Thursday, April 25, 2013

आजन्म अजागळ

चीन नावाच्या अजगराची भूक किती आहे, याचा अनुभव १९६२च्या युद्धात आपण घेतलेलाच आहे. परंतु लष्करी भानास ठाम राजकीय नेतृत्वाची जी जोड लागते, तिचा मात्र आजही आपल्याकडे पूर्ण अभावच दिसून येतो.
आपल्या लडाख प्रांतात घुसखोरी करण्याआधी पंधरा दिवस चीनकडून सीमेवरील ताणतणाव कमी करण्याच्या दृष्टीने ठोस प्रस्ताव सादर करण्यात आला होता. भारत आणि चीन या देशांनी आपापल्या सीमांवर सैन्य दले कशी हाताळावीत, एकमेकांच्या सैन्यांचा टेहळणीनंतर पाठलाग करू नये, रात्रीच्या प्रहरांत उभय देशांनी सशस्त्र गस्ती मोहिमा काढू नयेत अशा बऱ्याच शहाजोग मागण्या आणि सूचना चीनच्या या प्रस्तावात होत्या. आपण त्या सुदैवाने मान्य केल्या नाहीत. परंतु फेटाळल्याही नाहीत. एका बाजूला चीन असा सदिच्छापूर्ण मागण्या आणि सूचना करीत असताना चीनचे नवे अध्यक्ष जिनपिंग हे भारताबरोबरील संबंधांत नवा अध्याय लिहिला जाण्याची भाषा करीत होते. गेल्या महिन्यात सत्ता हाती घेतल्यानंतरच्या वार्ताहर परिषदेत त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय दौरा भारतात आखण्याची मनीषा प्रकट केली होती. हे सगळे सुरू असतानाच त्याचवेळी चीन लडाखमध्ये घुसखोरीची योजनाही आखीत होता. गेल्या काही महिन्यांत पन्नासपेक्षा अधिक वेळा चीनने या प्रांतात घुसखोरी केलेली आहे. आतापर्यंतच्या घुसखोऱ्यांचे स्वरूप अत्यंत स्थानिक होते. म्हणजे भारताबरोबरची सीमा चुकून ओलांडली गेल्याचे दाखवायचे, भारतीय सीमा सुरक्षा दलांनी ही घुसखोरी दाखवून दिल्यावर पुन्हा माघारी जायचे असा प्रघात चिनी सैन्याने या प्रांतात पाडलेला आहे. आतापर्यंतच्या या घुसखोऱ्यांच्या तुलनेत ताज्या घुसखोरीचे स्वरूप नक्कीच वेगळे आणि गंभीर आहे. चिनी सैन्य भारतीय भूभागात तब्बल दहा कि.मी. आत आले आहे आणि माघारी जाण्याची त्यांची चिन्हे नाहीत. तेव्हा जे काही झाले आहे त्यास घुसखोरी म्हणता येणार नाही. हे सरळसरळ अतिक्रमण आहे. ते करताना चिनी लष्करास हवाई दलाची मदत मिळाली. चिनी हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर जमिनीवरील सैन्यास थेट छत्र देत सरळ भारतीय हद्दीत आले. हे सर्व करताना चिनी सैन्याने इंडोतिबेट सीमा दल या आपल्या विशेष संरक्षण तुकडीस दुसऱ्या ठिकाणी चकमक सुरू करून गुंगवून ठेवले. म्हणजे त्या चकमकीला तोंड देण्यात आपले सैन्य गुंतलेले असताना त्यावेळी चीनने अलगदपणे दुसऱ्या भागातून भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि तंबू, राहुटय़ा ठोकून आपला इरादाही स्पष्ट केला. याचा अर्थ जे काही झाले ते अत्यंत सुनियोजित होते असे म्हणावयास हवे आणि जेव्हा लष्करात एखादी गोष्ट इतकी सुनियोजित होते तेव्हा तिला वरिष्ठांकडून हिरवा झेंडा मिळालेला असतो. म्हणजेच चीनने जे काही केले त्यास त्या देशाच्या वरिष्ठ नेत्यांचा पूर्ण पाठिंबा आहे, हे नि:संशय. हा पाठिंबा दर्शवणारी दुसरी बाब म्हणजे चिनी सैन्याने आपल्या हद्दीत उभारलेल्या राहुटय़ा आणि तंबू. ही बांधणी बेकायदा आहे हे निदर्शनास आणून दिल्यानंतरही चिनी सैन्याने अतिक्रमण केल्याचे अमान्य केले असून हे तंबू आणि राहुटय़ा काढून टाकण्याची भारताची मागणी फेटाळून लावली आहे.
जे काही झाले ते चिनी परंपरेप्रमाणे झाले, असे म्हणावयास हवे आणि आपलीही प्रतिक्रिया आपल्या परंपरेस साजेशीच होती, हेही अमान्य करून चालणार नाही. आपली संपूर्ण नोकरशाही ही ब्रिटिशांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत असल्याने तिच्या दृष्टीस अंगभूत मर्यादा आहेत. या ब्रिटिश शैलीत ठरावीक मार्गाने आणि ठरावीक पद्धतीनेच व्यक्त होण्यास शिकवले जाते. समोरचाही या सगळय़ा परंपरा आणि संकेतांचे पालन करणारा असेल तरच त्यांचा उपयोग होतो. समोरचा जर कोणतेही नियम, संकेत न पाळणारा असेल तर त्याचा प्रतिसाद नियम आणि परंपरांच्या