Monday, December 29, 2014

खरी चूक देवाचीच! - रवींद्र देसाई

सात महिन्यांपूर्वी देशात सत्तांतर झाले. या काळात कट्टरतावादी नेते वा संस्थांनी संस्कृत भाषा, राममंदिर, गीतेसारखा ग्रंथ तसेच घरवापसी यांसारखे मुद्दे पुढे आणले. यामुळे आपला वेगळाच अजेंडा ते राबवू पाहात असल्याचे सर्वसामान्यांना वाटू लागले आहे. अशा वादविषयांची वेगळ्या अंगाने चिकित्सा करणारे टिपण..

रागावू नका मंडळी, कोणाच्याच भावना दुखवायची माझी इच्छा नाही; पण शांतपणे विचार करून पाहिलात, तर तुम्हीसुद्धा 'चूक देवाचीच आहे' हे लगेच कबूल कराल. देवाचा अवमान करण्याचा तर माझा काडीमात्र हेतू नाही. त्याच्याशी पंगा घेऊन, मेल्यानंतर मला नरकात जाऊन पडायचे आहे थोडेच?

देव सर्वशक्तिमान आहे. साऱ्या विश्वाचा व्यवहार केवळ त्याच्या इच्छेनुरूप चालतो. आपण कोणाच्या पोटी, केव्हा आणि कुठे जन्म घ्यायचा, जन्मभर काय भोग वा हालअपेष्टा भोगायच्या, केव्हा मरायचे हे सारे देवच ठरवतो. जिवंतपणी आपल्या हातून कोणती कृत्ये व्हावीत, इतकेच काय, पण आपल्या मनात कोणते विचार यावेत, हेही सारे केवळ देवच ठरवतो.

टाचणीच्या टोकावर ज्यांचा मेंदू ठेवला तरीदेखील त्या टोकावर मूळ जागेइतकीच जागा शिल्लक राहील, अशा किडय़ा-मुंगीसारख्या क्षुद्र (क्षुद्र केवळ आपल्या लेखी हं, परमेश्वराच्या लेखी नव्हे! कारण तीही त्याचीच निर्मिती आहे ना?) जीवांनासुद्धा आहार, निद्रा, भय, मथुन या गोष्टी परमेश्वराने त्यांच्या जीन्समध्ये आणि डीएनएमध्ये लिखित स्वरूपात दिल्या आहेत. आपण ती लिपी अजून तरी वाचू शकत नाही, ही बाब वेगळी! श्वसन, पचन, उत्सर्जन, जनन संस्थेसारख्या अत्यंत जटिल यंत्रणा - इतक्या जटिल की, आजपर्यंत मानवाला त्यांच्यासंबंधीचे झालेले ज्ञान हे समुद्रतटावरील वाळूच्या एका कणाइतके क्षुद्र आणि अल्प आहे - त्या क्षुद्रादिक्षुद्र प्राणिमात्रांनासुद्धा त्याने बहाल केल्या आहेत. प्रत्येक प्राणिमात्राला पंचज्ञानेंद्रिये दिली आहेत; विचारशक्ती (आपल्या लेखी थोडी कमी-जास्त) दिली आहे, वंशसातत्याची ओढ दिली आहे. खरोखरच हे सारे केवळ थक्क करणारे आहे.

मग अन्य कोणालाही अशक्यप्राय असलेले हे इतके सारे निर्माण करणाऱ्या परमेश्वराने आणखी केवळ एकाच तर्कशुद्ध गोष्टीची निर्मिती केली असती, तर काय बिघडले असते? निदान त्याने तसे केल्याचे मला तरी (त्याच्याच इच्छेने?) जाणवत नाही म्हणूनच मी (की माझ्या मुखातून तोच!) असे म्हणतो आहे की, 'खरी चूक परमेश्वराचीच आहे'.

मंडळी, सारे काही निर्माण करण्याचे सामथ्र्य असलेल्या परमेश्वराने समजा, 'देव म्हणजे कोण', 'धर्म म्हणजे काय', 'धर्माचरण म्हणजे काय', 'माझा अधिकृत प्रतिनिधी कोण', 'अधिकृत धर्मग्रंथ कोणता' याची कोणालाही कळेल अशी अत्यंत सुस्पष्ट (आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकुलती एक!) व्याख्या प्रत्येक मानवाच्या जीन्समध्येच लिहून ठेवली असती, तर बिचाऱ्या परमेश्वराच्या पदरचे असे काय चार चव्वल जादा खर्च झाले असते? किंवा नुसताच ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट करण्याऐवजी त्याने 'आकाशवाणी' करून (आकाशवाणीवरून 'मन की बात' करून नव्हे!) स्वत:च्या धीरगंभीर आवाजात हे सारे अजून जरी स्पष्ट केले की, 'बाबांनो, भांडू नका, या साऱ्या जगाची निर्मिती मीच केली आहे. प्रभू रामचंद्र हा माझाच अवतार होता. आज जी अयोध्येत वादग्रस्त इमारत आहे, तेच प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थळ आहे (किंवा 'नाही'सुद्धा!)'; 'गीता हा केवळ राष्ट्रीयच नव्हे तर वैश्विक पूज्य ग्रंथ मानावा' अथवा 'पैगंबर हेच शेवटचे प्रेषित आहेत' किंवा 'येशू हा माझा अत्यंत लाडका पुत्र मी केवळ तुमच्यावरील प्रीतीपोटी पृथ्वीवर पाठवलेला आहे' किंवा यापेक्षाही धमाल म्हणजे त्याने आपल्या इलेक्शन कमिशनकडून ती सुप्रसिद्ध नॉन-वॉशेबल इंक घेऊन, प्रत्येकाच्या कपाळी 'हा युगानुयुगांचा हिंदू', 'हा जन्मोजन्मीचा मुसलमान', 'हा पिढय़ान्पिढय़ांचा ख्रिश्चन' वगरे वगरे 'परमनंट' शिक्के अजून जरी मारले, तर कित्येक प्रश्न झटक्यात मिटतील.

