्याचं फसणं, त्याचं अपयश त्याच्या समाजात, कुटुंबात समजून घेतलं गेलं असतं आणि त्याला व्यवस्थेत सामावून घेतलं गेलं असतं. पण 'अधांतर'मधल्या बाबाला ती सोय नाही.'
'वंश'नंतर 'अधांतर' करताना आम्हालाही ती सोय नव्हती.
'अधांतर'मध्ये मी इतका का गुंतलो होतो? 'अधांतर'च्या तालमी सुरू होणार त्याचवेळी सुधीर भटांनी मला 'एका लग्नाची गोष्ट'ची ऑफर दिली होती. प्रशांत दामले-कविता लाडसारख्या कलाकारांनी या नाटकात काम करायचं नक्की झालं होतं. त्यामुळे नाटकाला व्यावसायिक यशाची शंभर टक्के हमी असताना मी सुधीर भटांना ठामपणे सांगितलं होतं.. 'नाही! मी 'अधांतर' आधी करणार.' मला वाटतं, मी या नाटकात इमोशनली गुंतलो होतो. यातल्या बाबा, मोहन, नरूमध्ये मी स्वत:ला आयडेंटिफाय करत होतो. या नाटकाच्या काही घटना मी जगलोय. या कुटुंबाची जी अवस्था झाली, जी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली, ती त्यांनी निर्माण केली होती का? नाही. भोवतालचं राजकीय, सामाजिक, आर्थिक वातावरण याला जबाबदार आहे. मिलच्या संपामुळे झालेलं डिझास्टर! आज अंडरवर्ल्डमध्ये गेलेल्या त्या तरुण मुलांचा काय ठावठिकाणा आहे? माणसा-माणसांत निर्माण झालेला दुरावा, नात्यांतलं तुटलेपण, फक्त स्वत:चा विचार करायला लावणारी अप्पलपोटी वृत्ती हा सगळा या अस्थिर वातावरणाचा परिणाम आहे.
गिरणगावातले माझे काही मित्र या भीषण संपामुळे संपले. काही निर्वासित झाले. काही गावाला गेले. काही लढत राहिले. या सगळ्यांचा दस्तावेज आज 'अधांतर'च्या रूपात कुलूपबंद आहे.

- लोकसत्ता , लोकरंग (नव्वदोत्तरी नाटकं)
दि. २२/०३/२०१५, रविवार

Wednesday, April 8, 2015

मराठी अभिमानगीत

मराठी अभिमानगीत 

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी

आमुच्या मनामनांत दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरांत स्पंदते मराठी
आमुच्या नसानसांत नाचते मराठी

आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यांत रांगते मराठी
आमुच्या मुलांमुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरांत वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथेल्या फुलाफुलांत हासते मराठी
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते  मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून डोलते मराठी
येथल्या चराचरांत राहते मराठी

गीतकार - सुरेश भट
संगीतकार - कौशल इनामदार

माऊली माऊली

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा

दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा
लेऊनि तुळशी माळा गळा ह्या, पाहसी वाट त्या राऊळा
आज हारपलं देहभान, जीव झाला खुळा बावळा
पाहण्या गा तुझ्या लोचनांत भाबड्या लेकरांचा लळा

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली

पुंडलिक वरदे हारि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय

गीतकार - गुरू ठाकुर
गायक - अजय गोगावले
संगीतकार - अजय-अतुल
चित्रपट - लय भारी (२०१४)

Monday, April 6, 2015

नाही 'भारतरत्न' तरी.. - गिरीष कुबेर

ही कहाणी आहे आपल्या सोयीस्कर स्मरणशक्तीची.. आपण सहजपणे विसरून गेलोय त्या केशव देव मालवीय यांची! सध्या 'भारतरत्न' पुरस्कारामुळे अनेकांच्या कानावर ज्यांचं नाव पडलं असेल ते पंडित मदन मोहन मालवीय, हे या केशव देवांचे काका. नरेंद्र मोदी यांना अलाहाबादमधून लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव पहिल्यांदा मांडणारे गिरिधर मालवीय हे पं. मदन मोहन यांचे नातू. पं. मदन मोहन यांनी 'बनारस हिंदु विश्वविद्यालया'ची स्थापना केली. पण केशव देव मालवीय यांचं काम तितकंच; किंबहुना त्यापेक्षाही मोठं आहे. त्यांच्या कामात हे असं हिंदु वगरे काही नसल्यानं बहुधा आपल्याला त्यांचा विसर पडला असावा. पण त्यांची आठवण जागवायला हवी..
ही १९५१ सालची घटना. पहिली पंचवार्षिक योजना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी जन्माला घातलेली. पण तिचं गणित बिघडणार हे अगदी सुरुवातीलाच लक्षात आलं. कारण- तेलाच्या किमती. त्या काळी आपले हातपायसुद्धा हलवू न लागलेल्या अर्थव्यवस्थेत तेलासाठी २० कोटी रुपये वर्षांला खर्च करायला लागायचे. सगळे परकीय चलनातले. आपल्या त्या वेळच्या आयातीतला १५ टक्के खर्च एकटय़ा तेलाच्या आयातीवर व्हायचा. तो वाचवायचा तर एकच पर्याय होता- भारतात तेलसाठे शोधणं!