चौकटीतून कसा द्यावयाचा याचे प्रशिक्षण त्या व्यवस्थेत दिले जात नाही. त्यामुळेच आपल्या नोकरशाहीस चीनसारख्या अनवट आणि आडमुठय़ा देशास कसे हाताळावे हे अद्याप समजल्याचे दिसत नाही. तेव्हा चीनने अतिक्रमण केल्यावर आपण पारंपरिक पद्धतीने चीनच्या येथील राजदूतास बोलावून समज वगैरे देण्याच्या प्रथेचे पालन केले. ज्यावेळी आपले परराष्ट्र खाते चिनी राजदूतास कार्यालयात बोलावून शिष्टाचारी चहापानात निषेध नोंदवण्याचा उपचार करीत होते त्याच वेळी बीजिंगमध्ये चिनी परराष्ट्र मंत्रालयाने भारताचा अतिक्रमणाचा दावा फेटाळलाही होता. तेव्हा आपल्या शिष्टाचारी मार्गात कोणता शहाणपणा होता? त्यानंतरही सीमावर्ती भागातील उभय देशांच्या लष्करी तुकडय़ांनी स्थानिक पातळीवर चर्चा करावी असा प्रस्ताव भारताने दिला. त्याकडे चीनने ढुंकूनही पाहिले नाही आणि भारताला आपण किती मोजतो ते दाखवून दिले. तेव्हा मग सीमावर्ती, तणावाच्या भूप्रदेशात स्वतंत्र लष्करी तुकडी पाठवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. इतके झाल्यानंतर चीन आणि भारत हे समोरासमोर असल्याचे आपल्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने मान्य केले आणि परिस्थिती लवकरच सुरळीत होईल असा सरकारी आशावाद व्यक्त केला. परंतु नेभळटांच्या आशावादास काडीचीही किंमत द्यायची नसते हे आपणास माहीत नसले तरी चीन मात्र जाणून आहे. त्याचमुळे भारतासारख्या देशाच्या प्रतिक्रियेस चीन खुंटीवर टांगून स्वत:स हवे ते करू शकतो.
मग तो मुद्दा ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवून अजस्र धरण बांधण्याचा असो वा सीमा प्रश्न. चीन त्यास हवे ते करतो आणि तसे करू देण्यापासून रोखण्याची धमक आपल्यात आहे, हे एकदाही आपण दाखवून देऊ शकत नाही. एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे चीन हे आपले वास्तव आहे. त्याचे भान फक्त दोन नेत्यांनाच दाखवता आले. इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी. बाकी सर्वत्र भोंगळपणाच भरलेला असून या ताज्या प्रश्नावरही त्याचेच विदारक दर्शन घडले. कारगिलच्या जखमा ओल्या असताना आपण आपल्या सीमांबाबत कमालीचे सुस्त राहिलेलो आहोत. ही सुस्ती लष्करी नाही तर राजकीय आहे. याचा अर्थ सीमावर्ती प्रदेशांत जे काही चालू आहे त्याचे लष्करी भान आपल्या सुरक्षा दलांना नक्कीच आहे. परंतु या भानास ठाम राजकीय नेतृत्वाची जी जोड लागते, तिचा मात्र पूर्ण अभावच आपल्याकडे दिसून येतो. चीनसारख्यास सामोरे जाताना प्रचंड लष्करी सज्जता असणे आवश्यक असते. परंतु आपल्याकडे संरक्षणमंत्री संरक्षण सामग्रीच्या खरेदीचा निर्णयच घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे. या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होऊ नये म्हणून स्वच्छशिरोमणी ए.के. अँटनी यांनी खरेदीच थांबवून ठेवलेली आहे. ओली होईल या काळजीने हातची छत्री बंद ठेवून पाऊस थांबण्याची वाट पाहण्याइतकाच हा प्रकारही निर्बुद्ध. पण तो गेली चार वर्षे सुरू आहे आणि थांबवावा असे पंतप्रधान मनमोहन सिंग वा त्यांच्या कर्त्यांकरवत्या सोनिया गांधी यांना सुचलेले नाही.  
मनमोहन सिंग यांचे आंतरराष्ट्रीय नेतृत्व चर्चा-परिषदा यांतच आनंद मानत असल्याने जम्मू-काश्मीरपासून अरुणाचलपर्यंत सीमेवर पसरलेला चीनचा अजगर त्यांना दिसलेला नाही. या अजगराची भूक किती आहे त्याचा अनुभव ६२च्या युद्धात आपण घेतलेलाच आहे. त्यावेळच्या पं. नेहरू यांच्या भोंगळ नेतृत्वाची आठवण करून देणारेच वर्तन मनमोहन सिंग यांच्याकडून घडत आहे. प्रश्न आंतरराष्ट्रीय असो वा राष्ट्रीय. सामथ्र्यवानांच्या शांततेलाच अर्थ असतो, हे आपण विसरलेले आहोत. परिणामी आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण आजन्म अजागळच ठरत आहोत. चीनच्या या कृतीने हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

