Friday, February 27, 2015

सर्रास वापरले जाणारे चुकीचे शब्द आणि उच्चार - दिलीप श्रीधर भट

साधारणत: ७०-८० वर्षांपूर्वीच्या मराठीत मरण पावलेल्या व्यक्तीचा उल्लेख मयत किंवा मृतक असा असावयाचा आणि तो शब्दार्थाने योग्यच होता. पण काही विद्वानांना हा शब्द ग्राम्य वाटला, म्हणून कैलासवासी, स्वर्गवासी सारखे शब्द त्यांनी वापरणे सुरू केले व ते रूढ झाले. स्वर्गीयचा अर्थ स्वर्गासमान, स्वर्गासारखा आहे. जसे आपण म्हणतो स्वर्गीय आनंद, स्वर्गीय सुख, स्वर्गीय सौंदर्य, स्वर्गीय संगीत इत्यादी. मुस्लीम व्यक्ती मरण पावल्यावर त्यास पैगंबरवासी व ख्रिश्चन व्यक्ती मरण पावल्यावर ख्रिस्तवासी हा शब्दप्रयोग आपण करतो तोही अयोग्य आहे. कारण त्यांच्या धार्मिक धारणेनुसार त्यांची शवं दफन केली जातात व निवाड्याच्या दिवशी त्यांचे पुनरुत्थान होऊन त्यांच्या पाप-पुण्याप्रमाणे त्यांना स्वर्ग, नरक प्राप्त होणार असतो. त्यामुळे मुस्लीम, मरहूम व ख्रिश्चन लेट हा शब्द मृताच्या आधी लावतात. सर्वच मृत झालेल्या व्यक्तींच्या नावाआधी ‘दिवंगत’ हा शब्द लावणे योग्य ठरते. संसदीय शब्दही ‘दिवंगत’ हाच आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर भागाला पश्चिम महाराष्ट्र असे लिहिले, बोलले जाते. पश्चिम महाराष्ट्र हा रूढ शब्द अयोग्य आहे. तो दक्षिण महाराष्ट्र हवा. कारण तो विभाग उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यांच्या खाली आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोकण (ठाणे जिल्हा ते सिंधुदुर्ग जिल्हा) आणि पूर्व महाराष्ट्र म्हणजे विदर्भ.
हॉर्स ट्रेडिंगचे रूपांतर घोडे बाजार असे झाले आहे. ते अयोग्य आहे. घोडे, उंट, हत्ती यांचे मेळे भरतात. पण बैल बाजार भारतातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यात वर्षभर भरत असतात. लाखो बैलजोड्यांची खरेदी-विक्र ी करोडो रुपयात होते. म्हणून घोडे बाजार ऐवजी ‘बैल बाजार’ हे हॉर्स ट्रेडिंगचे रूपांतर योग्य ठरते.
आजही बॉम्बे हायकोर्ट हे इंग्रजी नाव कायम आहे. ते मुंबई उच्च न्यायालय झाले पाहिजे, कारण मुंबई उच्च न्यायालय-नागपूर खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालय-औरंगाबाद खंडपीठ असे नामकरण झाले आहे. पण महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालय असे होऊ शकत नाही. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत गोवा हे राज्य पण येते. आता सर्वोच्च न्यायालयानेच बॉम्बेचे मुंबई, कलकत्ताचे कोलकाता, मद्रासचे चेन्नई अशी नामांतरास मान्यता दिली आहे.
अनेक महत्त्वाच्या सरकारी सूचना हिंदीतूनच दिल्या जातात, असे का? हे केवळ महाराष्ट्रातच होते. तामिळनाडू, केरळ, प. बंगालमध्ये होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवहार शब्दकोशातील मंत्री, सचिव, सभासद, सेनापती, पंतप्रधान इत्यादी अनेक शब्द आजही व्यवहारात आहेत.
अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्य इत्यादींना शासकीय शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्ती-छात्रवृत्ती हा शब्द अयोग्य आहे. विशिष्ट जाती-जमातीतील विद्यार्थ्यांनी शिक्षण नियमित घ्यावे यासाठी त्यांना उत्तेजनार्थ विद्यावेतन देण्यात येते, म्हणून विद्यावेतन हा शब्द योग्य ठरतो.
लोकशाही हा शब्द जरी मराठीत रूळला असला तरी तो योग्य नाही. कारण त्यात जो शाही शब्द आहे तो राजेशाही, बादशाही, या संबंधित आहे. म्हणून लोकतंत्र हा शब्द योग्य ठरतो. स्वातंत्र्य सेनानी ही उपाधी अनेक व्यक्तींच्या आधी लावण्यात येते. हे योग्य नाही. कारण सेनानी म्हणजे सेनापती. सेनापती एकच असतो आणि सैनिक अनेक असतात. म्हणून स्वातंत्र्य सैनिक हा योग्य शब्द वापरणे आवश्यक आहे.
हिंदू हा शब्द सिंधुपासून तयार झाला अशी एक धारणा आहे. त्याचे स्पष्टीकरण व पुष्टीकरण असे करण्यात येते की, अरबी लिपीत ‘स’ हे अक्षरच नाही. पण ते चुकीचे आहे. कारण सलाम, सलमान, सुलेमान, सुलतान असे अनेक शब्द ‘स’पासून सुरू होणारे शब्द अरबीत आहेत. ‘हिंदू’च्या मूळ अरबी शब्दाचा अर्थ काळ्या तोंडाचा चोर, दरोडेखोर, असा आहे. हिंदू हा शब्द कोणत्याही वेदात, पुराणात, महाभारतात, रामायणात नाही म्हणून आर्य धर्म, वैदिक धर्म, सनातन धर्म हे शब्द योग्य आहेत व ठरतात.
महाराष्ट्रा असा उच्चार न करता आपण महाराष्ट्र असा करतो. आंध्राचे आंध्रच करतो. पण स्पेलिंग प्रमाणे तामिलनाडू, तिलकरत्ने, जयवर्धने, इत्यादीचे उच्चार करतो पण मूळ उच्चार हा तमिळनाड, जयवर्धन, तिलकरत्न असा आहे. गुप्ता, मिश्रा या आडनावांचे स्पेलिंगनुसार उच्चार पण मूळ गुप्त, मिश्र आहे.
सहस्रचंद्रदर्शन सोहळा अनेकांचा साजरा होतो. पण दर महिन्यात अमावास्या सोडल्यास २८-२९ दिवस चंद्र आकाशात दिसतो. त्याचे दर्शन घेणे असा अर्थ नसून शुक्ल प्रतिपदेच्या चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर हा सोहळा साजरा केला जातो. व्यवहारात शिशुपण, बालपण, आजारपण, प्रवास इत्यादी कारणांमुळे कोणीच शुक्ल प्रतिपदा/द्वितीयेच्या चंद्राचे सहस्र दर्शन घेतलेले नसते.
संगीत क्षेत्रात विशेष स्थान असणाऱ्या गायिकेस संगीत विदुषी ही उपाधी लावतात, जी योग्य आहे. पण पुरुष गायकाला पंडित ही उपाधी लावणे अयोग्य आहे. पंडित म्हणजे ब्राह्मण व अनेक विख्यात संगीत कलाकार ब्राह्मण नसतात. म्हणून पुरुष संगीत कलाकारांना ‘संगीत विद्वान’ ही उपाधी लावणे योग्य जंजीरा नावाचा किल्ला प्रसिद्धच आहे. हा किल्ला एका बेटावर आहे. अरबीमध्ये जजीरा चा अर्थ बेट आहे. म्हणून जजीरा (बेट) हे मूळ नाव योग्य ठरते. जजीराचे मराठीकरण करताना ज वरती नजरचुकीने अनुस्वार दिल्याने जंजीरा असा शब्द तयार झाला असे दिसते
कोकण-दक्षिण महाराष्ट्र इत्यादी विभागात ‘भातशेती’ हा चुकीचा शब्द प्रयोग रूढ झाला आहे. पोळीची शेती, भाकरीची शेती असा शब्दप्रयोग प्रचारात नाही. तांदूळ शिजविल्यावर ‘भात’ तयार होतो व तांदूळ धानाची मळणी केल्यावर मिळतो. पूर्व विदर्भात धानाची शेती होते. म्हणून ‘धानाची शेती’ हा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात वापरात येणे आवश्यक आहे.
मनमुराद, मनपसंद, जिल्हाधिकारी इत्यादी शब्द संस्कृत व फारसीचे जोड शब्द आहेत व ते आता मराठीच झाले आहेत. ते बदलण्याची आवश्यकता नाही. पण ज्या शब्दांचा अर्थ विपरीत होतो त्यासाठी योग्य शब्द वापरले गेले पाहिजेत व त्यासाठी सर्व मराठी भाषक सतत प्रयत्न करतील असा विश्वास आहे.

- लोकमत
दि. २७/०२/२०१५, शुक्रवार

Thursday, February 26, 2015

सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द - अमेय गोगटे

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
   हे असे असंख्य खेळ पाहते मराठी
    शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।।

असं सुरेश भटांनी सांगितलं असलं तरी आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ' यू नो ' , ' यू सी ' हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं. अशा परिस्थितीत, काही राजकारणी मंडळी मराठी माणसामधलं मराठीप्रेम जागवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याहीपेक्षा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या भाषाशुद्धीच्या विचाराचा आज विचार व्हायला हवाय...

संवादाचं माध्यम आणि अभिव्यक्त होण्यासाठीचं साधन, म्हणजेच भाषा का? तर, नाही. भाषा ही संस्कृतीचं द्योतक असते, संस्कृतीची वाहक असते. संस्कारातून संस्कृती घडत असते आणि म्हणूनच भाषेतून संस्कारही प्रतीत होत असतात. पण अनेक शतकं मराठी भाषेवर आक्रमणं होत होती. त्या काळात अनेक परकीय शब्द मराठी भाषेत समाविष्ट झाले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, अत्तर, तवा, हे शब्द मराठी नाहीत, ते अरबी आणि फारशी भाषेतून आलेत हे आज सांगितल्याशिवाय अनेकांना कळणारही नाही. या संकरामुळे मराठी भाषा समृद्ध झाली, असं अनेकांना वाटतं. आजही इंग्रजी शब्द मराठीत आल्यानं मराठी संपन्न झाली, असंच भाषातज्ज्ञही म्हणतात.


पण, सावरकरांना हे मत मान्य नव्हतं. १९२४ मध्ये केसरीतून त्यांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. याच विषयावरून दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात झालेला वादही प्रसिद्ध आहे. ' परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले, ही आमची विजय-चिन्हंच नाहीत का ?' , असा प्रश्न दत्तोपंतांनी सावरकरांना विचारला. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ' ती काही आमची विजय-चिन्हं नाहीत ; ते तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत .' सावरकरांचं हे म्हणणं एका अर्थानं योग्यही आहे. आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतानाही दुस-या भाषेचा आधार का घ्यावा ?

' आपण बहुधा हयगय करून कधी कधी निरुपाय म्हणून आणि इतर वेळी ऐट म्हणून आपल्या बोलण्यात-लिहिण्यात परकीय शब्द वापरतो. ते जितके अधिक वापरले जातात , तितके त्या अर्थाचे आपले शब्द मागे पडतात . पुढे पुढे तर त्या शब्दांवाचून तो अर्थ व्यक्‍तच होत नाही , असे वाटू लागते. ते परशब्द आपलेच झाले , असे खुळे ममत्व वाटू लागते आणि पर-शब्द आपल्या भाषेच्या हाडीमाशी रुतून बसतात ' , असं विश्लेषण सावरकरांनी केलंय.

' स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं , हे औरस मुलांना मारून दुसरी मुले दत्तक घेण्यासारखे आहे. तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नव्हे , तसाच हा काही शब्दसंपत्ती वाढवायचा मार्ग नाही. आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी , फारशी इत्यादी परक्या भाषांमधून शब्द घेणे , म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीचे कप हाती घेण्यासारखे नाही का ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि अनेक पर-शब्दांना मराठमोळे प्रतिशब्द सुचवले. हे शब्द किचकट होते, संस्कृतप्रचूर होते आणि समजायला परभाषी शब्दांपेक्षाही कठीण होते अशी टीका काहीजण करतात. पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत. आज ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचं सौंदर्यही त्यातून जाणवतं. 
 
दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)

असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे. 

- महाराष्ट्र टाईम्स (मटा विशेष)
दि. २८/०५/२००८, बुधवार 
 

२६ फेब्रुवारी, १९६६: स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या समर्पित जीवनाची अखेर

२७ फेब्रुवारी १९६६ चे सगळे पेपर सावरकर गेल्याची दुःखद बातमी घेऊन आले. ' महाराष्ट्र टाइम्स ' मधेही ही बातमी पहिल्या पानावरची पहिली हेडलाइन होती. टाइम्स अर्काईव्ह्जच्या मदतीने ही बातमी आम्ही ऑनलाइन वाचकांसाठी देत आहोत.
.............................................

स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या समर्पित जीवनाची अखेर
 
चार आठवडे मृत्यूशी प्रखर झुंज
अंत्यदर्शनासाठी हजारो लोकांची रीघ : आज दुपारी चंदनवाडीत अंत्यसंस्कार

(आमच्या प्रतिनिधीकडून) 

मुंबई, शनिवार - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गेला महिनाभर मृत्यूशी चाललेली प्रखर झुंज आज सकाळी ११.१० वाजता संपली व त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधानाचे वृत्त समजताच सारा भारत हळहळला आणि सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत सा-यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर योद्ध्याला, मराठी सारस्वताला अमर साहित्याचे लेणे देणा-या महाकवीला आणि बुद्धिप्रामाण्याचा आग्रह धरणा-या कर्त्या सुधारक तत्वज्ञाला श्रद्धांजली अर्पण केली.

वीर सावरकरांची प्रकृती गेला महिनाभर चिताजनक होती, पण गेले चार दिवस ते मृत्यूशी अक्षरश: तीव्र लढत देत होते. आज त्यांच्या डॉक्टरांनी काढलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, १०.३० वाजता त्यांचे श्वसन व रुधिराभिसरण एकदम मंदावले, ताबडतोब कृत्रिम उपयांनी श्वसन व रुधिराभिसरण सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आलं, त्यांच्या प्रकृतीत तात्पुरती सुधारणा झाली. परंतु थोड्याच वेळात त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली व शेवटी मृत्यूने सर्व मानवी प्रयत्न हरवले व वीर सावकरांची प्राणज्योत विझली.

वीर सावरकरांचे चिरंजीव विश्वासराव, कन्या प्रभावती चिपळूणकर, जावई माधवराव चिपळूणकर, पुतणे विक्रम व अशोक इत्यादी नातेवाईक मंडळी व डॉ. सुभाष पुरंदरे, डॉ. अरविंद गोडबोले, डॉ. वसंत काळे प्रभृति त्यांचे वैद्यकीय साहाय्यक निधन समयी त्यांच्या जवळ होते.

वीर सावरकरांच्या निधनाचे वृत्त मुंबई शहरात वायुवेगाने पसरले व दादरच्या शिवाजी पार्कजवळील सावकर सदनापाशी हजारो नागरिकांची अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली. ही गर्दी क्षणाक्षणाला वाढत होती. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सावरकर सदनापासून सुरू झालेली रांग शिवाजी पार्कजवळच्या रस्त्यावरून वळून कोहिनूर मिलजवळून गोखले रस्त्याच्या बाजूला गेली. दुपारी चार वाजता मुंबईचे महापौर माधवन यांनी सावरकरांच्या पार्थिव देहाला पहिला पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर अक्षरश: हजारो पुष्पहार अर्पण करण्यात आलं.

सावरकर सदनात तळ मजल्यावरील दर्शनी खोलीत सावरकरांचा पार्थिव देह उच्चस्थानी ठेवण्यात आला होता. हिंदुमहासभेच्या कृपाण कुंडलिनी व स्वस्तिक चिन्हांकित ध्वजाने तो आच्छादला होता व त्यावर पुष्पहार घालण्यात आला होता. खोलीत तीनही सावरकरबंधूंची व सौ. माई सावरकर यांचे अशी तीन छायाचित्रे ठेवली होती व चार समया तेवत ठेवल्या होत्या. सदनावरील हिंदू ध्वजही अर्धा फडकत होता. गीता व वेदमंत्राचे पठण सुरू होते व आबालवृद्ध स्त्री-पुरुष नागरिक मृत्यूजय सावरकरांच्या अंत्यदर्शनासाठी येत होती. कोणी पुष्पहार आणले होते तर कोणी नुसतीच सुवासिक फुले वाहात होते आणि बहुसंख्य नागरिक मुक्या मनाने आणि साश्रु नयनांनी केवळ नमन करून जात होते.

महापौरांच्या पाठोपाठ दर्शनासाठी आलेल्या नागरिकात केशवराव दाते, नानासाहेब फाटक यांच्यासारखे नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध कलावंत जसे होते त्याचप्रमाणे वसंत देसाई, सुधीर फडके इत्यादी संगीतज्ज्ञही होते. आणि राजकीय क्षेत्रातील नेते तर होतेच होते. कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष कॉ. श्री. अ. डांगे, जनसंघाचे अध्यक्ष बच्छराज व्यास, स्वतंत्र पक्षाचे नेते कन्हय्यालाल मुन्शी, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष सरदार प्रतापसिंग यांनी वीर सावरकरांच्या पार्थिव देहास आपापल्या पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण केले. त्याशिवाय डॉ. मटकर, डॉ. त्र्यं. रा. नरवणे, शेरीफ श्री. गंगाराम जोशी, प्रा. अनंत काणेकर, श्री. शं. नवरे, रा. म. आठवले, ना. वि. मोडक, ठाण्याच्या नगराध्यक्ष सौ. सुमन हेगडे, राष्ट्रसेविका समितीच्या श्रीमती लक्ष्मीबाई केळकर इत्यादी अनेक मंडळी अंत्यदर्शनासाठी येऊन गेली. संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अंत्यदर्शनाची रीघ थांबली नव्हती. रविवारी सकाळी आठपासून दुपारी दोनपर्यंत पुन्हा दर्शन मिळू शकेल असे जेव्हा जमलेल्या लोकांना सांगितलं तेव्हाच मध्यरात्रीनंतर गर्दी कमी होऊ शकली.

हिंदू महासभेचे अध्यक्ष नित्यनारायण बानर्जी, इंडियन नॅशनल चर्चचे फादर विल्यमस, नभोवाणी व माहिती खात्याचे मंत्री राजबहादूर तसंच के. एम. मुन्शी यांनी सावकर सदनात जाऊन स्वातंत्र्यवीरांचे अखेरचे दर्शन घेतले.

परगांवचे लोक आले

वीर सावरकरांच्या निधनाचे वृत्त सायदैनिकांचे खास अंक, आकाशवाणीवरील वृत्त-सायंदैनिकांचे खास अंक, आकाशवाणीवरील वृत्त-निवेदन यामुळे घरोघर व गावोगाव पोहोचण्यात वेळ लागला नाही. मुंबईत संध्याकाळचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आलं. तर अनेक सार्वजनिक संस्था, मंडळे यांनी त्यांच्या पुष्पहारमंडित प्रतिमा लावून आपली श्रद्धांजली अर्पण केली. आज दर्शनासाठी व वसई-कर्जत इथपासून उपनगरातील नागरिकांच्या जोडीने दुपारच्या गाडीने आलेले अनेक पुणेकर नागरिकही होते.

शेवटला आजार

१९५२ साली वीर सावरकरांनी अभिनव भारत या क्रांती संस्थेचे समारंभपूर्वक विसर्जन केलं आणि त्यानंतर राजकीयदृष्ट्या ते निवृत्त जीवनच जगत होते. तरीही त्यांचे लेखन, वाचन, भेटीगाठी हे सुरूच असे. १९६१ साली पुण्याला मृत्यूजय-दिन साजर झाला त्या वेळी त्यांनी जाहीर सभेत शेवटचे भाषण केलं. १९६३ साली त्यांचा ८१ वा वाढदिवस समारंभपूर्वक साजरा झाला. पण त्या वेळी त्यांनी सभा-भाषणच काय दर्शन देणंही कटाक्षाने टाळले. त्याच दिवशी अपघात होऊन ते पडले व त्यांच्या मांडीचे हाड मोडले. या अपघातातून सावरकर बचावले पण ते शय्येवर खिळूनच राहिले. मधूनमधून त्यांची प्रकृती चिंताजनक बने पण पुन्हा सुधारणा होई. गेला महिनाभर मात्र वीर सावरकरांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. गेला आठवडा ती चिंताजनक होती आणि आज सकाळी ते अत्यवस्थ झाले व अखेर मृत्यूने त्यांना गाठले.

अखेरपर्यंत वाचन व चिंतन

या सर्व आजाराच्या काळात सावकरांचे वाचन-चिंतन सुरूच होते. रोजची वृत्तपत्रे ते नियमितपणे वाचत, गेल्या आठवड्यात रँग्लर परांजपे यांच्या ९१ व्या वाढदिवसाचे वृत्त त्यांनी वाचले आणि आपल्या एकेकाळच्या गुरूंना त्यांनी शुभेच्छादर्शक तार पाठवली.