१९५६ साली 'बर्मा ऑइल' नावाच्या कंपनीला नहारकटिया आणि मोरान इथं तेलसाठे सापडले. त्याआधी तीन वर्षं 'स्टॅण्डर्ड व्हॅक्यूम ऑइल' कंपनीनं आसामात तेल उत्खनन सुरू केलं होतं. ही कंपनी म्हणजे पुढे जिचं नाव 'एस्सो' असं झालं ती! पण तरीही भारतात म्हणून तेल उत्खनन, शुद्धीकरण वगरे कामाला काही गती येत नव्हती. याचं कारण या कंपन्या. त्या आपापल्या मूळ कंपन्यांकडूनच तेल भारतात आणायच्या आणि आपल्या गळ्यात मारायच्या. या वातावरणात भारतात तेल उत्खननाचं महत्त्व पहिल्यांदा एका व्यक्तीनं जाणलं; ते म्हणजे केशव देव मालवीय!
केशव देवांना राजकारणात ओढलं मोतीलाल नेहरूंनी. केशव देव उच्चविद्याविभूषित. घरचं वातावरण हरिकथा निरूपकांचं. त्यांचे आजोबा आदी सर्व उत्तम प्रवचनकार होते. संस्कृत पंडित होते. मदन मोहन यांनाही तसंच प्रवचनकार व्हायचं होतं. पण केशव देव यांचं तसं नाही. ते त्या काळात रसायन अभियांत्रिकीचे पदवीधर होते. त्यामुळेच पंडित नेहरूंनी त्यांना नैसर्गिक साधनसंपत्ती आणि विज्ञान खात्याचं मंत्रिपद दिलं. एव्हाना मदन मोहन मालवीय आणि काँग्रेस यांचे संबंध तुटले होते. काँग्रेसच्या खिलाफत धोरणाविरोधात मदन मोहन होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि माधव श्रीहरी अणे यांच्या साथीनं 'काँग्रेस नॅशनलिस्ट पार्टी'ची स्थापना केली. पण त्यात काही त्यांना यश आलं नाही. १९३७ सालीच त्यांनी राजकारण सोडलं.
.. मंत्री झाल्यावर केशव देवांनी पहिल्या दिवसापासून ध्यास घेतला तो भारतात तेल उत्खनन हाती घेण्याचा. त्यांच्याच आग्रहामुळे 'जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया'च्या अखत्यारीत पेट्रोलियम विभाग स्थापन केला गेला. भूगर्भात कुठे कुठे खनिज तेल आहे हे शोधायचं काम या विभागाकडे होतं. हे झाल्यानंतर मालवीय यांनी पुढची पाच र्वष देशाचा तेल उत्खननाचा कार्यक्रम तयार केला. पण तो राबवणार कोण? म्हणून मग हा केंद्रीय मंत्री देशभरातल्या विद्यापीठांना भेटी देऊ लागला; तरुण अभियंत्यांनी मोठय़ा प्रमाणावर या क्षेत्रात यावं यासाठी! त्यांनी शब्दश: युद्धपातळीवर तरुण अभियंते नेमले, २५० रुपयांच्या मासिक शिक्षणभत्त्यावर. काम वाढू लागल्यावर त्यांच्या लक्षात आलं की नुसतं जिऑलॉजिकलवर अवलंबून चालणार नाही. तेल उत्खननासाठी स्वतंत्र खातंच हवं. तसं ते स्थापन व्हावं यासाठी त्यांनी जातीनं पं. नेहरूंच्या मागे धोशा लावला. परंतु पंतप्रधान नेहरू दडपणाखाली होते.हे दडपण होतं अमेरिकी आणि ब्रिटिश तेल कंपन्यांचं. भारतात औषधालासुद्धा तेल सापडणार नाही, सबब भारतानं आमच्याकडूनच तेल घेत राहावं असा या कंपन्यांचा आग्रह होता. हे दोन देश कमी म्हणून की काय जागतिक बँकेनंही पंतप्रधानांना सल्ला दिला, 'तेल उत्खननात पडू नका. भारताला ते परवडणार नाही.' पं. नेहरू हा दबाव झुगारून देण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना साथ होती केशव देवांची. १९५९ साली स्थापन झालेली 'इंडियन ऑइल रिफायनरी' हा याच प्रयत्नांचा भाग. अमेरिका, ब्रिटन या दोन्ही देशांचे तज्ज्ञ भारतात तेल निघणारच नाही, असं सांगत असताना एन. ए. कालिनन नावाचे एक विख्यात