Thursday, December 19, 2013

गोठलेल्या पाठ्यपुस्तकाची गोष्ट - किशोर दरक

 'शिवछत्रपती' हे सलग ४३ वर्षे जवळपास तसंच राहिलेलं जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे. मात्र २००९ च्या आवृत्तीत काही बदल केले गेले.  पण हे बदल करताना  जी राजकीय चलाखी दाखवली गेली त्याला पाठय़पुस्तकांच्या इतिहासात तोड नाही. त्या बदलांवर आक्षेप घेणे, हा या लेखाचा हेतू नाही. हे पुस्तक गोठलेलेच राहिल्यामुळे शिक्षणशास्त्रीय निकषांशी ते कसे विसंगत ठरते, हे दाखवायचा आहे..
इयत्ता चौथीचं इतिहासाचं पाठय़पुस्तक - शिवछत्रपती - या वर्षी तब्बल ४३ वर्षांचं झालं. नऊ-दहा वयोगटाच्या मुलांना एकाच व्यक्तीचा इतिहास शिकविणारं आणि १९७० पासून सलग ४३ वर्षे जवळपास तसंच राहिलेलं 'शिवछत्रपती' हे जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे. या पाठय़पुस्तकात छोटय़ाशा बदलाचा प्रस्तावदेखील तणाव निर्माण करत असल्याचं या पाठय़पुस्तकाचा इतिहास आपल्याला सांगतो. १९९२ साली अशाच एका तणावाच्या काळात विधिमंडळातल्या प्रचंड गोंधळानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी 'हे पुस्तक कोणत्याही बदलाशिवाय आहे तसेच ठेवले जाईल' अशी घोषणा विधानसभेत केली होती. याच घोषणेची री ओढत गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासक्रमातदेखील 'इयत्ता चौथीच्या इतिहासात कोणताही बदल असणार नाही' याची ग्वाही देण्यात आली आहे. ही ग्वाही 'विद्या परिषदे'मार्फत (SCERT) राबवली गेली आहे. १९७० पासून कोटय़वधी मुलांनी ज्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासला ते पुस्तक कोणतं संदर्भसाहित्य वापरून बनवलंय, याबाबत या पुस्तकाच्या निर्मितीसाठी जबाबदार असणाऱ्या 'बालभारती'कडेच कसलीही माहिती नसल्याचं, माहितीच्या अधिकारात विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या उत्तरांदाखल खुद्द 'बालभारती'ने म्हटलंय.
मूळ संदर्भाच्या अनुपस्थितीत चकित करणारी गोष्ट म्हणजे या पाठय़पुस्तकाचं भालजी पेंढारकर दिग्दर्शित 'छत्रपती शिवाजी' या १९५२ सालच्या चित्रपटाशी असणारं साम्य. चित्रपटातील काही प्रसंग 'फ्रेम बाय फ्रेम' पाठय़पुस्तकात आलेले दिसतात. पाठय़पुस्तकातली अनेक चित्रं तर पडद्यावरच्या हलत्या प्रतिमा स्थिर करून चितारल्यासारखी हुबेहूब आहेत. कुणी म्हणेल की चित्रपटातून प्रेरणा घ्यायला हरकत का असावी? ऐतिहासिक चित्रपट किंवा कादंबरीतदेखील कल्पनाविलासात दडलेला 'इतिहास' असू शकतो. एखादा ऐतिहासिक चित्रपट किंवा कादंबरी पाहताना किंवा वाचताना प्रेक्षक-वाचक त्यात पूर्णपणे गुरफटला अथवा झपाटला जाऊ शकतो, किंबहुना ते त्या निर्मितीचं उद्दिष्ट असतं. पण इतिहासाचं पाठय़पुस्तक म्हणजे ऐतिहासिक सिनेमा किंवा कादंबरी नव्हे. तो वैध ज्ञानाचा स्रोत आहे. शिकणाऱ्यांना 'झपाटून टाकणं' किंवा 'रोमहर्षति करणं' हे इतिहास शिक्षणाचं उद्दिष्ट नसतं. चिकित्सक विचारसरणीचा अवलंब करत वर्तमानाच्या संदर्भात भूतकाळाची रचना करायला शिकवणं, भूतकाळाच्या मांडणीतली विविधता समजावून घेऊन तिचा आदर करायला शिकवणं, 'इतिहास म्हणजे मती गुंगवणाऱ्या कथा' या इतिहासाच्या मर्यादित, पुरातनकालीन अर्थाला आव्हान देणं ही आधुनिक इतिहास शिक्षणाची मुख्य उद्दिष्टं असतात. इतिहासाच्या