Monday, February 23, 2015

शास्त्रांचे उंबरठे ओलांडून.. - मिलिंद थत्ते

हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट अतिप्रसिद्ध आहे. ही गोष्ट पुन्हा सांगण्याची गरज नाही, पण ही घडते मात्र वारंवार. डॉ. जगदीशचंद्र बसूंचे आपण जेमतेम नाव ऐकलेले असते. टिळकांचे जसे एकच वाक्य आपल्याला माहीत आहे, तसे डॉ. बसूंचेही - ‘वनस्पतींना भावना असतात’. त्यांनी शास्त्रात जी क्रांती घडवली त्याविषयी आपल्याला सूतराम माहिती नाही. त्यांनी भौतिकशास्त्रातल्या नियमांनी जीवशास्त्रातल्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या. शास्त्रा-शास्त्रात त्यावेळी कठोर भिंती होत्या, अगदी जातिपातीसारख्या. आमच्या शास्त्रातले याला काय कळते, अशी डॉ. बसूंची हेटाळणी त्या शास्त्रातल्या ब्रह्मवृंदांनी केली होती. बसूंच्या संशोधनानंतर खूप वर्षांनी त्यांची महती मान्य झाली. शास्त्राशास्त्रातल्या भिंती काहीशा ढासळल्या. आपल्याच शास्त्राच्या चष्म्यातून सत्य काय ते दिसते या धारणेतून शास्त्रज्ञ बाहेर येऊ लागले. आता याची पुढची पायरी गाठणे गरजेचे आहे.
नैसर्गिक शास्त्रे आणि समाजशास्त्रे यात अजूनही अस्पृश्यता आहे. ‘विहीर’ चित्रपटातला एक छान संवाद आहे - ‘‘आयुष्याला पाने तीन, आर्ट्स, कॉर्मस आणि सायन्स.’’ या तिन्हींचा आपापसात काही संबंध नाही, एकात शिरलेल्याला दुसरीकडे जाता येत नाही अशी आपली पक्की व्यवस्था. एका जातीत जन्म झाला की दुसर्‍यात जाता येत नाही तसेच हे. अनेक संशोधने घडतात, ती एकांगी शास्त्रअभ्यासातून. अणुबॉम्बचा शोध हा शास्त्रातला मोठा शोध होता. अणुबॉम्बचा शोध लावणार्‍या शास्त्रज्ञांना आपलं हे बाळ किती विध्वंस करू शकतं हे एकदा पाहण्याची मोठी उत्सुकता होती. त्यांच्या त्या संशोधनाची आणि उत्सुकतेची मोठी किंमत जगाला मोजावी लागली. जपाननं तर किंमत मोजलीच, पण आताही अनेक राष्ट्रे मोठा खर्च अण्वस्त्रसज्जतेवर करतच आहेत. तीही किंमत आहेच. आपल्या शास्त्राचे, नवोन्मेषाचे समाजावर काय परिणाम होणार आहेत याची जाणीव शास्त्रज्ञांना असायलाच हवी.
एका बाजूला शास्त्रज्ञांचे समाजांधळेपण, तर दुसर्‍या बाजूला समाजाचे अभिसरण घडवणार्‍या कार्यकर्त्या मंडळींमध्ये शास्त्राविषयी हेटाळणीचा भाव असतो. ‘त्यांना प्रयोगशाळेच्या बाहेरचं काय कळतंय’ असं म्हटलं जातं. ‘सगळं ज्ञान लोकांजवळच असतं’ असंही म्हटलं जातं. पारंपरिक ज्ञान लोकांकडे असतं हे खरंच आहे; पण बदलत्या काळात जेव्हा मृगात मृगासारखा पाऊस पडत नाही, जमिनीत शिरलेल्या रसायनांमुळे वनस्पतींमधल्या काही गुणांची हानी झाली आहे, तेव्हा पारंपरिक ज्ञानाची मात्रा लागू पडतेच असं नाही. उदंड जंगल असताना शेतीतल्या राबासारख्या काही रिती रूढ झाल्या. जमिनी मोकळ्या असताना फिरती शेती परवडण्याजोगी होती. आता जंगल आणि जमिनी दोन्हीचे माप आटले आहे. आता जुन्या नुस्ख्यांवर अवलंबून राहणे कसे परवडेल? यामुळे परंपरेचे एकांगी प्रेम हेही समाजशास्त्र्यांना सोडणे भाग आहे. आमच्या जवळचे एक उदाहरण आहे. सरपणावर चूल पेटते आणि अन्न शिजते. देशातले ७५ टक्के लोक आजही अन्न शिजवण्यासाठी सरपणावर अवलंबून आहेत. आमच्या अनुसूचित क्षेत्रात तर ८२ टक्के लोक सरपण वापरतात. हे सरपण कमी लागावे म्हणून काही शास्त्रज्ञांनी फार मौलिक संशोधन केले आहे. चुलीत एकेक करत त्यांनी बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. अशा सर्व सुधारणा करून तयार झालेल्या चुलीत सरपण खूपच कमी लागते, पण तरीही या चुली ग्रामीण भागात लोकप्रिय झाल्या नाहीत. अशी एक चूल मीही गेली दोन वर्षे वापरतो आहे; पण आमच्या गावातल्या एकानंही अशी चूल हवी असं म्हटलं नाही. 
काय असेल लोकांचं कारण? 
ही चूल कार्यक्षम असल्यामुळे उष्णता अजिबात बाहेर जात नाही. म्हणजे या चुलीचा थंडीत-पावसात शेकायला उपयोग नाही. पावसाळ्यात जेव्हा कपडे वाळत नाहीत, तेव्हा चुलीवर एक चौकोनी शिंकाळे टांगून कपडे वाळवतात. तोही उपयोग या चुलीचा नाही. चुलीत फार सुधारणा केल्यामुळे या चुलीची किंमतही फार झाली आहे. त्यात सरकार किंवा एखाद्या संस्थेने सवलत दिली, तर किंमत उतरते खरी; पण आताची चूल तर पूर्ण फुकट आहे की! आताच्या चुलीत सरपण थोडं जास्त लागतं, लागू दे की, तेही फुकटच आहे. असं लोकांचं डोकं चालतं. सरपण वाचवण्याची गरज नेमकी कोणाला आहे, असा प्रश्न पडतो. 
ज्यांनी चुलीचं इतकं चांगलं भौतिकशास्त्रीय संशोधन केलं, त्यांनी जमिनीवरचं समाजशास्त्रही लक्षात घ्यायलाच हवं. आपल्या देशात गुणवत्तेपेक्षा पैसा वाचवणं महत्त्वाचं मानलं जातं. हे अर्थशास्त्रही समजायला हवं. म्हणून जगदीशचंद्रांची आठवण येते. शास्त्रांनी दरवाजे उघडून लोकांजवळ यावं, समभावानं एक प्रकाश शोधावा, तर खरी मजा येईल!
(लेखक समावेशक विकासासाठी काम करणार्‍या ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)
- लोकमत
दि. २३/०२/२०१५

Thursday, February 19, 2015

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात

म्यानातुन उसळे तरवारीची पात...वेडात मराठे वीर दौडले
म्यानातुन उसळे तरवारीची पात...वेडात मराठे वीर दौडले सात... ॥धृ.॥

"श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता
रण सोडुनि सेनासागर अमुचे पळता
अबलाहि घरोघर खया

ते फ़िरता बाजुस डोळे...किन्चित ओले...
सरदार सहा सरसवुनी उठले शेले
रिकबित टाकले पाय...झेलले भाले
उसळित धुळिचे मेघ सात निमिषात... ॥१॥

आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना
अपमान् बुजविण्या सात अरपुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात... ॥२॥

खालुन आग, वर आग ,आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात... ॥३॥

दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरन्गे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वारयावर गात ॥४॥

म्यानातुन उसळे तरवारीची पात...वेडात मराठे वीर दौडले सात... 

कवी - कुसुमाग्रज 
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायिका - लता मंगेशकर

छत्रपती शिवाजी महाराज- मुत्सद्दी व उदारमतवादी

छत्रपती शिवाजी महाराज राजकारणी होते. पण त्यांचे राजकारण कोणत्या विचारांचे होते? महाराजांच्या जीवनातील घटना, प्रसंग पाहिले, तर त्यांना जात, धर्म, प्रांत, भाषेचे राजकारण अभिप्रेत होते काय? महाराजांचे राजकारण मुस्लिमद्वेष्टे किंवा हिंदूधार्जिणे कधीच नव्हते, तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन असे होते. अफजलखानाच्या वधानंतर शिवरायांनी त्याच्या कुटुंबाला कसे अभय दिले, याचे वर्णन शिवरायांच्या दरबारातील सदस्य कृष्णाजी अनंत सभासदाने पुढीलप्रमाणे केले आहे, ‘‘ऐसी फत्ते करून जय जाहाला. मग राजे यांनी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते त्यांस धरून आणिले. राजा खासा प्रतापगडाखाली उतरोन कुल आपले लोक व अफजलखानाचे लोक व त्यांचे पुत्र भांडते माणूस होते तितकियांस भेटून, पोटाशी धरून, दिलासा करून, भांडते लोक जे पडले होते त्यांच्या लेकांस चालविले.’’ खानाला धडा शिकविल्यानंतर शिवरायांनी त्याच्या मुलांना प्रेमाने वागविले. त्यांना पोटाशी धरून अभय दिले व त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावून दिली.
मोगलांनी विजापूरला वेढा घातला, तेव्हा त्यांच्या दक्षिणेतील राजकारणाला पायबंद घालण्यासाठी शिवरायांनी आदिलशहाच्या मदतीसाठी दहा हजार घोडेस्वार आणि धान्याच्या गोण्यांसह दहा हजार बैल रवाना केले. दिलेरखानाच्या छावणीतून संभाजीराजांची सुटका झाल्यानंतर ते प्रथम विजापूरला गेले आणि तेथून पन्हाळगडावर आले. त्यासाठी आदिलशहाने साह्य केले. दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर मोगल सुभेदार बहादूरखान स्वराज्याला उपद्रव देणार नाही, याची व्यवस्था शिवाजीराजांनी त्याच्याशी अंतर्गत तह करून केली होती. यावरून स्पष्ट होते, की राजांचा मोगल- आदिलशहाशी असणारा संघर्ष राजकीय होता, धार्मिक नव्हता. राजे दक्षिण दिग्विजयासाठी निघाले असता गोवळकोंडा जवळ आल्यानंतर त्यांनी मावळ्यांना सांगितले, की ‘एक काडी रयतेची तसनस न व्हावी.’ म्हणजे रयतेच्या काडीचीही नासाडी करू नका. परमुलूखातील सामान्य रयतेचेही हित शिवरायांनी जोपासले. ही वार्ता ऐकून गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने शिवरायांच्या स्वागतासाठी चार गावे पुढे येण्याचे ठरवले. तेव्हा राजांनी त्याला कोणता निरोप पाठवला, याचे हृदयस्पर्शी वर्णन समकालीन सभासदाने पुढीलप्रमाणे केले आहे, ‘‘तुम्ही न येणे. आपण वडीलभाऊ, मी धाकटा भाऊ. आपण पुढे न यावे.’’ गोवळकोंड्याच्या बादशहाला मोठा भाऊ म्हणून शिवरायांनी संबोधले होते. शिवाजीराजे- कुतुबशहा यांच्या मैत्री करारातून दक्षिण दिग्विजयाचा मार्ग सुकर झाला. तेव्हा शिवरायांनी मालोजी घोरपडे यांना पत्र पाठवून कळवले, की ‘तुम्ही कुतुबशहाशी रुजवात करावी. कुतुबशहाशी बहुत रीती बोलोन, तुम्हास कुतुबशहाचा कौलाचा फर्मान घेऊन पाठविला आहे. तुम्ही मराठे लोक तुमचे गोमटे (कल्याण) व्हावे म्हणून तुम्हास लिहिले आहे.’ राजांनी मालोजी घोरपडे यांना आदिलशाहीतून कुतुबशाहीत जाण्याचा आग्रह केला, हे या पत्रावरून स्पष्ट होते. तेच मालोजी घोरपडे पुढे स्वराज्यात आले आणि संभाजीराजांचे सरसेनापती झाले. तत्कालीन राजकीय घडामोडीत लोककल्याण हे शिवरायांचे धोरण होते.
शिवाजी महाराज तमिळनाडूतील तिरूवाडी येथे असताना डच व्यापारी काही सवलती मागण्यासाठी आले. डचांबरोबर जो व्यापारी करार झाला, त्यात शिवरायांनी एक कलम घातले. ते पुढीलप्रमाणे, ‘‘इतर कारकिर्दीत तुम्हाला स्त्री, पुरुष यांना गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची अनिर्बंध परवानगी होती, पण माझ्या राज्यात स्त्री, पुरुष यांना गुलाम म्हणून विकण्याची आणि विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही. असे काही करण्याचा प्रयत्न कराल, तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.’’ व्यापारी धोरणातही शिवरायांनी गुलामगिरीला विरोध करून मानवतावाद जपला. राजांचे बळ त्यांच्या साधेपणात, नैतिकतेत, चातुर्यात होते. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. ढाल-तलवारीच्या संघर्षातही त्यांनी प्रजेचे हित जोपासले. ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील हात लावू नका. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा. अन्यथा पेटती वात तोंडात धरून उंदीर धावत जाईल, त्यामुळे गवताची गंज जळून खाक होईल. मग जनावरांना चारा मिळणार नाही. मग तुम्ही शेतकऱ्यांची भाजी, धान्य, लाकूड, चारा आणाल, हे तर मोगलापेक्षा अधिक जुलूमकारक आहे,’ अशा सूचना शिवरायांनी चिपळूणच्या अधिकाऱ्यांना १९ मे १६७३ रोजी दिल्या होत्या. यातून राजांचा प्रजावत्सल दृष्टिकोन दिसतो.
दुष्काळग्रस्तांना कशा प्रकारे मदत करावी याबाबतचे पत्र ५ सप्टेंबर १६७६ रोजी शिवरायांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘गावोगावी जावा, शेतकऱ्यांना गोळा करा, त्यांना बैलजोडी द्या, खंडी दोन खंडी धान्य द्या, वसुलीसाठी तगादा लावू नका, ऐपत आल्यानंतरच वसूल करा, वाढीदिडीने वसूल न करता मुद्दलच तेवढी घ्यावी.’’  राजांचा पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज यांच्याशी संघर्ष झाला. त्यांच्या राजकीय हस्तक्षेपाला पायबंद घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वराज्यनिर्मितीसाठी उपयोग करून घेतला. आरमार उभारण्यासाठी त्यांनी पोर्तुगीज कारागीर नेमले. इंग्रज आणि डचांशी त्यांनी व्यापारी करार केला. पण त्यांच्यावर अंकुश ठेवला. पोर्तुगीज आणि इंग्रजांनी राजांच्या योग्यतेची तुलना युरोपीय नायकांशी केली आहे.
राजांच्या राजकारणाचे, कौशल्याचे ध्येयधोरणांचे कौतुक त्यांच्या राजकीय विरोधकांनीही केले आहे. औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार खाफीखानाने ‘मुंतखबुल्लुबाब’ या फारसी ग्रंथात राजांच्या नैतिकतेचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, ‘‘रायगडाला लागूनच शिवाजीने एक वाडा बांधला होता. उन्हाळ्यात तेथे पाण्याची टंचाई भासे. शिवाजीने आपल्या वाड्याला लागून विहीर बांधली होती. विहिरीजवळ दगडाची बैठक होती. तेथे शिवाजी बसत असे. विहिरीवर सावकारांच्या बायका आणि इतर गरीब स्त्रिया पाणी भरण्यास येत. त्यांच्या मुलांना ते फळे देत असत. आपण आपल्या आईशी किंवा बहिणीशी बोलतो तसे ते त्या बायकांशी बोलत.’’
शिवाजी महाराजांनी मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी राजकारण केले, पण लोककल्याणाचे धोरण कधीही सोडले नाही. राजे चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, धर्मनिरपेक्ष, न्यायी, समतावादी होते. त्यांचे राजकारण जातीयवादी, धर्मवादी, भाषावादी नव्हते, तर लोककल्याणकारी होते. शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन शासन आणि प्रशासन लोककल्याणकारी व्हावे, हीच आजच्या शिवजयंतीदिनी सदिच्छा!