भूगर्भशास्त्रज्ञ भारतात आले. ते रशियन होते आणि त्यांनी यावं यामागे प्रयत्न होते केशव देवांचे. या पथकानं भारतात पाहणी करून सल्ला दिला, 'नद्यांच्या खोऱ्यात उत्खनन हाती घ्या.. तेल सापडेल.' पण सरकारचा काही त्यावर विश्वास बसेना. त्यामुळे अमेरिकी आणि जर्मन अशा दोन तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा निर्णय झाला. या दोघांनीही सांगितलं की, तुमच्या देशात अजिबात तेल नाही. आश्चर्य हे की आपल्या नियोजन आयोगाचे सदस्यही याच मताचे होते. त्यांना वाटायचं आपल्याकडे तेल शोधणं म्हणजे वेडेपणा!
केशव देव मालवीय त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. पं. नेहरूंच्या मागे या संदर्भातली भुणभुण काही त्यांनी थांबवली नाही. शेवटी त्यांच्या आग्रहामुळे एक विभाग स्थापन केला गेला- 'ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस डायरेक्टोरेट'. १४ ऑगस्ट १९५६ या दिवशी या संस्थेच्या नावातलं डायरेक्टोरेट गेलं आणि कमिशन आलं- 'ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कमिशन'. म्हणजेच आजची 'ओएनजीसी'. मुख्य कार्यालय डेहराडून. हिमालयाचा पायथा, जेसलमेरचं वाळवंट, गुजरात, आसाम आदी ठिकाणी या विभागानं तेल उत्खनन सुरू केलं. प्रचंड नसíगक अडचणी. राजस्थान, गुजरातेत तर काम करताना 'खालून आग वर आग आग बाजुनी..' अशी स्थिती. धुळीची वादळं, अति ऊन, विंचू वगैरे.. याउलट आसामात काम करणाऱ्यांच्या पाचवीला दलदल आणि दलदलीबाहेर शरीरावर हल्ला करणारे राक्षसी डास. सोयी म्हणाल तर काहीही नाहीत. ही तरुण पोरं त्या वेळी चौदा-चौदा तास झपाटून काम करायची. प्रेरणा एकच- केशव देव मालवीय! त्यांच्या रेटय़ामुळे उत्खननाचं काम होतं राहिलं. केशव देव इतके झपाटलेले होते की देशभरच काय, जगात जिथं कुठे मदत मिळेल तिथून ती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असे.
अखेर गुजरातेत १९६० सालच्या जानेवारी महिन्यात अंकलेश्वर इथं एका विहिरीला तेल लागलं. पण ते हाताळायचं कसं, याचा काही अनुभव नव्हता आपल्या अभियंत्यांना. या तेलाआधी वायूचा असा काही झोत जमिनीतून बाहेर आला की आपले चार अभियंते आभाळातच फेकले गेले. तरीही काम थांबलं नाही. अखेर पुढच्या महिन्यात तिथून तेलगंगा वाहू लागली. तिचं स्वागत करायला थेट पंडित नेहरू आले. मालवीय यांनी या कामी किती वाहून घेतलंय हे ते पाहात होते. अडचणी, अपघात आणि आता हा अखेर तेलाचा झरा.. 
ती वाहणारी तेलगंगा पाहून पंडित नेहरूंनी त्या जागेला नाव दिलं - 'वसुधारा'. 'ओएनजीसी'च्या सर्व इमारतींचं नाव आजही 'वसुधारा' आहे ते त्यामुळे. नंतर १९७३ साली मुंबईजवळच्या समुद्रात तेल सापडलं. 'बॉम्बे हाय' नावानं ओळखल्या जाणाऱ्या तेलविहिरी त्या याच. जपानच्या मित्सुबिशी कंपनीनं त्यासाठी साधनसामग्री बनवून दिली. ही आपली पहिलीच सागरी तेल विहीर. त्यामुळेही असेल तिच्या खोदकामाचा आपला अंदाज चुकला. तेल काही निघेना. त्यामुळे मुंबईतल्या एका बडय़ा दैनिकानं त्या वेळी या साधनसामग्रीचा उल्लेख भंगार असा केला आणि हा प्रयत्न निरुपयोगी आहे हे सूचित केलं. वर्षभरानंतर ही तेल विहीर स्थिर झाली आणि तिच्यातून तेल वाहू लागलं. त्या वेळी त्या वर्तमानपत्रास खडसावण्याचं धाडस दाखवलं ते केशव देव यांनीच, मंत्री नसतानाही!
