Tuesday, March 31, 2015

ती पोलादराणी

वैयक्तिक खेळामध्ये तेथे मदानात तुम्ही एकटेच असता. स्टेडियमच्या तीव्र प्रकाशझोताखाली आजूबाजूला हजारो प्रेक्षक असतात. समोर तुमचा प्रतिस्पर्धी असतो. परंतु तुम्ही कोणाशीही बोलू शकत नाही. तुमच्या मार्गदर्शकाशीही. तुम्हाला कोणाचीच मदत नसते. सगळा खेळ तुम्हाला एकटय़ालाच खेळायचा असतो. सगळे निर्णय एकटय़ालाच घ्यायचे असतात. आंद्रे आगासी त्याच्या आत्मचरित्रात ज्या एकलेपणाचा उल्लेख करतो ते हेच. त्या प्रचंड दडपणाखाली एखादा क्रीडापटू वैयक्तिक खेळातील सर्वोच्च स्थान संपादन करतो तेव्हा ते यश तेवढेच मोठे असते. सायना नेहवाल - भारताची अव्वल बॅडिमटनपटू - जागतिक क्रमवारीतही अव्वल ठरते, भारतीय खुल्या सुपर-सीरिज स्पर्धेची विजेती ठरते, तेव्हा ते यश देशाने सणासारखे साजरे करावे असेच असते. याची कारणे दोन. एक तर ती मुलगी, या खेळातील असा बहुमान मिळवणारी पहिलीच महिला खेळाडू आहे म्हणून आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे हे यश मिळविण्यासाठी तिने जे कष्ट केले, जो संघर्ष केला तो प्रत्येकालाच प्रेरणादायी ठरावा असा आहे म्हणून. कोणत्याही दोन खेळांची आणि त्यातील यशापयशाची तुलना करता कामा नये. परंतु तरीही विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव झाल्यामुळे सर्व देशावर उगाचच पसरलेल्या उदासीनतेच्या ढगांना हटविण्यासाठी बॅडिमटनमधील तिचे हे यश कामास आले, हेही एक कारण तिच्या विजयाचे ढोलताशे वाजविण्यासाठी पुरेसे आहे. जागतिक महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या देशाच्या नजरेसमोर अधूनमधून असे काही मिरवावेसे आले नाही, तर या देशाची मानसिकता दुभंगत्वाकडेच जाईल. सायनासारख्यांचे यश म्हणून अतिशय महत्त्वाचे ठरते. वर म्हटल्याप्रमाणे हे यश काही सहजी प्राप्त झालेले नाही. सायना बॅडिमटनची फुले उडविते म्हणून तिला फुलराणी म्हटले जाते. पण या फुलराणीचे काळीज पोलादाचे आहे, हे तिने आता सिद्ध करून दाखविले आहे. नाही तर गेल्या वर्षीच्या जूनमधील जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेतील पराभवाने ती संपलीच होती.. म्हणजे तसे तिचे टीकाकार म्हणू लागले होते. सानिया मिर्झाचे टेनिसमध्ये काहीसे असेच झाले होते. दुखापती होत्याच, पण मनावरही काळोख दाटून आला होता. त्या कसोटीच्या क्षणी तिने एक निर्णय घेतला. आपले आजवरचे प्रशिक्षक गोपीचंद यांच्या ऐवजी ती बंगळुरूला प्रकाश पदुकोण अकादमीत विमल कुमार यांच्याकडे धडे घेण्यास गेली. या निर्णयाने तिच्यावर टीकाही झाली. परंतु तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. जागतिक क्रमवारीतील आघाडीच्या खेळाडूंसमोर खेळताना येणारे दडपण झुगारून लावणे हे तिच्यापुढील सर्वात मोठे आव्हान होते. ते किती मोठे होते याचा अंदाज काही दिवसांपूर्वीच झालेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत आला होता. तेथे स्पेनच्या कॅरोलिना मारिनसमोर दुसऱ्या गेमपासून तिचा खेळ जो ढासळला तो सावरलाच नाही. तिच्या मनाने जणू आधीच तो पराभव मान्य केला होता, अशा पद्धतीने ती खेळत होती. खेळ कारकीर्दीच्या या टप्प्यावर कोणताही खेळाडू कोसळूनच गेला असता. सायना सावरली. जिंकली. अव्वल ठरली. आपल्यातले पोलाद तिने सिद्ध केले. तिची ही झुंज, हे यश अन्य कोणत्याही विश्वचषकाहून प्रेरणादायी आहे.

- लोकसत्ता (संपादकीय, अन्वयार्थ)
दि. ३१/०३/२०१५, मंगळवार

Thursday, March 26, 2015


आपण जो मुंबईचा इतिहास वाचतो तो प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी, प्रवासी इत्यादींनी लिहिलेला आहे परंतु ह्या इतिहासात काही गोष्टी नमूद करण्याचे टाळलेले दिसते. कदाचित त्या गोष्टी ब्रिटीशांच्या लेखी तेव्हा महत्वाच्या नसाव्यात. अश्याच गाळलेल्या गोष्टी वाचायचा (reading between the lines)/ समजून घ्यायचा प्रयत्न आजच्या लेखात करीत आहे.
----------
पोर्तुगीज भारतात आले होते ते ख्रिस्ती लोकांच्या आणि मसाल्यांच्या पदार्थांच्या शोधात. त्यामुळे धर्मप्रसार हा प्रमुख अजेंडा आणि समुद्री व्यापारावर वर्चस्व हा दुसरा. ब्रिटिशांसाठीदेखील हिंदी महासागरातील समुद्री व्यापारावरील वर्चस्व महत्वाचे होतेच, परंतु ते वर्चस्व स्थापन करण्यासाठी एक स्वतंत्र base असणे त्याहूनही महत्वाचे होते. आणि तीच संधी कॅथरीना आणि दुसऱ्या चार्लसच्या विवाहाच्या निमित्ताने इंग्रजांना मिळाली… मुंबईच्या इतिहासातील हि कलाटणी देणारी घटना होती कारण इथून मुंबईत 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' ह्या म्हणीचा वारंवार प्रत्यय येऊ लागला. तो असा, म्हणजे मुंबईची मूळ बेटे इथल्या कोळी जमातीच्या मालकीची (hereditary rights), त्यातले बॉम्बे बेट बाहेरून आलेल्या पोर्तुगीजांनी त्यांच्याचसारख्या बाहेरून आलेल्या इंग्रजांना भेट म्हणून देऊन टाकले. आणि पुढे आणखी सात वर्षानंतर इंग्रजांनी बॉम्बे बेट, इस्ट इंडिया कंपनीकडे दिले. ह्या दोन्ही, किंबहुना ह्यानंतर झालेल्या कोणत्याही जागेसंबंधीच्या transactions मध्ये मुंबईतल्या मूळ कोळी जमातीला, ज्यांचा इथल्या जागांवर भारताच्या घटनेतदेखील उल्लेखित केलेला hereditary right आहे, त्यांना सामावून घेतलेच गेले नाही.
इस्ट इंडिया कंपनीकडे बॉम्बे बेटाचा ताबा आल्यानंतर मुंबईतील 'colonial डेव्हलपमेंटला' सुरुवात झाली. हि डेव्हलपमेंट म्हणजे बॉम्बे बेटावरील पोर्तुगुजांनी बांधलेल्या बॉम्बे कॅसल भोवती तटबंदी, जेट्टी, कोठार आणि कस्टम हाउसची निर्मिती. ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही महत्वाच्या नोंदी करून ठेवल्या आहेत त्यात प्रामुख्याने बॉम्बे बेटाचे स्वरूप, इथले 'त्यांच्या' आरोग्यास हानिकारक असे वातावरण आणि इथल्या कोळी गावठाणांबद्दल नोंदी आहेत. त्यातील महत्वाची नोंद म्हणजे इथले वातावरण आणि त्याचा इथे येणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या आयुर्मानावर होणारा विपरीत परिणाम… मुंबईत येउन गेलेल्या ब्रिटीश अधिकारी/ सैनिक इत्यादींचे सरासरी आयुर्मान तीन महिने असल्याचे ह्या नोंदींमध्ये नमूद केलेले आहे. इतके कमी आयुर्मान आणि कमी मनुष्यबळ (कारण सुरुवातीला काही बोटी भरभरून इथे राज्य करण्यासाठी इंग्रज आले नव्हते) बरोबर असताना, इथल्या निर्मिती प्रक्रियेत स्थानिक लोकांची मदत नक्कीच घेतली गेली असावी. नंतरच्या काळातील मुंबईच्या निर्मिती प्रक्रियेतील भारतीयांच्या सहभागाबद्दल नोंदी आहेत. त्याच आधारावर स्थानिक कोळ्यांकडे असलेल्या मुंबई परिसर, अरबी समुद्र आणि समुद्री व्यापारातील इत्यंभूत माहिती तसेच इमारत बांधणी आणि जहाज बांधणी प्रक्रियेतील बरीचशी कामे स्वतःच करण्याचे कौशल्य असे महत्वाचे गुण असताना, सुरुवातीच्या काळात देखील मुंबईच्या निर्मिती प्रक्रियेत इथल्या स्थानिकांचा सहभाग असावा असे अनुमान काढता येईल. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेता येईल ती म्हणजे, ह्या काळात भारतातील इतर मागासलेल्या भागांतून गुलाम म्हणून लोकं नेली जात असताना मुंबई व आजूबाजूच्या परिसरातून धर्मांतर केल्यानंतरही कुणाला गुलाम म्हणून नेल्याच्या नोंदी नाहीत. ह्याचे कारण स्थानिक लोकांकडे असलेल्या कौशल्याचा पोर्तुगीजांना किंवा ब्रिटीशांना इथे पाय रोवण्यात फायदाच झाला.
Reclamation: ब्रिटिशांनी बॉम्बे बेटानंतर साधारण १७व्या शतकाच्या शेवटी माझगाव बेट पोर्तुगीजांकडून मिळविले आणि reclamation द्वारे बॉम्बे बेटाशी जोडले. बॉम्बे आणि माझगाव बेटांमधील reclamation तसे सोपे होते कारण दोन्ही बेटांच्या मध्ये उमरखाडी नावाची कमी खोलीची, ओहोटीच्या वेळी चालत पार करता येऊ शकेल अशी खाडी होती (आजही ह्या भागाचे नाव उमरखाडीच आहे). त्यानंतर टप्प्या-टप्प्याने वरळी, शिवडी, माहिम, ओल्ड वुमन्स आयलंड आणि कुलाबा बेटे मिळविली. ह्यापैकी बॉम्बे आणि वरळी बेटांमधील विस्तीर्ण खाडी बुजवून १७८२ ते १७८४ ह्या दोन वर्षाच्या काळात केलेले reclamation, 'The Great Breach' (म्हणजेच आताचा ब्रीच कॅन्डी भाग) अतिशय महत्वाचे होते, कारण ह्या reclamationमुळे फक्त बॉम्बे, माझगाव आणि वरळी ही तीन बेटेच जोडली गेली नाही तर जवळपास ४०० एकर्सचा भूभाग तयार झाला... ह्या मोठ्या reclamation मुळे ब्रिटीशांसाठी समुद्री व्यापारावरील वर्चस्वासाठी एक base तर तयार झाला पण त्यामध्ये बॉम्बे, माझगाव आणि वरळी बेटांच्या आतील बाजूस असलेल्या कोळीवाड्यांचा हकनाक बळी गेला. समुद्रच न राहिल्यामुळे व्यवसायाचा स्त्रोतच नाहीसा झाला… पुढे जवळपास २०० वर्षे सुरु असलेली मुंबईतील विविध reclamation's हि मुंबईच्या किनारपट्टीशी केलेली negotiations होती, त्यात किनारपट्टी तर बदललीच पण प्रत्येक reclamation बरोबर इथले कोळीवाडे आणि गावठाणे नामशेष होत गेली… तर काही नावापुरती उरली.
१७९६ मध्ये कुलाब्याला cantonment म्हणून घोषित केले गेले आणि इथला कोळीवाडा आक्रसला गेला. १८३८ मध्ये बॉम्बे बेटाशी जोडण्याकरिता कुलाबा कॉजवे बांधला गेला आणि आधीच आक्रसून गेलेला कुलाबा कोळीवाडा विभागाला गेला. आजही कुलाबा कोळीवाडा cantonmentला अगदी खेटून उभा आहे तर कॉजवेमुळे विभागल्या गेलेल्या मुळच्या कुलाबा कोळीवाड्याच्याच एका भागावर आज कफ परेडचा कोळीवाडा किंवा मच्छीमार नगर वसलेले आहे. सात बेटांच्या मुंबईच्या निर्माण प्रक्रियेत अनेक गावठाणे आणि कोळीवाडे नामशेष होत होते त्याला अपवाद फक्त माहीम 'कॉजवे'... १८४५ मध्ये बॉम्बे आणि साष्टी बेटावरील बांद्रा जोडण्याकरिता कुलाबा कॉजवेप्रमाणे माहीम कॉजवेची निर्मिती केली गेली. माहीम कॉजवेच्या निर्मितीसाठी लेडी जमशेटजी जीजीभॉय ह्यांनी उदारहस्ते मदत केली परंतु ती करतानाच त्यांनी 'माहीम काजवे' ह्या वाटेतल्या कोळीवाड्याला धक्का लागणार नाही आणि इथल्या स्थानिक कोळी लोकांना कॉजवेच्या वापरासाठी टोलही भरावा लागणार नाही अशी अट घातली.
एकीकडे reclamationद्वारे मुंबई वसवली जात असतानाच पायाभूत विकासकामे (infrastructural development) देखील वेग घेत होती. आणि ह्या infrastructural development मधील मैलाचा दगड गाठला गेला तो १६ एप्रिल १८५३ साली... मुंबईतील बोरी बंदर ते ठाणे दरम्यान मुंबईतीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली रेल्वे धावली. ३४ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग, सिंध, साहेब आणि सुलतान ह्या तीन स्टीम इंजिन्सच्या सहाय्याने ओढलेली १४ डब्ब्यांची गाडी आणि ठाणे खाडीवरचा ९४० मीटर लांबीचा पुल, हे सगळेच काळाच्या खूप पुढचे होते. पण बोरी बंदर ते ठाणेच का? तसे पहिले तर मुंबईतील पहिली रेल्वे कुठूनही कुठेही धावू शकली असती… पण इथे मागच्याच लेखात लिहिल्याप्रमाणे ठाणे कितीतरी आधीपासून समुद्री व्यापारामुळे समृद्ध होते आणि ब्रिटिशांनी मुंबई वसवायला घेतल्यानंतरही इथल्या व्यवसायावर त्याचा काहीही परिणाम झाला नव्हता. फक्त ठाणेच नाही तर साष्टीवरची पूर्वापार समुद्री व्यापारात असलेली बरीचशी बंदरे १९व्या शतकातदेखील आपले वर्चस्व राखून होती. ती बंदरे आणि व्यापारी मार्ग रेल्वेने जोडणे आणि तिथून पूर्वीच्याच थळघाट आणि बोरघाट मार्गे अंतर्गत भागात जाणे हा त्यामागचा एक प्रमुख उद्देश होता. त्याकरिता ठाण्यानंतर कलिआन (आताचे कल्याण) बंदर रेल्वेने जोडण्याकरिता ठाणे खाडीवर पुल बांधणे क्रमप्राप्त होते. ठाणे खाडी वरचा पुल पार केल्यानंतर साधारण एक किलोमीटरवर पारसिकची टेकडी लागते. ह्या टेकडीवर रेल्वेचे एक artificial तळे आहे (Google earth मध्ये पाहिल्यास हे तळे दिसेल), त्यातल्या पाण्याचा उपयोग स्टीम इंजिन्समध्ये होत असे.
ह्या सगळ्या प्रवासात रेल्वे आणि ठाणे खाडीवरच्या पुलाकडे structural engineering मधले marvel म्हणून पहिले जात असतानाच ह्याच रेल्वेमुळे ठाण्यातला शेकडो वर्षाची समृद्ध परंपरा असलेला चेंदणी कोळीवाडा मात्र कापला गेला आणि दोन भागात विभागाला गेला… to be precise विस्थापित हा शब्द प्रचलित होण्याआधीच मुंबईतले एक एक कोळीवाडे विस्थापित होत गेले… आणि वर लिहिल्याप्रमाणे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' सुरूच राहिले.
क्रमशः

Wednesday, March 25, 2015

जैविक शेतीने भरघोस पीक येऊ शकते - डॉ. राम बजाज

कमी किमतीत अधिक उत्पादन घेण्याच्या लोभामध्ये बहुतेक शेतकरी रासायनिक खताचा आणि कीटकनाशकांचा वापर करीत असतात. त्यामुळे शेतीचे सुरक्षाचक्र कोलमडून परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या परिस्थितीतून वाचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे रासायनिक खताचा वापर न करता शेती करणे. त्यासाठी जैविक खताचा वापर अधिकाधिक केला पाहिजे. "वैयक्तिक पातळीवर मी हा प्रयोग केला आहे. या प्रयोगाने घेतलेले उत्पादन अद्याप शेतात उभे आहे. गव्हाची रोपं चार फुटाहून अधिक उंच झाली आहेत. १०० चौरस फूट जागेत गव्हाच्या ६०० ते ६५० लोंब्या आहेत आणि प्रत्येक लोंबीत ४५ ते ५२ दाणे अस्तित्वात आहेत. सामान्यपणे गव्हाच्या लोंब्यात २५ ते ३० दाणे असतात हे लक्षात घेता मला अधिक उत्पादन मिळणार हे उघड आहे".