नुसत्या कथा मुलांना सांगण्याऐवजी समाजाच्या सर्व वैविध्यांचं प्रतिबिंब असलेल्या, समाजाच्या बहुविधतेला सामावून घेणाऱ्या इतिहासाची निर्मितीप्रक्रिया मुलांना शिकवणं हे शालेय इतिहास शिक्षणाचं काम आहे, असं जगभरात मानलं जातं. थोडक्यात सांगायचं तर इतिहास म्हणजे 'चिकित्सक पद्धतीनं केलेली भूतकाळाची रचना' हे सूत्र मान्य करून ही 'रचना' कशी समजावून घ्यायची, कशी करायची हे शिकवणं म्हणजे इतिहास शिक्षण देणं, असं आपण म्हणू शकतो.
१९७० पासून तसंच ठेवण्यात आलेल्या या पाठय़पुस्तकाच्या २००९ च्या आवृत्तीत काही बदल केले गेले आहेत. या बदलांचा मुख्य हेतू राजमाता जिजाबाई आणि शहाजीराजांच्या संदर्भात न्याय्य मांडणी करणं हा होता, असं संबंधित समितीचं म्हणणं होतं. पण हे बदल करताना इतर ठिकाणी अत्यंत जुजबी बदलांतून जी राजकीय चलाखी दाखवली गेली त्याला पाठय़पुस्तकांच्या इतिहासात तोड नाही. स्वराज्याची पहिली राजधानी (राजगड) कशी उभी राहिली हे सांगताना, 'गडावर पाथरवटांनी दगड घावले. लोहाराने भाता फुंकला. सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी मराठी माणसं कामाला लागली' (पान ३९) असा उल्लेख करण्यात आला आहे.  सन १९७० पासून २००८ पर्यंत हेच विधान 'गडावर पाथरवटांनी दगड घावले. लोहाराने भाता फुंकला. सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती सारे कामाला लागले' असं होतं. वारंवार हिंसेवर उतरणारी 'मराठी माणूस' ही सध्याची पश्चिम महाराष्ट्रीय, शहरी अस्मितादर्शी ओळख शिवकाळात अस्तित्वातदेखील नव्हती. असं असताना स्वराज्य 'घडवण्याचं' काम करणाऱ्यांना 'मराठी माणूस' हे बिरुद चिटकविण्याचं कारण स्पष्ट आहे. महाराजांच्या प्रतिमेचा वापर सद्यकालीन राजकारणासाठी करायचाय. मराठी माणसांचा अर्थ तत्कालीन समाजातील मराठी भाषा बोलणारे लोक, असा घेतला तर 'स्वकीय' शत्रूंच्या संदर्भात 'अनेक मराठी माणसांनी स्वराज्यनिर्मितीला विरोध केला' असंदेखील म्हणावं लागेल; पण पाठय़पुस्तकात तसं झालेलं दिसत नाही.
१९७० पासून मुस्लिमांचं ज्या प्रकारचं चित्रण या पाठय़पुस्तकात करण्यात आलंय ते पाहता शिवाजी महाराजांना केवळ हिंदू धर्मीय बनवून त्यांच्या उदार धार्मिक प्रतिमेला पुस्तकानं तडा दिलाय, असं म्हणावं लागेल. महाराजांच्या सेवेतल्या मुस्लिमांचा उल्लेख करतानाचं हे विधान पाहा - 'त्यांच्या आरमारातील अधिकारी दौलतखान, सिद्दी मिसरी तसेच त्यांचा वकील काझी हैदर हे मुसलमान होते, पण ते सारे स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते' (पान १०१). २००९ पर्यंत पाठय़पुस्तकात असणाऱ्या या विधानात 'पण' हे केवळ उभयान्वयी अव्यय नाही. हेतू मुस्लिमांच्या निष्ठांविषयी थेट शंका व्यक्त करण्याचा आहे. मुस्लिमांना 'परकीय' म्हणणं आणि त्याच वेळी महाराजांच्या हिंदू धर्मीय शत्रूंना 'स्वकीय' म्हणणं, मुस्लिमांची चित्रं काढताना केवळ हिरव्याच रंगाच्या छटांचा वापर करणं, स्वाध्यायांमधून मुस्लिमांच्या 'दुर्गुणां'चं दृढीकरण करणं, महाराजांच्या बाबतीत वारंवार 'स्वधर्माचा' उल्लेख करणं आणि पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरात त्याचं भाषांतर 'हिंदू' असं करणं अशा अनेक प्रकारे महाराजांच्या प्रतिमेचा वापर हिंदुत्ववादी राजकारणासाठी केल्याचं स्पष्ट दिसतं.