- सकाळ (संपादकीय)
दि. १९/०२/२०१५, गुरुवार   

Wednesday, February 18, 2015

पुलं पोस्टात; गदिमा मामलेदार कचेरीबाहेर...! - शरद पवार

बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर मी नेहमीच माझ्या मतदारसंघातल्या सर्व घटकांमधल्या लोकांच्या भेटी वेगवेगळ्या कामांच्या निमित्तानं घेत असे. पुण्यापासून जवळच असलेल्या बारामतीत होणाऱ्या साहित्य, कला, संगीत, नाटक आदी उपक्रमांमध्येही मी बारकाईनं लक्ष घालत असे व अशा संस्थांमधून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमागं उभा राहत असे. त्या काळी सर्व छोट्या-मोठ्या शहरांमध्ये ‘सानेगुरुजी कथामाला’ हा कार्यक्रम उत्साहात साजरा होई. आमच्या बारामतीच्या ‘सानेगुरुजी कथामाले’च्या एका मोठ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ख्यातनाम कवी-गीतकार ग. दि. माडगूळकर आणि सिद्धहस्त साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना एकत्रितपणे आमंत्रित केलं होतं. ठरल्याप्रमाणे कथामालेचा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीनं पार पडला. या मोठ्या पाहुण्यांसाठी माझ्या घरीच दुपारच्या भोजनाची व्यवस्था केलेली होती. त्याप्रमाणे कार्यक्रम संपवून आम्ही घरी आलो. भोजनाची सर्व तयारी झालेली होती. पानंसुद्धा घेतलेली होती. तर्कतीर्थांच्या पानाभोवती सुरेख रांगोळी घातलेली होती आणि पानात सर्व शाकाहारी पदार्थ वाढलेले होते. बाकी आम्हा सगळ्यांच्या ताटांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांची रेलचेल होती. जेवण सुरू करण्यापूर्वी तर्कतीर्थांनी मला जवळ बोलावलं आणि विचारलं - ‘‘हा ‘पंक्तिप्रपंच’ कशासाठी? तसं बघितलं तर, तुमच्या पानात जे वाढलेलं आहे, तेही चालतं आम्हाला आणि जमलंच तर आम्ही घेतोसुद्धा!’’ हे ऐकून तर्कतीर्थांचं ताट बदलण्यात आलं. तर्कतीर्थ स्वत-च्या वाहनानं बारामतीला आलेले होते. त्यामुळं त्यांची परतीची सोय झालेली होती; परंतु गदिमा ऊर्फ अण्णा आणि पुलं यांना पुण्याला पोचवायचं होतं. त्या वेळी माझ्याकडं स्वत-ची जीपगाडी होती; परंतु एवढ्या थोरा-मोठ्यांना जीपनं प्रवास घडवावा, याबद्दल मला थोडा संकोच वाटत होता. गावातले माझे एक सहकारी भगवानराव काकडे बऱ्यापैकी सधन होते आणि त्यांच्याजवळ एक चांगली मोटारगाडीही होती. मी त्यांना विनंती केली - ‘‘आपण तुमच्या गाडीनं पाहुण्यांना पुण्यापर्यंत सोडू या.’’ माझे पाहुणे म्हटल्यानंतर साहजिकच काकडे यांची कल्पना अशी झाली, की कुणीतरी फार मोठी माणसं असली पाहिजेत. काकडे लगेच तयार झाले आणि आम्ही गदिमा व पुलं यांना घेऊन पुण्याकडं निघालो. काकडे स्वत-च गाडी चालवत होते आणि मी पुढच्या सीटवर त्यांच्या शेजारी बसलो होतो. प्रवास सुरू झाला तशी काकडे यांनी पाहुण्यांची विचारपूस करायला सुरवात केली. त्यांनी पहिलाच प्रश्न टाकला - ‘‘कोणच्या गावाकडचं म्हणायचं?’’ 
‘‘आम्ही पुण्यालाच असतो,’’ असं उत्तर दोघांनीही दिलं. त्यांचा पुढचा प्रश्‍न - ‘‘काय काम करता?’’ आता या प्रश्नाचं उत्तर काय येईल, याबाबत मी थोडासा धास्तावलोच होतो; तर अण्णांनी म्हणजे गदिमांनी उत्तर दिलं - ‘‘आम्ही लिव्हतो.’’
त्यांचा परत प्रश्न आलाच - ‘‘कुठं पोस्टाबाहेर बसता की मामलेदार कचरीसमोर?’’ आता संभाषणाची सूत्रं पुलंनी स्वत-कडं घेतली आणि सांगितलं - ‘‘मी पोस्टात बसतो आणि हे (गदिमा) मामलेदारांच्या कचेरीबाहेर बसतात.’’ काकडे यांचं समाधान अर्थातचं झालेलं नव्हतं.
त्यांनी पुन्हा विचारलं - ‘‘काय, घरदार चालंल इतकं पैसं मिळतात का ?’’
पुलंनी लगेच उत्तर दिलं - ‘‘लोक आम्हाला लिहिल्याचे बऱ्यापैकी पैसे देतात.’’ काकडे यांच्या शंका अद्यापही संपलेल्या नव्हत्या. त्यांनी पुढं विचारलं - ‘‘तुम्ही या एवढुशा कामाचे  लोकांकडून फार पैसं घेत असला पाहिजे. आवं, जरा विचार करा...काय एक-दोन-चार तर कागद लिव्हायचे आन्‌ किती पैसं घ्यायचे? बरं, तुम्ही पडला शिकली-सवरलेली माणसं आणि तुमच्याकडं कागद लिव्हायला येणारा अडाणी, गरीब. हे काय बरोबर नाही. तुमचं सगळं शिक्षण तर सरकारच्या पैशातच व्हतं ना; मग थोडं माणुसकीनं वागा की राव. कशाला गरिबांचे तळतळाट घ्यायचे?’’ हे सगळं ऐकून महाराष्ट्राचे ते दोन मोठे साहित्यिक, अर्थातच गदिमा आणि पुलं, एकमेकांकडं बघून हसत होते. मीही या संभाषणात माफक सहभाग दाखवून शांतपणे बसलो होतो.

...आणि पी. सावळाराम नगराध्यक्ष झाले!

वसंतराव नाईकसाहेबांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. मी स्वत- प्रदेश सरचिटणीस म्हणून सर्व काम बघत असे आणि दिवसभर मी दादरच्या टिळक भवन कार्यालयातच असायचो. एके दिवशी टिळक भवनामध्येच मला सायंकाळी चार वाजता प्रदेशाध्यक्ष वसंतदादांचा फोन आला. दादांनी मला फोनवर सांगितलं, की सायंकाळी चार वाजता ते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी जाणार आहेत आणि मीसुद्धा वेळेवर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोचावं.
कुठल्या संदर्भात ही बैठक आहे, याची मला काहीही माहिती देण्यात आलेली नव्हती. ठरल्या वेळी मी ‘वर्षा’वर पोचलो...तर आत नाईकसाहेब, वसंतदादा व ग. दि. माडगूळकर बसलेले होते. गदिमा त्या वेळी विधान परिषदेचे सदस्यही होते. आता या तिघांच्या बैठकीत मला कशासाठी बोलावलं असावं, हे काही मला कळेना ! साधारणत- सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या, की प्रचारसाहित्यासाठी गदिमांची मदत घेतली जात असे; पण निवडणुका तर अजून खूपच लांब होत्या. 
मला वसंतदादांनी सांगितलं - ‘‘एका महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुझ्यावर सोपवायची आहे. आज संध्याकाळी तू ठाण्याला मुक्कामाला जायचं. दोन दिवसांनी ठाण्याच्या नगराध्यक्षांची निवड होणार आहे. ठाणे नगरपालिकेत आपलं बहुमत नाही. आपल्याला बरीच मतं कमी पडतायत; पण प्रयत्नांची पराकाष्ठा कर आणि आपला अध्यक्ष होईल, याची काळजी घे.’’ विचारलं - ‘‘उमेदवार म्हणून कुणाचं नाव नक्की केलं आहे का? की तिथल्या सदस्यांमधून निवड करण्याची प्रक्रिया राबवायची आहे? याबाबतीत मी काय करावं, हेही सांगावं.’’ खरं म्हणजे माझ्या प्रश्नावर मला वसंतदादांकडून उत्तर अपेक्षित होतं; पण गदिमा ऊर्फ अण्णांनीच उत्तर द्यायला सुरवात केली. आता अण्णा निवडणुकीच्या उमेदवाराबद्दल काही सांगत आहेत, हे लक्षात आल्यावर मला थोडंसं आश्‍चर्यचकित व्हायला झालं. 
अण्णा म्हणाले - ‘‘अरे, आपल्या ठाण्याच्या पालिकेत आमचा एक सहकारी निवडून आला आहे आणि तोच अध्यक्ष झाला पाहिजे, अशी तयारी करावयाची आहे. त्या उमेदवाराचं नाव सावळाराम पाटील! हे सावळाराम पाटील माझ्या सांगली जिल्ह्यातले असून, इस्लामपूर तालुक्‍यात येडं मच्छिंद्र म्हणून एक गाव आहे, तिथले ते रहिवासी. आमच्या या भागानं दोन मोठी माणसं पाहिली आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील आणि दुसरे सावळाराम पाटील.’’ बैठक संपवून मी निघालो. माझी खात्री होती, की मतांची जुळवाजुळव काही सोपी नाही. खरंतर अशी निवडणूक हे अण्णांचं काम नव्हे; परंतु त्या काळी महाराष्ट्रात कुठल्याही गावापासून शहरापर्यंत विवाहाच्या प्रसंगी शेवटी बॅंडवर ‘जा, मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गीत हमखास वाजवलं जायचं. या अत्यंत लोकप्रिय अशा गीताचे रचनाकार म्हणजेच हे सावळाराम पाटील ! पुढं ते ‘पी. सावळाराम’ म्हणून ख्यातनाम झाले. मी त्यांची गाणी गुणगुणतच ठाण्यात दाखल झालो. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते प्रभाकर हेगडे, वसंतराव डावखरे आणि इतर सहकाऱ्यांसमवेत मी त्या वेळी तासन्‌तास बैठका घेतल्या.
या सगळ्यांशी माझ्या भेटी-गाठी सतत दोन दिवस सुरूच होत्या. तिसऱ्या दिवशी रीतसर निवडणूक झाली आणि आमचे उमेदवार सावळाराम पाटील विजयी झाले. ठाण्याच्या पालिकेतूनच मी वसंतदादांना फोन लावला व निकाल सांगितला आणि विजयी नगराध्यक्षांना भेटीला घेऊन यायचं आहे, असंही सांगितलं.  वसंतदादांनी मला सांगितलं - ‘‘त्यांना घेऊन तू ‘वर्षा’वरच ये. माडगूळकर अण्णांनासुद्धा मी बोलावून घेतो.’’ आम्ही फुलांचा गुच्छ घेऊन ‘वर्षा’वर पोचलो. नाईकसाहेब, वसंतदादा आणि गदिमा एकत्र बसलेलेच होते. आत गेल्यावर गदिमांनी गुच्छ माझ्या हातातून घेतला आणि पी. सावळाराम यांना दिला आणि त्यांना आनंदानं घट्ट मिठी मारली. नंतर गदिमांनी मला जवळ बोलावून घेतलं. पाठीवर एक जोरकस थाप मारली आणि ते मला म्हणाले - ‘‘गड्या, आज फार मोठं काम केलंस तू...येड्याचा पाटील तू थेट ठाण्याचा अध्यक्ष केलास. शाब्बास रे बहाद्दरा...!’’