हे यश आम्ही जैविक खताचा वापर करून संपादन केले आहे. जैविक खतात असलेल्या अ‍ॅझोटोबॅक्टर व ग्लुकोनेक्टर बॅक्टरमुळे नैसर्गिक अवस्थेत नायट्रोजनला एकत्र करून रोपाच्या मुळापर्यंत पोचविले जाते. रोपाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला प्राणवायू तसेच सायटोकायनीन, अ‍ॅब्सिसिक अ‍ॅसिड, एथिनील ही पोषक द्रव्ये जिबिरीलीन सिंथेसिसद्वारा सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोजची निर्मिती करतात. त्यामुळे रोपांना आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स मिळतात. रोपांचे आरोग्य चांगले राहते. रोपाचे आरोग्य चांगले असले की कीटकांसोबत लढण्याची क्षमता वृद्धिंगत होते. इंडोल अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडमुळे रोपाची मुळं वाढतात. काही वेळातच जीवाणूंची संख्या वाढून ती कित्येक कोटी होते. हे जीवाणू जमिनीला मऊ करतात. त्यामुळे रोपांची मुळं या जीवाणूंना ग्रहण करू लागतात. परिणामी रोपे कमालीची वाढू लागतात.

रेतीत आणि मातीमध्ये अस्तित्वात असलेल्या लाभदायी सूक्ष्म जीवाणूंची वैज्ञानिक पद्धतीने निवड करून त्याचा उपयोग करून आमच्या शेतातच आम्ही जैविक खतांची निर्मिती केली आहे. वातावरणातील नत्रवायू आणि जमिनीतील फॉस्फोरस हे रोपाच्या मुळांपर्यंत पोचविणारे जीवाणू हे जिवंत स्थितीत गायीच्या शेणात असतात. ते शेण, गोमूत्र, जिप्सम, दहा किलो लाल माती, राख, गव्हाची ताजी तीन चार रोपं एकत्र करून ते सगळे रेती आणि मातीच्या मिश्रणात एकत्र करून सात दिवस सडू द्यावेत. अशातऱ्हेने निर्मित जैविक खत पाण्यात मिसळून ते पाणी शेतात उपयोगात आणतात. या जैविक खतात असलेले अ‍ॅसोटोबॅक्टर जीवाणू मातीत मिसळताच ते क्रियाशील होतात. २४ तासात एका जीवाणूपासून कोट्यवधी जीवाणूंची निर्मिती होते. हे जीवाणू गव्हाच्या रोगांसोबत सहजीवन करू लागतात. त्यामुळे वातावरणात असलेल्या नायट्रोजनचे रूपांतर ते नायट्रेटमध्ये करतात. या नायट्रेटचा उपयोग गव्हाच्या तसेच रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या एन्झाईम प्रोटीन, पिगमेंट्स, हार्मोन्स व विभिन्न व्हिटॅमिन्सच्या निर्मितीसाठी तर होतोच पण तो द्रव्ये रोपात मिसळून त्याचा विकास करण्यास मदत करतात. तसेच विविध किटाणूंशी तसेच रोगांशी लढण्याची क्षमता त्या रोपांमध्ये निर्माण करतात. पिकांच्या मुळांपर्यंत नायट्रोजन पोचल्यामुळे त्या रोपांमध्ये आवश्यकतेनुरूप पोषक तत्त्वे ग्रहण करण्याची क्षमता निर्माण होते. परिणामी गव्हाचे दुप्पट उत्पादन मिळू शकते.

बीपासून रोपाची निर्मिती झाल्यावर त्या बियात असलेली पोषक तत्त्वे समाप्त होतात. मग रोपांना पोषक तत्त्वांची गरज भासू लागते. रोपांची जी हिरवी पाने असतात त्या पानांमुळे वातावरणातील कार्बनडाय आॅक्साईड ग्रहण केला जातो. जमिनीतील पाण्यात तो मिसळून रोपांसाठी आवश्यक असलेली पोषक तत्त्वे मुळांच्या माध्यमातून रोपांना मिळू शकतात. रोपांच्या वाढीसाठी व विकासासाठी एकूण १६ पोषक तत्त्वे आवश्यक असतात. ती पुरेशी उपलब्ध झाली नाही तर रोपांची वाढ होत नाही. त्यामुळे रोपांना पोषक तत्त्वांची सतत उपलब्धता मिळायला हवी. अन्यथा गव्हाच्या उत्पादनावर त्यांचा विपरीत परिणाम होतो.

लोह : लोह तत्त्वाची उपलब्धता कमी झाली की रोपं कमजोर होतात. त्यांची वाढ न झाल्याने ती खुजी राहतात. रोपांची पाने पिवळी पडतात. फांद्या झुकायला लागतात. तसेच फळांची झाडे असल्यास ती फळे गळू लागतात.

मँगनीज : याची उपलब्धता कमी झाल्यास रोपाच्या पानावर हिरवे डाग पडतात. हे हिरवे डाग कालांतराने पिवळे होतात तशी रोपांची वाढ थांबते.

ताम्र : ताम्राची उपलब्धता कमी झाल्यास रोपांची नवी पाने सुकतात. त्यांचा रंग बदलू लागतो. शेवटी ती पिवळी होत होत पांढरी पडतात.

आम्ही आमच्या शेतात निर्माण केलेले फॉस्फोरसयुक्त बायोलॉजिकल जैविक खत हे रोपांसाठी अत्यंत आवश्यक आहे. रोपांच्या वाढीसाठी लागणारे फॉस्फोरस ते निर्माण करते. पिकांची फॉस्फोरसची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून डी.ए.पी. निगेटिव्ह चार्जचा प्रयोग करण्यात येतो. हा निगेटिव्ह चार्ज मातीत सुरुवातीपासून उपलब्ध असलेल्या पॉझिटिव्ह चार्जशी मिळून त्यांचा एक प्रकारचा बॉण्ड निर्माण होतो. त्यामुळे पिकांना फॉस्फोरस योग्य प्रमाणात मिळू शकत नाही. परिणामी जमीन कडक होते. पण जैविक खताचा प्रयोग केल्यामुळे जमीन मऊशार होते. या खतातून वेगवेगळे एन्झाइम्स जमिनीत तयार होतात. ते जमिनीत निर्माण झालेला बॉण्ड तोडून टाकतात. त्यामुळे उपयुक्त फॉस्फोरस पिकाच्या मुळाशी पोचण्यात मदत होते. पिकाच्या मुळाशी अ‍ॅन्टीव्हायरस तत्त्वांची निर्मिती होते. त्यामुळे पिकांतील गोडवा वाढण्यास मदत तर होतेच; शिवाय उत्पादनही भरघोस मिळते.

- लोकमत
दि. २५/०३/२०१५, बुधवार

Tuesday, March 24, 2015

कल्याणकारी कर्दनकाळ

राष्ट्र वा देश म्हणवण्यासारखे काहीच सिंगापूरकडे नसताना ली कुआन यू यांनी त्या शहरराज्यवजा देशाची उभारणी केली. प्रेमाऐवजी भीती, स्वातंत्र्याऐवजी प्रगती यांना पसंती देणारा हा नेता जगावेगळा होता.. त्यामुळे त्यांचा मानवी स्खलनशीलपणा उत्तरायुष्यात दिसलाच असला तरी त्यांचे मूल्यमापन पारंपरिक निकषांवर करता येणार नाही..
'दोन शुभ्र घोडय़ांची संतती शुभ्रच असते, वेगळ्या रंगाचे पोर झाल्यास तो एखाददुसरा अपवाद' इतक्या थेटपणे घराणेशाहीचे समर्थन करणारे, विरोधकांना गप्पच करायला हवे असे म्हणणारे, प्रेम आणि भीती यांत मी भीतीला अधिक पसंती देतो, माझी कोणाला भीती वाटलीच नाही तर मी काय साध्य करू शकणार? असे विचारणारे कर्तबगार पण तितकेच वादग्रस्त ली कुआन यू यांचे सोमवारी निधन झाले. स्वातंत्र्य आणि कार्यक्षमता यात महत्त्व असते ते कार्यक्षमतेला, स्वातंत्र्य देऊन काय उपयोग असे त्यांचे मत होते आणि अखेपर्यंत ते बदलले नाही. पण ली कुआन यांच्याबाबत जगाची पंचाईत ही की इतकी एकांगी भूमिका असूनही ली यांना जगाने हुकूमशहा म्हटले नाही. ली यांच्या भूमिकेवर टीका झाली, अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु तरीही जगाने त्यांच्याशी संपर्क तोडला नाही आणि ते जगासाठी क्रूरकर्मा झाले नाहीत. याचे कारण एकच. ते म्हणजे ली यांनी जे काही केले ते स्वत:साठी नव्हते. ली यांच्या प्रत्येक कृतीतून कोणत्याही निकषावर देश असे म्हणवून घेण्यास असमर्थ असलेल्या प्रदेशाची एकेक वीट रचली गेली आणि त्यातूनच सिंगापूर नावाचे आश्चर्य उभे राहिले.
पर्यटक असो वा उद्योगपती वा राजनैतिक अधिकारी असो वा राजकारणी. जो कोणी सिंगापुरात पाऊल टाकतो तो थक्क होऊन परततो. जमीन नाही, पाण्यासारखा साधा जीवनावश्यक घटक नाही, खनिज संपत्तीची बोंब आणि इतकेच काय एकधर्मी वा एकभाषी जनताही नाही. अशा वेळी सिंगापूर हा देश म्हणून उभा राहायलाच नको होता, असे ली म्हणत. पण तो उभा राहिला तो आपण घेतलेल्या कष्टांमुळे असे सांगण्यात ते कचरत नसत आणि आपण आत्मस्तुतीचा धोका पत्करीत आहोत असेही त्यांना वाटत नसे. या माणसाचे सारे आयुष्यच सिंगापूर घडवण्यात गेले. जन्म एका चिनी विस्थापिताच्या पोटी. बालपण काळे धंदे करण्यातच गेलेले. पण तरीही ली यांना शिकायची प्रचंड आस होती आणि अभ्यासातही उत्तम गती होती. त्याचमुळे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी पदव्या घेतल्या. इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांचा परिचय दोन गोष्टींशी झाला आणि दोहोंचीही साथ त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. एक म्हणजे राजकारण आणि दुसरी, पत्नी क्वा गिओक चु. या दोन्हींवर त्यांचे निस्सीम प्रेम होते आणि माझ्या दुसऱ्या प्रेमाने पहिल्या प्रेमाराधनेसाठी उसंत दिली, असे ते म्हणत. क्वा चार वर्षांपूर्वी गेल्या. शेवटची दोन वर्षे त्या आजारी होत्या तर हा आधुनिक सिंगापूरचा जनक दररोज पत्नीच्या उशाशी बसून तिला अभिजात वाङ्मय वाचून दाखवत असे. हे दोघे पन्नाशीच्या दशकात मायदेशी परतले. नंतर पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीची त्यांनी स्थापना केली आणि ते या पक्षाचे तहहयात सचिव राहिले. १९५९ साली त्यांच्या पक्षाला निवडणुकीत बहुमत मिळाले ते अगदी आजतागायत
याचे कारण ली यांची शैली. सिंगापूर घडवणे हे त्यांनी आपले एकमेव ध्येय मानले. त्या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी निवडलेले मार्ग विचित्र होते. सिंगापुरात चिनी, भारतीय आणि मलय नागरिक मोठय़ा प्रमाणावर असतात. तेव्हा तो प्रदेश बहुभाषिक व्हायचा धोका होता. ली यांनी तो टाळला. इंग्रजीचे शिक्षण अनिवार्य केले. आपल्या प्रत्येक नागरिकास उत्तम इंग्रजी बोलता यायला हवे, असा त्यांचा आग्रह होता आणि तो त्यांनी सक्तीने राबवला. नागरिकांनी एकमेकांशी हसतमुखच बोलायला हवे, हा त्यांचा आणखी एक नियम. तसेच त्यांनी देशात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी आणली. च्युईंग गम चघळा, पण थुंकताना दिसलात कोठे तर याद राखा, असा दमच त्यांनी देशवासीयांना देऊन ठेवला होता. शिस्त आणायची असेल तर फटके देण्यास पर्याय नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि तो वारंवार अमलात आणून दाखवला. इतका की आजही सिंगापूरच्या घटनेत जवळपास ४० गुन्हय़ांसाठी जाहीर फटके मारण्याची शिक्षा दिली जाते. शिक्षेखेरीज नियमन व्यवस्थेस पर्याय नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांची जीवनशैली पाश्चात्त्य होती. पण त्यातील उदारता काहीही कामाची नाही, असे त्यांना वाटे. लहानपणी आपणासह अनेकांना शिक्षकांनी शाळेत चांगले बदडून काढले आहे, त्यामुळे काय बिघडले आमचे, असे ते विचारत. त्यामुळे सिंगापुरातील पाश्चात्त्य शाळांत त्यांनी 'छडी लागे'ची परंपरा चालूच ठेवली. सार्वजनिक पातळीवर आपल्या देशवासीयांनी कसे वागावे याच्या काही ठाम संकल्पना त्यांच्या होत्या. त्यामुळे त्यांनी अगदी विधीसाठी स्वच्छतागृहात जाऊन आल्यावर पाणी किती टाकावे याचेही नियम करून दिले. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पातळीवर भ्रष्टाचार होऊ द्यायचा नाही, असा त्यांचा पण होता. तो त्यांनी यशस्वीपणे पाळला. सत्ताधीशांना भ्रष्टाचाराचा मोह होऊच नये यासाठी त्यांनी अभिनव मार्ग पत्करला. तो म्हणजे मंत्री आदींना खासगी क्षेत्राच्या तोडीस तोड वेतन द्यायला त्यांनी सुरुवात केली. देश हा एका कंपनीसारखाच आहे. त्यामुळे तो चालविणाऱ्यास खासगी कंपनीच्या प्रमुखाएवढे वेतन का नसावे, असा त्यांचा प्रश्न होता. ही असली धोरणे राबवायची तर अधिकारास आव्हान असून चालत नाही. ती व्यवस्था ली यांनी केली होती. सर्व प्रकारचा विरोध त्यांनी सढळपणे मोडून काढला. विकसनशील देशांना प्रगतीच्या मार्गाने जावयाचे असेल तर त्यांनी स्वातंत्र्याकडे जरा काणाडोळाच करावयास हवा, असा त्यांचा सल्ला असे. इतक्या अतिरेकी व्यक्तीचे सर्व निर्णय योग्यच होते का? त्यांनाही हा प्रश्न पडे. पण त्याचे उत्तर त्यांनी स्वत:च देऊन ठेवले. नसतीलही माझे काही निर्णय योग्य. पण मी करतो ते सिंगापूरच्या भल्यासाठीच आणि योग्य की अयोग्य ते आम्हीच ठरवणार. इतरांना जे काही वाटायचे ते वाटो, असे त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान होते. अशा विचारांच्या व्यक्तीसाठी प्रसारमाध्यमे ही साहजिकच अडथळा ठरणार. ली यांच्यासाठी अर्थातच ती तशी होती. आपली राजकीय ताकद वापरून त्यांनी कंबरेत वाकावयास लावले नाही असे जगातील एकही बलाढय़ वर्तमानपत्र नाही. प्रसारमाध्यमांना त्यांनी विरोधकांप्रमाणेच नेस्तनाबूत करण्यात धन्यता मानली. आपले पंतप्रधानपद वापरून ते टीका करणाऱ्या वर्तमानपत्रांवर बदनामीचे खटले भरत. ही माध्यमे माझ्या विरोधकांच्या हातातील बाहुले आहेत, असा त्यांचा ग्रह होता. 
ही अरेरावी काही काळ खपते देखील. परंतु सद्दीची साथ काही अमर्याद असत नाही. ली यांना उत्तरायुष्यात याची जाणीव व्हायला लागली होती. आपल्या कुटुंबकबिल्यातच सत्ता राबवल्याचा त्यांच्यावर आरोप होत असे आणि तो रास्तही होता. परंतु तसे म्हणणाऱ्यांना त्यांनी तुरुंगात डांबले. तरीही सत्य पुरून उरतेच. ते म्हणजे त्यांचा एक मुलगा सिंगापूरचा विद्यमान पंतप्रधान. दुसरा सिंगापूर नागरी हवाई खात्याचा प्रमुख. पंतप्रधानपुत्राची पत्नी हो चिंग हे तामासेक या बलाढय़ वित्तसंस्थेची प्रमुख. कन्या डॉ. ली लिंग हे त्या देशाच्या एका वैद्यक सेवेची प्रमुख अणि स्वत: ली यांच्याकडे पंतप्रधानपद सोडल्यानंतरही मंत्र्यांचा मार्गदर्शक हे पद. या सगळ्यामुळे घराणेशाहीचा आरोप झाला तर ते म्हणत, "मी गुणवान असल्यामुळे माझी संततीही गुणवानच असणार. शुभ्र घोडा-घोडीच्या पोटी काळा घोडा कसा निपजेल?"
तर ली हे असे प्रकरण होते. खिजगणतीतही नसलेल्या शहरातून सिंगापूर नावाची बलाढय़ अर्थसंस्था उभी करण्याचे त्यांचे कर्तृत्व विसरून चालणार नाही. परंतु अखेर ली हे माणूस होते आणि मर्त्य मानवाच्या स्खलनशीलतेस अपवाद नव्हते. तेव्हा त्यांचे मूल्यमापन हे पारंपरिक निकषांतून करता येणार नाही. जगावेगळे काही करून दाखवणाऱ्याच्या ऊर्मीही जगावेगळ्याच असू शकतात. परंतु केवळ ऊर्मी जगावेगळ्या आहेत म्हणून कृतीही जगावेगळी घडतेच असे नाही, हे आपण पाहतोच. अशा वेळी ली कुआन यू यांचे मोठेपण उठून दिसते. इतिहासात त्यांची नोंद कल्याणकारी कर्दनकाळ अशीच होईल.