पुस्तकामध्ये भरून वाहणारी युद्धजन्य हिंसा ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे. या संपूर्ण पुस्तकात थेट हिंसेची ३० पेक्षा जास्त उदाहरणं आहेत. 'नाही तर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार' (पान ४७); 'खानाची आतडी बाहेर पडली' (पान ५१); 'फेका आणखी दगड. ठेचा गनिमांना' (पान ५८); 'कापा, तोडा, मुडदे पाडा' (पान ६९);  '.. आणि तुफान कत्तल करत सुटला' (पान ६९) ही त्यातली काही उदाहरणं. नऊ-दहा वर्षांच्या मुलांना शिकवलं जाणारं आणि तीव्र हिंसेची अशी 'ग्राफिकल' वर्णनं असणारं पाठय़पुस्तक या भूतलावर सापडणं शक्य नाही. विशेष म्हणजे पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरात हिंसेची तीव्रता बरीच कमी झाली आहे. हा योगायोग की भाषांतरकाराची अक्षमता की महाराष्ट्रातला कारभार जगापासून लपवण्याचा प्रयत्न हे मात्र सांगता येत नाही.
एखाद्या समाजाला आवश्यक वाटणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तींचा इतिहास शिकवण्याचा निर्णय त्या समाजाचा असतो. पण तो शिकवण्याची पद्धत, त्यासाठी योग्य वयोगट, योग्य शिक्षणशास्त्र (पेडागॉजी) याचा कसलाही विचार न करता शिकवलेला इतिहास उपयुक्त ठरणं तर सोडा, त्याचा गरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
शिक्षणाला आधुनिक करावं, जगातल्या बदलांशी सुसंगत असावं म्हणून महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजी शाळांमधून संगणक शिक्षण अशा अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. पण अशा आधुनिकतेची मागणी इतिहास शिक्षणात का केली जात नाही? गेल्या चार दशकांमध्ये इतिहासातल्या 'कथनां'ची जागा 'रचनां'नी घेतली आहे. स्त्रिया, शोषित जात-वर्ग समूहांच्या इतिहासलेखनाच्या नवनव्या पद्धती उदयाला आल्या आहेत. 'बालपण' ही संकल्पना मोठ्ठय़ा प्रमाणात बदलली आहे. बाल मानसशास्त्राचे आयाम बदलले आणि नागरिकत्व-शिक्षणाचा विचार आणि पद्धती बदलल्या. इतिहास आणि सामाजिक शास्त्रांच्या शिक्षणाचा उपयोग 'शांतता शिक्षणा'साठी करण्याचे प्रयत्नदेखील चार ते पाच दशके जुने झाले आहेत. शिक्षण हक्ककायद्यानुसार बंधनकारक असणाऱ्या 'राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा- २००५' नेदेखील 'शांततेसाठी शिक्षणा'चा पुरस्कार केला आहे. या कशाचाही विचार न करता एखादं पाठय़पुस्तक, त्यातला शब्दन्शब्द तसाच ठेवणं हा शिक्षणातल्या आधुनिकतेचा कुठला प्रकार आहे? 'रचनावादा'वर (कन्स्ट्रक्टिव्हिझम) आधारित नवा अभ्यासक्रम तयार करतानादेखील काळाच्या पट्टीवर गोठवलेलं पाठय़पुस्तक आहे तसं ठेवण्याची घोषणा म्हणजे हे पुस्तक शिक्षणशास्त्राच्या पलीकडचं म्हणजेच 'पेडागॉजी प्रूफ' (pedagogy proof) मानलं गेल्याचं लक्षण आहे.
इतिहास शिक्षण कल्पकतेने कथनापलीकडे गेलं तर आधुनिक काळातल्या मुलांसाठी महाराजांचा इतिहास अधिक प्रेरक ठरेल. शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायचा, तो त्यातून प्रेरणा घेऊन मुलांनी वर्तमानकालीन आवाहनांना तोंड द्यायला तयार व्हावं म्हणून, की भालजी पेंढारकरांनी म्हटल्याप्रमाणे 'युगप्रवर्तक पुरुषोत्तमाची त्यांच्या भक्तांनी पूजा मांडावी' म्हणून, याचा निर्णय महाराष्ट्राने करायचा आहे.