ते एव्हाना मंत्री नव्हते, कारण एका कथित प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला. कहाणी अशी, की परदेशी तेल कंपन्यांनीच त्यांच्याविरोधात कुभांड रचलं. एका खाणमालकानं काँग्रेसच्या उमेदवारासाठी १० हजार रुपयांची देणगी द्यावी अशी विनंती म्हणे मालवीय यांनी केली होती. मालवीय यांच्या स्वदेशी ऊर्जाकारणामुळे अनेक बडय़ा परदेशी कंपन्या दुखावल्या गेल्या होत्या. त्यांचा धंदा बुडाला होता. त्यामुळे त्यांच्या वतीनं हे कुभांड रचलं गेलं. त्यातलं खरं-खोटं कधीच सिद्ध झालं नाही. पण माध्यमांनी त्याचा खूप बभ्रा केला. त्यामुळे अखेर पंडित नेहरूंना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. ही घटना १९६३ सालची. 
म्हणजे तेल कंपन्यांच्या साठमारीचा इतिहास हा असा जुना आहे. जयपाल रेड्डी, त्याआधी मणिशंकर अय्यर वगरे तेल कंपन्यांनी घेतलेले बळी अलीकडचे. असो. पण या सगळ्यांपेक्षा केशव देवांचा मोठेपणा हा की मंत्रिपद गेलं तरी ते भारतीय तेल उत्खनन क्षेत्राच्या विस्तारासाठी कार्य करत राहिले. शेवटपर्यंत.. त्याचमुळे 'बॉम्बे हाय'वर परदेशी तेल कंपन्याप्रेरित टीका जेव्हा झाली; तेव्हा मंत्रिपदी नसतानाही त्यांना ती लागली आणि त्यांनी वर्तमानपत्राला आपले शब्द मागे घ्यायला लावले. तेव्हा केशव देव मालवीय हे भारतीय ऊर्जा क्षेत्राचे पितामह आहेत. त्यांचं आपण सदैव ऋणी राहायला हवं.
पण या स्मरणाचं आताच प्रयोजन काय?
कारण गेल्याच आठवडय़ात केंद्रीय तेलमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या कल्पनेतून साकार झालेला 'ऊर्जासंगम'. निमित्त होतं 'ओएनजीसी'च्या 'ओएनजीसी विदेश' या कंपनीच्या सुवर्ण महोत्सवाचं! इराण, इराक या देशांत तेलशुद्धीकरणाच्या कामाचा विचार आपण त्या वेळी केला होता, हे लक्षात घ्यायला हवं. खेरीज, 'इंडियन ऑइल'च्या १९६४ साली स्थापन झालेल्या बरौनी इथल्या तेलशुद्धीकरण कारखान्याचाही वाढदिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या 'ऊर्जासंगम'चं उद्घाटन झालं. डॅनियल एरगिनसारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा तेलतज्ज्ञ या सोहळ्यात बोलून गेला. ऊर्जा क्षेत्राचा निरीक्षक या नात्यानं 'ऊर्जासंगम'चं खास निमंत्रण होतं आणि त्याआधी तेलावर विविध पुस्तकं लिहिताना हा सर्व इतिहास कुठे ना कुठे भेटला होता. पण 'ऊर्जासंगम'च्या निमित्ताने तो ढवळून वर आला. या संगमात भारतातल्या ऊर्जा क्षेत्रासमोर पुढे काय वाढून ठेवलंय, तेलाची मागणी किती वाढणार आहे, आपण काय करायला हवं वगरे सर्व ऊहापोह झाला. हे छानच झालं.
खंत तशी एकच..
केशव देव मालवीय काही हवे तसे समोर आले नाहीत.
गेल्याच आठवडय़ात 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान केला गेला. मदन मोहनांच्या नातवांनी तो स्वीकारला. त्यानिमित्ताने मदन मोहन यांचं कार्यकर्तृत्व समोर आलं. तेही महत्त्वाचंच; पण आपल्यासारख्या ऊर्जांधळ्या समाजाला 'भारतरत्न' न मिळालेल्या दुसऱ्या मालवीयांचंदेखील स्मरण करून देणं आवश्यक वाटलं; इतकंच!