- लोकसत्ता, अग्रलेख 
दि. २४/०३/२०१५, मंगळवार

Friday, March 20, 2015

चष्टनाने सुरू केले शालिवाहन शक - डॉ. मंजिरी भालेराव

शालिवाहनाने सुरु केलेल्या कालगणनेला शालिवाहन शक म्हणतात असं आत्तापर्यंत समजलं जात होतं, पण संशोधनातून वेगळीच माहिती पुढे आली आहे.

 चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला गुढीपाडवा हे नाव आहे. या दिवशी हिंदूूंच्या नवीन वर्षांची सुरुवात होते म्हणून या दिवसाला वर्ष प्रतिपदा असेही नाव आहे. भारतीय परंपरेमध्ये अतिशय मोठय़ा प्रमाणात वापरला गेलेला आणि शालिवाहन शक नावाने प्रसिद्ध असलेला संवत्सर या दिवशी सुरू होतो. या संवत्सराची स्थापना शालिवाहन म्हणजे सातवाहन या राजाने शक राजांचा पराभव करून केली असे सर्व भारतीय मानतात. ही घटना साजरी करण्यासाठी आपापल्या घरांवर गुढय़ा उभारल्या जातात. कलियुगाची ३,१७९ वर्षे संपल्यानंतर या संवत्सराची सुरूवात होते असेही भारतीय परंपरेत मानले आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने या दिवशीच सृष्टीची निर्मिती केली असाही समज लोकांमध्ये रूढ आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. फार प्राचीन काळापासून गुढीपाडवा आणि शालिवाहन शकाची सुरुवात या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडला गेला आहे. 

प्रत्यक्ष शालिवाहन शकाचा विचार करता त्याच्याबद्दलच्या माहितीत गुढी पाडव्याचा काहीही उल्लेख येत नाही. पण काळाच्या ओघात कधीतरी त्यांचा एकमेकांशी संबंध जोडला गेला असे दिसते. शालिवाहन शक नावाचा संवत्सर कोणी स्थापन केला याबाबत परंपरेत दुमत नाही. शालिवाहन राजाने इ.स. ७८ मध्ये शक राजाचा पराभव केला तेव्हा हा संवत्सर सुरू झाला असे सर्वमान्य मत आहे. परंतु हा संवत्सर कनिष्क या राजाने सुरू केला असे बरेच विद्वान मानतात. पुढे त्याचे जे शक अधिकारी होते, त्यांनी तो वापरला आणि म्हणून त्याला शक संवत्सर हे नाव पडले. परंतु प्रत्यक्ष पुरावे पाहून या सर्व विधानांचा खोलवर आणि तपशिलात विचार करावा लागतो. सातवाहन राजांचा इतिहास पाहून त्या काळात कोण शक राजे होते आणि त्यापैकी नेमक्या कोणाचा पराभव केला हेसुद्धा पडताळून पाहावे लागते.  

गौतमीपुत्र सातकर्णीने स्वतःची चिन्हे उमटविलेले नहपानाचे पुनर्मुद्रांकित नाणे. पुढची बाजू, मागची बाजू  
निरनिराळ्या मतांमधून आतापर्यंत झालेल्या इतिहासातील संशोधनातून जे काही पुरावे पुढे आले आहेत त्यामध्ये शिलालेख, नाणी, परकीय प्रवाशांची वर्णने या सर्वाचा समावेश करावा लागतो, तसेच ऐतिहासिक पुरावा हा परंपरेतील पुराव्याशी पडताळून पाहावा लागतो. त्यानंतर एक वेगळेच चित्र डोळ्यांसमोर येते. या शालिवाहन शक संवत्सराशी संबंधित कथेमध्ये काही घराणी, काही राजे यांचा समावेश आहे. ते कोण याची आधी माहिती घेऊ. यामध्ये सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी, क्षहारात क्षत्रप राजा नहपान आणि कार्दमक क्षत्रप राजा चष्टन यांचा समावेश होतो. साधारणपणे इ.स. पूर्व पहिल्या शतकातील गोष्ट आहे. पर्शिया म्हणजे प्राचीन इराण येथील सिथिया नावाच्या प्रांतातील काही अधिकारी हळूहळू स्थलांतर करत सिंध आणि राजस्थान या परिसरात आले. पुढे त्यांनी तिथे आपले राज्य प्रस्थापित केले. या लोकांना भारतीयांनी शक या नावाने संबोधले. त्यांनी पुढे राज्यविस्तार करायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी नहपान नावाचा राजा खूपच बलाढय़ होता. त्याला दक्षमित्रा नावाची मुलगी होती. तिचा पती उषवदात हा त्याचा सेनापती होता. या दोघांनी आपला राज्यविस्तार करायला सुरुवात केली. ते गुजरातमधून राज्य करत असताना पुढे त्यांनी उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावर ताबा मिळवला. तिथे राज्य करत असलेल्या सातवाहन राजांना त्यांनी पराभूत केले. सातवाहन तेव्हा पूर्व महाराष्ट्राच्या भागात राज्य करू लागले आणि त्यांनी नंतर आंध्र प्रदेशमध्येही आपला राज्यविस्तार केला.

नहपान पश्चिम महाराष्ट्रावर राज्य करू लागला, त्या वेळेस त्या परिसरातील बौद्ध भिक्षूंना त्यांनी काही गुहांचे दान दिले. तसेच त्या गुहांमध्ये लेखही कोरवले. अशा काही गुहा नाशिक, कार्ले, जुन्नर या परिसरात कोरलेल्या दिसतात. त्यामध्ये ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेत कोरलेले लेखही आहेत. अशा पद्धतीने क्षहारात क्षत्रप राजांनी पश्चिम भारतावर अंमल तर प्रस्थापित केलाच, पण त्या काळात जो भारत आणि युरोप यांच्यामध्ये सागरी व्यापार सुरू होता त्यावरही आपला ताबा मिळवला. पश्चिम भारतातील व्यापारी मार्गावरही ताबा मिळवून त्यांनी कर वसुलीला सुरूवात केली. थळघाट, नाणेघाट यांसारख्या व्यापारी मार्गावर त्यांचे राज्य असल्यामुळे तेथील जकात आणि इतर कर मिळवून त्यांचे राज्य खूपच श्रीमंत झाले. त्यांनी मोठय़ा संख्येने चांदीची नाणी पाडली. त्यावेळेस सातवाहनांची मात्र तांब्याची आणि शिशाची नाणी होती. त्यांच्या राज्याचा बराच मोठा भाग क्षत्रपांनी जिंकून घेतला होता. 

पुढे सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहारात क्षत्रप राजा नहपान याच्याशी नाशिकजवळील गोवर्धन या ठिकाणी मोठे युद्ध केले. त्या युद्धात नहपानाचा दारुण पराभव झाला आणि क्षहारात वंश 'निरवशेष' झाला. गोवर्धनाच्या विजय स्कंधावारातून गौतमीपुत्राने नाशिक येथील गुहेत राहणााऱ्या भिक्षूंना काही जमीनही दान दिली, ज्यावर पूर्वी नहपानाची मालकी होती. नहपानाची बाजारात प्रचलित असलेली सर्व नाणी गोळा करून त्याने त्यावर स्वत:चे नाव आणि चिन्हे उमटवली. अशी हजारो पुनर्मुद्रांकित नाणी नाशिकजवळील जोगळटेम्बी या ठिकाणी सापडली आहेत. नंतर गौतमीपुत्राच्या मुलाच्या म्हणजे वासिष्ठीपुत्र पुळूमाविच्या नाशिक येथील लेखात या सर्व घटनांची सविस्तर माहिती दिली आहे. ही घटना इ.स.७८ मध्ये घडली असावी, ज्या वेळेस गौतमीपुत्राचे राज्य वर्ष १८ आणि नहपानाचे राज्य वर्ष ४६ होते. त्या काळात राजे स्वत: गादीवर आल्यावर नवीन संवत्सर सुरू करीत, तो त्यांचे राज्य वर्ष असे.

नाशिक येथील गौतमीपुत्र सातकर्णी याचा लेख असलेली गुहा
नाशिक येथील नहपानाचा जावई उषवदात याचा लेख असलेली गुहा
नहपानाच्या मृत्यूनंतर त्याचे गुजरातमधले राज्य सातवाहनांनी घेतले नाही, तर शक क्षत्रप लोकांपैकीच दुसरे घराणे गादीवर आले. त्यांचे नाव होते कार्दमक. त्यांचा एक चष्टन नावाचा राजा गादीवर आला. त्याने राज्यावर बसल्यापासून जो संवत्सर सुरू केला तो त्याच्या वंशजांनीही पुढे सुरू ठेवला. त्यांनी तो पुढे जवळजवळ ३०० वर्षे वापरला. त्यामुळे त्या संवत्सराचा उपयोग करणे लोकांना सोपे जाऊ लागले. पुढे 'शक राजांचा संवत' या नावाने तो प्रसिद्ध झाला. वाकाटक राज देवसेन याच्या विदर्भातील हिस्सेबोराळा येथील लेखामध्ये सर्वप्रथम याचा 'शकांचा ३८०' असा उल्लेख सापडतो. त्यानंतर चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या ऐहोळे प्रशस्तीमध्येही शक राजांचा काल असा उल्लेख सापडतो. त्यामुळे शक राजांनी सुरू केलेली कालगणना आम्ही वापरत आहोत हे सर्वानी स्पष्ट सांगितले आहे. या सर्व लेखांमध्ये 'शक' शब्दाचा अर्थ संवत्सर असा नसून त्या लोकांचे नाव असा आहे. येथे कुठेही हा सातवाहनांचा संवत्सर आहे असे म्हटले नाहीये. इसवी सनाच्या बाराव्या शतकापासून या संवत्सराचा संबंध शालिवाहनांशी जोडला गेलेला दिसतो. तेव्हापासूनच 'शक' या शब्दाचा अर्थही संवत्सर असा झालेला दिसतो. मुळात शक हे समाजातील एका गटाचे नाव आहे याचा लोकांना विसर पडलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांच्या राज्याभिषेकानंतर 'राज्याभिषेक शक' सुरू केला. या नावात 'शक' हा शब्द 'संवत्सर' या शब्दाशी समानार्थी आहे. हीच परंपरा आजपर्यंत सुरू आहे.

प्राचीन भारतीय लोकपरंपरा मात्र असे सांगते की शालिवाहनानी शकांचा पराभव केल्यावर हा संवत सुरू झाला किंबहुना तो सातवाहनांनीच सुरू केला. पण त्यांनी तो अजिबात वापरला नाही असे दिसते. कारण गौतमीपुत्र सातकर्णीनंतर त्याचा मुलगा जेव्हा गादीवर आला, तेव्हा त्याने स्वत:चा नवीन राज्य संवत्सर सुरू केला. तसेच खुद्द गौतमीपुत्रानेही तो कधी वापरला नाही. वापरायचा नव्हता तर कशाला सुरू केला असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. पण खरा इतिहास पाहिला तर असे दिसते की सातवाहनांनी एका शक राजाला म्हणजे नहपानाला हरवले तेव्हा दुसरा शक राज म्हणजे चष्टन गादीवर आला. त्याने जो संवत्सर सुरू केला, तो पुढे सलग ३०० वर्षे वापरला गेला आणि 'शक राजांचा संवत' या नावाने इतर अनेक राजांनी तो वापरला, कारण दरवर्षी नवीन राज्य वर्ष देण्यापेक्षा हे जास्त सोयीचे होते. तो इतका लोकप्रिय झाला की पुढे शक या शब्दाचा अर्थ संवत्सर असा घेतला जाऊ लागला. त्यानंतर तो भारतभर, एवढेच नव्हे तर आग्नेय आशियातही काही देशांमध्ये वापरला जाऊ लागला. भारतीय लोकांनी मात्र यामध्ये शालिवाहन राजाने शक राजाला हरविल्याची स्मृती कायम ठेवली, पण संवत्सर सुरू करणारा राजा हा कोणीतरी दुसराच होता हे ते विसरून गेले. त्यामुळे शालिवाहन शक असे नाव त्याला मिळाले आणि तेच वापरले जाऊ लागले. या विजयाप्रीत्यर्थ गुढी तोरणे इ. उभारून तो दिवस साजरा केला जाऊ लागला. पण चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच ही घटना घडली का हे सांगणे आज अवघड आहे. या संवत्सराचा वापर दक्षिण भारतात आणि उत्तर भारतातील काही भागात होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी पंजाबी, सिंधी, कन्नड लोकांचेही नवीन वर्ष सुरू होते. मात्र या सर्वाच्या बाबतीत वेगवेगळ्या कथा आणि परंपरा आहेत. 

अशा प्रकारे महाराष्ट्रात साजरा केल्या जाणाऱ्या या सणाचा इतिहास खूप खोल आणि विस्तारलेलाही आहे.

- लोकप्रभा (कव्हर स्टोरी, ४२ वर्धापनदिन विशेष)
दि. २७/०३/२०१५, शुक्रवार

Thursday, March 19, 2015

साहित्य परिषदेची स्थापना आणि इतिहास

मराठी भाषा आणि साहित्य यांच्या प्रसारासाठी आणि विकासासाठी मराठी प्रदेशात ज्या लहान-मोठ्या संस्था सातत्याने कार्यरत आहेत त्या सर्वांत महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था ज्येष्ठ आणि प्रातिनिधिक आहे. १९०६ साली पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात या संस्थेची स्थापना झाली. तिच्या स्थापनेपूर्वी मराठी साहित्यप्रसाराचे जे कार्य चालू असे ते मुख्यतः सार्वजनिक ग्रंथालयांच्या आश्रयाने होत असे.

सातार्यापाठोपाठ चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे शनिवार, रविवारी म्हणजेच दि. २६ व २७ मे १९०६ रोजी सदाशिव पेठेत नागनाथ पारानजीकच्या मळेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या तिन्ही संमेलनांपेक्षा मोठ्या प्रमाणावर नि विधायक स्वरूपाचे झाले.

ग्रंथ, वृत्तपत्रे, नियतकालिके इ. माध्यमांची झपाट्याने वाढ हे बहुधा यामागचे कारण असावे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर (१८५४ - १९१८) होते. गोविंदराव हे न्या. रानडे आणि हरिभाऊ आपटे यांचे स्नेही होते. त्यांची मते सुधारकी होती. प्रसिद्ध स्त्री-चरित्रकार आणि कादंबरीकार म्हणून ख्यातनाम असलेल्या काशीबाई कानिटकर या त्यांच्या सहधर्मचारिणी होत्या. असा बहुगुणी अध्यक्ष लाभल्याने चौथे ग्रंथकार संमेलन हे खर्या अर्थाने साहित्य संमेलन ठरावे यात आश्चर्य नाही.

भारताचार्य चिंतामणराव वैद्य, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, प्रोफेसर पानसे, न. चिं. केळकर, कादंबरीकार ह. ना. आपटे, ‘आनंद’कर्ते वा. गो. आपटे, संत वाङ्मयाचे अभ्यासक हभप ल. रा. पांगारकर, नाटककार आणि पत्रकार कृ. प्र. तथा काकासाहेब खाडिलकर, महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे, कवी रेव्ह. ना. वि. टिळक, लोकमान्य टिळक इ. अनेक ख्यातनाम मंडळी संमेलनात सहभागी झाली होती. त्यामुळे निबंधवाचन, ठरावांवरील भाषणे, काही इतर प्रासंगिक भाषणे इत्यादी उपक्रमांमुळे संमेलन दोन दिवस गजबजून गेले होते.