- विशेष लेख (संपादकीय, लोकसत्ता)
दि. १९/१२/२०१३, गुरुवार

Sunday, December 15, 2013

मंडेला नावाचे वादळ! - स्वरूप पंडित

!! आदरांजली !!
नेल्सन मंडेला गेले. आयुष्यातली २७ वर्षे तुरुंगवासात घालवणाऱ्या ह्या माणसाला कधी निराशेने स्पर्श केला नाही की जीवनाबद्दलची त्यांची आसक्ती कमी झाली नाही. आयुष्याप्रमाणेच त्यांनी राजकारणातल्या आपल्या व्यवहारांमध्येही खुलेपणाच ठेवला. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या पैलू विषयी -
कोणत्याही राजकीय व्यक्तीचा विचार करताना त्या व्यक्तीला 'कोणत्या ना कोणत्या विचारधारेच्या कप्प्यात बंदिस्त करणे' हे मानवी स्वभावाचे अविभाज्य अंग आहे. एक तर असे केल्याने त्या व्यक्तीवर टीका करणे सोपे जाते शिवाय त्या व्यक्तीला देवत्व बहाल केले जाणार नाही याची काळजी तिच्यातील वैचारिक उणीवा दाखवून करता येते. त्याचवेळी समाजातील एक घटक सर्वतोपरी प्रयत्न करून अश्या व्यक्तींना ईश्वरत्व बहाल करण्याचा प्रयत्न करीत असतो. या द्वंद्वातून ती व्यक्ती समजून घेताना मात्र निखळ आनंद मिळाल्यावाचून राहात नाही.
६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेत राहणारे 'भारतरत्न' निखळले. दहा हज्जार दिवस सूर्य न पाहिलेला नेल्सन मंडेला नावाचा स्वातंत्र्यसूर्य अस्ताला गेला. नेल्सन मंडेला यांचे आत्मचरित्र वाचताना सातत्याने समोर येणारी बाब म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा. एक राजकारणी असूनही आपले सारे आयुष्य प्रामाणिकपणे घालवणाऱ्या या नेत्याच्या आयुष्याच्या बांधणीची ही कहाणी.. 
नेल्सन यांचे मूळ नाव रोलिल्हाल्हा..  या नावाचा अर्थ होतो 'खट्याळ' किंवा 'उनाड' तर इंग्रजी भाषक ख्रिस्ती शाळेत दाखल झाल्यानंतर शाळेतील बाईंनी ठेवलेले नाव म्हणजे नेल्सन. या नावाचा अर्थ आहे 'अजिंक्य योद्धा'.. आपल्या ९५ वर्षांच्या आयुष्यात परस्परविरोधी छटा आणि प्रतिमा असणारी ही दोन्ही नावे मंडेला जगले. शालेय जीवनाचा, तेथे शिकलेल्या गोष्टींचा मानवी मनावर प्रभाव राहतो असे म्हणतात. छोटा नेल्सन शाळेत तर मोठ्या हौसेने जाई, पण त्याचबरोबर आपल्या 'कळपा'मध्ये खोसा आणि थेंबू या आफ्रिकेतील दोन जमातींच्या ऐतिहासिक कथांचे श्रवणही तितक्याच तल्लीनतेने करीत असे. वस्तुतः मंडेला हे थेंबू या आदिवासींच्या राजघराण्यातील. पण त्यांनीच आपल्या आत्मचरित्रात नमूद करून ठेवले आहे की 'थेंबू आणि खोसा वीरांच्या कथा ऐकताना माझ्या बालमनात सर्व जातींच्या निरपेक्ष वीरतेचे कौतुक निर्माण झाले.' समतेच्या तत्वांची बीजे मंडेलांच्या आयुष्यात अशा पद्धतीने पेरली गेली.
शाळेत सगळेच जातात, अभ्यासही करतात, उत्तीर्णही होतात. पण शाळेत शिकविल्या जाणाऱ्या गृहीतकांना आव्हान देत नाहीत किंवा आपल्याला काही चुकीचे शिकविले जात असेल असे कुणाला चुकूनही वाटत नाही. मंडेला यांचे वेगळेपण आणि त्यांची स्वातंत्र्याची उर्मी इथून सुरु होते. शालेय जीवनात इतिहास हा मंडेलांचा आवडीचा विषय. आपल्या जमातीच्या 'मुखिया'कडून ऐकलेल्या गोष्टी आणि इतिहासातले दाखले यात काही दुवे आहेत का हे नेल्सन तपासू लागले. तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, ब्रिटीशांकडून शिकविला जाणारा इतिहास हा आफ्रिकेचा खरा इतिहास असेलच असे नाही किंबहुना त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, ' आफ्रिकेचा खरा इतिहास ब्रिटीश पुस्तकांमधून वाचायला मिळणारच नाही'  आणि इथूनच त्यांच्या मनातील प्रामाणिकपणाने, निरागसतेने आणि स्वातंत्र्याच्या निकडीने तीव्र उचल घेतली.