- लोकसत्ता (संपादकीय/अग्रलेख)
दि. २५/०४ /२०१३, गुरुवार   

Sunday, April 21, 2013

मी न माझा - वीणा गवाणकर

चीन, जपान इत्यादी पूर्वेकडील देशांतून येणारा शेंगदाणा तेथील स्वस्त मजुरीमुळे अमेरिकन शेंगदाण्याच्या मानाने स्वस्त पडे. खेरीज त्याच्यावर आयात करही माफक होता.  त्याचा परिणाम अमेरिकेतील शेंगदाणा पडून राहण्यावर झाला. त्याला बाजारपेठ मिळेना. या समस्येला तोंड देण्यासाठी शेंगदाण्याचे औद्योगिक दृष्ट्या महत्त्व सरकारला पटवून देणं भाग होतं. त्यासाठी उभ्या अमेरिकेत प्रा. कार्व्हरखेरीज अधिक योग्यतेचा दुसरा कोण असणार!
१९२० साली यासंबंधीची बैठक माँटगोमेरी इथे होणार होती. म्हणून, शेंगदाणा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी १९१९ मध्ये स्थापन केलेल्या, United Peanut Growers Asso. या संघटनेने प्रा. कार्व्हरना पाचारण केलं होतं. आपल्या 'लाडक्या' शेंगदाण्याची जाहिरात करण्याची संधी प्रा. कार्व्हर सोडते तरच नवल!
शेंगदाण्यापासून बनवलेल्या निरनिराळ्या उत्पादनांचे नमुने दोन भल्या मोठ्या खोक्यांत भरून प्रा. कार्व्हर १३ सप्टेंबर १९२० रोजी माँटगोमेरीच्या सिटी हॉलमध्ये भर दुपारी पोहोचले.
सिटी हॉलमध्ये पोहोचायला उशीर झाल्याने, त्यांची वाट पाहून पिनट असो. चे सभासद दुपारच्या जेवणासाठी सिटी हॉल सोडून एका हॉटेलात गेले होते. डॉ. कार्व्हर भर उन्हात तडक त्या हॉटेलच्या दाराशी पोहोचले. दरवानाने त्यांना अडवलं.
"काळ्यांना या  हॉटेलात मज्जाव आहे."
प्रा. कार्व्हरनी हातातली खोकी खाली ठेवली. घामाने थबथबलेले आणि थकव्याने, भुकेने थरथरणारे, साठी उलटलेले प्रा. कार्व्हर कसेबसे उभे राहिले. या दरवानाशी काय हुज्जत घालणार! ते म्हणाले -
"माझं नाव कार्व्हर, मला युनायटेड पिनट असो. च्या बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्या लोकांना मी इथे आल्याचं कळवाल तर बरं !"
दरवानाने आत निरोप धाडला. मग त्यांना मागच्या दराने आत घेण्यात आलं. एका मोठ्या दालनाच्या बाहेर उभं करून सांगण्यात आलं-
"शेंगदाणेवाले शेतकरी आत्ताच जेवायला बसले. तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल."
काही वर्षांनंतर या प्रसंगाची आठवण सांगताना प्रा. कार्व्हर म्हणाले, "या उपेक्षेला, अवमानाला उत्तर म्हणून, सामान उचलून चालू लागणं मला कठीण नव्हतं. मीही माणूस आहे. माणसाच्या मानापमानाच्या भावना मलाही आहेत. तेथून तडक निघावं अशी प्रबळ उर्मी क्षणभर माझा ताबा घेऊन गेली. पण मी विचार केला; माझ्या वैयक्तिक भावनेच्या कौतुकासाठी किंवा उद्योगपती-व्यापारी यांच्या संपत्तीची वृध्दी करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. मी आलो आहे त्या गरीब शेतकऱ्यांसाठी, ज्यांनी माझ्या शब्दावर विसंबून भुईमूग पेरला त्यांच्यासाठी. या संघटनेच्या ठरावाचा फायदा त्या गरीब शेतकऱ्यांना मिळणार होता म्हणून! "
तर या बैठकीपुढे हजर व्हायला  त्यांना दुपारचे दोन वाजले. सर्व सभासद थंड आणि अलिप्त वाटत होते. पण झाल्या प्रकारचा कोणताही परिणाम वागण्यात न दाखवता प्रा. कार्व्हरनी आपली खोकी उघडली.….
"गाईच्या शंभर पौंड दुधापासून दहा पौंड चीज निघतं. पण शेंगदाण्याच्या तेवढ्याच दुधापासून वीस पौंड चीज निघतं. तसंच शेंगदाण्यात जीवनसत्व 'ब' असून Pellagra (पेलाग्रा) रोगावर ते गुणकारी आहे." ही व अशी विधानं ऐकून सारी सभा स्तब्ध झाली.…
याच संघटनेतर्फे 'वेज अँड मिन्स कमिटी' पुढे उभे राहण्यासाठी त्यांना तारांवर तारा पाठवून बोलावण्यात आलं. २० जानेवारी १९२१ रोजी त्यांना वॉशिंग्टन इथे हजर व्हायचं होतं.