- लोकसत्ता (लोकरंग, लेख)
दि. ०५/०४/२०१५, रविवार

Wednesday, April 1, 2015

नामयाचे नेटवर्किंग! - रवि आमले

कोणत्याही संताची दोन चरित्रे असतात- धार्मिक आणि सामाजिक. धार्मिक चरित्रात त्या संताचे काव्य आणि त्याच्या कथा, अध्यात्म आणि चमत्कार हे असते. साहजिकच ते लोकप्रिय असते. जनमानसावर त्याचाच पगडा असतो. पण संतांचे अध्यात्म हे काही आभाळातून पडलेले नसते. म्हणजे, त्याच्या भक्तांना तसे वाटत असले तरी ते तसे नसते. अखेर कोणत्याही धर्माची, धर्मसंकल्पनांची मुळं ही भौतिक परिस्थितीत असतात. संतांच्या अध्यात्माचा उगमही आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीतून होत असतो. या अर्थी त्याचे अध्यात्म हे त्याचे 'पॉलिटिक्स' असते. जसे ते संत ज्ञानदेवांचे होते. नामदेवांचेही होते. नामदेवांचे हे 'पॉलिटिक्स' तर अधिक स्पष्ट आहे; अगदी समर्थ रामदासांच्या इतके! 
यंदाचे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबातल्या घुमान येथे होत आहे. पंजाबी परंपरेनुसार हे नामदेवांच्या समाधीचे गाव आहे. मराठी परंपरा नामदेवांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या महाद्वारी समाधी घेतल्याचे सांगते; आणि ते अधिक इतिहासास धरून आहे. पण येथे प्रश्न श्रद्धेचा असतो. त्यांच्या शीख भक्तांच्या मते, बाबा नामदेवजींनी गुरुदासपूर जिल्ह्यातल्या घुमानमध्ये देहत्याग केला. त्यांच्या स्मरणार्थ तेथे बाबा नामदेवजीका गुरुद्वारा उभारण्यात आला आहे. गावातल्या घराघरांत बाबा नामदेवजींची तसबीर आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला हे माहीत असण्याचे तसे काहीच कारण नाही. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नामदेवांच्या चरित्रातील ही गोष्ट सर्वपरिचित झाली, हे एक बरे झाले. संमेलनाचे बाकी काही नसले, तरी हे एक फलित सांगता येईल. एक मात्र खरे, की नामदेवांचे हे पंजाब नाते तसे महाराष्ट्राला पूर्वीपासूनच माहीत आहे. शिखांचा धर्मग्रंथ गुरुग्रंथसाहिब. त्यात नामदेवांची ६१ पदे आहेत हा तर आपल्या अभिमानाचा विषय असतो; पण तेवढेच. बाकी मग नामदेवांचे सामाजिक चरित्र आपल्याला फार काही ज्ञात नसते. 'नामदेवजी की मुखबानी' म्हणून प्रसिद्ध असलेली पदे 'गुरुग्रंथसाहिब'मध्ये असणे, मुळात त्यांनी िहदी, पंजाबीत तशी पदे करणे ही केवढीतरी मोठी गोष्ट आहे, हेच मुळात आपल्या ध्यानी आलेले नसते. संतांची चरित्रे अनेक चमत्कारांनी भरलेलीच असतात. बालनामदेवाच्या हट्टापायी विठ्ठलाने स्वत: येऊन नवेद्य खाणे, मारवाडातल्या वाळवंटातली विहीर नामदेवांनी पाण्याने भरणे किंवा मेलेली गाय जिवंत करणे, असे चमत्कार नामदेवांच्या चरित्रातही येतात. तशातलाच हा एक चमत्कार अशी एक भावना असते. पण हा चमत्कार नाही. पंजाबीत पदे रचणे ही नामदेवांनी जाणीवपूर्वक केलेली एक कृती आहे. त्यांचे सामाजिक चरित्र पाहिले की ही बाब स्पष्ट होते आणि ते पाहण्यासाठी आधी तो काळ समजून घेतला पाहिजे.
नामदेवांचा जन्म १२७०चा. त्यांच्या नंतर पाच वर्षांनी ज्ञानदेव जन्मले. हे दोघेही समकालीन. दोघेही मराठवाडय़ातले. देवगिरीच्या यादवांच्या राज्यातले. नुकतेच आमणदेव या आपल्या चुलतभावाचे डोळे काढून, त्याला कारावासात टाकून रामदेवराय याने देवगिरीचे राज्य ताब्यात घेतले होते. हा मोठा कर्तापुरुष. दक्षिणेत अधिराज्य स्थापन केल्यावर त्याच्या फौजांनी थेट बनारस जिंकले होते. नामदेव साधारण २२ वर्षांचे होईपर्यंतची ही सगळी धामधूम होती. एकंदर यादवसत्ता तेव्हा वैभवाच्या शिखरावर होती. परंतु हेमाद्रीच्या 'चतुर्वर्गचिंतामणी'ने