मराठी जुने ग्रंथ व लेख सुरक्षित ठेवण्याकरिता एक गृह बांधण्याची जाहीर सूचना प्रथमच महादेव राजाराम बोडस यांनी मांडली. वर्हाडचे वा. दा. मुंडले यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या जपणुकीसाठी एखादी सुरक्षित जागा हवी, असा विचार मांडून त्यासाठी स्वत:ची ५० रुपये देणगी जाहीर केली. योगायोग असा की, या दोन्ही सूचनांमधील आशय पाच-सहा वर्षांनी पुण्यातच कार्यवाहीत आला. श्री. मुंडल्यांची सूचना १९१० साली भारतीय इतिहास संशोधक मंडळ-स्थापनेच्या रूपाने साकार झाली, तर श्री. बोडसांची सूचना थोड्या निराळ्या पद्धतीने प्रस्तुत संमेलनाच्या समारोपाच्या वेळी साहित्य-परिषद स्थापन झाल्याच्या घोषणेने झाली. श्री. पांगारकरांनी परिषदेसारख्या स्थायी स्वरूपाच्या संस्था स्थापन होण्याला उत्तेजन म्हणून स्वत:ची २५ रुपये देणगी जाहीर केली.

संमेलनातील काही भाषणांत साहित्य परिषदेच्या स्थापनेविषयीचे विचार मांडले गेल्यामुळे समारोपाच्या आधी न. चिं. केळकर यांनी साहित्य परिषद स्थापण्यात आली असून, साठ सभासद मिळाले असल्याविषयी व त्या परिषदेच्या सेक्रेटरींच्या जागी ठाण्याचे वि. ल. भावे, रा. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आणि रा. वासुदेव गोविंद आपटे यांना नेमल्याविषयी जाहीर केले. या घोषणेला पाठिंबा देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी आशीर्वादपर भाषणे केले.

१० जुलै १९०६ रोजीच्या केसरीत श्री. आपटे, श्री. भावे आणि श्री. खाडिलकर यांच्या सहीने मराठी भाषेच्या अभिमान्यांना उद्देशून एक विनंतीपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. या पत्रात परिषदेची उद्दिष्टे आणखी स्पष्ट करण्यात आली, तिने हाती घेतलेल्या नऊ कामांची जंत्री देण्यात आली आणि शेवटी परिषदेची वार्षिक एक रुपया वर्गणी भरून सभासद होण्याची विनंती करण्यात आली.

नऊ कलमांतील पहिले मराठी ग्रंथकारांची व लेखकांची आता वेळोवेळी परिषद भरवून परस्परांमधील परिचय वाढविणे व त्यांच्या अडचणी काय आहेत ते समजावून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे हे फार महत्त्वाचे आहे. परिषदेतर्फे साहित्य-संमेलने भरविण्याच्या कार्याचा या कलमात स्पष्ट निर्देश आहे. चौथ्या कलमात साहित्य चर्चा करण्याकरिता साधल्यास एखादे मासिक किंवा त्रैमासिक काढण्याचेही सूतोवाच करण्यात आले. परिषदेतर्फे पुढे दहा वर्षांनी महाराष्ट्र साहित्य पत्रिका मुंबई कार्यालयातून निघू लागली. तिचे मूळ वरील सूतोवाचात आढळते.

अशा रितीने ग्रंथकार संमेलनाच्या द्वारे २७ मे १९०६ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुणे येथे स्थापना झाली नि आपटे, भावे आणि खाडिलकर हे तिघे ग्रंथकार चिटणीस म्हणून तिचे काम पाहू लागले. ‘ग्रंथकार संमेलन’ या नावाचा पुढल्या काळात अर्थातच लोप झाला.

बडोदा संमेलनानंतर तीन वर्षांनी १९१२ साली अकोला येथे आठवे साहित्य संमेलन श्रीराम नाटकगृहात भरले होते. परिषदेच्या दृष्टीने या अकोला संमेलनाला ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठी लोकप्रिय कादंबरीकार, करमणूककार हरी नारायण आपटे संमेलनाध्यक्ष आणि पूर्वाध्यक्ष विष्णू मोरेश्वर महाजनी स्वागताध्यक्ष हा योगही विशेष आनंददायी होता. या संमेलनातील महत्त्वाची घटना म्हणजे बडोदा संमेलनात ठरल्याप्रमाणे साहित्य परिषदेच्या घटना-नियमांचा मसुदा थोडा फेरफार करून संमत करण्यात आला. संमत झालेल्या परिषदेच्या या पहिल्या १९ कलमी घटनेत तिचे उद्देश आणि ते साध्य करण्याचे उपाय निर्दिष्ट करण्यात आले. दर वर्षी साहित्य संमेलन भरविणे आणि संमेलनप्रसंगी परिषदेची वार्षिक साधारण सभा बोलावणे हे काम परिषदेवर सोपविण्यात आले. संमेलनातील या घटनेचे महत्त्व दत्तो वामन पोतदार यांच्या शब्दांत सांगायचे तर १९०६ साली जन्मास आलेल्या परिषदेला १९१२ मध्ये नियमबद्ध व घटनामंडित करण्यात आले.

परिषदेची कचेरी १९३३ साली मुंबईहून पुण्यात स्थलांतरित झाली त्या वर्षी बाळकृष्ण अनंत भिडे यांचा मराठी भाषेचा वाङ्मयाचा इतिहास- मानभावअखेर हा एक महत्त्वाचा ग्रंथ ५०० रुपयांचा पुरस्कार देऊन प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत त्यांची प्रकरणे याआधी प्रसिद्ध झालेली होती. ग्रंथ प्रकाशित झाला तेव्हा भिडे (१८७४-१९२९) हयात नव्हते. या संदर्भात आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे श्री. भिडे यांच्या आधी चिंतामणराव वैद्य आणि अहमदनगरचे शिवरामपंत भारदे यांना असा ग्रंथ लिहिण्याची विनंती करण्यात आली होती. पण दोघांनी असमर्थता दर्शविल्यामुळे ते काम भावे-भिडे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन हेच परिषदेचे आरंभ काळातले महत्त्वाचे कार्य म्हणता येईल. वरील चारही पुस्तके गेल्या अनेक वर्षांपासून दुर्मीळ आहेत.

पुण्यात परिषद आल्यावर तिचे दप्तर प्रथम कृ. पां. कुलकर्णी यांनी जपून ठेवले. नंतर टिळक रोडनजीकच्या चापेकरांच्या आर्यसंस्कृती मुद्रणालयाजवळ भागवतांच्या बंगल्यात (१९६/७९ सदाशिव पेठ, पुणे -०२) ती दोन-तीन वर्षे अल्प भाड्याने नांदत होती. कार्याध्यक्ष नानासाहेब चापेकर यांचा शांत स्वभाव होता. दा. ग. पाध्ये यांच्यासारख्या हटयोगी गृहस्थांशीसुद्धा त्यांनी शेवट स्नेह जोडला होता. दोघांमध्ये दिलजमाई झाली म्हणून पुढे पाध्यांच्याच हस्ते परिषदेच्या वास्तूची कोनशिला बसविण्यात आली.

आज ना उद्या परिषदेची कचेरी पुण्याला येणार याचा अंदाज बांधून नानासाहेबांनी औंधचे संस्थानिक श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्याशी यासंबंधी प्राथमिक बोलणी सुरू ठेवली होती. राजेसाहेब राजी झाल्यावर परिषदेच्या साधारण सभेचा नि कार्यकारी मंडळाचा कौल घेऊन ते पुढच्या तयारीला लागले. २१ जुलै १९३५ रोजी प्रथम राजेसाहेबांच्या भेटीसाठी अध्यक्ष मा. वि. किबे यांच्या नेतृत्वाखाली औंधास एक शिष्टमंडळ गेले. या मंडळात किबे, चापेकर, वा. म. जोशी, द. वा. पोतदार, पां. वा. काणे, ज. र. घारपुरे, धनंजयराव गाडगीळ आणि चिटणीस दे. द. वाडेकर अशी बडी मंडळी होती. शिष्टमंडळाची भेट दुपारी झाली. परिषदेच्या जागेबाबतचा अर्ज वाचून श्रीमंतांना सादर करण्यात आला. शिष्टमंडळ परतल्यावर औंधकरांच्या दिवाणांचे पत्र आले. त्यात ९१ वर्षांच्या कराराने नि वार्षिक ४५ रुपये भाड्याने टिळक रस्त्यावरील जागा देऊ केल्याचा मजकूर होता. तथापि, चापेकरांनी आपला शब्द खर्ची टाकून कराराची मुदत ९९९ वर्षे आणि भाडे वार्षिक १५ रुपये असा बदल करवून घेतला. त्याप्रमाणे ६ जुलै १९३५ रोजी पंतप्रतिनिधींनी भाडेपट्टा करून परिषदेला आपल्या मालकीची ६७७.६ चौरस यार्ड जागा दिली.

परिषदेच्या भाडेपट्ट्यावर चापेकरांची सही आहे. भाडेपट्ट्यातील प्रदीर्घ मुदत आणि नाममात्र भाडे विचारात घेता पंतप्रतिनिधींनी परिषदेला जागा जवळजवळ कायमची देणगीदाखलच दिली असे म्हटले पाहिजे. साहित्यविषयक कार्यासाठी जागेचा वापर करावा, भाडे वगैरे उत्पन्नासाठी तिचा वापर करू नये अशी अट मात्र घालण्यात आली. बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी परिषदेवर न फिटणारे उपकारच केले. पत्रिकेच्या यानंतरच्या अंकात त्यांचे एक रंगीत आकर्षक पूर्णाकृती छायाचित्र छापण्यात आले असून, जागेबाबतच्या व्यवहाराची सर्व माहिती देण्यात आली आहे. पाध्येसाहेबांनी मागचे सारे विसरून आनंदाने येण्याचे कबूल केल्यावर २८ ऑक्टोबर १९३५ (कार्तिक शु. प्रतिपदा) हा कोनशिला बसविण्यासाठी मुहूर्त ठरवण्यात आला.

१९४६-४७ च्या सुमारास श्री. म. तथा बापूसाहेब माटे परिषदेचे कार्याध्यक्ष झाले. पुढे १९६२ साली सातारच्या संमेलनाचे अध्यक्ष श्री. न. वि. ऊर्फ काकासाहेब गाडगीळ घटना-नियमानुसार वर्षभर परिषदेला अध्यक्ष म्हणून लाभले. या दोघा श्रेष्ठींच्या प्रयत्नांमुळे परिषदेच्या वास्तूचा आणखी भरदार विस्तार होत गेला.

चिपळूणकर सभागृहानंतर परिषदेच्या वास्तूला उपयुक्त जोड मिळाली ती सभागृहाला लागूनच उभारलेल्या चार खोल्यांच्या अतिथी भवनाची. अतिथी भवन उभारण्याचे सारे श्रेय काकासाहेब गाडगीळांना द्यावे लागेल. १९६२ साली काका परिषदेचे अध्यक्ष होते. श्री. म. माट्यांप्रमाणे तेही कर्ते गृहस्थ. मराठी साहित्य संस्था आणि दिल्लीतील बृहन्महाराष्ट्र मंडळ यांच्यासाठी काकांनी खूप काही केले आहे. परिषदेच्या परगावच्या सभासदांना अल्पदरात पुण्यात उतरता यावे यासाठी त्यांनी अतिथी भवनाची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते कामाला लागले. पहिली पंधरा हजारांची देणगी त्यांनी दिल्लीच्या महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्टकडून आणली. महाराष्ट्र शासन (१० हजार रुपये), दयानंद बांदोडकर (५ हजार रुपये), विश्वासराव चौगुले (५ हजार रुपये), महाराष्ट्र निवास, कलकत्ता (२ हजार रुपये), बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट (१ हजार रुपये), चित्रशाळा ट्रस्ट (५०१ रुपये) अशा काही भरघोस देणग्यांची भर पडू लागली.

जी. एम. आपटे कॉन्ट्रॅक्टर यांच्याकरवी वर्ष - दीड वर्षांत उंचउंच खांब घेऊन त्याचे बांधकाम पूर्ण झाले. १५ ऑगस्ट १९६४ रोजी परिषदेचे वयोवृद्ध - ज्ञानवृद्ध माजी कार्यकर्ते ना. गो. चापेकर (वय ९७) यांच्या हस्ते समारंभपूर्वक अतिथी भवनाचे उद्घाटन झाले. परिषदेचे प्रस्तुत ग्रंथालय हे मुख्यत्वे संदर्भ-ग्रंथालय आहे. पण असे असूनही त्यात दुर्मीळ ग्रंथ, नियतकालिकांचे अंक, विविध विषयांचे कोश इत्यादींबरोबर कथा, कादंबरी, कविता, नाटके, प्रवास, चरित्र-आत्मचरित्रे, ललित गद्य इ. अनेक प्रकारची ललित पुस्तकेही आहेत. प्रभाकर, मासिक मनोरंजन, विविध ज्ञानविस्तार, रत्नाकर, म. सा. पत्रिका, इतर साहित्य संस्थांची नियतकालिके यांचे बांधीव अंक पाहण्या-चाळण्यासाठी कितीतरी अभ्यासक ग्रंथालयात नित्य येत असतात. परिषदेचे सभासद, विद्यार्थी वर्ग, अभ्यासक, संशोधक, पीएच. डी. चे छात्र यांना ग्रंथालयात मुक्त प्रवेश आहे. रविवारखेरीज ते खुले असते. आपटे ट्रस्टने स्टीलची कपाटे खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपयांची आणखी एक देणगी देऊन संस्थेला उपकृत केले आहे. यानंतर साहित्य परिषदेने अनेक उपक्रम व पारितोषिके सुरू केली.

सौजन्य - म. श्री. दिक्षित लिखित, महाराष्ट्र साहित्य परिषद या ग्रंथातून
स्त्रोत : http://www.sahityasammelanghuman.org/parishad-stapna-itihas.php