'टस्कगी निग्रो शाळेमध्ये' या तारांनी वातावरण कसं भारून टाकलं. सारेजण त्यांचं अभिनंदन करायला धावत होते. टॅरिफ बिलावर बोलायला प्रा. कार्व्हर वॉशिंग्टनला जाणार! शाळेच्या दृष्टीने केवढ्या अभिमानाची घटना ही! मात्र सारेजण एका बाबतीत चिंतित झाले होते.
डॉ. कार्व्हरांचा पोषाख!! अठ्ठावीस वर्षांपूर्वी वर्गबंधूंनी जबरदस्तीने त्यांच्या अंगावर चढवलेला सूट ते आजही वापरीत होते. त्या पोषाखावरून सगळे त्यांना छेडीत होते. आता तरी नवीन पोषाख शिवा म्हणून आग्रह करीत होते; पण अंहं! शेवटी ते साऱ्यांना म्हणाले -
"हे पहा! जर लोकांना माझा नवीन पोषाख पाहायची इच्छा असेल तर तो मी एका खोक्यात घालून पाठवून देतो. आणि जर त्यांना मीच हवा असेन, तर आहे त्या पोषाखात त्यांनी मला स्वीकारलं पाहिजे."
वेज अँड मिन्स कमिटीच्या सदस्यांना पिनट असो. च्या ठरावाची कुणकुण लागली होती. त्यांच्या मते हे माकडाचं खाणं 'शेंगदाणा' म्हणजे जकातीच्या स्वरूपात एक मोठा विनोदच होता. त्या विनोदावर 'भाष्य' करण्यासाठी कमिटीने फक्त दहा मिनिटांचा अवधी दिला होता.
प्रा. कार्व्हर यांनी आपल्या अल्पमोली आणि बहुगुणी शेंगदाण्याबद्दल दहा मिनिटात अशा काही खुमासदार भाषेत माहिती दिली की, समस्त कमिटीची उत्सुकता चाळवली गेली. शेंगदाण्याबद्दलच्या अद्भुत माहितीने सारी सभा तटस्थ झाली. आपली दहा मिनिटं संपताच प्रा. कार्व्हर आपल्या जागेवर परतू लागले, तेव्हा अध्यक्षांसकट साऱ्या सभेने त्यांना विनंती केली की, अधिक विस्तृत विवेचन करावं.
प्रा. कार्व्हरांनी सभा जिंकली होती. विनोदाचा विषय ठरवला गेलेल्या उपेक्षित शेंगदाण्याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.
आपल्या सोबत आणलेल्या भल्या मोठ्या पेटाऱ्यातून छोट्या छोट्या बाटल्या, डबे, काचनळ्या इत्यादी खजिना काढून त्यांनी त्याचं एक प्रदर्शन टेबलावर भरवलं, शेंगदाण्यापासून बनू शकलेल्या असंख्य पदार्थांचं प्रदर्शन! प्रदर्शनातील पदार्थांची माहिती देताना शेंगदाण्याचं वैद्यकीय दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्व विशद करण्यास ते विसरले नाहीत. आपण बराच वेळ आपल्या लाडक्या शेंगदाण्याविषयी बोलत आहोत हे ध्यानी येताच प्रा. कार्व्हरांनी आपलं भाषण आवरतं घेतलं. अध्यक्षांच्या लक्षात येताच त्यांनी कार्व्हरना विनंती केली -
"तुमच्यावर वेळेचं बंधन नाही. जास्तीत जास्त माहिती द्याल तर या कमिटीवर उपकार होतील."
या संधीचा पुरेपूर फायदा प्रा. कार्व्हरनी घेतला. आपल्या विनोदी व मिष्किल शैलीत त्यांनी शेंगदाण्यापासून तीनशे पदार्थ कसे बनवता येतात हे सांद्यत सांगितलं. शेंगदाण्यापासून बनवता येणारा 'शाकाहारी' मांसाहार, कालवं इत्यादी पदार्थ मांसाहारी पदार्थांची उणीव भासू देत नाहीत. शेंगदाण्याच्या सालापासून वेगवेगळे तीस टिकाऊ रंग बनवता येतात. सारांश, शेंगदाण्याचा कोणताच घटक फुकट न जाता त्यापासून काही ना काही उपयुक्त पदार्थ बनू शकतात याची त्यांनी ग्वाही दिली.
"हे सारे पदार्थ तुम्ही स्वतः तयार केलेत का? कुठे?"
"होय. हे सारे पदार्थ मी आपल्या प्रयोगशाळेत तयार केले आहेत. अलाबामातील 'टस्कगी' निग्रो शाळेत मी शिक्षक आहे. आमचं रताळ्यावरही संशोधन चालू आहे. त्यापासून आतापर्यंत शंभर निरनिराळ्या गोष्टी तयार करण्यात आम्हाला यश मिळालं आहे."…
एका श्रोत्याने त्यांना विचारलं - "तुम्हाला हे सारं सुचलं कसं?"
"कसं म्हणजे? बायबलमधून! जेनेसिसच्या पहिल्याच भागात म्हटलेलं आहे -'भूतलावर उगवणारी प्रत्येक वनस्पती, प्रत्येक बी, प्रत्येक फळ, तुमच्या अन्नाची गरज भागवेल. मांसाहारासारखा तुम्ही तिचा उपयोग करू शकाल.' यातूनच मी प्रेरणा घेतली. विधाता निरर्थक कधी तरी बोलेल का?"