आयुष्याची २७ वर्षे स्वत: तुरुंगात असतानाही, या माणसाच्या अंत:करणातील स्वातंत्र्याची अखंड, अविरत प्रेरणा अविचल राहिली. त्यांच्या शालेय जीवनातील आणखी दोन प्रसंग मंडेला यांच्या स्वभावाची जडणघडण अधोरेखित करतात. नव्या आणि खऱ्या अर्थाने 'गोऱ्या' शाळेत प्रवेश घेताना मंडेला यांना 'राजसल्लागार' होण्यासाठी शिकायचे आहे, असे त्यांच्या मुख्याध्यापकांना सांगण्यात आले. आपण राजघराण्यातील असल्यामुळे आपल्याला विशेष वागणूक मिळेल असा मंडेलांचा कयास होता. प्रत्यक्षात त्या शाळेत आलेली सर्वच मुले कोणत्या ना कोणत्या राजघराण्याशी जोडली गेलेली होती. यामुळे, 'विशेष वागणुकीच्या' बाबतीत नेल्सन यांचा भ्रमनिरास झाला. पण यातून लहानग्या नेल्सननी घेतलेला बोध खूप महत्त्वाचा आहे. 'आयुष्यात राजघराण्यातील आहोत या सबबीने नव्हे तर स्वकर्तृत्वाने मार्ग शोधावा लागतो'. पुढील आयुष्यात मंडेला यांना ज्या भीषण अनुभवांना, अन्यायांना सामोरे जावे लागले ते जाताना त्यांच्या अंत:करणातील निरागसता आणि स्निग्धता कायम राहिली त्याचे मूळ या प्रसंगात आहे. 
याच शाळेत एकदा परीक्षा तोंडावर आलेली असताना इंग्रजी आणि इतिहास या विषयांमध्ये आपली काही डाळ शिजत नाही हे मंडेलांना समजून चुकले. तशी भीतीही त्यांनी आपल्या मत्रिणीकडे व्यक्त केली. तेव्हा मत्रिणीने त्यांना आश्वस्त करताना, काळजी करू नकोस. आपल्या शिक्षिका या पहिल्या कृष्णवर्णीय महिला पदवीधर आहेत, त्या आपल्याला नापास नक्कीच करणार नाहीत, असे सांगितले. आपल्या एका मुलाखतीत मंडेलांनी हा प्रसंग नमूद करताना सांगितले की, त्या वेळी मी उत्स्फूर्तपणे तिला म्हणालो ''जे माहीत नाही ते माहिती आहे असे भासविण्याची हुशारी माझ्या अंगी आलेली नाही, त्यामुळे हा मार्ग अनुसरणे मला जमेल असे वाटत नाही''. मंडेला यांच्या नेतृत्वाला जो प्रतिसाद जगभरातून लाभला त्याचे कारण त्यांच्या या प्रांजळ स्वभावात आपल्याला दिसते..
नेल्सन मंडेला हे गांधीजींनी मांडलेल्या स्वातंत्र्यलढय़ाच्या पद्धतीचे पाईक असल्याचे आपण मानतो, पण त्यामागील खरे कारण वेगळे आहे. मंडेलांच्या विचार करण्याच्या पद्धतीचे एक वैशिष्टय़ं होते ते म्हणजे 'प्रश्न तत्त्वांचा नसून क्लृप्त्यांचा - डावपेचांचा आहे' या मूल्यावरील त्यांची दृढ श्रद्धा. आपल्या आत्मचरित्रात मंडेलांनी याबद्दल जे नमूद केले आहे ते उद्धृत करणे गरजेचे आहे : 'हिंसक चळवळ दडपणे सरकारला सहज शक्य झाले असते त्यामुळे, अिहसक मार्गाचा वापर करणे ही व्यावहारिक गरज होती. एक डावपेच म्हणून तो मार्ग मी स्वीकारला होता. गांधीजींप्रमाणे एक शाश्वत मूल्य म्हणून मी ते स्वीकारले नव्हते!' आपल्या राजकीय विचारसरणीचा पाया व्यावहारिकतेवर आणि उपयुक्ततेवर आधारलेला होता, हे जगजाहीर करण्यात मंडेला यांना जराही कमीपणा वाटला नाही, हे त्यांचे वेगळेपण.
रिचर्ड स्टेंगेल यांनी टाइम साप्ताहिकात मंडेला यांच्या नेतृत्वातील वेगळे पलू मांडले होते. त्यातील दोन पलू तर सर्वार्थाने भिन्न होते. मंडेला यांचे बालपण रानावनात हुंदडण्यात गेले होते. त्या वेळी त्यांनी मेंढय़ा पाळण्याचे कसब आत्मसात केले होते. मेंढय़ांच्या कळपाला सांभाळायचे तर, त्यांच्या नेत्याला म्हणजे मेंढपाळाला त्यांच्या मागे राहावे लागते. नेत्याने आघाडीवर राहून नेतृत्व करावे ही जगाची रीत. पण कळप सांभाळताना त्याचे मानसशात्र वेगळे असते हे मंडेलांनी हेरले. कळपाचे नेतृत्व करणाऱ्याने नव्या कल्पना मांडण्याची - काय करायचे ते सांगण्याची गरज नसते, तर कळपामध्ये जेव्हा मतभेद निर्माण होतात तेव्हा मतक्य निर्माण करण्याची गरज असते आणि म्हणूनच नेतृत्वाने आघाडीवर राहण्यापेक्षा मागे राहण्याची गरज मंडेला अधोरेखित करतात. शिवाय याचा आणखी एक फायदा असतो, असे उपयुक्ततावादी स्पष्टीकरणही खुद्द मंडेला देतात.. आपली संकल्पना इतरांवर लादण्यापेक्षा संकल्पना अशा पद्धतीने मांडली जावी की प्रत्येकाला 'ही तर मीच मांडलेली संकल्पना' असे वाटले पाहिजे, असे त्यांचे धोरण होते.
दुसरी बाबही अशीच. आपले मित्र आणि आपल्या विरोधातील बंडखोर यांच्याविषयीची. विश्वासू व्यक्तींच्या वर्तुळात बंडखोर कमी धोकादायक असतात, मात्र जर मोकळे रान मिळाले तर ते अधिक 'तापदायक' ठरू शकतात. हे लक्षात घेत 'मित्रांना दूर ठेवू नयेच, पण बंडखोरांना अधिक जवळ करावे आणि त्यांचे अंत:करण जिंकून घ्यावे,' असे सूत्र मंडेला मांडत असत. मंडेला राजकारणी म्हणून किती व्यावहारिक, धूर्त आणि 'प्रॅग्मॅटिक' होते याचे हे उत्तम उदाहरण.