राज्यात धुमाकूळ घातला होता. या ग्रंथातील ३६५ दिवसांसाठीच्या दोन हजार कर्मकांडांनी सामाजिक जीवनाला वेढून टाकले होते. पुरोहितशाहीचे वर्चस्व अतोनात वाढले होते आणि उत्पादकवर्ग मातीत चालला होता. ज्ञानेश्वरीत 'कुळवाडी रिणे दाटली' असा उल्लेख येतो. वैभवाच्या शिखरावर फक्त सत्ताधारी वर्गच होता. आज ९०० वर्षांनीही त्यात फारसा फरक पडलेला नाही, हे एक विशेष. एकीकडे समाजजीवनाला विळखा घालून बसलेली, वैदिक परंपरेशी पुनरपि नाळ जोडून घेतलेली ब्राह्मणशाही हे तेव्हाचे एक वास्तव होते. त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रात महानुभाव संप्रदाय वाढत होता. बौद्ध धर्म कमकुवत झाला होता, पण जैनमत प्रभावी होते. हे दुसरे वास्तव आणि त्याच वेळी िहदुस्थानात इस्लामी धर्माच्या आक्रमणाखाली येथील राजसत्ता नामशेष होत चालल्या होत्या- हे तिसरे वास्तव. या तिन्ही वास्तवांनी ज्ञानदेवांप्रमाणेच नामदेवांचेही सामाजिक चरित्र आकाराला आले आहे.
यादवांच्या काळात ब्राह्मणी धर्माचे बळ वाढलेले दिसत असले तरी त्यातच सामाजिक ऱ्हासाची चिन्हेही दिसत होती. समाजातील सर्वात मोठा- जो खालचा स्तर तो नाडलेला होता. महानुभाव आणि जैनांहून अत्यंत बलिष्ठ असे सुफी इस्लामचे आव्हान निर्माण झाले होते. यातून निर्माण झालेला सामाजिक विस्कळीतपणा दूर करणे आणि सनातन धर्मावरील आक्रमण परतवून लावणे हा ज्ञानदेवांच्या गीतेवरील टीकेचा हेतू दिसतो. त्यांची ही समाज सांधण्याची आकांक्षा त्यांच्या अद्वैताच्या मांडणीतून स्पष्टच दिसते. ही मांडणी अर्थातच अध्यात्मापुरती मर्यादित राहिली. सामाजिक समतेच्या बाबतीत ज्ञानेश्वरी 'जैसे थे'वादीच राहिली. मात्र स्त्री, शूद्र आणि पापीही अंत:करणपूर्वक भक्ती करील तर तो मोक्षाचा अधिकारी बनू शकतो, ही गीतेची भूमिका मांडून त्यांनी पुरोहितशाहीविरोधात मोठीच क्रांती केली. ज्ञानदेवांच्या या तत्त्वज्ञानाने भागवतधर्माला नवी उभारी दिली. सुतार, लोहार, महार, मांग, कुंभार, चांभार, परीट, न्हावी, भाट, तेली, गुरव आणि कोळी हे १२ बलुत्ये आणि तांबोळी, साळी, माळी, घडशी, तराळ, सोनार, िशपी, गोंधळी, रामोशी, खाटीक, डावऱ्या आणि कळवंत हे १२ अलुत्ये यांच्यातूनच पुढे संत चळवळ फोफावली, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. नामदेव जातीने िशपी होते. जनाबाई दासी होत्या. नरहरी सोनार, सेना न्हावी, गोरा कुंभार, सावता माळी, बंका तसेच चोखा महार होते. हे ज्ञानेश्वरीचे कार्य होते आणि या धर्मचळवळीचे नेते नामदेव होते. पंढरपूर हे तिचे केंद्र होते. ईश्वराच्या कल्पनेचे लोकशाहीकरण ही चळवळीची भूमिका होती.
यानंतर नामदेवांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना येते- ती तीर्थाटनाची. ज्ञानेश्वरांच्या आग्रहाखातर त्यांनी काही संतमंडळींसमवेत तीर्थाटन केले. ज्ञानेश्वर-नामदेवांबरोबर त्या यात्रेत अन्य कोण होते याचा उल्लेख नाही. पण तेथून आल्यानंतर पंढरपुरात जी जेवणावळ झाली तिला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, सावता माळी, नरहरी सोनार, चोखामेळा, बंका महार, गोरा कुंभार ही मंडळी असल्याचे 'तीर्थावली'तून दिसते. हे नामदेवांनी उभारलेले जाळे होते. महाराष्ट्र, गुजरातमधील तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यानंतर ते उत्तरकडे गोकूळ, वृंदावन, मथुरा, काशी, प्रयाग असे करत पंजाबात गेले. हे साधे तीर्थाटन नव्हते. त्या त्या भागातील धार्मिक चळवळींना दिशा देणारी अशी ही मार्गदर्शन यात्रा होती. ती भक्तिसंप्रदायाची प्रचार मोहीम होती आणि इस्लामच्या धार्मिक आक्रमणाविरोधातील एल्गारही होता, हेही ध्यानी घेतले पाहिजे.