- मी न माझा (एक होता कार्व्हर)
लेखिका - वीणा गवाणकर    
      
              

Thursday, April 18, 2013

मी भारतीय म्हणूनच जगेन - पुल


महाराष्ट्र टाईम्स, १२  जून २००८

मला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास 'ढोरं, गॅंवार, शूद्र, पशु , नारी, ये सब ताडनके अधिकारी' म्हणतो, म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं, खेडवळ माणसं, इतर पशू आणि स्त्रिया  ह्या फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत!
बायकांना नव-यांनी लाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांत सर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातच असं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्या देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्या आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचा आहे.
'उपकार म्हणून तुम्हाला ह्या देशात राहू देतो' ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्य झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं काम करायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा.
हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी, मुल्ला, शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पूर्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे.
'मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है ?' असा सवाल कबीरानं केला आहे. महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की 'शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे, वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही! ' आमचे तुकोबा विचारतात, 'ऐसे कैसे रे सोवळे, शिवता होतसे ओवळे ?' ह्या सर्व मंडळींची देवावरची श्रद्धा कमी प्रतीची होती असं कोण म्हणेल ?
त्यांनी ते देवत्व माणसांत पाहिलं. कलेच्या ख-या उपासकाला आणि रसिकाला तर राष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं. मग धार्मिक कुंपणांची तर गोष्टच नको. म्हणूनच केशवसुतांनी 'ब्राह्मण नाही हिंदुही नाही, न मी एक पंथाचा | तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा | खादाड असे माझी भूक | चतकोराने मला न सुख, कूपातिल मी नच मंडूक | मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे | कोण मला वठणीवर आणू शकतसे ते मी पाहे' असं विचारलं आहे.
मुखमें रामनाम बगलमे छुरी,  ह्या तत्वाचं आचरण करणा-याविरुद्ध प्रत्येक काळांतले साहित्यिक, कवी आणि कलावंत उभे राहिलेले आहेत. मुस्लिम धर्मांधतेविरुद्ध प्रेममार्ग सांगणारे सुफी उभे राहिले, जातिभेदाचं पोषण करणा-याविरुद्ध रामी धोबिणीबरोबर संसार करणारा ब्राह्मण चंडिदास 'सर्वांहून श्रेष्ठ माणूस त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही ' असं सांगत उभा राहिला.
यज्ञामुळे होणारी भरमसाठ पशुहत्या आपल्या देशातली शेती धोक्यात आणीत होती. त्याविरुद्ध गौतमबुद्ध प्रज्ञा आणि करुणेचा संदेश घेऊन उभे राहिले. बुद्धीला सतेज ठेवून प्रज्ञा आणि प्रत्यक्ष वृतीतून जी सिद्ध होते त्या करूणेचा मार्ग प्रमाण मानून ही एकात्मता साधायची आहे. रवीन्द्रनाथांनी त्याला 'मानुषेर धर्म (माणसाचा धर्म)' म्हटलं आहे ज्या रुढी आपल्यांत दूरत्व निर्माण करतात त्या दूर सारुन  ह्या प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गानंच भारतीयांची एकात्मता साधली जाईल.
'नान्य: पंथः अयनाय विद्यते '- दुसरा कुठलाच मार्ग यासाठी नाही' समाजाच्या ऐहिक अभ्युदयासाठी ज्यांना तन देता येईल त्यांनी तन, धन देता येईल त्यांनी धन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांशी युक्त केल्यामुळे मुक्त झालेलं मन देण्याची ही एक ऐतिहासिक महत्वाची घडी आलेली आहे.
'हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणूनच मरणार नाही' असं म्हणून आंबेडकरांनी धर्माचं प्रवर्तन केलं. कुठल्याही धर्माचा किंवा प्रांताचा माझ्यावर शिक्का असला तरी मी भारतीय म्हणूनच जगेन, अशा विचारचक्र प्रवर्तनाचं हे कार्य आहे आणि ते होणं ही आजच्या काळातली भारताची सर्वांत मोठी गरज आहे....