Monday, March 16, 2015


मागच्या लेखात लिहिल्याप्रमाणे मुंबई सात बेटांचीच होती का? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी आपले मुंबईचे definition काय हे पाहणे महत्वाचे ठरेल. म्हणजे मुंबई शहर ह्या व्यतिरिक्त असलेल्या मुंबई उपनगर, नवी मुंबई आणि MMRDA च्या कक्षेत येणाऱ्या शहर/ गावांना आपण मुंबईचाच भाग मानतो का? कारण आजच्या मुंबईचा इतिहास हा मुंबईच्या आजूबाजूला वसलेल्या शहरं आणि गावठाणांशी निगडीत आहे. आपण वाचलेल्या मुंबईच्या इतिहासाची सुरुवात नेहमीच 'सात बेटे' जोडली गेली आणि मुंबई निर्माण झाली अशीच असते. त्यामुळे "मुंबईचे पहिले आणि अखेरचे राजे हे इंग्रज." हे आपल्याला सहज पटतेही... परंतु जर खोलात जाऊन त्यातले तथ्य शोधायचा प्रयत्न केल्यास काहीसा वेगळा इतिहास समोर येतो, तो असा कि मुंबईच्या निर्मितीची सुरुवात होण्याच्या कितीतरी वर्षांपुर्वीपासून मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणे अस्तित्वात होती… आहेत... तसेच मुंबई परिसरात केवळ सातच नव्हेत तर अनेक लहान मोठी बेटे अस्तित्वात होती, त्यातली काही आजही बेटेच आहेत तर खुद्द अनेक बेटे एकत्र करूनही आजची मुंबई geographically बेट स्वरूपातच (island city) राहिली आहे.
मुंबईची निर्मिती टप्प्या-टप्प्याने झाली आहे ती अशी:
➙ कोळी जमातीची वस्ती असलेली बॉम्बे, कुलाबा माहीम अशी अनेक लहान मोठी विखुरलेली बेटे
➙ बॉम्बे बेटावरचा विकास
➙ सभोवतालची आणखी सहा बेटे जोडून झालेली ग्रेटर बॉम्बेची निर्मिती
➙ ग्रेटर बॉम्बेचा विकास
➙ मुंबईचा उपनगरातील विस्तार
➙ उपनगरांच्याही पुढे जाऊन मुंबईला लागुनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील विस्तार
➙ महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राजधानी म्हणून झालेली मुंबईची निवड
➙ मुंबईचा रायगड जिल्ह्यातील विस्तार आणि नवी मुंबईची निर्मिती
➙ आणि सरतेशेवटी MMRDA ची स्थापना
त्यातला पहिला टप्पा विखुरलेल्या बेटांचा:
मुंबईच्या आजूबाजूला विखुरलेल्या बेटांपैकी सर्वात मोठे आणि महत्वाचे बेट म्हणजे साष्टी (Salsette)… साष्टी म्हणजे सहासष्ट गावांचा समूह. मुंबई उदयास येण्यापूर्वीपासूनच साष्टी बेटावरील सोपारा, डहाणू, कल्याण, वसई, ठाणे इत्यादी अनेक शहरांतील कोळी जमाती, पर्शिया, ग्रीस आणि आखाती देशांशी लाकूड, मीठ, अरबी घोडे, सुपाऱ्या, वेलवेट इत्यादींचा व्यापार करीत असत. साष्टी बेटावरील ही सर्व समुद्री व्यापार केंद्रे थळघाट, नाणेघाट आणि बोरघाट मार्गे अंतर्गत भारताशी जोडलेली होती. त्यामुळेच ह्या भागात कान्हेरी, महाकाली, जोगेश्वरी इत्यादी लेण्यांची निर्मिती झाली.ह्या लेण्यांमध्ये, व्यापाऱ्यांकडून शिधा घेऊन त्यांच्या राहण्याची सोय बौद्ध भिख्खु करीत असत. ह्या लेण्यांची locations देखील विशेष आहेत, म्हणजे साष्टी बेटावरच्या सर्वात उंच ठिकाणी कान्हेरी किंवा बाजूच्या घारापुरी बेटावरील (हि कोकण मौर्यांची राजधानी होती) घारापुरीची किंवा एलिफंटा लेणी... थळघाट, नाणेघाट आणि बोरघाट ह्या व्यापारी मार्गावरच पुढे म्हणजे इसवीसन पूर्व पहिल्या ते इसवी सन सहाव्या शतकापर्यंत सातवाहन, कोकण मौर्य, चालुक्य, राष्ट्रकुट आणि शिलाहारांच्या काळात देवळे, तलाव, विहिरी, मठ इत्यादीच्या स्वरुपात विस्तारित विकास होत गेला.
राजा बिंबदेवाला मुंबईचा कर्ता म्हटले जाते. बिंबदेवाने साष्टी बेटापलीकडील माहीम बेटावर साम्राज्य विस्तार जरूर केला परंतु त्याची राजधानी आताच्या मुंबई बेटावरील माहीम येथे नसून, साष्टी बेटावरील केळवे माहीम येथील माहीम इथे होती. बिंबदेवाचे मुंबईतील योगदान म्हणजे प्रभादेवी व बाबुलनाथ मंदिरांची निर्मिती. बिंबदेवाच्या कारकीर्दीपर्यंत साष्टी परिसरात बर्यापैकी शांतता आणि परिणामी सुबत्ता होती. बिंबदेवानंतर हा सगळा परिसर गुजरातच्या सुलतानाच्या अधिपत्याखाली गेला. बिंबदेवाच्या प्रभावामुळे असेल कदाचित पण ह्या काळात गुजरातच्या सुलतानाने आताच्या मुंबईतील महिमवर लक्ष केंद्रित केले आणि हाजी अली दर्गा व महिमी मशीदीची (माहीम दर्गा, माहीम बाजार) निर्मिती केली. ह्या व्यतिरिक्त अनेक सुफी संतांच्या नावाने पीरांची देखील स्थापना केली. मुंबईतील अनेक कोळीवाड्यांमध्ये किंवा आजूबाजूला (ज्या ज्या ठिकाणांवरून पूर्वी समुद्री व्यापार चालत असे अश्या ठिकाणी) आजही हे पीर आढळतात. त्या नंतर साष्टी बेटावर खोलवर ठसा उमटवणारी घटना घडली ती म्हणजे पोर्तुगीजांचे आगमन.
१५३४ मध्ये गुजरातच्या सुलातानाकडून वसईच्या तहाअंतर्गत साष्टी आणि आजूबाजूच्या बेटांची मालकी पोर्तुगीजांकडे आली आणि त्याच वर्षी मुंबईतील पहिले सेंट मायकल चर्च (माहीम चर्च) माहीम येथे उभारले गेले. सातासमुद्रापलीकडून आलेल्या पोर्तुगीजांना साष्टी बेटावरील आधीच भरभराटीस आलेल्या समुद्री व्यापाराचे आकर्षण वाटले नसते तरच नवल होते. ह्या समुद्री व्यापारा व्यतिरिक्त स्थानिक लोक मासेमारी आणि शेतीही करीत. पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचार करतानाच इथला समुद्री व्यापार स्वतःच्या अधिपत्याखाली आणला. हा धर्मप्रचार इतका आक्रमक होता कि ज्यात Inquisition च्या माध्यमातून संपूर्ण गावेच्या गावे धर्मांतरित केली गेली. १५५७ मध्ये निर्मळ आणि दादर येथील Nossa Senhora da Salvação (म्हणजेच आताचे पोर्तुगीज चर्च), १५६६ मध्ये सांदोर, १५६८ मध्ये आगाशी, १५७३ मध्ये नंदकाल, १५७४ मध्ये पापडी, १५७५ मध्ये पाले, १६०६ मध्ये माणिकपूर, १६१६ मध्ये बांद्र्याचे माउंट मेरी चर्च अश्या अनेक चर्चेसची आणि त्याचबरोबर सभोवतालच्या समुद्री हल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी बॉम्बे कॅसल, डोंगरी, acquisitionद्वारे माहीम, बांद्रा, मढ ह्या ठिकाणी किल्ल्यांची निर्मिती केली. पोर्तुगीजांच्या काळात एकाच वेळी व्यापार, शहर विकास, संरक्षण आणि धर्मांतर असे सगळे एकत्रित कार्यक्रम चालले होते. ह्या सर्वांचा साष्टी बेटांवरील गावांच्या सांस्कृतिक जडणघडणीवर खोलवर उमटलेला ठसा आजही ठाणे, वसई, मढ, बांद्रा, नालासोपारा ह्या पूर्वीच्या साष्टी बेटांवरील गावांवर आणि प्रामुख्याने इथल्या कोळीवाड्यांवर ठळकपणे दिसतो.त्याबद्दल नंतर लिहीनच पण पोर्तुगीजांच्या काळात ह्या सर्व घटनांनव्यतिरिक्त घडलेली एक महत्वपूर्ण घटना म्हणजे मुंबईला मिळालेले पहिले लिखित नाव, Bombaim... म्हणजेच good bay!
आत्तापर्यंतचा इतिहास वाचताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे देवळे असू देत, दर्गे असू देत, चर्चेस असु देत किंवा संरक्षणासाठी उभारलेले किल्ले असू देत, सगळ्यांचे अस्तित्व किनारपट्टीवर अगदी mandatory असल्यासारखे आहे. अश्या किनारपट्टीवर ब्रिटिशांचे आगमन कधी न कधी तरी झालेच असते. कारण पोर्तुगीजांप्रमाणे ते हि दर्यावार्दीच परंतु हिंदी महासागरातल्या समुद्री व्यापारविस्तारासाठी, त्यांच्या डच (बटाविया) आणि पोर्तुगीज (गोवा) व्यापारी प्रतीयोग्यांसारखा भक्कम व्यापारी तळ नसलेले. तो तळ उभारण्याची संधी ब्रिटिशांना मिळाली ती ११ मे १६६१ साली पोर्तुगीज राजकन्या केथारिन ब्रीगांझा हिच्या इंगलंडचा राजपुत्र दुसरा चार्लसशी झालेल्या विवाहाच्या निमित्ताने. ह्या लग्नात हुंडा म्हणून पोर्तुगीजांनी बॉम्बे (फक्त बॉम्बे बेट, सात बेटे नाही) ब्रिटिशांना दिले आणि मुंबईच्या पहिल्या नाही पण निशितपणे अखेरच्या राजांचे मुंबईत (बॉम्बे मध्ये) आगमन झाले.…
क्रमशः
(* ह्या लेखात दोन ते अडीज हजार वर्षांचा इतिहास संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे तिथ्या, वंशावळ्या इत्यादी तपशील टाळले आहेत.)

मुंबईतील कोळीवाडे रूढ अर्थाने केवळ 'आहेत' असे लिहायचे कारण मुंबईत रहात असताना खास कोळीवाडा बघायला म्हणून कुठे जावे लागत नाही तर कोळीवाडेच आपल्याला कुठून ना कुठूनतरी दिसत राहतात. वर्ल्ड ट्रेड सेंटरला जाताना कफ परेडचा, कुलाबा कॉजवेवरून जाताना कुलाब्याचा, पोर्ट ट्रस्टकडे जाताना माझगावचा, सी लिंकवरून जाताना माहीम आणि वरळीचा, बांद्रा बॅंण्ड स्टेंडवरुन जाताना चिंबईचा… असे अनेक… आणि त्यांचे 'असणे' जाणवते ते, त्या त्या कोळीवाड्यांच्या पट्ट्यातील समुद्रात नांगरलेल्या रंगीबेरंगी बोटींमुळे. "मुंबईचे मूळ रहिवासी कोळी आणि कोळीवाडे मुंबई (बॉम्बे), मुंबई शहर म्हणून विकसित होण्याच्या कितीतरी वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत", हे वाचलेलं असल्यामुळे किंवा किनाऱ्यालगतच्या कोळी वस्त्या व समुद्रात नांगरलेल्या बोटी सतत दिसत असल्यामुळे किंवा ऐकून माहित असलेल्या कोळीगीतांमुळे तरी रूढ अर्थाने मुंबईत कोळीवाडे अस्तित्वात आहेत ह्यावर कुणाचेही दुमत नसते.
कोळीवाड्यांचे हे असणे, दिसणे आणि ऐकू येणे ह्या व्यतिरिक्त असे कोळीवाड्यांचे वेगळेपण काय आहे? हे 'वेगळेपण' जाणून घेण्याआधी कोळीवाड्यांमध्ये फिरताना मला जाणवलेल्या काही गोष्टी इथे नमूद कराव्याशा वाटतात. त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक लोकांमध्ये स्वतःच्या गावाच्या इतिहासाबद्दल दिसलेली कमालीची अनास्था. तुमच्या गावाचा इतिहास काय? किंवा वेगळेपण काय? ह्या प्रश्नाला काही कोळीवाड्यांमध्ये जुने दस्ताऐवज उपलब्ध करून देणे, जुन्या-जाणत्या लोकांशी गाठीभेटी घालून देणे, गावातील महत्वाची ठिकाणे दाखविणे अशी सर्वतोपरी मदत मिळाली तर काही कोळीवाड्यांमध्ये 'तू ना, अमक्या सरांना किंवा तमक्या मॅडमना भेट. त्यांनी मागे एकदा आमच्या गावाचा अभ्यास केला आहे'. अशी उत्तरे मिळाली. कोळीवाड्यातील फारच कमी लोकं कोळीवाड्यांच्या समाजहितासाठी प्रयत्नशील दिसली… त्याउलट प्रत्येक गावात एक खूप मोठा वर्ग 'आई माउलीचा उदो उदो' करीत देवाधर्मात किंवा 'ह्या कोलीवारयाची शान आय तुजं देऊलं' करीत बॅंजोवरच्या नाच-गाण्यात मग्न दिसला… कोळीवाड्यातल्या दैनंदिनीवर संगीताचा किती प्रभाव असतो ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु स्वतःच्या इतिहासाविषयी किंवा भविष्याविषयीची उदासीनता आणि स्वतःच्या गावाचा इतिहास दुसऱ्यांकडून ऐकावा लागणे ह्यासारखी दुसरी शरमेची गोष्ट असूच शकत नाही...
जी गोष्ट इतिहासाची तीच येणाऱ्या भविष्याची… मुंबईच्या DP (डेव्हलपमेंट प्लान) मध्ये कोळीवाड्यांशी निगडीत अनेक चुका आहेत आणि त्याचा परिणाम येत्या काही वर्षांमध्ये कोळीवाड्यांवर होऊ शकतो. त्या अनुषंगाने काही कोळीवाड्यांच्या प्रस्तावित रिडेव्हलपमेंटबद्दल विचारले असता वरळी कोळीवाड्यातल्या, 'आम्हाला समुद्रात पोहता येते मग आम्हाला स्विमिंग पूलचे डबके कशाला पाहिजे?' असा किंवा सायन कोळीवाड्यातल्या, "आमच्या मालकी हक्काच्या जागेवर आम्ही कसे आणि कुठे राहायचे हे आम्हाला बिल्डर सांगणार का?' असा खडा प्रश्न विचारणारे एखाद-दोन अपवाद वगळता, बाकी कोळीवाड्यांमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट, स्लम रिडेव्हलपमेंट DP मधील चुकीचे demarcation, coastal road इत्यादींचा कोळीवाड्यांवर काय परिणाम होईल ह्याबद्दलही एक प्रकारची हतबलता दिसली.
मुंबईसारख्या झपाट्याने ग्लोबल सिटी म्हणून विकसित होऊ पाहणाऱ्या शहरात, उष्ण दमट वातावरणात, जिथे सर्वांनाच आपल्या घरातून अरबी समुद्राचा view दिसावा, किंवा तापलेल्या दुपारी समुद्रकिनारी बसून समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्याचे आणि पाण्याचे तुषार अंगावर झेलावेत असे मनोमन वाटते, त्याच मुंबईत किनाऱपट्टीवर रिअल एस्टेट मार्केट मध्ये प्राइम लोकेशन म्हणून गणल्या जाणाऱ्या ठिकाणी वसलेले असूनही कोळीवाडे मात्र अजूनही मध्ययुगीन अवस्थेतच आहेत. मध्ययुगीन अश्यासाठी कारण इतक्या वर्षांमध्ये ना ह्या कोळीवाड्यांच्या रचनेत बदल झाला ना इथल्या राहणीमानात… त्याचप्रमाणे जगभर मासेमारीसाठी पर्सेनिअर किंवा त्याही पुढे जाऊन फॅक्टरी लाईनर (इथे मास फिशिंग चांगले असे म्हणायचा उद्देश नाही) प्रकारच्या अत्याधुनिक बोटी वापरल्या जात असताना मुंबईतील बहुतांश कोळी मात्र अजूनही सिंगल इंजिन प्रकारच्या छोट्या बोटींमधूनच मासेमारी करतात… ग्लोबलायझेशनच्या काळात कोळ्यांचे मध्ययुगीन राहणीमान, पेहराव आणि छोट्या छोट्या रंगीत बोटी बघणाऱ्याला जरी आकर्षक वाटत असल्या तरी प्रत्यक्षात कोळ्यांना आणि कोळीवाड्यांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड झगडावे लागते आहे. वर्तमानातील ह्या झगड्याबद्दल पुढे लिहेनच. पण त्याआधी थोडे इतिहासात डोकावून पाहूयात… बॉम्बे होण्यापूर्वीची मुंबई होती तरी कशी? सात बेटांची कि आणखी काही?
क्रमशः

लेखमालिका: मुंबईतील कोळीवाडे - देवश्री आक्रे


मुंबईतील कोळीवाडे म्हणजे well known yet unknown प्रकारात मोडणारे. म्हणजे आपल्या सर्वांनाच मुंबईत कोळीवाडे आहेत हे माहित असते, पण बऱ्याचदा नुसतेच 'आहेत' इतकीच माहिती असते. Actually मुंबईबद्दलचा कोणताही लेख किंवा पुस्तक, "मुंबई सात बेटांची मिळून बनलेली आहे आणि मुंबईचे मूळ रहिवासी कोळी आहेत", ह्या वर्णनाशिवाय पूर्णच होत नाही. In fact मुंबईच्या कोणत्याही वर्णनामध्ये तिथल्या कोळी लोकांविषयी किमान एक तरी paragraph अगदी mandatory असल्यासारखा लिहिलेला असतो. असे हे मुंबईतील कोळीवाडे, लायडन युनिव्हर्सिटीमधील 'ग्लोबल एशियन सिटीज' ह्या विषयांतर्गत सुरु असलेल्या रिसर्चच्या निमित्ताने गेल्या वर्षी मला बघता आले… अनुभवता आले. तो अनुभव इतका भन्नाट होता की त्यामुळे गेल्यावर्षी भारतातून परत येताना मी सगळे कोळीवाडे सोबत घेऊनच आले. त्यातच खुद्द मुंबईतल्या माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींनी कोळीवाड्यांबद्दल अजून माहिती करून घ्यायला आवडेल असे सांगितल्यामुळे हि लेखमाला सुरु करीत आहे. 
हेरीटेज आणि डेव्हलपमेंट हे माझे मूळ अभ्यासविषय. त्यामुळे मुंबईतील हेरीटेज म्हणून अजूनही केवळ ब्रिटीश काळातील इमारतींकडे बघणाऱ्यांना, redevelopment म्हणजेच development असे धरून चाललेल्यांना आणि मुंबईच्या peripheryवर असल्यामुळे कोळीवाडे/ गावठाणांना urban villages समजणाऱ्याना, मुंबईच्या ह्या मूळ गावठाणांची ओळख करून देणे हा ह्या लेखमालिकेचा प्रमुख उद्देश. ह्याचे स्वरूप साधारण ललित लेखनाप्रमाणेच पण मुंबई आणि मुंबईतील कोळीवाड्यांचा इतिहास तसेच वर्तमानाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणारे असेल. ह्या लेखांसाठीची सगळी माहिती प्रत्यक्ष कोळीवाडे फिरून, थोडेफार वाचून, तिथल्या लोकांशी बोलून, तर काही ऐकिवातल्या गोष्टी एकत्र करून जमा केली आहे. ती सगळीच बरोबर असेल असे नाही, त्यामुळे तुमच्यापैकी कोणाकडेही अजून माहिती असल्यास ती जाणून घ्यायला मला नक्की आवडेल.
पण एक नक्की, मुंबईतले हे कोळीवाडे फिरताना, माझी एका सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत, निसर्गसंपन्न, काळाच्या बरोबरीने चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या, truly secular परंतु शैक्षणिक, सामाजिक (घटनेने नमूद केल्याप्रमाणे) आणि काही प्रमाणात आर्थिकदृष्ट्या अजूनही मागास राहिलेल्या समुदायाशी ओळख झाली आणि रूढ अर्थाने 'आहेत' इतकीच माहिती असलेल्या कोळीवाड्यांच्या वेगळेपणाची जाणीव झाली. ते वेगळेपण आपल्यापुढे मांडण्यासाठी हि लेखमालिका…
(क्रमशः)

ती फुलराणी

ती फुलराणी 

हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे 
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ही खेळत होती
गोड निळ्या वातावरणात, अव्याज मने होती डोलत
प्रणयचंचल त्या भृलीला, अवगत नव्हत्या कुमारीकेला
आईच्या मांडीवर बसुनी, झोके घ्यावे गावी गाणी
याहुनी ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फुलराणीला?