- सकाळ (सप्तरंग)
दि. १५/०२/२०१५, रविवार

Wednesday, February 11, 2015

आठवणीतलं बेळगाव - अनिल पवार

रोजच्या रामरगाड्यात बऱ्याच गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. कळत-नकळत त्याकडं दुर्लक्ष होतं. मग कधी थोडी उसंत मिळाल्यानंतर कपाट आवरायला घ्यावं अन्‌ जुना अल्बम हाताला लागावा, तसं आज झालंय. अल्बम जुना झालेला असतो, कधी त्यावर थोडी धूळ साचलेली असते, फोटोंचे रंग विरळ झालेले असतात, काही फोटोंतील माणसं, संदर्भ पटकन लक्षात येत नाहीत... पण फोटोवरून हलकेच हात फिरवताना, अल्बमची पानं पलटताना मन मागं धाव घेऊ लागतं अन्‌ कॅमेऱ्यात बंदिस्त झालेले ते क्षण लख्ख होऊन समोर उभे राहू लागतात. कृष्णधवल रंगातील त्या फोटोंच्या आठवणी मात्र रंगीबेरंगी असतात... पुस्तकात जपून ठेवलेल्या मोरपिसासारख्या... बेळगावच्या आठवणी या अशा आहेत.
बाकी कोणत्याही आठवणींपेक्षा लहाणपणीच्या आठवणींचा ठसा- मग त्या कोणत्याही असोत, आपल्या मनावर अधिक खोलवर उमटतो, टिकून राहतो. साहजिकच आपल्या बालविश्‍वात गहिरे रंग भरलेल्या, आपल्यावर कळत-नकळत संस्कार केलेल्या, मूल्यांचा, चांगल्या गोष्टींचा वारसा दिलेल्या माणसांविषयी, घराविषयी, गावाविषयी आपण नेहमीच कृतज्ञ राहतो, राहायला हवं. आपल्या माणूसपणाची ती खूण असते. बेळगावनं अशा खुणा आजही जाग्या ठेवल्या आहेत. त्यांना बेळगावच्या लाल मातीचा गंध आहे आणि तिथल्या पाण्याची चवही. बेळगावच्या लोण्यासारखीच तिथली माणसंही अस्सल आणि तिथल्या कुंद्याइतकीच गोड! खास बेळगावी भाषेत बोलणाऱ्या या माणसांच्या वागण्यात सहजता आणि आपलेपणा ठायीठायी आहे.
तेव्हा आजही बेळगाव म्हटलं, की डोळ्यांपुढं येतं आणि आठवत राहतं, ते लहानपणीचंच बेळगाव. त्याच्या आठवणी साहजिकच घरापासून सुरू होतात. वीसेक जणांचं एकत्रित कुटुंब, लाल कौलांचं भलंथोरलं तीन मजली घर आणि दारात फुलांनी बहरलेला मोठा मांडव यामुळं गल्लीत आमचं घर उठून दिसायचं. एकाच घरात राहात असलो, तरी प्रत्येक काकांचा संसार स्वतंत्र होता. चुलत भावंडांमुळं आणि माणसांचा राबता यामुळं घर नेहमीच भरलेलं असे. आईला स्वच्छता अतिशय प्रिय. तिच्या हाताला विलक्षण चव होती. हा वारसा तिला तिच्या आईकडून मिळाला होता. आमचे खाण्यापिण्याचे सगळे लाड तर आईनं पुरवलेच, पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे परिस्थितीची जाणीव ठेवून शहाणपणानं वागण्याचे मोलाचे संस्कारही केले. वडील मराठा मंडळ्‌स हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होते. शिवाय सामाजिक कार्याबरोबरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कामातही त्यांचा सहभाग असे. या सगळ्यामुळं त्यांचा दिनक्रम व्यग्र असे, पण त्यातूनही वेळ काढून रात्री "गंमत जंमत ऐका ले,‘ "घेईरे सोनुल्या घास प्रीतीचा,‘ अशी बालगीतं ते आम्हाला ऐकवायचे. माझी लेक लहान असताना तिला ती ऐकवून त्यांच्या आठवणींना अन्‌ माझ्या बालपणाला मी कितीदा तरी उजाळा दिला आहे. वडिलांच्या हायस्कूलचं ग्रंथालय म्हणजे वाचनाची आवड असलेल्यांसाठी खजिनाच होता. तिथल्या गोष्टींच्या नव्या कोऱ्या पुस्तकांनी, "अमरकथा‘च्या संस्कारक्षम चित्रकथांनी वाचनाची गोडी लावली; तर वेताळच्या कॉमिक्‍सनी अद्‌भुत दुनियेची सफर घडविली. बालपणीचा काळ खऱ्या अर्थानं सुखाचा करण्याचं काम या सगळ्यांनी केलं.
 घर हे भाचरांसाठी सगळ्याच बाबतीत कौतुक करून घेण्याचं हक्काचं ठिकाण असतं. त्यात नातवांचे लाड करणारी आजी असली, तर दुधात साखरच. बेळगावपासून पाऊण तासाच्या अंतरावरील कडोलीत एसटी बसमधून उतरल्यानंतर मामाचं घर गाठेपर्यंत आम्हाला दम नसायचा. तिथं स्वयंपाकघरात शेणानं सारवलेल्या छोट्या ओट्यावर बसून चुलीपुढं बसलेल्या आजी किंवा मामीच्या हातची तांदळाची गरम भाकरी आणि अंड्यांची कोशिंबीर (म्हणजे आताच्या भाषेत बुर्जी) पितळी थाळीत घेऊन खाणं यासारखा परमोच्च आनंद दुसरा नसायचा. आंब्याचा, वाटाण्याच्या शेंगांचा हंगाम सुरू झाला की मामाकडून कधी बोलावणं येतं याची आम्ही वाटच बघायचो. मग आम्ही भाचरं आणि मामेभावंडं धमाल करायचो. मामाच्या भल्यामोठ्या घरातील एक खोली आंब्यांनी भरून गेलेली असे. त्या खोलीत जायचं आणि आंब्यांवर मनसोक्त ताव मारायचा ही आमची चैन होती. भल्या सकाळी मामा म्हशीचं दूध काढायचा आणि फेसाळलेलं दूध ग्लास भरून द्यायचा. ते पिताना ओठांवर पांढऱ्या शुभ्र मिशा उमटायच्या... कधी शेतात जाऊन वेलांवरील वाटाण्याच्या शेंगा तोडण्याचा आणि तोडताना त्या भरपेट मटकावण्याचा कार्यक्रम चालायचा; तर कधी सकाळी परसात शेकोटी पेटवून तिची ऊब घेता घेता शेतावरचा गडी वाटाण्याच्या शेंगा त्यात खरपूस भाजून द्यायचा. त्या अर्ध्या कच्च्या, गरमागरम शेंगांची चव काही औरच. मामाच्या गावी जाण्याची ओढ वाटण्याचं आणखी एक आकर्षण म्हणजे रात्री झोपताना आजीकडून गोष्टी ऐकायला मिळायच्या. आजी सुगरण तर होतीच; पण गोष्टीवेल्हाळही. तिनं सांगितलेल्या गोष्टी कितीतरी वेळा ऐकूनही आमचं समाधान होत नसे. कडोलीतच माझी आत्याही होती. तिचाही आमच्यावर भारी जीव. स्वतःच्या हातानं पदार्थ करून ती आग्रहानं खायला घालायची. तिच्या घरी असलेले "चांदोबा‘चे जुने अंक वाचायला मिळणं हेही तिथं जाण्याचं एक कारण असायचं. गावातील एसटी स्टॅंडलगतच्या दगडी पारावर मधोमध बकुळीच्या फुलांचं डेरेदार झाड होतं. सकाळी झाडाखाली पडलेली बकुळीची फुलं वेचण्याची आम्हा मुलांमध्ये स्पर्धा लागायची. मंद सुगंधाच्या त्या फुलांनी ओंजळ अन्‌ मन कधी भरून जायचं ते कळायचंही नाही. मामाच्या गावानं असं भरभरून दिलं. हे सुख कशात मोजता येईल?
शिवजयंती अनेक शहरांत उत्साहात साजरी होते; पण बेळगावमधील शिवजयंतीच्या उत्साहाला तोड नसते. सीमावासीयांचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र बेळगावातील घराघरांत पोचविण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रावरील व्याख्यानमालेचा वाटा मोठा आहे. सीमाभागात कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभं राहणाऱ्या मराठी जनतेकडून या व्याख्यानमालेला उदंड प्रतिसाद मिळायचा. रात्रीचे आठ वाजले की स्वेटर, बसण्यासाठी जाजम अशा जामानिम्यासह लहान मुले, महिलांसह लोकांच्या झुंडीच्या झुंडी युनियन जिमखान्याच्या दिशेनं निघत. आजूबाजूच्या खेडोपाड्यांतीलही असंख्य लोक व्याख्यानमालेला आवर्जून येत. चढत्या रात्रीबरोबर व्याख्यानाला रंग चढायचा. बाबासाहेब आपल्या प्रभावी वक्तृत्वातून साक्षात शिवकाल हजारो श्रोत्यांपुढं उभा करीत. कधी स्लाइड शोच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील गडकोटांचं दर्शन घडवायचे. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा भव्य सोहळाही आम्ही तिथंच रंगमंचावर अनुभवला. या सगळ्याचं आम्हाला भारी अप्रूप वाटे.
आनंदाचा ठेवा ठरलेल्या अशा किती गोष्टी सांगाव्यात? घराला लागूनच असलेल्या मारुतीच्या मंदिरात उत्साहात साजरी होणारी हनुमान जयंती, नवरात्रात झांजांच्या निनादात निघणारी रोज रात्रीची पालखी आणि या सगळ्यावर कळस म्हणजे दसऱ्याचा विलक्षण देखणा सोहळा... घरापासून दोनेक किलोमीटरवरील पोलिस हेडक्वार्टरमध्ये पहाटे वाजविल्या जाणाऱ्या बिगुलाची सुरावट... निलजीजवळील वडिलोपार्जित, हिरवं वैभव मिरवणाऱ्या शेतमळ्यात चुलत भावंडांसमवेत घालविलेली सुटी... बेळगावला पाणीपुरवठा करणारा राकसकोप जलाशय, खानापूरजवळील असोगा येथील मंदिर, रामनाथाचं मंदिर आदी ठिकाणी मित्रांसमवेत सायकलवरून काढलेल्या सहली... तर कधी बेळगावातील मामाच्या मोटारीतून केलेली गोकाक, राकसकोपची सैर... सुटीच्या दिवशी कधी झाडांवरील कैऱ्या, पिकलेली जांभळं खाण्यासाठी केलेली पायपीट; तर कधी भुईकोट किल्ल्यातील भ्रमंती... पहाटे लवकर उठून अरगन तळ्याच्या रस्त्यावर धावायला जाण्याचे दरवर्षी केलेले संकल्प... विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा आमच्या परीनं केलेला प्रचार... सीमाप्रश्‍नावर जनजागृतीसाठी पहाटे निघणाऱ्या प्रभात फेऱ्यांमध्ये उत्साहानं घेतलेला भाग... असे कितीतरी संस्मरणीय क्षण बेळगाव म्हटलं की आठवत राहतात.
आज इतक्‍या वर्षांनंतर बाकीच्या शहरांप्रमाणेच बेळगावचाही चेहरामोहरा पालटला आहे. एकेकाळी "गरिबांचं महाबळेश्‍वर‘ अशी ओळख असलेल्या बेळगावातील हवा आणि हवामानही बदललं आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्यानं आता तिकडं जाणं कमी झालं आहे; पण असाच कधी बेळगावचा विषय निघतो आणि तिथले दिवस, ते क्षण एकामागून एक उलगडत जातात. काळाच्या ओघात हरवून गेलेल्या अनेक गोष्टींच्या आठवणी मन हळवं करतात. बेळगाव सोडून पंचवीसेक वर्षं उलटली; पण आजही माझ्या आठवणीतलं बेळगाव असं आहे.... न विसरता येण्यासारखं. बेळगावच्या आठवणी या अशा आहेत.