(राष्ट्रीय एकात्मता परिषदेतील भाषण)

मूळ स्रोत - http://cooldeepak.blogspot.nl

Saturday, April 13, 2013

"टेस्ट ट्यूब बेबी" च्या बाबाची गोष्ट

                   नैसर्गिक यंत्रणांचे गूढ उकलण्यासाठी आपल्या मेंदूचा जेवढा म्हणून उपयोग करता येईल, तेवढा करत करत माणसाने विज्ञानाच्या क्षेत्रात अवकाशालाही गवसणी घालण्याचे स्वप्न पुरे केले. तरीही एकूण आकळलेली माहिती फारच कमी आहे, याचे भान मात्र सुटले नाही. त्यामुळेच हा न संपणारा शोध अद्याप सुरूच राहिला आहे. अँटिबायोटिक्सपासून डीएनए मॅपिंगपर्यंतच्या सगळ्या संशोधनातून माणसाचे आयुष्य अधिक काळपर्यंत कसे आरोग्यपूर्ण राहील, याचा विचार झाला. जन्म आणि मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या माणसाच्या धडपडीतूनच 'टेस्ट टय़ूब बेबी'च्या रूपाने माणसाने विज्ञानाच्या क्षेत्रात एक अनोखे पाऊल टाकले. या 'टेस्ट टय़ूब बेबी'च्या जनकांपैकी रॉबर्ट एडवर्ड्स यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाने मानवाच्या जगण्यातील या एका सुंदर शोधाचे पुन्हा स्मरण होणे साहजिक आहे.
              मानवी अपत्यजन्म कसा होतो, यामागची शास्त्रीय सत्ये माणसाने जाणली खरी; पण तरीही हमखास अपत्यजन्माची हमी देणारी प्रक्रिया ही त्याच्यासाठी वैज्ञानिक कलाविष्कार होती. माणसाचे ते स्वप्न सत्यात आणणारे सौदागर होते ब्रिटनचे रॉबर्ट एडवर्ड्स व डॉ. पॅट्रिक स्टेपेटो. या दोघांनी अथक संशोधनानंतर, स्त्रीच्या गर्भाशयाबाहेर गर्भधारणा घडवून आणण्यात यश मिळवले. अपत्यप्राप्तीसाठी अनेक वैद्यकांचे उंबरठे झिजवलेले लेस्ली व जॉन ब्राऊन हे दाम्पत्य जेव्हा डॉ. स्टेपेटो व एडवर्ड्स यांच्याकडे आले, तेव्हा त्यांनीही हा विश्वास सार्थ ठरवला. २५ जुलै १९७८ रोजी लुसी ब्राऊन या गोंडस मुलीचा जन्म या बाह्य़ पात्र फलनाने झाला. कुरळ्या केसांच्या, निळ्या डोळ्यांच्या या मुलीने सगळ्यांचेच लक्ष वेधले, पण अनेकांनी भीतीचे दरवाजे उघडेच ठेवले होते. ती जगेल का, जगली तर तिला रोग होतील का, तिला मुलेबाळे झाली तर त्यांच्यात काही दोष असतील का, अशा अनेक प्रश्नांनी रिकाम्या डोक्यांमध्ये काहूर मांडले असताना एडवर्ड्स व स्टेपेटो मात्र त्यांच्या तंत्रावर कमालीचा विश्वास ठेवून होते. आज लुसीही आई झाली आहे, म्हणजे खरे तर काहीच विपरीत घडलेले नाही. लुसीचा जन्म व नंतर विवाहापासून ते तिला मुलगा होईपर्यंत डॉ. एडवर्ड्स सावलीसारखे तिच्या मागे उभे राहिले. विज्ञानाच्या सत्यतेच्या ध्यासापलीकडे असलेले माणूसपण त्यात लपले होते. डॉ. एडवर्ड्स यांना २०१० मध्ये टेस्ट टय़ूब बेबी तंत्रासाठी नोबेलही मिळाले. तो योग स्टेपेटो यांच्या नशिबी नव्हता, कारण त्यांचे त्यापूर्वीच म्हणजे १९८८ मध्ये निधन झाले.
                 मूल जन्माला घालणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे, असे समजून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वैज्ञानिकांना मान्य नव्हता. काही जोडप्यांना मूल का होत नाही, हा प्रश्न त्यांना सतावत होता. १९४८ मध्ये डब्ल्यू मेकली कॉनेल या दिग्दर्शकाने एक चित्रपट 'टेस्ट टय़ूब बेबी' याच नावाने काढला होता.  त्यामधील मूळ कल्पना 'बाह्य़ पात्र फलनातून अपत्यप्राप्ती' हीच होती. ही कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी मात्र तीन दशके लोटावी लागली. 