अल्लाउद्दीन खिलजी या तुर्काने १२९६ मध्ये देवगिरीचा पाडाव केला, पण त्याआधी अनेक वर्षे इस्लामचा धोका स्पष्ट दिसत होता. तेराव्या शतकाच्या प्रारंभी शहाबुद्दीन घोरीच्या दुसऱ्या आक्रमणाच्या वेळी त्याच्यासोबत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे सुफी संत दिल्लीला आले होते. तेथून त्यांनी अजमेर हे आपले केंद्र बनविले. भारतातील इस्लामच्या प्रचाराचे मोठे श्रेय त्यांना जाते.
दक्षिणेपुरतेच बोलायचे झाल्यास याच कालखंडात सुफी समरस्त हा सुफी संत गुलबर्गा जिल्ह्यात शहापूरला स्थायिक झाला होता. त्याने तेथील राजास ठार मारून जम बसवला होता. वऱ्हाडात मंगळूरपीर येथे हयात कलंदर हा सुफी संत वास करून होता. त्याने तेथील राजाला मारून अनेकांना इस्लामची दीक्षा दिली होती. इस्लामचा प्रभाव एवढा वाढत चालला की पुढे गुरुदेव दत्ताने फकिराच्या वेशात भक्तांना दर्शन दिले, या कथेत कोणाला काही वावगे वाटेनासे झाले. नामदेवांच्या चळवळीपुढे हे सुफींचे मोठे आव्हान होते. उत्तर हिंदुस्तानात तर ते अधिक कठीण होते.
ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर नामदेव पुन्हा िहदुस्थान यात्रा करण्यास जातात हे येथे लक्षणीय आहे. ते दक्षिणेत गेले. गुजरात, सौराष्ट्र, सिंध, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल या भागांत बराच काळ राहिले. तेथील भाषा शिकले. त्यांचे साहित्य आणि व्यक्तित्व यांचा त्या त्या प्रदेशांतील लोकांवर पडलेला प्रभाव अजूनही दिसतो. दक्षिणेतील दर्जी ही जात स्वत:ला नामदेव म्हणवून घेते. भूसागर आणि मल्ला या जातींनी नामदेव हे पर्यायी नाव घेतले आहे. राजस्थानातील छिपा दर्जी स्वत:स नामावंशी छिपा दर्जी असे म्हणू लागले आहेत. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे नामदेवांची मंदिरे आहेत. त्या काळातील व नंतरच्या रोहिदास, धना, तुलसीदास, कबीर, मीराबाई, नरसी मेहता या संतांच्या वाङ्मयातून त्यांचा नामोल्लेख येतो. पंजाबात तर ते अठरा वष्रे राहिले. १३५० साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर १०९ वर्षांनी नानक येतात. आणि तब्बल २३१ वर्षांनी- १५८१ मध्ये शिखांचे पाचवे गुरू अर्जुनसिंह यांच्या काळात ग्रंथसाहेबची निर्मिती सुरू होते. या ग्रंथात नामदेवांची ६१ पदे येतात, यावरूनच त्यांच्या स्मृती किती गडद होत्या हे लक्षात यावे.
आता समाजमनात कुणाचा आठव असा जागृत असणे याचा अर्थ सामाजिक कृतज्ञतेमध्येच शोधावा लागतो. बाबा नामदेवजींबाबत शीख समाजात जी भक्ती आहे ती त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे. ती प्रेरणा वारकरी संप्रदायाची होती, आध्यात्मिक समतेची होती आणि सामाजिक आत्मविश्वासाची होती. नामदेवांच्या मुखबानीतील काही पदे यासंदर्भात पाहण्यासारखी आहेत. 'मैं अंधुले की टेक तेरा नाम खुन्दकारा' (संसारात अंध झालेल्या माझ्यासारख्या दीन माणसाला हरिनाम हाच एक आधार आहे.) हा विचार कर्मकांडांचे जोखड झुगारून देण्याचा होता. 'हिंदू पुजे देहुरा, मुसलमान मसीत, नामा सोई सेविया, जहाँ देहुरा ना मसीत' (हिंदू देवळात, मुसलमान मशिदीत पूजा करतात. परंतु मी जिकडे ना देऊळ आहे ना मशीद अशा ठिकाणी पूजा करतो.) हा विचार िहदू आणि मुसलमान यांच्या देवस्थानांना आव्हान देणारा होता. नामदेवांच्या चरित्रकथांपैकी एक कथा अशी की, मुसलमान होण्यासाठी सुलातानाने त्यांना विवश केले असते. त्यांची आई घाबरते. 