लेखक - श्री. अनिल पवार
ललित, सकाळ (साप्ताहिक सकाळ)
दि. ०९/०२/२०१५, सोमवार     

Tuesday, February 10, 2015

आई, मला पावसांत जाउं दे

 आई, मला पावसांत जाउं दे
 
आई, मला पावसांत जाउं दे
एकदांच ग भिजुनी मला चिंब चिंब होउं दे ॥धृ.॥

मेघ कसे हे गडगड करिती
विजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगें अंगणांत मज खूप खूप नाचुं दे ॥१॥

खिडकीखालीं तळें साचलें
गुडघ्याइतकें पाणी भरलें
तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग, लावुं दे ॥२॥

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडूकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करूं दे ॥३॥

धारेखालीं उभा राहुनी
पायानें मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी वाट्टेल तें होउं दे ॥४॥

गायक : योगेश खडीकर
गीतकार : वंदना विटणकर
संगीत : मीना खडीकर

आयुष्यावर बोलू काही

 आयुष्यावर बोलू काही
 
जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही।

तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्‌या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही।

हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे, कातर बोलू काही।

उद्याउद्याची किती काळजी? बघ रांगेतून र्
’परवा’ आहे उद्याच नंतर बोलू काही।

शब्द असु दे हातामध्ये काठी म्हणूनी
वाट आंधळी प्रवास खडतर! बोलू काही।

 कवी: संदीप खरे

अखेरचा हा तुला दंडवत

अखेरचा हा तुला दंडवत

अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव ॥धृ.॥

तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले
आता दे परि सारे सरले, उरलं मागं नाव ॥१॥

हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता, धरती दे गं ठाव ॥२॥

 गीतकार : शांता शेळके
संगीतकार :आनंदघन
गायक :लता मंगेशकर
चित्रपट :मराठा तितुका मेळवाव

कणा

कणा

'ओळखलंत का सर मला', पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी,
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून;
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून;
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली.
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले-
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे'
पैशाकडे हात जाताच हसत हसत उठला
'पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला-
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा-
पाठीवरती हात ठेऊन नुसते 'लढ' म्हणा.'

कवी - कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)

Monday, February 9, 2015

दख्खनचा तारा: नामदार गोखले - विवेक आचार्य

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेच्या वतीने राज्यकारभार करतात. जनतेच्या हिताचे रक्षण करणे, नागरिकांचे मूलभूत हक्क शाबूत राखणे हे या प्रतिनिधींचे प्रमुख काम असते. त्यामुळेच लोक प्रतिनिधी हा संसदीय लोकशाहीचा केंद्रबिंदू असतो. स्वातंत्र्योत्तर भारताच्या संसदेमध्ये अनेक दिग्गज संसदपटू होऊन गेले. ज्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा असे पंडित जवाहरलाल नेहरू, बॅ. नाथ पै, अटलबिहारी वाजपेयी, मधु लिमये आदी महनीय व्यक्ती आहेत. अशा या आदर्श भारतीय संसदेचा पाया ब्रिटिश काळातच 'इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काऊन्सिल'च्या रूपाने घातला गेला होता. हिंदुस्थानचे सुपुत्र नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी इंपिरियल काऊन्सिलमधील आपली कारकीर्द गाजवली होती व सवरेत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा गौरव झालेला होता.
उत्कृष्ट वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती व त्यायोगे प्राप्त झालेले विषयाचे सखोल ज्ञान, प्रखर राष्ट्रभक्ती, जनहिताची तळमळ अशा उत्तम संसदपटूला आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा समुच्चय गोखलेंच्या ठायी झालेला होता. या गुणांव्यतिरिक्त त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे ते इंपिरियल काऊन्सिलचे आकर्षण ठरत. संसदपटू म्हणून गोखलेंची कारकीर्द बॉम्बे काऊन्सिलच्या माध्यमांतून सुरू झाली. (डिसेंबर १८९९). मुंबई इलाख्याच्या या गव्हर्नर्स लेजिस्लेटिव्ह काऊन्सिलवर फक्त आठ सदस्य अप्रत्यक्षरीत्या (Indirectly) निवडले जात. तत्कालीन बॉम्बे, उर्वरित महाराष्ट्र, गुजरात आणि सिंध प्रांतांचे प्रतिनिधित्व हे सभासद करत. गोखले बॉम्बे काऊन्सिलचे सभासद झाले तेव्हा सँडहर्स्ट हे गव्हर्नर होते. 'नॉन ऑफिशियल' असा या सभासदांचा दर्जा होता. त्यांना कुठलेही बिल मांडण्याचा अधिकार नव्हता; परंतु ते चर्चेत सहभागी होऊ शकत. वेगवेगळ्या विषयांवरील गोखलेंची भाषणे, ऐतिहासिक ठरली. बॉम्बे काऊन्सिलमधील त्यांच्या कामगिरीमुळे ते 'रायझिंग स्टार ऑफ द डेक्कन' म्हणून ओळखले जाऊ लागले.
फिरोजशहा मेहतांनी राजीनामा दिल्यामुळे इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काऊन्सिलचा सभासद होण्याची सुवर्णसंधी गोखलेंना एप्रिल १९०१च्या सुमारास प्राप्त झाली. फिरोजशहांच्या रिक्त झालेल्या जागेवर गोखलेंची एकमताने निवड झाली. गोखलेंना इंपिरियल काऊन्सिलचे सभासद निवडून येण्यास स्वत: फिरोजशहांनी पाठिंबा दिला तर टाइम्स ऑफ इंडियाच्या बेनेट यांनीही मदत केली. इब्राहिम रहिमतुल्ला व बोमनजी दिनशा पेटीट या इतर दोन उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. सदस्य म्हणून कायदेमंडळाच्या कामकाजात १९०२ साली त्यांनी प्रथम भाग घेतला व १९१५ साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते या लेजिस्लेटिव काऊन्सिलचे सभासद होते.
कायदे मंडळांतील गोखलेंची निवड ही अतिरिक्त सभासद म्हणूनच झालेली होती व तत्कालीन राज्यघटनेनुसार या अतिरिक्त सदस्यांना स्वत:हून कुठला ठराव किंवा बिल मांडण्याचा अधिकार नव्हता. परंतु ते अर्थसंकल्पावर किंवा व्हॉइसरॉयच्या एक्झिक्युटिव काऊन्सिलने मांडलेल्या ठरावावर चर्चा करू शकत. गोखलेंसारखा जागरूक सदस्य या संधीचा फायदा उठवत अर्थसंकल्पाव्यतिरिक्त इतर प्रश्नांवरील चर्चेतही हिरिरीने भाग घेत असे. पुढे मोर्लेमिंटो सुधारणान्वये या सदस्यांना जनतेच्या हिताच्या प्रश्नासंबंधी प्रस्ताव देण्याचा किंवा चर्चा घडवून आणून मतविभागणी मागण्याचा अधिकार मिळाला.
विविध विषयांवरील गोखलेंच्या अभ्यासपूर्ण भाषणाने व त्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाने सत्ताधारी निष्प्रभ होत. गोखलेंनी इंपिरियल काऊन्सिलमध्ये द प्रेस बिल (फेब्रु १९१०), एलिमेंट्री एज्युकेशन बिल (मार्च १९१०) वगैरे विषयांवर भाषणे केली. परंतु गोखलेंची अर्थसंकल्पावरील भाषणे सर्वाधिक गाजली. १९०२ ते १९१२ या कालावधीत त्यांनी अर्थसंकल्पावर भाषणे केली व ती सर्व सवरेत्कष्ट म्हणून गणली जातात. गोखलेंच्या भाषणामध्ये त्यांनी विषयाची पूर्ण तयारी केली आहे. हे लक्षात येत असे. अर्थसंकल्पाची निर्भयतेने चिरफाड करत असतानाच ते विधायक सूचना करत. त्यांच्या अर्थसंकल्पावरील भाषणाची संपूर्ण हिंदुस्थान औत्सुक्याने वाट बघत असे. १९१३ साली अर्थसंकल्पावर त्यांचे भाषण झाले नव्हते. त्यावेळेस अर्थसंकल्प समितीचे सभासद गाय विल्सन म्हणाले, 'दॅट टू डिस्कस द बजेट विदाऊट गोखले वॉज लाइक प्लेइंग हॅम्लेट विथ द पार्ट ऑफ द प्रिन्स ऑफ डेन्मार्क लेफ्ट आऊट' गोखलेंच्या गैरहजेरीमुळे किती मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ते नवीन सभासदांना समजणे कठीण आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
१९०२ सालचे गोखलेंचे अर्थसंकल्पावरील पहिलेच भाषण सत्ताधाऱ्यांना धक्का देणारे ठरले. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात दाखवलेल्या सात कोटी रुपयांच्या शिलकेची त्यांनी खिल्ली उडवली. जर सात कोटी रु. शिल्लक राहात असतील तर सरकारने जनतेकडून इतके पैसे वसूल करण्याचे कारणच नाही, अशी जोरदार टीका त्यांनी केली. अर्थसंकल्पामुळे जनतेची सद्य:स्थिती आणि देशाची आर्थिक स्थिती यामध्ये सुसंवाद नसल्याचे स्पष्ट होत आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. सरकारने लादलेल्या करांविषयी ते बोलले, 'अ टॅक्सेशन सो फोर्सड् अ‍ॅज नॉट ओन्ली टू मेन्टेन अ बजेटरी इक्विलिब्रियम बट टू यिल्ड अ‍ॅज वेल लार्ज, कंटिन्यूयस, प्रोग्रेसिव्ह सरप्लसेस इव्हन इन इयर्स ऑफ ट्रायल अ‍ॅण्ड सफरिंग, आय सबमिट, अगेन्स्ट ऑल अ‍ॅक्सेप्टेड कॅनन्स ऑफ फायनान्स' आपल्या उपरोधित भाषणांत त्यांनी सरकारी उधळपट्टीवर कडाडून हल्ला चढवला. करांच्या रूपांत गोळा केलेल्या पैशाचा व्यय योग्य तऱ्हेने करणे हे सरकारचे कर्तव्य आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. एकीकडे सरकार रेल्वेचे जाळे पसरवण्यासाठी भरमसाट खर्च करत आहे, तर जलसिंचनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आहे. ब्रिटिश साम्राज्य वाढवण्यासाठी लष्करावर वारेमाप खर्च होत आहे हे त्यांनी कठोरपणे निदर्शनास आणले. लॉर्ड कर्झन यांनी लष्करावरील खर्च कमी करता येणार नाही, असे ठामपणे सांगितल्यानंतर गोखलेंनी एक अभिनव विचार मांडला. ते म्हणाले, जर लष्करावरील खर्च कमी करता येत नसेल तर तो ब्रिटनच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याची शक्यता पडताळून पाहावी.
अर्थसंकल्पावरील गोखलेंच्या पहिल्या भाषणापूर्वीचा पायंडा असा होता की, काऊन्सिलमधील भारतीय सदस्य अर्थसंकल्पावर विरोधी मत व्यक्त करत नसत, फारतर एखाद दुसऱ्या किरकोळ विषयावर दुरुस्ती सुचवत. सर्व जण शिलकीच्या अर्थसंकल्पाबद्दल अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करत. त्यामुळे अर्थसंकल्पावरील गोखलेंचे सडेतोड भाषण हे हिंदुस्थानच्या जनतेला आश्चर्याचा सुखद धक्का देणारे ठरले, तर सरकारमधील उच्चपदस्थांचा जळफळाट होण्यास कारण झाले. देशामध्ये सर्वत्र गोखलेंच्या विचाराचे स्वागत झाले. एका वर्तमानपत्राने अशा तऱ्हेची घटना पहिल्यांदाच घडली, असे म्हटले. तर एका ब्रिटिशधार्जिण्या वृत्तपत्राला गोखलेंचे विचार अर्थातच पटले नाहीत, तरीही ते आमचे म्हणजे (Western India चे ) आहेत म्हणून त्यांनी गोखलेंची स्तुती केली. सर्वात सुंदर प्रतिक्रिया कोलकात्याच्या एका ब्रिटिश वृत्तपत्राची होती. ते लिहितात, मिस्टर गोखले, अ मेंबर फ्रॉम बॉम्बे मेड अ स्लॅशिंग अ‍ॅटॅक ऑन द होल फायनान्शियल पोझिशन ऑफ द गव्हर्नमेंट अ‍ॅण्ड द एक्स्प्लोजन ऑफ अ बॉम्बशेल इज देअर मिड्स्ट कुड हार्ड्ली हॅव क्रिएटेड ग्रेटर सरप्राइज अ‍ॅण्ड कॉन्स्टेरनेशन इन द मिड्स्ट ऑफ द सीडेट असेम्ब्ली. गोखलेंच्या वक्तृत्वशैलीची स्तुती करताना संपादक म्हणतात, गोखलेंच्या भाषणात तारुण्यातील धिटाई, भाषेची अस्खलितता आणि विषयाची तंत्रशुद्ध मांडणी यांचा मनोज्ञ संगम झाल्यामुळे त्यांचे भाषण ऐकणे ही एक पर्वणीच ठरली.
इंपिरियल काऊन्सिलमध्ये गोखलेंचा एवढा दबदबा निर्माण झाला की, अर्थखात्याचे एक सदस्य गाय फ्लीटवूड म्हणाले, 'द वन मॅन आय फ्रॅन्कली फीअर्ड वॉज गोखले, 'द ग्लॅडस्टोन' ऑफ इंडिया. लॉर्ड मिंटो त्यांना 'लीडर ऑफ द नॉन ऑफिशियल्स इन द लॅजिस्लेटिव्ह काऊन्सिल' असे म्हणत. तर काऊन्सिलचे आणखी एक सदस्य अली इमाम हे गोखलेंचा उल्लेख 'लीडर ऑफ द आपोझिशन ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस' असा करत.
गोखलेंनी दादाभाईंप्रमाणे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये प्रवेश करावा, असे अनेकांचे मत होते. यामुळे आपणास वैयक्तिक मानसन्मान मिळेल, परंतु देशाच्या सक्रिय राजकारणापासून आपण दूर जाऊ, अशा विचाराने त्यांनी हा प्रस्ताव गांभीर्याने घेतला नाही. हिंदुस्थानातील राष्ट्रीय उत्थानाचे एक प्रमुख नेते व इंपिरियल काऊन्सिलमध्ये तेजाने तळपणारे उत्कृष्ट संसदपटू म्हणून गोखलेंची कीर्ती एव्हाना साता समुद्रापार पोहोचली होती. अमेरिकेतील 'सिव्हिल फोरम ऑफ न्यूयॉर्क' या अत्यंत प्रतिष्ठेच्या बिगर राजकीय संस्थेमध्ये 'हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळ' या विषयावरती भाषण करण्याचे त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण मिळाले. परंतु गोखले हे निमंत्रण स्वीकारू शकले नाहीत.
राष्ट्रहिताच्या प्रश्नावर चर्चा करताना विचारांतील पारदर्शकता, आपल्या विचारांवरील ठाम निष्ठा व ते निर्भयपणे मांडण्याचे धैर्य व कौशल्य यामुळे गोखले हे स्वातंत्र्य चळवळींतील एक अग्रणी बनले. सुशिक्षितांमध्ये ते खूपच प्रसिद्ध होते. सरकार व सरकारी धोरणांवर टीका करताना ते काळजीपूर्वक छाननी केलेल्या माहितीचा व काटेकोरपणे जमवलेल्या आकडेवारीचा आधार घेत. त्यामुळे गोखलेंची मते खोडून काढणे सरकार पक्षाला खूपच जड जात असे. विधिमंडळात संपूर्ण तयारीनिशी चर्चा करण्याची गोखलेंची ही पद्धत सुशिक्षितांना विशेष भावत असे.
गोखलेंची इम्पिरियल काऊन्सिलमधील कार्यशैली व आपल्या आजच्या संसदेतील खासदारांच्या कार्यशैलीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. सार्वभौम भारताच्या संसदेमधील गोंधळ बघितला की गोखलेंची प्रकर्षांने आठवण होते. संसदपटू म्हणून त्यांचे कार्य अविस्मरणीय व आदर्श असे आहे. म्हणूनच लॉर्ड कर्झन म्हणाले, 'आय हॅव नेव्हर मेट अ मॅन ऑफ एनी नॅशनॅलिटी मोअर गिफ्टेड विथ पार्लमेन्ट्री कॅपॅसिटीज. मिस्टर गोखले वुड हॅव ऑब्टेन्ड अ पोझिशन ऑफ डिस्टिनेशन इन एनी पार्लमेन्ट इन द वर्ल्ड, इव्हन इन द ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स'. 