'टेस्ट टय़ूब बेबी' हा मानवी मनातून निर्माण झालेल्या विज्ञानकल्पनेचा मूर्त आविष्कार होता. त्यामुळे पृथ्वीवरील समस्त मानवाच्या जीवनात काही आमूलाग्र बदल घडणार नव्हता, की त्याचे जगणे संपन्न होणार नव्हते. त्याच्या वेदनांचे हरण होणार नव्हते की त्याच्या आयुष्याची दोरी लांबणार नव्हती. तरीही या शोधाने माणसाला एका अप्राप्य गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचे समाधान मात्र मिळाले. निसर्गावर मात करण्याच्या माणसाच्या विजिगीषू वृत्तीतून हे संशोधन झाले. मृत्यू लांबवण्यासाठी आणि वेदना संपवण्यासाठी जसे औषधशास्त्र विकसित होत गेले, तसेच अनावश्यक संतती वगळण्याचे आणि टाळण्याचे संशोधन माणसाने याच वृत्तीतून केले. आपण स्वत:च्या बुद्धीच्या जोरावर निसर्गनिर्मित गोष्टींवर अल्प प्रमाणात का होईना नियंत्रण मिळवू शकतो, हे समाधान माणसासाठी अधिक महत्त्वाचे होते. वैज्ञानिक संशोधनाचा हा प्रवाह अखंड सुरू असतानाच माणसाने संस्कृतीच्या विकासात अनेक नव्या संकल्पनांची भर घातली. अपत्यप्राप्तीला दत्तकाचा पर्याय शोधला. पुरुषी अहंकारातून निर्माण झालेल्या वंशसातत्याच्या खुळचट कल्पनांमुळे स्त्रीचा होत असलेला छळ कमी करण्यासाठी सामाजिक पातळीवर अनेक प्रयत्न केले गेले. निसर्गनियम डावलण्यापेक्षा समूहाने राहणाऱ्या माणसाने आपल्या सांस्कृतिक क्षेत्रावर जमलेली परंपरांची पुटे दूर करत नव्या, प्रगतिशील विचारांना वाट करून दिली. टेस्ट टय़ूब बेबी हे त्याचे एक फलितरूप आहे. मूल होणे हा केवळ चमत्कार नाही आणि त्याचा नशिबाशीही संबंध नाही, हा विचार आत्ता कुठे शहरी भागात रुजायला लागला आहे. रॉबर्ट एडवर्ड्स व डॉ. पॅट्रिक स्टेपेटो यांना त्याचे श्रेय द्यायला हवे. जगण्याचा आनंद केवळ वंशसातत्यात नाही, ही विचारप्रणाली प्रगत देशांनी ज्या सहजतेने स्वीकारली. ती सहजता भारतासारख्या, परंपरेचा कमालीचा पगडा असलेल्या देशात स्वाभाविक नसली तरी अशक्य नाही. जन्माचे वैज्ञानिक सत्य उलगडल्याने अपत्यप्राप्ती होत नसलेल्या स्त्रियांवरील सामाजिक बहिष्कार कमी होण्यास मात्र निश्चितच मदत झाली आहे हे सत्य मान्य करायला हवे.
                 आल्डस हक्सले यांनी त्यांच्या 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' या पुस्तकात 'ब्रीडिंग फार्मस' अशी संकल्पना मांडली होती. तसे काहीतरी घडेल व माणूस निसर्गाचेच खेळणे करून टाकेल, अंडपेशीची निवड करणे म्हणजेच एक छोटा गर्भपात आहे, असे अनेक नैतिक मुद्दे हमसून धुमसून मांडले गेले. टेस्ट टय़ूब बेबीच्या वैज्ञानिक आविष्कारानंतरच्या गेल्या पस्तीस वर्षांमध्ये अशी काही अनागोंदी घडली नाही, हे सुचिन्ह असले, तरीही या तंत्रज्ञानाचे उद्योगात रूपांतर मात्र झाले. वर्षांला साडेतीन लाख बालके टेस्ट टय़ूब बेबी तंत्राने जन्म घेत आहेत. आता त्या तंत्राचे वैद्यक बाजारपेठेत रूपांतर झाले आहे, हे खरे असले तरी पन्नास लाख जोडप्यांच्या मुखावर अपत्यप्राप्तीच्या सुखाचा आनंद विलसतो आहे तो एडवर्ड्स व स्टेपेटो यांच्या टेस्ट टय़ूब बेबी तंत्राचाच परिणाम आहे. एडवर्ड्स यांना भारतात येण्याची मनोमन इच्छा होती, पण ती अखेपर्यंत या ना त्या कारणाने फलद्रूप होऊ शकली नाही. आज त्यांच्या रूपाने असंख्य जोडप्यांसाठी टेस्ट टय़ूब बेबी या जैवतंत्राच्या रूपाने 'कल्पवृक्ष' लावून 'बाबा' मात्र अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे.