'रुदन करै नामेकी माई, छोडी राम कीन भजन खुदाई' अशी तिची स्थिती. तेव्हा नामदेव म्हणतात, 'न होऊ तोर पूंगडा न तू मेरी माई,पिंडु पडै तऊ हरिगुन गाई.' समाजातील वरिष्ठ वर्ग जेव्हा मुस्लीम सत्तेच्या पायाशी जाऊन बसलेला होता तेव्हा शूद्रातिशूद्र वर्गाला आत्माभिमान देण्याचे हे काम होते. मध्ययुगीन कालखंडात जेव्हा सगळ्याच प्रेरणा धार्मिक असतात तेव्हा सगळ्या लढायाही धार्मिकच असतात. नामदेवांची लढाई एकाच वेळी 'चतुर्वर्गचिंतामण्योक्त' ब्राह्मणी धर्म आणि आक्रमक इस्लाम यांच्या विरोधातील होती. नामदेवांनी त्यासाठीची भुई तयार केली. त्याकरिता चळवळ उभारली. पंजाबातही नामदेवांना बहोरदास, लध्धा, विष्णुस्वामी, केशव कलधारी, जाल्लो तथा जाल्हण सुतार असा शिष्यगण मिळतो, ही गोष्ट येथे महत्त्वाची आहे.
नामदेवांच्या या सगळ्या कार्याच्या मुळाशी त्यांचे माणसांशी संवाद साधणे, जगी ज्ञानदीप लावणे हे होते. परप्रांतात जाऊन त्यांनी तेथील भाषा आत्मसात केली. तीही इतकी की त्यात साहित्य प्रसवण्याएवढी! नामदेवांच्या नावावर सुमारे सव्वाशे हिंदी पदे आहेत. तेथे जाऊन त्यांनी त्या लोकांमध्ये धर्मजागृती केली. त्यांचे जगणे किमान सोपे केले आणि ते शब्दांच्या माध्यमांतून केले. हे पाहिले की मग त्या शब्दांना वजन किती असेल ते लक्षात येईल. शिवाय हे सर्व त्यांनी तेराव्या-चौदाव्या शतकात केले आहे. त्याआधी महाराष्ट्रातील राजे बनारसपर्यंत जाऊन आलेले आहेत. पठण हे क्षेत्र तेव्हाही दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध होते. माणसांचे जाणे-येणे आणि विचारांचे आदानप्रदान होत होते. नामदेवांचे वैशिष्टय़ हे, की त्यांनी जाईल तेथे माणसांचे नेटवर्क उभारले, लोकांस चळवळीस लावले. असे करणारा मराठी मातीतील हा पहिलाच पुरुष म्हणावा लागेल. त्यांच्यानंतरचा असा महामानव महाराष्ट्रात जन्माला येण्यास मग थेटच १६३० हे साल उजाडावे लागले. त्यानंतर मग टिळक, आंबेडकर, सावरकर, विनोबा अशी एक फळी येते. पुढे मात्र सारे शांत.
स्वातंत्र्योत्तर काळात या भूमीने संपूर्ण देशाला काही विचार देण्याचे, विचारांवर प्रभाव पाडण्याचे काम जवळजवळ बंदच केले असे म्हणावे लागेल. म्हणजे, 'महाराष्ट्र मेला तर राष्ट्रगाडा चालणार नाही,' हा एल्गाराचा उद्गार नसून जणू या भूमीला मिळालेले सदासर्वकाळचे वरदान आहे असे आपण समजत राहिलो आणि झोपी गेलो असेच हे प्रकरण होते. एखादे शरद जोशी त्यांचा 'इंडिया विरुद्ध भारत' हा विचार घेऊन देशभरातील शेतकरी चळवळीला तत्त्वज्ञान देतात. एखादे खांडेकर, तेंडुलकर, सारंग वा नेमाडे देशातील साहित्य चळवळींना दिशा देतात. कोलटकर- चित्र्यांसारखे कवी आणि किरण नगरकरांसारखे कथा-कादंबरीकार मराठीसह इंग्रजीतही नवनिर्मिती करतात. 'नामदेवजी की मुखबानी' पंजाबीत आहे. पण तिचे नुसते असणे ही काही फार मोठी गोष्ट नाही. आजकालचे मराठीतले काही खपाऊ साहित्यिकांच्या खपाऊ कादंबऱ्यांचेही अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. पण हा निरा भाषेचा प्रश्न नसतो; तो भाषिक कृतीच्या प्रभावाचा मुद्दा असतो. तेरावे शतक आणि आजचा काळ यांतील दळणवळणाच्या, संपर्काच्या साधनांत किती फरक आहे. आज घरात बसून मत्रविनंत्या पाठवून माणसे जोडता येणे शक्य आहे. त्यासाठी इंटरनेट आहे. आणि तरीही नामयासारखे नेटवर्क साधणे जमण्यापलीकडे गेले आहे. याचे कारण नामदेव हे महामानवच होते, असे म्हणून चालत नसते. याचे कारण आपल्या प्रेरणा आणि बांधीलकींमध्ये, आपल्या 'पॉलटिक्स'मध्ये शोधायचे असते.

- लोकसत्ता (लोकरंग, लेख)
दि. २९/०३/२०१५, रविवार

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...