विशेष, लोकप्रभा 
दि. १३/०२/२०१५, शुक्रवार

Monday, February 2, 2015

अलौकिक भाष्यकार - प्रशांत कुलकर्णी


ऐंशी-एक्याऐंशी साल असावं. बंगलोरला मेडिकल कॉलेजच्या बाजूला एका भव्य सभागृहात त्या दिवशी देशातले दिग्गज व्यंगचित्रकार जमले होते. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असताना हॉस्टेल मॅगेझिनमध्ये चार व्यंगचित्रं काढल्याने व्यंगचित्रकार म्हणून माझाही नुकताच जन्म झाला होता. अत्यंत उत्कंठेने मी त्या भरगच्च सभागृहात टाचा उंचावून त्या वलयांकित व्यक्तिमत्त्वांकडे पाहू लागलो. 'डेक्कन हेरॉल्ड'चे राममूर्ती हे अत्यंत साधेपणाने व्यासपीठावर बसले होते. त्यांची चित्रं मी रोज पाहत असे. व्यासपीठावर तोंडात पाईप ठेवून लोकांकडे बेदरकारपणे पाहणारे 'इंडियन एक्स्प्रेस'चे अबू अब्राहम होते. फ्रेंचकट दाढी ठेवून रुबाबदार दिसणारे 'वीकली'चे मारिओ मिरांडा होते. आणि सर्व सभागृहाला ज्यांच्याविषयी अत्यंत उत्कंठा होती, उत्सुकता होती ते 'टाइम्स ऑफ इंडिया'चे आर. के. लक्ष्मणही होते. पाहताक्षणी नरजेत भरावे असे भव्य कपाळ, मागे वळवलेले काळे केस आणि चौकोनी चष्मा यामुळे ते बुद्धिमान वाटत. (आज हे चारही व्यंगचित्रकार आपल्यामध्ये नाहीत!)
लक्ष्मण यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक भाषणाच्या सुरुवातीलाच दाखवली. त्यावेळी अमेरिकेची अंतराळ प्रयोगशाळा 'स्कायलॅब' पृथ्वीच्या वातावरणात केव्हाही प्रवेश करेल आणि कोणत्याही देशावर, कोणत्याही गावावर, भागावर कोसळू शकेल अशी अनामिक भीती वृत्तपत्रांतून सतत व्यक्त केली जात होती. तोच धागा पकडून लक्ष्मण म्हणाले, ''माझ्या मनात मघापासून हीच भीती आहे, की समजा ही स्कायलॅब या व्यासपीठावरच पडली तर देशातल्या वृत्तपत्रांतील सगळा ह्यूमर क्षणात नष्ट होईल!'' त्याबरोबर संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. व्यंगचित्रकार कसा विचार करू शकतो याचं ते जणू एक प्रात्यक्षिकच होतं. यानंतर अनेकदा लक्ष्मण यांच्या व्यक्तिमत्त्वातील व्यंगचित्रकार अनेक मुलाखतींतून भेटत राहिला. एका मुलाखतीत पत्रकाराने त्यांना त्यांच्या आत्मचरित्रातील काही तपशिलाविषयी विचारलं. लक्ष्मण यांनी उत्तर देण्याऐवजी उलट विचारलं, 'अरेच्चा! तुम्हाला हे कसं माहिती?' मुलाखतकार म्हणाले, ''सर तुमच्या आत्मचरित्रात त्याचा उल्लेख आहे!'' क्षणाचाही विलंब न लावता लक्ष्मण म्हणाले, ''ओह! माफ करा, मी ते पुस्तक वाचलेलं नाहीये!!''
दुसऱ्या एका जाहीर मुलाखतीत शेवटी त्यांनी काही अर्कचित्रांचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्यात लालूप्रसाद यादव आणि जयललिता यांच्या अर्कचित्रांचा समावेश होता. अर्कचित्रं भराभर रेखाटून झाल्यावर साहजिकच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर क्षणभर थांबून लक्ष्मण यांनी चक्क या दोघांच्या अर्कचित्रांवर जाड उभ्या रेषा मारल्या! 'मला हे खरे असे- म्हणजे 'बिहाइंड दि बार्स' हवे आहेत..' असं त्यांनी म्हटल्यावर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला! काही वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव आणि गेल्या वर्षी जयललिता हे दोन्ही नेते काही काळ तुरुंगात जाऊन आले तेव्हा लक्ष्मण यांच्या या कलाकृतींची (खरं तर कृतीची!) प्रकर्षांने आठवण झाली. आणि लोकशाहीमध्ये व्यंगचित्रकाराचं स्थान काय असतं, हे पुन्हा एकदा जाणवलं!!
'तुम्ही कॉमन मॅन कसा शोधलात?,' असं विचारल्यावर, 'खरं तर त्यानेच मला शोधलं!' असं त्यांनी म्हणणं, किंवा दस्तुरखुद्द राजीव गांधींनी, 'तुम्ही मला खूपच जाडा माणूस दाखवता!' अशी लाडिक तक्रार केल्यावर हजरजबाबीपणे 'आय वुइल लुक इन् टू द मॅटर'!' असं सरकारी प्रत्युत्तर देणं, हे सारं एका बुद्धिमान व्यंगचित्रकाराच्या हजरजबाबी प्रतिक्रिया आहेत हे जाणवतं.
लक्ष्मण यांनी नि:संशयपणे राजकीय व्यंगचित्रकलेला विलक्षण लोकप्रियता आणि प्रतिष्ठा दिली. वृत्तपत्रीय व्यंगचित्रांमध्ये मोठी व्यंगचित्रं आणि दररोजची पॉकेट कार्टून्स यामुळे त्यांच्या कलाकृतींवर देशभरातील लाखो वाचक दररोज लक्ष ठेवून असत. थोडीथोडकी नव्हे, तर पन्नासहून अधिक र्वष आपल्या कामाचा दर्जा टिकवून धरणं हे लोकोत्तर कलावंतच करू जाणोत.
कॅरिकेचर्स किंवा अर्कचित्रांचं रेखाटन हे लक्ष्मण यांचे फार मोठे शक्तिस्थान. पन्नास वर्षांच्या कालखंडात त्यांनी अक्षरश: हजारो व्यक्तिमत्त्वं अर्कचित्रांतून उभी केली. निव्वळ चेहऱ्याचे साम्यच नव्हे, तर त्यावरचे विविध भाव, शरीरयष्टी, उभे राहण्याची वा बसण्याची लकब, कपडय़ांच्या विविध तऱ्हा हे सारं अत्यंत नजाकतीने ते कागदावर उमटवत असत. त्यांच्या या कारकीर्दीविषयी बोलायचं तर पंडित नेहरूंपासून ते प्रियांका गांधींपर्यंतच्या चार पिढय़ांची अर्कचित्रं त्यांनी रेखाटली आहेत. मोरारजींच्या चेहऱ्यावरचे हेकट भाव, चंद्रशेखर यांची त्रासिक चेहरेपट्टी, इंदिराजींच्या चेहऱ्यावरचा अहंभाव, राजीवजींचा नवखेपणा, भांबावलेपण, लालूंचा उद्दामपणा हे सारं त्या चेहऱ्यावर येत असे. रोनाल्ड रेगन यांच्या चेहऱ्यावरच्या असंख्य बारीक सुरकुत्या किंवा झिया-उल-हक यांच्या चेहऱ्यावरचे जाड फटकारे किंवा अमर्त्य सेन यांचे नाजूकपणे रेखाटलेले डोळे, इम्रान खान यांचे विस्कटलेले केस, कपिलदेवचे दात, एम. एफ. हुसेन यांची पांढरीशुभ्र दाढी रेखाटताना जेमतेम दोन-तीन लयबद्ध रेषा वगैरे वगैरे मुद्दाम, वारंवार पाहण्यासारखे आहे. या अर्कचित्रांचा वापर मोठय़ा राजकीय चित्रांमध्ये त्यांनी अत्यंत खुबीने केला. उदाहरणार्थ चरणसिंगांची रुरल पॉलिटिक्स पॉलिसी दाखवण्यासाठी त्यांनी बहुतेकदा कुठेही फिरताना नांगर घेऊन फिरणारा बेरकी नेता रेखाटला. अडवाणींच्या डोक्यातून रथयात्रा, मंदिर वगैरे पौराणिक विषय जात नसल्याने त्यांच्या डोक्यावर लक्ष्मण यांनी नेहमी देवादिकांचा (अर्थातच नाटकातल्या) मुकुट दाखवला अन् त्यांना अत्यंत हास्यास्पद बनवलं. देवेगौडांना नेहमी झोपलेलं दाखवलं, तर ठाकरेंच्या आजूबाजूला लपलेल्या वाघाची नुसती शेपटी दाखवून त्यांचं खरं व्यक्तिमत्त्व दाखवलं. राजकारणामध्ये नेमकं काय सुरू आहे, हे इतक्या सोप्या पद्धतीने जनतेला समजावून सांगणारा व्यंगचित्रकार लोकप्रिय झाला नसता तरच नवल!