पूरा विनोदी संध्यावात, डोल दोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला, चुंबून म्हणे फुलराणीला
"छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे गं पहात होती?
कोण बरे त्या संध्येतून, हळूच पहाते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा, आवडला अमुच्या राणीला?"
लाज लाजली या वचनांनी, साधी भोळी ती फुलराणी

आन्दोली संध्येच्या बसुनी, झोके झोके घेते रजनी 
त्या रजनीचे नेत्र विलोल, नभी चमकती ते ग्रहगोल
जादू टोणा त्यांनी केला, चैन पडेना फुलराणीला
निजली शेते निजले रान, निजले प्राणी थोर लहान
अजून जागी फुलराणी ही, आज कशी तळ्यावर नाही?
लागेना डोळ्याशी डोळा, काय जाहले फुलराणीला?

या कुंजातून त्या कुंजातून, इवल्या इवल्या दिवट्या लावून
मध्यरात्रीच्या निवांत समयी, खेळ खेळते वनराणी ही
त्या देवीला ओव्या सुंदर, निर्झर गातो त्या तालावर
झुलुनी राहिले सगळे रान, स्वप्नसंगमी दंग होऊन!
प्रणयचिंतनी विलीन वृत्ती, कुमारिका ही डोलत होती
डुलता डुलता गुंग होऊनी, स्वप्ने पाही मग फुलराणी.

"कुणी कुणाला अवकाशांत, प्रणयगायने होते गात
हळूच मागुनी आले कोण, कुणी कुणा दे चुंबनदान!"
प्रणय खेळ हे पाहुनी चित्ती, विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता, वाऱ्यावरती फिरता फिरता
हळूच आल्या उतरून खाली, फुलराणीसह करण्या केली
परस्परांना खूणवुनि नयनीं, त्या वदल्या ही आमुची राणी!

स्वर्गभूमीचा जुळवित हात, नाच नाचतो प्रभात वात
खेळूनी दमल्या त्या ग्रहमाला, हळूहळू लागती लपावयाला
आकाशीची गंभीर शांती, मंद मंद ये अवनीवरती
विरु लागले संशयजाल, संपत ये विरहाचा काल
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी, हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती, तरीहि अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, लख्ख पांढरा दहा दिशांना
जिकडे तिकडे उधळित मोती, दिव्य वऱ्हाडी गगनी येती
लाल सुवर्णी झगे घालूनी, हासत हासत आले कोणी
कुणी बांधिला गुलाबी फेटा, झगमगणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला, हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे, साध्या भोळ्या फुलराणीचे!

 गाऊ लागले मंगलपाठ, सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवी सनई मारुतराणा, कोकीळ घे तानांवर ताना!
नाचू लागले भारद्वाज, वाजविती निर्झर पखवाज
नवरदेव सोनेरी रविकर, नवरी ही फुलराणी सुंदर!
लग्न लागते! सावध सारे!सावध पक्षी! सावध वारे!
दवमय हा आंतरपाट फिटला, भेटे रविकर फुलराणीला!

वधूवरांना दिव्य रवांनी, कुणी गाइली मंगल गाणी
 त्यात कुणीसे गुंफत होते, परस्परांचे प्रेम! अहा ते!
आणिक तेथील वनदेवीही, दिव्य आपुल्या उच्छ्वासाही
लिहित होत्या वातावरणी, फुलराणीची गोड कहाणी!
गुंतत गुंतत कवी त्या ठायी, स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला, नवगीतांनी फुलराणीला!

कवी - बालकवी

Friday, March 13, 2015

व्हिंटेज दर्शन - संपदा सोवनी

 
गाडी कितीही जुनी झाली तरी तिच्यावरील मालकाचे प्रेम काही कमी होत नाही. त्यात जर गाडी अगदीच जुनी असेल, अगदी थेट गोऱ्या साहेबाच्या काळातली, तर मग बघायलाच नको. त्या वेळच्या गाडय़ांचा ऐटबाजपणा, डामडौल, तिची देखभाल अगदी आनंदाने सांभाळला जातो. अगदी हीच बाब पुण्यात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या व्हिंटेज कार रॅलीत ठळकपणे दिसून आली. रोल्स रॉइस, पॅकॉर्ड, इम्पाला, डॉज, रोइली, मॉरिस, मर्सिडिज या व अशा अनेक गाडय़ा पुणेकरांना रस्त्यावर धावताना दिसल्या. केवळ चारचाकीच नव्हे तर दुचाकीही या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. या मोटारी बघताना, त्यांच्या मालकांशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवत होती की, हा फक्त आणि फक्त पशांचा खेळ नव्हे! अर्थात पसा (तोही थोडाथोडका नव्हे!) असल्याशिवाय जुन्या मोटारी खरेदी करता येत नाहीत हे खरे, पण मोटारींबद्दल खरेखुरे प्रेम असल्याशिवाय त्या सांभाळता येत नाहीत हेही तितकेच खरे!

हडसन, द ग्रेट
d8रंगसंगतीची कमाल असलेली आणखी एक देखणी मोटार म्हणजे 'हडसन ग्रेट'. व्हीसीसीसीआयचे अध्यक्ष नितीन डोसा यांच्या मालकीची ही दुर्मीळ मोटार थेट १९३२ मधली. डोसा यांच्याकडे ती आली १९९७ मध्ये. इतर गाडय़ांसारखीच या गाडीचीही दुरवस्था झाली होती. मात्र, तिला पुन्हा तिच्या पूर्वीच्याच दिमाखात उभे केले तेव्हा सगळ्यांचेच डोळे विस्फारले, हडसनची अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे काळजी घेणारे राजू सांगत होते. सात माणसे बसू शकतील अशी ऐसपस जागा, 'फोल्ड' करता येणारे छत, आठ सिलिंडर असलेले इंजिन आणि मेकॅनिकल सायकल ब्रेक्स ही तिची वैशिष्टय़े. सगळ्यात डोळ्यांत भरतो तो तिचा केशरी आणि मरून रंग. ही मोटारसुद्धा स्पध्रेसाठी मुंबईहून चालवत आणली होती.

विलीज जीप
d10इतर उंची मोटारींमध्ये थोडीशी वेगळी वाटणारी विलीज जीप पण या फेरीत बघायला मिळाली. पार्कर सादिक यांची ही 'लेफ्ट हॅण्ड ड्राइव्ह'ची क्रीम रंगाची जीप दुसऱ्या महायुद्धात वापरली गेली होती. उघडता येणारे छत, चालकाच्या पुढची काचही उघडणारी, स्टीअरिंगला लागून चक्क'रायफल सॉकेट', जीपच्या मागच्या बाजूला जोडलेला पाणी भरण्याचा मोठा कॅन, आत चार जणांना बसता येईल अशी प्रशस्त जागा अशा किती तरी सोयी या 'विलीज'मध्ये आहेत. जीपच्या पुढच्या बाजूला 'ब्लॅकआऊट लाइट्स' युद्धाची आठवण करून देणारा. सगळीकडे ब्लॅकआऊट असताना हे दिवे मोटारीच्या पुढचे अगदी जवळचे तेवढे दिसेल इतकाच प्रकाश देतात. ही जीप चार-पाच फूट पाण्यात सहज चालते. सादिक म्हणाले, ''मला जुन्या मोटारींमध्ये वापरलेल्या तंत्राचे खूप आकर्षण आहे. जुनी मोटार म्हटले की देखभाल लागणारच, त्याला मर्यादाच नसते. पण मला या सगळ्यात खूप मजा वाटते.''
सादिक यांच्याकडे असलेली छोटय़ा आकाराची 'राइली वन पॉइंट वन' देखील ते खूप उत्साहाने दाखवतात. 'आताच्या मोटारींना 'पुश बटन स्टार्ट'ची सोय असते. पण माझ्या राईलीलाही पुश बटन स्टार्ट आहे. म्हणजे आताचे तंत्र अगदी त्या वेळीही वापरात होते.' 

ग्रीन रोल्स रॉइस
d11वेगवेगळ्या मालकांनी आणलेल्या रोल्स रॉइसच्या विविध मॉडेल्सचा संग्रहच इथे बघायला मिळाला. अमर अली जेठा यांची क्रीम आणि ऑलिव्ह ग्रीन रंगातली 'रोल्स रॉइस पी-११', योहान पूनावालांची १९३२ मधली लाल आणि काळी रोल्स रॉइस, या गाडय़ा डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्याच. मोटारीचा प्रत्येक भाग सुबक आणि उंची कसा असू शकतो याचं रोल्स रॉइस हे उत्तम उदाहरण. त्यातही मोटारीच्या पुढच्या बाजूस दिमाखात उभी राहिलेली 'स्पिरिट ऑफ एक्स्टसी'ची चंदेरी बाहुली ही रोल्स रॉइसची ओळख. 

मोरपंखी रोल्स रॉइस
१९२९ सालातली मोरपंखी रोल्स रॉइस दिमाखात उभी होती. चकचकीत रंगाच्या या आलिशान गाडीत मोटारीत चढायला रुंद पायरी, आत गुळगुळीत लाकडाची जुन्या ढंगाची सजावट, काळ्या चामडय़ाच्या शानदार सीट्स असा सगळा जामानिमा. मोटारीचे मालक फली धोंडी थेट मुंबईहून घेऊन आले होते तिला. ही मोटार माझ्याकडे १९९५ मध्ये आली. तेव्हा तिची अगदीच दुरवस्था झाली होती. तिला तिचे मूळ रूप प्राप्त करून देण्यासाठी पाच वष्रे काम करीत होतो, असे सांगताना धोंडी यांच्या चेहऱ्यावरील समाधान लपत नव्हते. पॅशन असेल ना, तर मोटारीची देखभाल नक्कीच जमते, अगदी सहज त्यांनी त्यांच्यातील कारवेड अधोरेखित केले. 

लाल परी इम्पाला
d9
तलेरा संग्रहातली लाल-पांढरी 'शेव्हरोलेट इम्पाला' (मॉडेल १९६४ चे) जुन्या हिंदी चित्रपटांच्या नायकांची आठवण करून देत होती. 'बी. यू. भंडारी' कंपनीचे प्रवीण कपाडिया या मोटारीची देखभाल करतात. दोन रंगांमधली मोटार हल्ली बघायला मिळणे विरळाच, पण बहुतेक जुन्या मोटारींमध्ये रंगसंगतीची ही किमया दिसते. इम्पाला प्रसिद्ध आहे तिच्या लांबडय़ा आकारामुळे. पुढच्या बाजूचे चार मोठमोठे दिवे, आतली नाजूक सजावट, अगदी स्टीअिरगमध्येही साधलेली लाल-पांढरी संगती, लाल चामडी सीट्स तिचे देखणेपण वाढवत होत्या.

मॉरिस मायनर
d12लहान आकर्षक आकाराच्या 'मॉरिस मायनर' मोटारींनीही या रॉलीत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. सुभाष सणस यांच्या संग्रहातली पिवळ्या रंगाची 'मॉरिस मायनर १०००', पार्कर सादिक यांची बॉटल ग्रीन रंगाची मॉरिस मायनर (१९५१) या मोटारी बघण्यासारख्या. जुन्या मोटारी आणखी जुन्या होत राहतील, कदाचित त्यांना पुढे नवे मालकही मिळतील. पण जोपर्यंत या मोटारींबद्दलचे प्रेम आणि 'पॅशन' राहील तोपर्यंत त्यांचा दिमाख जराही उणावणार नाही. 

रोव्हर
d13सोनेरी रंगाच्या शस्त्रसज्ज सनिकाच्या चिन्हानं सजलेली मरून रंगाची 'रोव्हर' (मॉडेल १९२३ चे) फली धोंडी यांच्या संग्रहात आहे. 'आता अशा फक्त ३० रोव्हर्स आहेत जगात. त्यातल्याही फक्त आठच धावण्याच्या अवस्थेत आहेत,' धोडी सांगतात. 'ट्विन सिलिंडर एअर कूल्ड इंजिन' हे या मोटारीचे वैशिष्टय़ आहे. हे इंजिन खरे तर मोटारसायकलसारखेच. जुन्या मोटारींमधल्याही फार कमी मोटारींना 'एअर कूल्ड' इंजिन असते. मरून रंग आणि त्यावर उठून दिसणारी सोनेरी रंगाची सजावट यामुळे ही मोटार शोभून दिसते.