मंडेला आयुष्याची २७ वर्षे तुरुंगात होते. यापकी काही कालावधी तर असा होता की, जेव्हा त्यांना वर्षांतून केवळ दोन पत्रे लिहिण्यास आणि दोन पुस्तके वाचण्यास परवानगी होती. आपल्याला एक बाब लक्षात घ्यायला हवी की अवघ्या आठ बाय नऊच्या कोठडीत, त्या अंधारात एकटय़ाने आयुष्य घालविण्याची २७ वष्रे सवय झाल्यानंतर मंडेला यांना एकलकोंडेपणा आला असता तरी कोणालाही त्यात आक्षेपार्ह वाटले नसते. आपले जीवनावरील प्रेम, आपली आसक्ती आणि माणसाच्या अस्तित्वाची दृढ ओढ त्यांनी कधीच कमी होऊ दिली नाही. उलट तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांचे काही विवाह झाले. त्यांचे देखणेपण हे की त्यांनी या साऱ्या बाबी खुल्या अंत:करणाने जगासमोर ठेवल्या. मानवी जीवनावर भरभरून प्रेम करणाऱ्या माणसाला माणसाचेच दर्शन दुर्लभ होणे यापेक्षाही अमानवी ते काय, आणि हीच मला झालेली खरीखुरी शिक्षा होती, असे मंडेला म्हणत असत.
बाबा आमटे यांनी लिहिलेल्या 'गांधी : एक युगमुद्रा' या कवितेत म्हटले आहे -
'सामान्य माणसासारखे प्रमाद गांधींनीही केले,
पण.. सामान्य माणूस जे कबूल करायला बिचकतो ते त्यांनी जगजाहीर केलं.'
मंडेला आणि गांधीजी यांच्यातील फरक पूर्णपणे मान्य करतानाही, या ओळी मंडेला यांनाही तंतोतंत लागू पडतात हे मांडल्यावाचून राहवत नाही.
एका नेत्यासमोरील खरे आव्हान असते ते त्याच्या निवृत्तीच्या प्रसंगात. कारण असा नेता निवृत्त होत असताना त्याने उभं केलेलं काम तो ज्या हातांमध्ये सोपवितो ते हातही तितकेच बळकट असणे गरजेचे असते. राजकीय जीवनातून- सत्तास्थानातून निवृत्ती घेणे ही काही सामान्य बाब नाही. मंडेला यांनी मात्र पिकले पान झाडावरून ज्या सहजतेने गळून पडावे त्या सहजतेने सत्तेच्या सिंहासनाचा त्याग केला. शिवाय आपल्यानंतर नवस्वतंत्र झालेले दक्षिण आफ्रिका नावाचे बाळ अत्यंत सुरक्षित हातात राहील हेही पाहिले. आधी थाबो म्बाकी आणि आता जेकब झुमा यांच्या हातात आफ्रिका अभंग आहे. तात्पर्य, मंडेलांनी आपल्या हाती सत्तेच्या दोऱ्या ठेवण्यापेक्षा स्वतंत्र विचारसरणीची, दक्षिण आफ्रिकेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झुंजण्याची जाणीव असलेली पिढी तयार केली. देशात लोकशाही आणि सार्वत्रिक प्रौढ मताधिकार लागू करणे, शक्य असूनही राजकीय कारकीर्द न लांबविणे आणि प्रगल्भ नेतृत्व तयार करणे हे मंडेला यांचे कर्तृत्व मानावे लागेल.
आपल्या अहिंसक लढय़ानंतरही मंडेला यांचा लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गड्डाफी आणि क्युबाचा फिडेल कॅस्ट्रो यांना पाठिंबा होता. या विरोधाभासाचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल, असा सवाल एका अमेरिकन पत्रकाराने त्यांना विचारला. त्यावर मंडेला यांनी फार उत्तम आणि नेमके उत्तर दिले. ते म्हणाले, 'अमेरिका प्रत्येक गोष्टीकडे 'ब्लॅक ऑर व्हाइट' याच दृष्टिकोनातून पाहते म्हणून असे वाटते तुम्हाला. जगात सारे काही काळे किंवा पांढरे नसते. कोणत्याही घटनेमागे अनेक कारणे असतात आणि कोणत्याही प्रतिसादाचे अनेक आयाम! माझ्या मते, मला शेवट काय हवा आहे आणि तिथे पोहोचण्याचा सर्वात प्रभावी व्यावहारिक मार्ग कोणता हाच खरा प्रश्न आहे, आणि या निकषावर हे दोघेही निर्दोष ठरतात. म्हणून मला ते आवडतात.' इतका खुलेपणा, राजकारणात राहूनही इतके प्रांजळपण आणि आपल्याला आदर्शवादी म्हणून जग ओळखत असतानाही व्यवहारांवरील दृढ निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते.
मंडेलांचं शक्तिस्थान हे होतं की त्यांनी आयुष्यात व्यावहारिकतेची कास कधीच सोडली नाही आणि हे प्रामाणिकपणे कबूल करण्यात कधी कद्रूपणा केला नाही. पण त्यांचं दुर्दैव हे आहे की, राजकारणात राहूनही प्रांजळपणे जगण्याच्या त्यांच्या व्यावहारिकतेला महत्त्व देण्याऐवजी बहुतांश जणांनी ते वास्तववादापेक्षाही कसे आदर्शवादी होते याच्याच प्रतिमा उभ्या करण्याचा जिवापाड प्रयत्न केला.