मोठय़ा व्यंगचित्रांतून मोठा आशय थोडक्यात कसा समजावून सांगता येतो, यासाठी त्यांच्या हजारो व्यंगचित्रांतून कोणतंही एक चित्र पाहिलं तरी सहज कळेल. पन्नास वर्षांतील देशाची प्रगती दाखवणारं चित्र याचीच साक्ष आहे. त्यात अक्षरश: एका लेखाचा नव्हे, तर एका अवजड व अवघड ग्रंथाचा विषय व आशय सामावलेला आहे. लक्ष्मण यांची पॉकेट कार्टुन्स अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांचे असंख्य संग्रह आजही तडाखेबंद खपतात. (यू सेड इट!) या सामर्थ्यांचं थोडं विश्लेषण करणं गरजेचं आहे. लक्ष्मण चित्रांची मांडणी अत्यंत प्रभावीपणे करतात. वास्तविक पॉकेट कार्टुन्समध्ये जागेच्या मर्यादेमुळे कॉम्पोझिशन अत्यंत कठीण असतं. पण तिथेही ते चित्रातील सर्व बारकावे कुशलतेने रेखाटतात.
एखाद्या फार्सिकल नाटकातील एखाद्या प्रवेशासारखं त्यांचं पॉकेट कार्टुन असतं. उदाहरणार्थ- नेपथ्य! म्हणजे प्रसंग कुठे घडतोय याचं रेखाटन! म्हणजे गावातील रस्ता, मंत्र्यांची केबिन, आदिवासी वस्ती,  विमानातील अंतरंग, बहुराष्ट्रीय कंपनीची बोर्डरूम, मध्यमवर्गीय घरातील बैठकीची खोली, पोलीस स्टेशन, कोर्टाचा कॉरिडॉर, हॉस्पिटलचा वॉर्ड किंवा एखादी आंतरराष्ट्रीय परिषद, तिथल्या परिसराचं चित्रण मोजक्या रेषांत ते इतक्या परिणामकारकरीत्या उभं करतात, की वाचकांच्या मनात त्याविषयी काही संशय राहत नाही. त्यानंतर पात्रं किंवा कॅरेक्टर्स! मला वाटतं, खरोखरच्या सामान्य माणसाचे किमान शंभर वेगवेगळे चेहरे विविध वेशभूषेसह ते सहज रेखाटू शकतात. उदाहरणार्थ भाजीवाला, नर्स, मंत्र्याचा पी. ए., बँक कर्मचारी, गृहिणी, शाळेत जाणारी मुलं, खुद्द मंत्रिमहोदय, परदेशी राजकीय पाहुणे, भिकारी मुलं इत्यादी पात्रं खरोखरच आपण कुठेतरी पाहिलेली आहेत, इतकी खरी वाटतात. इतकंच नव्हे तर हवालदार, इन्स्पेक्टर, पोलीस कमिशनर ही एकाच खात्यातील माणसं त्यांच्या देहबोलीसकट ते वेगवेगळी दाखवितात. या पात्रांच्या चेहऱ्यावरचे हावभावही वेगवेगळे असतात. आश्चर्य, संताप, त्रासिकपणा, निर्विकारपणा, केविलवाणेपणा, बेदरकारपणा, तुच्छता, कावेबाज, बेरकी इत्यादी हावभावांमुळे ही पात्रं जिवंत वाटतात.
शेवटचा व अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्युमर किंवा विनोद. यात तर ते अक्षरश: बापमाणूस आहेत. पॉकेट कार्टुनमध्ये ते ज्या पद्धतीने विसंगतीकडे लक्ष वेधतात, ती अक्षरश: अचंबित करणारी असते. स्वाभाविकपणे हास्यस्फोटकही! या विनोदातील 'सरप्राइज एलिमेंट' हे लक्ष्मण यांचं खरं बलस्थान आहे. फार्सिकल नाटकातील एखादा प्रवेश जर कॉम्प्रेस केला तर त्यातला ह्युमर जसा एखाद् दुसऱ्या वाक्यात कॉन्सन्ट्रेट होईल तशी त्यांची पॉकेट कार्टुनची कॅप्शन असते.
लक्ष्मण यांनी 'कॉमन मॅन' नावाचं कॅरेक्टर तयार केलंय ते अफलातून आहे. जणू काही आपणच खरे 'लक्ष्मण' आहोत, या थाटात व आविर्भावात हे पात्र त्यांच्या चित्रांतून डोकावत असते. त्यांच्या आजच्या चित्रात हे पात्र काय करतंय हे पाहणं हाही अनेकांच्या कुतूहलाचा भाग असे. तो कसा न बोलता सारं सहन करतो, याचंही मध्यमवर्गीय कौतुक अनेकदा होत असतं. ही सारी चर्चा किंवा कुतूहल हे लक्ष्मण यांच्या कल्पकतेचं यश आहे. (मात्र या अबोलपणासाठी प्रसिद्ध असलेल्या 'कॉमन मॅन'ला जेव्हा बोलायचं असतं त्यावेळी त्याच्याऐवजी त्याची पत्नी बऱ्याच वेळेला का बोलते, हे मला न उलगडलेलं कोडं आहे!)
लक्ष्मण यांच्या पॉकेट कार्टुनमधील अनेक संदर्भ हे काळानुरूप बदलले. उदाहरणार्थ जुन्या काळी सरकारी कार्यालयात काळे, उंच, जड टेलिफोन ते दाखवायचे. ते नंतर छोटेखानी, डिजिटल झाले. टाइपरायटर्स जाऊन टेबलावर पी. सी. आले. अ‍ॅम्बेसेडर गाडी जाऊन मारुती आली. पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा बदलल्या. या साऱ्यांचं श्रेय त्यांच्या जबरदस्त निरीक्षणशक्तीला देता येईल. जवळपास साठ वर्षांच्या भल्यामोठय़ा कारकीर्दीत लक्ष्मण यांच्या पॉकेट कार्टुनमधील दोनच गोष्टी बदलल्या नाहीत. त्या म्हणजे- विषयातील ताजेपणा आणि विनोद! पण या सर्वापेक्षाही लक्ष्मण यांच्या कामाचा दर्जा लक्षात राहतो तो या पॉकेट कार्टुन्समधल्या भाष्यामुळे! यातील असंख्य व्यंगचित्रांतील भाष्य हे पन्नास वर्षांनंतरही पुरून उरतं, यातच लक्ष्मण यांचं अलौकिकपण सिद्ध होतं.
व्यंगचित्रकाराची डायरी किंवा स्केचबुक हा खूप उत्सुकता निर्माण करणारा प्रकार असतो. व्यंगचित्रकार आपल्या मनात येणारे हजारो विचार, कल्पना झटपट स्केचबुकात रेखाटत असतो, नोंद करत असतो. लक्ष्मण यांची प्रतिमा ही वादग्रस्त व्यंगचित्रकार म्हणून कधीच नव्हती. त्यांचं भाष्य हे निर्भीड असले तरी ते कधीही मर्यादा ओलांडून पुढे गेले नाही. अर्थातच या मर्यादांची 'लक्ष्मणरेषा'ही त्यांनीच आखलेली होती हे त्यांच्या चित्रांवरून स्पष्ट होतं. मात्र, डायरीत चित्र रेखाटताना कलावंत मुक्त असतो. याचा प्रत्यय लक्ष्मण यांची दोन दुर्मीळ रेखाटने पाहून लक्षात येतं. मोरारजी देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक व्यंगचित्रकारांना राग होता असं म्हटलं तरी चालेल. त्यांचा तो ताठरपणा, कर्मठपणा, अहंभाव, दारूबंदी वगैरेचा अतिरेक या साऱ्यांचा परिपाक म्हणून लक्ष्मण यांची ही प्रतिक्रिया दिसते. त्याचबरोबर पी. व्ही. नरसिंह राव यांचा चेहरा रेखाटताना त्यांना मत्स्यावतार किंवा बेडूकवतार का आठवले, हेही पाहणं मजेदार आहे. लक्ष्मण यांनी फक्त राजकीय आणि सामाजिक संदर्भ असलेली व्यंगचित्रंच काढली असं नसून मॅनेजमेंट आणि सायन्स या विषयांवरही शेकडो व्यंगचित्रं काढली आहेत.
त्यांनी जगभर व देशभर भरपूर प्रवास केला. या प्रवासात त्यांनी काढलेली रेखाटनेही पुस्तकरूपाने उपलब्ध आहेत. या रेखाटनांमध्येसुद्धा त्यांच्यातला व्यंगचित्रकार जागा असतो हे जाणवतं. हीच बाब त्यांनी रेखाटलेल्या इतर लेखकांच्या बाबतीतही खरी आहे. (उदा. मालगुडी डेज् किंवा शरू रांगणेकरांची पुस्तकं, वगैरे.) त्यांनी रेखाटलेले कावळे हाही एक औत्सुक्याचा विषय आहे. त्यांच्या घरीही मला एक टॅक्सीडर्मी केलेला कावळा दिसला. इतका तो त्यांच्या आवडीचा पक्षी होता.
गेली पन्नास-साठ वर्षे लक्ष्मण यांचा वाचकवर्ग किंवा कॉमन मॅन हा व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून समाज, राजकारण याकडे पाहत असे. आता या कॉमन मॅनपुढचा कागद कोरा आहे! कॉमन मॅनची ही विषण्ण अगतिकता अगदी मन हेलावून टाकणारी आहे. 


- लोकरंग, लोकसत्ता
दि. ०१/०२/२०१५, रविवार

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...