- लोकसत्ता ( Drive इट )
दि. २०/०२/२०१५, शुक्रवार

Thursday, March 12, 2015

२०१४ नंतरचे अफगाणिस्तान - श्रीकांत परांजपे

मे २०१२ मध्ये नाटो (North Atlantic Treaty Organisation) च्या शिखर परिषदेत अफगाणिस्तानमधून नाटो तसेच अमेरिकन सैन्य माघारी घेण्याबाबत निर्णय झाला. त्याच महिन्यात अमेरिका व अफगाणिस्तानदरम्यान एक सामरिक पातळीवर सहकार्य करण्याबाबत करार झाला. नाटो तसेच अमेरिकन सैन्य आता टप्प्याटप्प्याने परत घेतले जाणार होते आणि डिसेंबर २०१४ पर्यंत सर्व सैन्य काढून घेतले जाईल व अफगाणिस्तानच्या लष्कराकडे स्थानिक सुरक्षिततेचे कार्य सोपविले जाईल असे ठरले आणि त्या वेळापत्रकानुसार डिसेंबर २०१४ मध्ये हे सैन्य काढून घेतले गेले. २०१४ नंतरचा अफगाणिस्तान हा या प्रदेशामधील एक गुंतागुंतीचा प्रश्न होऊ शकतो.
अफगाणिस्तानच्या 'आधुनिक' युगाची सुरुवात १९७३ च्या लष्करी क्रांतीनंतर होते. राजे झहीर शाह यांना पदच्युत करून सरदार दाऊद खान सत्तेवर आले. पुढे १९७८ मध्ये तराकी आणि नंतर हकिमुल्ला अमीन यांची सत्ता हातात घेतली. १९७९ च्या शेवटास सोव्हिएत रशियाच्या मदतीने अमीन यांना बाजूला करून बाब्राक कारमाल यांची राजवट सुरू झाली. त्यानंतरचा कालखंड हा मुजाहिद्दीनचा कालखंड आहे. अफगाणिस्तानमधून निर्वासित म्हणून पाकिस्तानात आलेली ही जनता आता आपल्या राष्ट्राला पुन्हा मुक्त करण्यासाठी लढा करायला सज्ज झाली. त्या मुजाहिद्दीनना अमेरिकेकडून आर्थिक व लष्करी मदत होती, तसेच पाकिस्तानचा पाठिंबा होता. पुढे १९८९ नंतर सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेतले आणि तिथे मुजाहिद्दीनचे सरकार स्थापन केले, त्याचा १९९६ मध्ये तालिबानने ताबा घेतला. २००१च्या ९/११च्या घटनेनंतर अफगाणिस्तानच्या राजकारणातील नवीन पर्व सुरू झाले. अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील अल् कायदाविरुद्धचे युद्ध हे सुमारे एक दशक चालले. त्यात नाटोचादेखील सहभाग होता. हे 'अमेरिकन पर्व' आता २०१४ मध्ये संपले आहे. अर्थात, अफगाणिस्तानबरोबर एका द्विपक्षीय सुरक्षा कराराच्या आधारे काही मर्यादित प्रमाणात अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये राहणार आहे, मात्र त्याचे मुख्य कार्य हे काही महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण व अफगाण सैन्याला प्रशिक्षण हे राहणार आहे.
अफगाणिस्तान
गेल्या तेरा वर्षांत अफगाणिस्तानमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. या बदलाचा आढावा घेताना अफगाणिस्तानच्या भारतातील दूतावासाचे वरिष्ठ अधिकारी अशरफ हैदरी म्हणतात की, अफगाणिस्तानमध्ये प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात शाळा, विद्यापीठे, दवाखाने, इस्पितळे, टेलिफोन, बँका, टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रे, दुकाने, क्रीडा इत्यादी दिसू लागल्या आहेत. अफगाणिस्तानमध्ये आज संसदेत स्त्रियांची संख्या मोठी आहे. एक सक्षम नागरी समाज पुढे येताना दिसतो आहे.
अशाच स्वरूपाचे विचार अफगाणिस्तानमधील राजकीय सल्लागार इसेब हुमायून इझेब यांनी मांडले आहेत. २०१४ मध्ये अफगाणिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकांनी दोन गोष्टी पुढे आणल्या. राष्ट्राचे नवीन संविधान आणि नव्याने बांधले जात असलेली सुरक्षा यंत्रणा. अफगाणिस्तानमधील प्रदीर्घ निवडणुका संपल्या आणि तिथे अशरफ घानी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले. त्यांचे विरोधी अब्दुल्ला अब्दुल्ला हेदेखील त्या सरकारमध्ये आहेत.
अफगाणिस्तान हे आता एक नवीन राष्ट्र म्हणून पुढे येऊ पाहत आहे. जे मुल्ला स्त्रियांनी राजकारणात येऊ नये असा आग्रह धरीत होते, त्यांना आता असे सांगण्यात येत आहे, 'मुल्लासाहेब, ज्या राष्ट्रांकडून (पाकिस्तान) आपल्याला धार्मिक शिकवण दिली जात आहे ते राष्ट्र एक महिला (बेनझीर भुट्टो) चालवीत होती हे विसरू नका.' अफगाणिस्तानमध्ये अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला जात आहे, अशा वातावरणात तालिबान कुठे आहे, हा प्रश्न उरतोच.
तालिबान
डिसेंबर २०१४ मध्ये पेशावरमध्ये शाळेवर झालेला तालिबानी हल्ला, पश्चिम आशियात इसिसची उद्भवलेली नवीन समस्या आणि अल कायदाचे पसरत चाललेले जाळे बघता, तालिबानकडे एक संघटना म्हणून नव्हे, तर एक प्रवाह म्हणून बघावे लागेल. तालिबानची सुरुवात ही अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत रशियाने केलेल्या हस्तक्षेपानंतर झाली. त्याला निश्चित असे स्वरूप मुल्ला ओमर याने १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला दिले. कंदाहार आणि दक्षिण अफगाणिस्तानमध्ये त्याची सुरुवात होते. तालिबानचा सुरुवातीचा लढा हा अफगाणिस्तानमधील हिकमतयार यांच्या मुजाहिद्दीन सरकारविरोधी होता. हिकमतयार यांच्या सरकारविरोधात उत्तरेकडून 'नॉर्दन अलायन्स'नेदेखील आघाडी उघडली होती. पुढे तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा मिळाला आणि १९९६ च्या सुमारास पाकिस्तानच्या मदतीने त्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळविला. या तालिबानला बिन लादेन याच्या अल कायदाचा पाठिंबा मिळाला.
९/११ नंतर अफगाणिस्तानविरुद्ध कारवाई करून नवीन सरकार स्थापन केल्यानंतर खरी समस्या ही तालिबानबाबत होती, कारण त्याचे अस्तित्व संपलेले नव्हते. अमेरिकेने काही काळ 'चांगले तालिबान' आणि 'वाईट तालिबान' अशा स्वरूपाचा फरक करायला सुरुवात केली. त्या 'चांगल्या तालिबान'बरोबर संवाद साधून त्यांना सरकारमध्ये सामील करण्याचे योजिले गेले. या पर्यायाबाबत आजदेखील बोलले जात आहे. कारण तसे न केल्यास तिथे पुन्हा एकदा यादवी सुरू होण्याची शक्यता आहे. अर्थात, या प्रक्रियेत एक महत्त्वाचा घटक हा तालिबान-पाकिस्तान (विशेषत: पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय) यांचे घनिष्ठ संबंध हा आहे. ओसामा बिन लादेन प्रकरणात हे संबंध जगजाहीर झाले.
पाकिस्तानने तालिबानविरुद्ध काही प्रमाणात कारवाया केल्याचे वृत्त कधी तरी दिले जाते; परंतु त्यांच्या एकूण दुटप्पी धोरणामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेलगत विशेषत: उत्तर व दक्षिण वझिरीस्तान आणि फाटा (FATA) प्रदेशात तालिबानचा आजदेखील प्रभाव दिसतो.
भारत
सामरिकदृष्टय़ा विचार केला तर अफगाणिस्तानमध्ये भारताचे तीन मुख्य हितसंबंध दिसतात. एकतर दहशतवादाचा प्रश्न आहे. अफगाणिस्तानचा वापर, मग तो वापर वैचारिक पातळीचा असेल, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचा असेल किंवा त्या क्षेत्राचा लपण्यासाठी वापर करण्याबाबत असेल, हे थांबवण्याची गरज आहे. दुसरे कार्य हे अफगाणिस्तान एक शेजारी राष्ट्र म्हणून त्याला मदत करणे, तिथे स्थैर्य नांदेल, विकास होईल हे पाहणे आणि त्यातून मैत्रीचे संबंध निर्माण करणे. तिसरा मुद्दा हा अफगाणिस्तानचा वापर हा मध्य आशियाई राष्ट्रांशी संपर्क साधण्यासाठीचा आहे. हे साध्य करण्यासाठी भारताला अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व व राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी तसेच इतर आशियाई राष्ट्रांनी अफगाणिस्तानला साथ देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आजपर्यंत भारताने अफगाणिस्तानला जी मदत केली ती मुख्यत: तेथील मूलभूत साधनसुविधा सुधारण्यासाठी. त्याचबरोबर लष्करी व पोलिसी क्षेत्रातील मदत महत्त्वाची आहे. ही मदत साधनसामग्री तसेच प्रशिक्षणाच्या संदर्भात केली जात आहे. अफगाणिस्तानमधून बाहेर पडणारी दहशतवादाची समस्या ही पाकिस्तानमार्गे भारतात येते, हे आता उघड सत्य आहे. त्याचे पडसाद काश्मीरमध्ये दिसतात. तसेच इतरत्रदेखील दिसतात. पाकिस्तानचे तालिबानशी असलेले जवळचे संबंध हे त्याला कारणीभूत आहेत. म्हणूनच भारताला अफगाणिस्तानमधील राजकीय व्यवस्थेत तालिबानचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
भारताने अफगाणिस्तान तसेच मध्य आशियाशी संपर्क साधण्यासाठी इराणचा मार्ग घेण्याचे योजले आहे. त्यासाठी एकीकडे इराणचे चाबहार बंदर विकसित करणे आणि चाबहार ते मिलाक, जे शहर अफगाणिस्तान-इराणच्या सीमेवर आहे तो रस्ता विकसित करणे हा कार्यक्रम आहे, तर दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये इराणच्या सीमेपासून झारांज ते देलारामचा रस्ता भारताने तयार केला आहे. चाबहारच्या विकासाने मध्य आशियाई राष्ट्र तसेच अफगाणिस्तानला समुद्री व्यापाराचा पर्यायी मार्ग खुला होतो.
भारताने अफगाणिस्तानबरोबर सामरिक सहकार्याचा करार केला आहे. त्या करारांतर्गत राजकीय व सुरक्षाविषयक संवाद, व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाण, क्षमता वाढविण्याच्या उपाययोजना, सामाजिक आणि सांस्कृतिक सहकार्य या सर्वाचा समावेश आहे. भारताच्या दृष्टीने अफगाणिस्तानबरोबरच्या या सहकार्याचे मोजमाप हे त्या राष्ट्राने भारतविरोधी दहशतवादी संघटनांना आश्रय मिळणार नाही हे साध्य करण्यात राहील. त्यासाठी कदाचित दोन्ही देशांना गुप्त माहिती आदानप्रदान करावी लागेल. त्याउलट भारताने अफगाणिस्तानला शस्त्रास्त्रांची योग्य मदत तसेच लष्करी प्रशिक्षण देणे अभिप्रेत असेल. अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर भारतीय घटकांना पूर्वीसारखे संरक्षण मिळणार नाही. पाकिस्तान त्या परिस्थितीचा फायदा घेईल हे भारत जाणून आहे. म्हणूनच अफगाणिस्तानचे अंतर्गत राजकीय स्थैर्य, तालिबानी गटांना बाजूला ठेवण्याची क्षमता आणि लोकाभिमुख राज्यव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. अशरफ हैदरी यांना या नव्या अफगाणिस्तानबाबत विश्वास आहे. भारताने त्या विश्वासाला योग्य पाठिंबा देण्याची गरज आहे.

- व्यूहनीती (लोकसत्ता, संपादकीय)
दि. २७/०२/२०१५, शुक्रवार

*लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संरक्षण व सामरिक शास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.

Wednesday, March 11, 2015

बायकांच्या दृष्टिकोनातून नवरे - मुकुंद वझे

गेल्या शतकातील अनेक रंजक ललित तसंच वैचारिक पुस्तके कालौघात वाचकांच्या स्मरणातून पुसली गेली आहेत. अशा काही पुस्तकांची किमान तोंडओळख करून देणारे पाक्षिक सदर 'विस्मृतीत गेलेली पुस्तके'
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक - 'आमचा संसार', 
लेखक- रघुनाथ गोविंद सरदेसाई, 
ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, 
प्रथमावृत्ती- १९४८, मूल्य- २ रु.

'हंस' मासिकात ऑगस्ट १९४७ ते एप्रिल ४८ या काळात 'बायकांच्या दृष्टिकोनातून नवरे' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह. मासिकात प्रसिद्ध झालेले लेख शीर्षकावरून वाटतात त्याप्रमाणे स्त्रियांनी लिहिलेल्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यासंबंधीच्या लिखाणाबाबत आहेत. मात्र, या स्त्रिया काही सामान्य स्त्रिया नव्हत्या. रमाबाई रानडे, आनंदीबाई कर्वे, लक्ष्मीबाई टिळक, लीलाबाई पटवर्धन, आनंदीबाई जोशी या स्त्रियांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल त्यांच्याच लिखाणातून काय चित्र उभे राहते, ते मांडण्याचा प्रयत्न र. गो. सरदेसाई यांनी केला आहे. पैकी पहिल्या चौघींची आत्मवृत्ते (अनुक्रमे) 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी', 'माझे पुराण', 'स्मृतिचित्रे', 'आमची अकरा वर्षे' ही प्रसिद्ध आहेत. तसेच 'डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्रे' हे काशिबाई कानिटकरांचे पुस्तक अशा चरित्र व आत्मचरित्रांवर आधारित असे हे पुस्तक आहे.
पंचवीसेक वर्षांपूर्वी सुनीताबाई देशपांडे यांचे 'आहे मनोहर तरी' हे आत्मकथन खूप गाजले. माधवी देसाई, सुमा करंदीकर, कमल पाध्ये यांचेही असेच लेखन चर्चेत राहिले. परंतु हे पुस्तक यापेक्षा थोडे वेगळे आहे. ते जवळजवळ ७० वर्षांपूर्वी लिहिले गेले आहे. दुसरं म्हणजे हे पुस्तक एका पुरुषाने तटस्थपणे आणि संबंधित पुस्तके प्रसिद्ध झाल्यानंतर बऱ्याच काळाने लिहिलेले आहे. रमाबाई रानडे व काशिबाई कानिटकर यांची पुस्तके १९१० व १९१२ साली प्रकाशित झाली. 'स्मृतिचित्रे'- १९३६, 'माझे पुराण'- १९४४, तर 'आमची अकरा वर्षे'- १९४५ मध्ये.  र. गो. सरदेसाईंचा जन्म १९०५ मधला. हे लेख लिहितेवेळी लेखकाची चाळिशी उलटलेली. म्हणजे अशा प्रकारच्या लिखाणाला आवश्यक अशी अनुभवसंपन्नता व संयम स्वाभाविकपणे आलेला. त्यामुळेच हे लिखाण मोजक्या शब्दांत केले गेले आहे. आणि तरीही आपल्या निष्कर्षांला आवश्यक ते संदर्भ देण्यात त्यांनी हयगय केलेली नाही. आपले निष्कर्ष मांडताना सरदेसाई यांनी त्या- त्या पुरुषांच्या कर्तृत्वाची, कार्यपद्धतीची उंची व वैशिष्टय़े मांडली आहेत. आणि तरीही त्यांच्या निष्कर्षांचा कल या प्रसिद्ध आणि कर्तृत्ववान स्त्रियांच्या सहानुभूतीचा आहे.
न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल ते लिहितात, 'रमाबाईंची रानडय़ांसंबंधीची भावना निरतिशय भक्तीची दिसते. रानडय़ांची रमाबाईंविषयीची भावना वात्सल्यपूर्ण सत्ताधाऱ्याची दिसते. रानडय़ांनी रमाबाईंना 'मी सांगतो ते मुकाटय़ाने कर,' असे हरेक प्रसंगी म्हटले आहे. रमाबाईंना काही विचारस्वातंत्र्य दिल्याचे उदाहरण सबंध पुस्तकात सापडत नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.'' (पृ. ८) आपण म्हणू ते बायकोने सर्व मुकाटय़ाने मान्य करावे, त्यासंबंधी कसलीही शंका तोंडानेही उचारू नये असा त्यांचा खाक्या दिसतो. (पृ. ९) त्याला काही अंशी रमाबाईंची स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाच्या खुजेपणाची (न्यायमूर्तीच्या तुलनेत) जाणीव हीही कारणीभूत होती. याउलट, आनंदीबाई जोशी यांच्या तुलनेत गोपाळराव खूपच सामान्य होते. परंतु आनंदीबाईंनी गोपाळरावांबद्दल सदैव कृतज्ञताच बाळगली. त्यांच्यासंबंधीचे सरदेसाईंचे भाष्य असे- ''स्त्रीशिक्षणावरील जबर निष्ठा हा गोपाळरावांचा प्रशंसनीय गुण होता व त्याबद्दल आनंदीबाईंनी त्यांच्याविषयी प्रकट केलेली कृतज्ञताही योग्य होती. पण  गोपाळरावांनी मात्र आनंदीबाईंना बोचून काढले.'' (डॉ. आनंदीबाईंची शोकांतिका अशी, की विदेशी अ‍ॅलोपथीचे पद्धतशीर शिक्षण घेऊन परतल्यावर दुखणे विकोपाला गेल्यावरही त्यांच्यावर आयुर्वेदिक औषधाचे प्रयोग गोपाळरावांनी केले. आनंदीबाईंबरोबरच गोपाळरावांनी केलेला हा स्वत:चाही पराभव होता. पण 'पत्रव्यवहारातून दिसणारा आनंदी-गोपाळ यांचा संसार' हे बंधन स्वत:स घातल्याने सरदेसाई यांच्या लिखाणात याचा निर्देश होत नाही.) गोपाळराव जोशी व न्या. रानडे यांच्यात कृतिशीलतेच्या बाबतीत जे अंतर होते त्यांचा सरदेसाई वाजवी उल्लेख करतात. म्हणजे गोपाळरावांनी आनंदीबाईंच्या शिक्षणासाठी स्वत: कष्ट, अवहेलना सोसली; पण न्यायमूर्तीनी मात्र घरच्या बायकांकडून रमाबाईंच्या शिक्षणाला होणाऱ्या विरोधालाही प्रतिकार केला नाही. ते सर्व रमाबाईंनाच सोसावे लागले. परंतु आनंदीबाई व रमाबाई दोघींनाही जी तुच्छतेची वागणूक मिळाली, त्याचे मूळ पुरुषी अहंगंडात काही प्रमाणात नक्कीच होते. तसे साम्य लेखक दाखवत नाही.
आनंदीबाई जोशी व रमाबाई रानडे यांच्या उलट आनंदीबाई (बाया) कर्वे यांची स्थिती आहे. त्या आपल्या 'माझे पुराण'मध्ये म्हणतात, ''कर्व्यांचे वागणे माझ्याशी काय, मुलांशी काय, सडेतोडपणाचे, तुटकपणाचे व हिशेबी असे. मात्र कर्वे माझ्याशी तसे वागतात हे मी कोणाच्या लक्षात आणून दिले नाही.'' पार्वतीबाईंच्या या विधानावर लेखकाचे भाष्य असे- ''कव्र्यानी जरूर तेथे आपल्या कर्तबगार बायकोची बाजू घेतली नाही, ही रुखरुख आनंदीबाईंच्या मनाला अजून बोचत आहे.'' (पृ. ३२)
इथे असे वाटते की, आनंदीबाईंनी कर्व्यांच्या त्यांच्याशी तुटक, हिशेबी वागण्याचा उल्लेख इतरांसमोर केला नाही याचेही मूळ त्यांच्यावर असलेल्या मध्ययुगीन संस्कारांत आहे. आणि ते आनंदीबाई जोशी व रमाबाई रानडे यांना समांतर आहे. पण सरदेसाई या शक्यतेकडे दुर्लक्षच करतात. लग्नानंतर आनंदीबाईंना पूर्वीप्रमाणे कर्व्यांना 'अण्णा' म्हणणे अवघड वाटू लागले, याचे कारण सरदेसाईंच्या मते, जुने संस्कार हे होते.
इथे थोडीशी चुकभूल झाली आहे. अण्णा हे आपल्याकडे आणि कर्नाटक-तामीळनाडूमध्ये मोठय़ा भावाला म्हटले जाते. नवऱ्याला मोठय़ा भावाच्या नात्याचे निदर्शक असलेल्या 'अण्णा' या संज्ञेने हाक मारणे कुणाही स्त्रीला अनुचितच वाटणार. त्यात नव्या-जुन्या मूल्यांचा संबंध नसतो. याउलट, कमलाबाई फडके लग्नानंतरही ना. सीं.चा उल्लेख 'अप्पा' या नावानेच करीत. मग त्यांना कोणत्या मूल्यांचे म्हणायचे?
लक्ष्मीबाई टिळकांबाबतही सरदेसाई यांनी संयमित लिहिले आहे. टिळकांच्या विरोधाभासी स्वभावाचे दाखले लक्ष्मीबाईंच्या लिखाणातून उद्धृत करून ते सांगतात- ''टिळकांनाही आपली बायको शिकून मोठी व्हायला हवी होती, पण त्यासाठी त्यांनी स्वत: काहीच कष्ट घेतले नाहीत. त्याही आर्य पतिव्रता होत्या. 'आज जी मी काही आहे ती टिळकांमुळेच आहे..' असा लक्ष्मीबाईंचा भाव आहे.'' (पृ. ५०)
लीलाबाई व माधव ज्युलियन यांचा संसार या सर्वापेक्षा वेगळा झाला. तो खूप प्रौढपणी झाला. दोघेही सुशिक्षित होते. आणि इतर सर्व स्त्रियांच्या मानाने लीलाबाईंनी माधव ज्युलियन यांच्या स्वभावाच्या मर्यादा स्पष्टपणे सांगितल्या आहेत. माधवरावांबद्दल त्यांना आदर आहे; पण आंधळा वाटेल असा भक्तिभाव नाही.
'आमचा संसार' हे नेटकेपणाने, संयमित शैलीत केलेले विवेचन आहे. मात्र, ते वाचत असताना जाणवते की, न्यायमूर्ती रानडे, गोपाळराव जोशी, अण्णा कर्वे, रेव्ह. टिळक आणि माधव ज्युलियन यांनी आपल्या पत्नीला दिलेल्या वागणुकीस बेफिकीरपणा कारणीभूत होता. या बेफिकिरीचा प्रज्ञेशी, पुरुषी अहंभावाशी, स्वकेंद्रिततेशी संबंध कसा असतो, याचा शोध अधिक सखोलपणे घेतला जायला हवा होता. र. गो. सरदेसाईंचे ७० वर्षांपूर्वीचे हे लिखाण म्हणूनच पथदर्शक मानावे लागते. 