- लोकसत्ता (संपादकीय/अग्रलेख)
दि. १३/०४/२०१३, शनिवार   

Friday, April 12, 2013

हे जीवन सुंदर आहे...! - राजेंद्र पाचंगे

हे जीवन सुंदर आहे

माझ्या सख्ख्या मावसबहिणीबद्दल थोडेसे…

मृणाल अरुण  निमोणकर 


स्रोत - अस्मिता, दैनिक प्रभात
दि. ०६ /०४ /२०१३, शनिवार 

Thursday, April 11, 2013

पू. लं. नी आपले मित्र सलील घोष यांना लिहिलेलं पत्र

                                                                                                                                                  पुणे ४ 
८ नोव्हेंबर १९७९ 

িপৃড় সলীল,
            माझी साठी संपल्याच्या अफवेवर विश्वास ठेवू नये. कुणाचीही एकसष्ठी म्हणली की ह्या पुण्यातली माणसं प्रथम पाळण्यातल्या पोरासारखं दचकून अंग काढतात. मग सत्कार समारंभ करून थैली देणार म्हणतात आणि हळूच त्यातून अंग काढतात. तेंव्हा तसले कसलेही सोपस्कार मी करून घेणार नाही याबद्दल निश्चिंत असावे. अतिस्नेह पापशंकी असतो. तेंव्हा तुमच्यासारख्या माझ्या मित्रांच्या जीवाला उगीचच घोर लागू नये म्हणून हे पत्र.        
           वयाबियाचे हिशोब इतिहास संशोधकांनी (बहुधा चुकीचे) आणि वयपरत्वे उपटणाऱ्या आजारांवर औषधे (तीही बहुधा चुकीची) देणाऱ्या डॉक्टरांनी करावे. पण तुम्हाला कळविणेस आनंद होतो की, 'हल्लीची पिढी बिघडली आहे' किंवा 'आमच्या वेळचं ते आता राहिलं नाही' यासारखी केवळ कवळीतूनच फुटायला योग्य अशी वाक्यं माझ्या तोंडून चुकूनही निघत नाहीत. हल्लीच्या मोगऱ्यालाही आपले नाक चोंदलेले नसल्यास कुठल्याही काळातल्या फुललेल्या मोगऱ्याइतकाच चांगला वास येतो. उदाहरणार्थ : हल्लीच्या पोरी पूर्वीच्या पोरींसारख्या छान लाजत नाहीत, हे म्हणणे साफ खोटे आहे. परवाच मी एका पोरीला 'काय ग, कितवीत आहेस?' असे विचारले. ते ऐकून ती नुसती लाजली नाही तर लाजलाजली. आणि म्हणाली, 'मी? इश्श माझी मुलगी यंदा बी. ए. ला आहे.' (पत्र खाजगी आहे म्हणून सांगतो. ते मला माहित होतं.) तात्पर्य काय की उन्हे उतरत चालली म्हणून त्यातले सोने बघायचे टाळायची गरज नाही.  (अहाहा!)
                 असो. आता भेटीचे योग यायला हवेत तितके जुळून येत  नाहीत.  शिवाय प्रतिवर्षी ठराविक दिवशी नेमाने 'मित्रमीलन' वगैरे साजरे करण्याचा प्रदर्शनी भावूकपणाहि कधी आपण केला नाही. (म्हणूनच मैत्री टिकली.) तरीही कधीमधी खुशाली कळवावी म्हणून पत्र लिहायला सोबत कागद पाठवीत आहे. ते वापरावे. (लिहायला.)
                 तर सांगायची गोष्ट काय की जोपर्यंत 'इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे' असे मी खूप आनंदाने आणि अभिमानाने म्हणू शकतो तोपर्यंत ह्या आपल्या मैफिलीतले माझे वय पंचवीसच. मग - 
                                                                     पिको हे मस्तक
                                                                      दुखोत गुडघे
                                                                      मैतरीचे धागे
                                                                      जैसे थे च - (संत कवि सखदेव)
हा माझा कायमचा पंचविसावा वाढदिवस सतत साजरा होत राहावा यासाठी माझ्यावर वर्षानुवर्षे निरपेक्ष प्रेम करणाऱ्या तुम्हा मित्राना उदंड आयुष्य आणि स्वास्थ्य लाभणे मात्र अत्यंत आवश्यक आहे. तसे ते लाभो ही याप्रसंगी माझी मनापासून इच्छा आहे. 
                                                                                                                                                     তৗমার,
                                                                                                                                                       পু.  ল. 


मूळ स्रोत - http://www.puladeshpande.net

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...