- लोकप्रभा (लोकसत्ता)
दि. २०/१२/२०१३, शुक्रवार

Friday, December 6, 2013

चक्रीवादळ(२) - प्रभाकर पेंढारकर

काल हेडलाईन होती: 900 Perish In Cyclone. त्यावेळी आपण संपादकांना म्हटलं होतं, हा आकडा खरा नाही. मृतांचा आकडा किती तरी मोठा असणार. आज 'इंडियन एक्सप्रेस' ह्या टाइपापेक्षा मोठी अक्षरे आहेत हेडलाईनची :
दहा गावे पूर्ण वाहून गेली. 
वादळाचे बळी ०००.
किती बेपत्ता आहेत? किती जखमी? - माहित नाही. गेल्या चोवीस तासांत हा फरक. नऊशेवरून हा आकडा सात हजारावर. उद्या तो किती असेल? आणखीन किती बळी घेतले म्हणजे हे खुनी वादळ तृप्त होईल?
अंकाची पहिली प्रत सूर्यनारायण मूर्तीच्या टेबलावर आली. अद्याप ओली शाई. काळी, मृत्यूचा स्पर्श असल्यासारखी अक्षरं. आता हजारो प्रती छापल्या जाण्यापूर्वी फिरून एकदा तपासणी. मूर्तीचे डोळे झरझर काही छोट्या पण महत्वाच्या बातम्यांवरून फिरत होते:
चिराला आणि मछलीपटनम विभागांतील निदान शंभर खेडी अद्याप पाण्यानं वेढलेली आहेत. ह्या भागात आलेल्या सागरलाटेची उंची बावीस फूट होती. ती झाडांवरून, घरांवरून वाहत होती. ते पाहिलेल्या लोकांनी सांगितलं, आमच्या  डोळ्यांवर आमचा विश्वास बसत नव्हता…
ह्या भागातील लोकांची पहिली गरज पिण्याचं पाणी. त्यासाठी पाण्याचे टँकर्स पाठवण्यात आलेले आहेत…
दोन हेलिकॉप्टर्स ह्या भागात शिजवलेल्या भाताची पाकिटं ह्या लोकांना पुरवत आहेत… सर्व तर्हेच्या मदतीसाठी आपण सज्ज आहोत, असं सैन्यानं फिरून कळवलं असलं तरी त्यांना बोलवायची गरज लागणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे…
सैन्याकडे प्रशिक्षित जवान आहेत. छोट्या होडया आहेत. त्यांचे इंजिनिअर्स वाहून गेलेले पूल त्वरेनं बांधू शकतील आणि मुख्य म्हणजे त्यांच्या वायरलेस मशिनरीमुळं दूरवरच्या खेड्यांतील माणसांशी लगेच संपर्क साधता येइल. पण राज्य सरकारनं सैन्याऐवजी काकीनाड्याहून स्पेशल आर्म्ड रिझर्व्हड पोलिसांची बटालियन ह्या मदत-कार्यासाठी मागवलेली आहे…
सूर्यनारायण मूर्ती वाचायचा थांबला. मनाशी म्हणाला, "लोक समजतील न समजतील. पण ज्यांना कालची बातमी आठवत असेल, की चरणसिंगांनी आंध्रमध्ये राष्ट्रपती-राजवट लवकरच येण्याची शक्यता व्यक्त केली होती, त्यांना ह्या घटनेचा अर्थ समजू शकेल."
आतल्या पानांवर आणखीन काही छोट्या छोट्या पण अर्थपूर्ण बातम्या होत्या:
केंद्र सरकारनं आंध्र आणि तामिळनाडूमधील वादळानं निराश्रित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. आंध्रमधील हानीची पाहणी करण्यासाठी शेती खात्याचे राज्यमंत्री श्री. भानुप्रताप सिंग सागर किनाऱ्यावरच्या पाच जिल्ह्यांना लवकरच भेट देतील…
नॅशनल स्टुडंट्स युनियनच्या आंध्र शाखेनं कपडे आणि इतर आवश्यक गोष्टी वादळग्रस्तांसाठी जमवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या सेक्रेटरीनं कळवलं आहे, की ज्यांना आर्थिक मदत करायची असेल त्यांनी चेक वा रोख रक्कम गांधी-भवनातील कार्यालयात सचिवाकडे देऊन त्याची पावती घ्यावी…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं वादळ-विमोचन-समिती स्थापन केली असून अवनीगड्डा भागात त्यांचं काम सुरु झालं आहे…
ह्याबरोबर आणखी एका बातमीनं सूर्यनारायण मूर्तीचं लक्ष वेधून घेतलं : काँग्रेसचे अध्यक्ष के. ब्रह्मानंद रेड्डी हे उद्या विजयवाड्याला पोहोचतील. पंचायत-राज्यमंत्री आर. नरप्पा रेड्डी हे त्यांच्याबरोबर वादळ-विभागाच्या दौऱ्यात राहतील.
मूर्ती वाचायचा थांबला. के. ब्रह्मानंद रेड्डी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर मी कायमचा राजीनामा देईन, असं मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटल्याची बातमी ह्याच पानावर आली होती. आज हे दोघं इंदिरा गांधींना विरोध करण्यासाठी एकत्र येत आहेत. संजय गांधींची कोथगोदमची भेट ह्याच आंध्रप्रदेशनं काही कोट्यावधी रुपये खर्च करून मोठ्या धूमधडाक्यानं साजरी केली होती.
हे सर्व काय आहे? क्षणात होत्याचं नव्हतं करणारं वादळ कित्येक वर्षातून एकदा येतं; पण राजकारणात फक्त पानांच्या सळसळीनं होत्याचं नव्हतं एका दिवसात होतं. बोललेले शब्द विसरले जातात. दिलेली वचनं टाळ्यांचा कडकडात विरण्यापूर्वीच फिरवली जातात. हे सर्व खरोखरच काय आहे?ब्रह्मानंद रेड्डींच्या पाठोपाठ इंदिरा गांधीही ह्या वादळग्रस्त विभागाला भेट देतील. केंद्र सरकारच्या मंत्र्यांबरोबर शर्यत लागल्यासारखे राज्य सरकारचे मंत्री इथं हजर होतील. सरकारी यंत्रणा वादळातील लोकांच्या मदतीचं काम बाजूस ठेवून ह्या व्ही. आय. पीं. च्या स्वागतासाठी राबवली जाईल. ह्या सर्वांतून ह्या वादळग्रस्तांचं जीवन सावरलं जाणार आहे की वादळानं उद्ध्वस्त झालेल्या भूमीवर निवडणुकींच्या आगमनापूर्वीच्या रणधुमाळीची ही सुरुवात आहे?…
सूर्यनारायण मूर्तीनं विचार करायचं थांबवलं आणि वृत्तपत्राच्या प्रती छापायला सांगितल्या. शेवटी वर्तमानपत्रं ही फक्त माहिती पुरवण्याकरता असतात. त्यांबद्दल विचार करायचा वा नाही हे नागरिकांनीच ठरवायचं असतं.