- लोकसत्ता (लोकरंग, विस्मृतीत गेलेली पुस्तके)
दि. ०४/०१/२०१५, रविवार

Tuesday, March 10, 2015

पितात सारे गोड हिवाळा

 पितात सारे गोड हिवाळा

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायू हळूच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढऱ्या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमध्ये फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुऱ्या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्घ्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

कवी - बा. सी. मर्ढेकर
-----

कोलंबसाचे गर्वगीत

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जू दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राषून मातू दे दैत्य नभामधले, दडू द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळू दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनी मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नभ माथ्यावरती
आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हाला धाम

काय सागरी तारू लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहून घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू , जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारू शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला"

कवी - कुसुमाग्रज
------

Monday, March 9, 2015

स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळा पैलू समोर आणणाऱ्या टेलिव्हिजनवरील जाहिराती

गेल्या अनेक वर्षांपासून स्त्रिया या भारतीय जाहिरात क्षेत्राच्या केंद्रबिंदू राहिल्या आहेत. भारतीय टेलिव्हिजनवरील आजवरच्या व्यवसायिक जाहिरातींवर नजर टाकल्यास स्त्रियांचा वावर हा प्रामुख्याने सेक्स सिम्बॉल किंवा गृहिणीच्या भूमिकेपुरता मर्यादित असल्याचे दिसून येते. मात्र, टेलिव्हिजनवरील काही जाहिराती या सगळ्याला अपवाद ठरल्या आहेत. स्त्रियांचे पारंपरिक पद्धतीने चित्रण न करता आत्मविश्वास असलेले स्त्रियांचे रूप या जाहिरांतीच्या माध्यमातून जगासमोर आले. अशाच काही जाहिरातींवर टाकलेली नजर.

 डव्ह- डव्ह या साबण कंपनीने मध्यंतरी जगभरात महिला आणि त्यांच्या सवयींचा आढावा घेणारी एक मोहिम चालविली होती. डव्हच्या मते जगातील बहुतांश महिला या स्वत:च्या सौंर्दयाबाबत कायम असमाधानी असतात. त्यामुळे डव्हने अशा स्त्रियांना एकत्र बोलावून एका चित्रकाराला कॅनव्हासवर त्यांची चित्रे काढायला सांगितली. ही सर्व चित्रे दाखवताना त्या चित्रकाराने प्रत्येक स्त्रीला तुम्ही सांगता त्यापेक्षा तुम्ही सुंदर आहात, असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न विचारला. त्यानंतर या स्त्रिया कशाप्रकारे व्यक्त झाल्या हे, पाहण्यासाठी या जाहिरातीचा व्हिडिओ नक्कीच बघितला पाहिजे.

व्हिस्पर- भारतामध्ये बराच काळ स्त्रियांना अनेकप्रकारे दडपून ठेवण्यात आले होते. यामध्ये परंपरा आणि संस्कृतीचा मोठा वाटा होता. भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात स्त्रियांच्या मासिक पाळीविषयीच्या प्रचलित असलेल्या समस्येला व्हिस्परने आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून वाचा फोडली होती.

टायटन वॉचेस- गेल्या काही वर्षांत भारतातील सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत असून सध्याच्या स्त्रिया या प्रगती करताना आणि स्वत:विषयी ठाम भूमिका घेताना दिसत आहेत. कॉर्पोरेट, समाजसेवा, राजकारण आणि अगदी घरात घरातदेखील या स्त्रिया आत्मसन्मानाने वावरत आहेत. या स्त्रिया खंबीर आहेत, स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची धमक त्यांच्यात आहे आणि ते निर्णय चुकलेच तर त्या पश्चाताप करत बसताना दिसत नाहीत. केवळ रडण्यासाठीच पुरूषाच्या खांद्याचा आधार या स्त्रियांना नको असून आपल्या मनातल्या चांगल्या-वाईट गोष्टी हक्काने सांगता येतील, असा जोडीदार त्यांना हवा आहे.
पीसी ज्वेलर्स- भारतीय कुटुंबव्यवस्थेतील पुरूषकेंद्रित संस्कृती नाकारणारी कमावती स्त्री आणि या सगळ्याला तितकाच पाठिंबा देणार तिचा नवरा या सगळ्याचे प्रभावी चित्रण पीसी ज्वेलर्सच्या जाहिरातीत करण्यात आले आहे.
टीव्हीएस स्कुटी- स्त्रियांचा वावर हा केवळ चार भिंतींपुरताच मर्यादित नसावा किंवा त्यांनी काय घालावे, खावे याच्या मर्यादा दुसऱ्यांनी आखू नयेत. कारण, स्त्रियांना स्वत:ला काय वाटते, हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. अशाचप्रकारचा संदेश टीव्हीएस स्कुटीच्या या जाहिरातीतून देण्यात आला आहे. या जाहिरातीमध्ये दाखविण्यात आलेली तरूणी पोंगलच्या दिवशी तिच्या आईला ज्याप्रकारे आश्चर्याचा धक्का देते, त्यावरून दर्शकांना सण आणि परंपराकडे अधिक सुक्ष्मपणे पाहण्याची दृष्टी मिळते.

- लोकसत्ता, लाईफस्टाईल 
दि. ०९/०३/२०१५, सोमवार  

Thursday, March 5, 2015

माणसं

अशोक कोठावळे

कमीत कमी बोलायचं आणि कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता काम करत राहायचं, ही मॅजेस्टिक प्रकाशनच्या अशोक कोठावळे यांची खासीयत. त्यामुळेच त्यांच्या मॅजेस्टिक प्रकाशनला बघता बघता साठ वर्षं आणि साहित्याला वाहिलेल्या 'ललित' मासिकाला ५० वर्षं कधी झाली, ते कळलंच नाही. पण २०१२चा सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठी असलेला श्री. पु. भागवत पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने मॅजेस्टिक प्रकाशन आणि अशोक कोठावळे यांची नेमकी दखल घेतली. अर्थात या पुरस्काराचे खरे मानकरी आपले वडील केशवराव कोठावळे आणि त्यांनी गोळा केलेला लेखकांचा गोतावळा आहे, हे अशोकरावही मानतात. कारण १९५२ ला मॅजेस्टिक प्रकाशन आणि १९६४ ला ललित मासिक सुरू केल्यावर १९८३ साली निधन होपर्यंत प्रकाशनाची-मासिकाची धुरा केशवरावच वाहत होते. पण अशोकरावांचं कसब म्हणजे वडिलांनी उभा केलेला प्रकाशनाचा डोलारा त्यांना केवळ सांभाळलाच नाही, तर वाढवलादेखील! केशवरावांनी दांडेकर, दळवी, कर्णिक असे लेखक जमवले-जपले, तसंच अशोकरावांनी भारत सासणे, रंगनाथ पठारे यांच्यासारखे नव्या पिढीचे लेखक मॅजेस्टिकच्या छायेखाली आणले. अशोकराव वडिलांच्या प्रकाशनाच्या व्यवसायात येणार हे ठरलेलंच होतं. शिवाय वरच्यावर घरी येणारे मोठमोठे साहित्यिक पाहून आणि त्यांच्या गप्पा ऐकून अशोकरावांनीही मनोमन याच व्यवसायात येण्याचं मनात पक्कं केलं होतं. अशोकरावांनी दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर टाकल्यावर दुसऱ्या दिवसापासून केशवरावांनी त्यांना आपल्याबरोबर न्यायला सुरुवात केली. मात्र सगळ्यात आधी अशोकरावांना काम मिळालं, ते 'ललित' मासिकाच्या अंकावर पत्ते टाकण्याचं. हे काम चोखपणे सुरू असतानाच अशोकरावांचे काका तुकारामशेट यांनी केशवरावांच्या संमतीने प्रकाशनाच्या बरोबरीने लॉटरी तिकिटांचा व्यवसाय सुरू केला. साधारणपणे १९६८ सालापासून १९८० पर्यंत अशोकरावांनी लॉटरीच्या धंद्यात लक्ष घातलं. पुढे १९८३ ला अचानक केशवरावांचं निधन झालं आणि मॅजेस्टिक प्रकाशनापासून ते ललित मासिकापर्यंतची संपूर्ण जबाबदारी अशोकरावांवर आली. सुरुवातीला अशोकरावांना ती पेलवेल की नाही, याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली. पण त्याचवेळी मॅजेस्टिक आणि केशवरावांचा भावनिक आधार असलेले जयवंत दळवी अशोकरावांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले आणि मॅजेस्टिकचा कारभार अशोकरावांकडे आला. दळवींनी दाखवलेला विश्वास पुढच्या काळात अशोकरावांनी सार्थ ठरवला. मॅजेस्टिक आणि ललित वाढतच राहिला. सोबत मॅजेस्टिक बुक डेपोचाही विस्तार झाला. नुकतीच अशोकरावांनी ललितची पन्नाशी साजरी केली, तेव्हा उपस्थित असलेला प्रकाशन क्षेत्रातला गोतावळा पाहिल्यावर खात्रीच झाली की, अशोकराव केशवरावांच्याच पाऊलखुणांवर उभे आहेत!

- महाराष्ट्र टाईम्स (संपादकीय)
दि. ०६/०७/२०१३, शनिवार 

-- x -- 

रत्नाकर कुलकर्णी

प्रकाशनाच्या व्यवसायात ग्रंथनिर्मितीएवढेच ग्रंथविक्री आणि ग्रंथप्रसाराचे महत्त्व आहे. रत्नाकर कुलकर्णी यांनी कॉन्टिनेन्टल प्रकाशनाची ही दुसरी बाजू समर्थपणे सांभाळली. त्यामुळेच कर्तृत्ववान अनंतराव कुलकर्णी यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि व्यासंगी अनिरुद्ध कुलकर्णी यांचे कनिष्ठ ‌बंधू एवढीच त्यांची ओळख नाही. 'कॉन्टिनेन्टल' आणि महाराष्ट्र साहित्य परिषद या दोन्ही संस्थांमध्ये त्यांनी उमेदीने काम केले. स्वभावाने परखड, स्पष्टवक्ते; पण प्रेमळ अशी त्यांची निकटवर्तीयांमध्ये ओळख होती. त्यांचे अक्षर वळणदार, सुंदर होते. कॉलेजमध्ये असताना ते क्रिकेट खेळत असत. अनंतराव कुलकर्णींसारख्या पित्याचे मार्गदर्शन आणि सहवास त्यांना लाभला होता. घरात आणि 'कॉन्टिनेन्टल'मध्ये सातत्याने साहित्यिकांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा वावर असे. या साऱ्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्यावर झाला. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. अनंतरावांनी स्थापन केलेल्या 'कॉन्टिनेन्टल'ची धुरा त्यांनी बंधू अनिरुद्ध यांच्यासमवेत सांभाळली होती. स्पर्धेच्या युगात त्यांनी स्वीकारलेले काम प्रकाशनासाठी पोषक ठरले. 'कॉन्टिनेन्टल'च्या ग्रंथविक्री, वसुली आणि ग्रंथप्रसाराचे काम त्यांनी सुमारे ४५ वर्षे केले. ‌पुस्तक विक्रेत्यांशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. दुकानात बसून पुस्तक विक्री करण्यापेक्षा गावोगाव प्रत्यक्ष हिंडण्यावर त्यांचा भर असे. त्यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्र पालथा घातला होता. त्यामुळे अनेक विक्रेत्यांशी त्यांची मैत्री जुळली होती. लेखक आणि अन्य प्रकाशकांशीही त्यांचे उत्तम संबंध होते. पुस्तक प्रदर्शनांच्या निमित्ताने आणि रसिक म्हणून त्यांनी भरपूर प्रवास केला. एकूणच भटकंतीची आवड असल्याने देशात आणि परदेशांत ते नेहमी जात असत. प्रकाशनाबरोबरच साहित्य परिषदेच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. कार्यवाह, कोषाध्यक्ष, साहित्य महामंडळावर परिषदेच्या वतीने प्रतिनिधित्व, घटना समितीचे निमंत्रक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या. परिषदेचे पुरस्कार, घटना दुरुस्ती, ग्रंथालय, साहित्यपत्रिका, अतिथी निवास या संदर्भातील समित्यांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले. प्रकाशन परिषदेशी त्यांचे जवळचे संबंध होते. जागतिक मराठी परिषदेचेही ते सदस्य होते. देशात आणि परदेशांत झालेल्या अधिवेशनांना ते आवर्जून उपस्थित राहात. अलीकडील काळात त्यांना कॅन्सरने गाठले होते. तरीही नव्या पिढीच्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी ते 'कॉन्टिनेन्टल'मध्ये जात असत. ग्रंथनिर्मिती, ग्रंथविक्री, ग्रंथप्रसार, साहित्य व्यवहार या क्षेत्रात ते सातत्याने कार्यरत राहिले. प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये प्रदीर्घ काळ सक्रिय असणारे, अनुभवी, अनेक घडामोडींचे ज्येष्ठ साक्षीदार असलेले व्यक्तिमत्त्व आता काळाच्या पडद्याआड गेले आहे

- महाराष्ट्र टाईम्स (संपादकीय)
दि. २१/०९/२०१३, शनिवार

-- x --

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...