पण नाही. परमेश्वर असे स्वत: काहीही करत नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी दुसरेच कोणी तरी अशा अनधिकृत घोषणा करतात वा शिक्के मारतात आणि मग ती घोषणा स्वीकारण्याचा, नाकारण्याचा वा भलतेसलते शिक्के पुसण्याचा इतरांना उगीचच अधिकार प्राप्त होतो. मग त्यातून खूनखराबा होतो. 'यदा यदाही धर्मस्य.. संभवामी युगेयुगे' असे खुद्द कृष्णाने (पण मानवी रूपात!) म्हटले म्हणून तर त्या काळातसुद्धा दुर्योधनाने ते मानले नाही. जो आधीपासूनच विनातक्रार आपल्याला देव मानतो त्या अर्जुनाला हे 'विश्वरूप दर्शन' घडवण्यापेक्षा, 'विश्वरूप दर्शन' दुर्योधनाला घडवणे अधिक उचित व उपयुक्त नसते का ठरले?

खरे तर भाडय़ाचे ट्रक वा बिदागी न पाठवतासुद्धा, अनायासे किमान १८ औक्षणींचा मॉब कुरुक्षेत्रावर जमला असताना, मानवरूपी कृष्णाच्या तोंडून 'संभवामी युगे युगे' असा अर्जुनाला दिलासा देण्याऐवजी, भले अदृश्य रूपात जरी परमेश्वराने, 'मुकाटय़ाने कृष्ण काय सांगतो ते ऐका, नाही तर माझ्याशी गाठ आहे,' अशी आकाशवाणीवरून तंबी दिली असती, तर कौरवांची युद्ध करायची काय बिशाद झाली असती; पण नाही. परमेश्वर तेव्हा मूग गिळून गप्प बसला आणि आता त्याऐवजी गीतेतला एकही श्लोक माहीत नसलेल्यांना कंठ फुटला आहे. परमेश्वरा, अशी करतात का रे कधी 'स्वराजनिर्मिती'?

किंवा याचा दुसऱ्या पद्धतीनेही अन्वयार्थ लावता येईल. एक तर देवाला यातले तेव्हाही काहीच अपेक्षित नव्हते किंवा अजूनही नाही. खुद्द परमेश्वराचे या तथाकथित धर्माशी, धर्ममरतडांशी, मुल्ला-मौलवींशी, पोप-पाद्रय़ांशी, गीता-कुराण-बायबलशी तेव्हाही काहीच देणेघेणे नव्हते अथवा अजूनही नाही. हे सारे धर्माच्या नावावर दुकाने चालवणाऱ्यांचे तेव्हाचे उद्योग होते आणि अजूनही तेच चालू आहे किंवा देवाकडून खरोखरच गफलत झाली आहे!

देवांच्या मदतीस चला तर..तेव्हा आता बापडय़ा देवाची चूक ती सुधारायची पाळी आपल्यावर आली आहे. 'देव म्हणजे कोण', 'धर्म म्हणजे काय', 'धर्माचरण म्हणजे काय', 'धर्माचा अधिकृत प्रतिनिधी कोण', 'अधिकृत धर्मग्रंथ कोणता', या साऱ्याचा निर्णय आपणच करू या. आपण खुद्द परमेश्वराचेच अंश आहोत ना? मग आपल्याला परमेश्वराशी संवाद साधायला बाहेरचे दलाल मुळात हवेतच कशाला?

तहानलेल्याला पाणी पाजणे म्हणजे धर्म. दुसऱ्याच्या डोळ्यांतील पाणी पुसणे म्हणजे धर्म. या दोन्ही गोष्टी करणे म्हणजे धर्माचरण! छळाने, बळाने, कपटाने दुसऱ्याची वस्तू छिनून घेणे म्हणजे अधर्म! दुसऱ्याच्या डोळ्यांत पाणी येईल असे वागणे म्हणजे अधर्म! अशा गोष्टी करणे म्हणजे अधर्माचरण! धर्म आणि अधर्म समजून घेणे इतके सोपे असताना आपल्याला हवेत कशाला अरबी, फारसी, इंग्लिश अथवा संस्कृतमधले ते दुसऱ्याकडून समजून घ्यायला लागतात असे क्लिष्ट ग्रंथ? आपल्या मनाचा आवाज ऐकू या. तीच खरी देवाची साद असेल.

(जाताजाता : आणि हो, धर्मभ्रष्टांना शिक्षा करायची 'फुकट फौजदारी' स्वत:च्या शिरावर घेऊ नका. त्यांना शासन करण्यासाठी खुद्द परमेश्वर स्वत: समर्थ असेलच, नाही का? तुम्ही ते काम स्वत:च्या हाती घेणे म्हणजे बिचाऱ्या परमेश्वराला नालायक ठरवून, आपण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे दाखवून देण्याजोगेच नाही का?)

- लोकसत्ता
दि. २८/१२/२०१४ , रविवार

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...