- चक्रीवादळ
लेखक - प्रभाकर पेंढारकर  

लांच्छनास्पद लिलाव


ज्या देशाला आपला इतिहास जपता येत नाही, त्याचा भूगोल बिघडतो, हे वाक्य आपण ठायीठायी ऐकतो आणि विसरतो. १९७१च्या युद्धात गौरवशाली कामगिरी केलेल्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे संग्रहालय मोडीत निघणे आणि नौकेचा लिलाव करण्याची वेळ येणे, हे लांच्छनास्पदच आहे. ५०० कोटींपर्यंत खर्च करण्यास कुणी खासगी कंपन्या पुढेच आल्या नसतील , तर आपण अशा पांढऱ्या हत्तीचे लोढणे गळ्यात बांधायचेच कशाला , असा महाराष्ट्र सरकारचा एकंदर सूर दिसतो आहे . १५ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाची मूळ किंमत आधी ७५ कोटी रुपये इतकीच होती . केंद्रात आणि राज्यातही सरकारे आली व गेली ; मुख्यमंत्री बदलले , संरक्षणमंत्री बदलले , पण कुणालाही या आरमार संग्रहालयाकडे लक्ष द्यावेसे वाटले नाही .
वास्तविक आज संरक्षण दलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा युद्धसामग्री खरेदीतील घोटाळे, दुर्घटना, चुकीची राजकीय धोरणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील सुंदोपदसुंदी यामुळे बदलत आहे. दुर्दैवाने त्यात युद्धातील कामगिरीमधील शौर्य, शांतताकाळातील खडतर प्रशिक्षण, जिवावर बेतणारे प्रसंग हे झाकले जाते . तिन्ही सैन्यदलांना आज अधिकाऱ्यांची उणीव भासते आहे . अशा वेळी विक्रांतवरचे आरमार संग्रहालय पुढच्या पिढीस प्रेरणादायी ठरले असते. किनारी राज्यात राहूनही आज नौदलाच्या कार्याचे दर्शन घेण्याची संधी सर्वसामान्यांना मिळत नाही. ती विक्रांत संग्रहालयाद्वारे उपलब्ध होती. मुंबईतील जहाजवाहतूक कंपन्या, विमान कंपन्या , सागरी पर्यावरण विभाग, आदींची एकत्र मोट बांधता आली असती. हा प्रकल्प व्यवहार्य नव्हता, तर आतापर्यंत तरी खर्च का केला ? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले वचन त्यांचेच युती सरकारही पाळू शकले नाही व जाहीर सभांमधून तरुणांमध्ये स्फुल्लिंग चेतविण्याच्या भाषा करताना या प्रश्नावर विरोधी पक्ष म्हणून जनजागृती करणेही त्यांना जमले नाही. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनेही याबाबतीत समित्या नेमून चालढकल करण्याचेच धोरण स्वीकारले. विक्रांतमागे जनआंदोलनांचाही पुरेसा रेटा उभा राहू शकला नाही. विविध क्षेत्रांतील धनाढ्यांची मुंबई व महाराष्ट्रात कमी नाही . यापैकी कित्येकजण विविध प्रश्नांवर राष्ट्रभावना रुजविण्याचे धडे देत असतात. त्यांच्यापैकीही कुणी अशा प्रकल्पासाठी पुढे आले नाही. कोणतीही गोष्ट लिलावात निघणे, हा आपल्या लौकिकावरचा बट्टाच मानला जातो व तेच या लिलावाचे सार आहे .

- संपादकीय, धावते जग (महाराष्ट्र टाईम्स) 
दि. ६ डिसेंबर २०१३, शुक्रवार 

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...