Monday, December 31, 2012

पोरी, तुझं चुकलंच..!

अखेर तू गेलीसच. सुटलीस म्हणायचं का? हो तसंच म्हणायला हवं. खरं तर तुझं वय फुलायचं.. प्रेमात पडायचं.. पुढच्या आयुष्याची स्वप्नं पाहायचं. ती तू पाहिलीही असशील. तुझ्याबरोबर तुझा जो सखा होता, तो याच स्वप्नांचा भाग होता का? असेलही किंवा नसेलसुद्धा. त्यानं तुझ्यामध्ये कदाचित सखीसहचरी पाहिली असेल. किंवा नसेलसुद्धा. तुझ्या आईवडिलांनी त्याच्यामध्ये जावई पाहिला असेल. किंवा नसेलसुद्धा. मम्मी किंवा डॅडीनं स्वत:च्या गाडीतून तुला सोडायला किंवा आणायला यावं, अशा घरातली तू नव्हतीस. लोकल, बस, मेट्रो अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून धक्के खात ज्यांना कार्यालय किंवा घर गाठावं लागतं अशा कोटय़वधी भारतीयांसारखीच तू. स्थानकावर ताटकळत वाट पाहत उभं असताना समोर हवी ती लोकल, बस आली की आनंदानं डोळे चमकणाऱ्या कोटय़वधी भारतीयांमधलीच तू. त्या दिवशी १६ डिसेंबरला संध्याकाळी दिवसभराच्या रगाडय़ानंतर सुहृदाच्या साथीनं निघालीस, त्या दिवशीही असेच कोटय़वधी भारतीय कुठे ना कुठे बसची, मेट्रोची किंवा लोकलची वाट पाहत उभे असतील. तूही त्यांच्यापैकीच एक. समोर रिकामी बस पाहून तुला आनंद झाला असणार.. दोस्ताच्या साथीनं खिडकीची जागा पकडत गुजगोष्टी करीत घरापर्यंत जाता येईल असं तुलाही वाटलं असणारच. अशा छोटय़ा छोटय़ा आनंदाचे ठिपके जोडत दिवसभराची चतकोरातली रांगोळी पूर्ण करायची आणि आला दिवस सुखात गेला असं मानायची सवय आहेच ना आपल्याला. आजच्या दिवसात रिक्षानं उडवलं नाही.. मोटारचालकांनी संप केला नाही.. डोक्यावरची विजेची तार/ छप्पर/ पंखा अंगावर पडलं नाही.. पायाखालचा रस्ता खचला नाही.. आणि आपण धडय़ा अंगानं घरी आलो याचा आनंद देशभरातल्या कोटय़वधींना रोजच्या रोज घेता यावा अशी व्यवस्था आहे आपल्या देशात. तूही त्याच व्यवस्थेचा भाग होतीस. त्याच आनंदात तू त्या दिवशीही बसमध्ये चढली असशील. समोर दोन पायांची दिसतायत म्हणजे ती माणसंच असतील असा समज तू करून घेतलास आणि त्यातच बेसावध राहिलीस. आदिम अवस्थेतलं पशुत्व चाराचे दोन पाय झाले म्हणून माणसांमधनं गेलं असेल असं तुलाही वाटलं असणार.. तिथंच घात झाला. पोरी, तुझं चुकलंच..!
या महान म्हणवणाऱ्या, उदात्त परंपरा सांगणाऱ्या देशात अर्धनारीनटेश्वर पुजला जातो. या पुजल्या जाणाऱ्या प्रतिमेपुरती तरी त्यात अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री दिसते. तुझ्यासारख्या अनेकांना कळत नाही पोरी त्यातल्या पुरुषानं स्त्रीला कधीच पायपुसणं करून टाकलंय ते. काही दिवसांनी तर ही प्रतिमा अर्धीच राहील की काय अशी परिस्थिती येणार आहे. कारण स्त्रीबीज गर्भातूनच उपटून टाकण्यात आपल्याला कोण आनंद. ज्यांनी जीव वाचवायचा ते वैद्यकच न उमलणाऱ्या कळय़ा खुडण्यात आयुष्याचं सार्थक मानतात हे तुलाही माहीत असेलच. तुझ्या आईवडिलांच्या मनात तुझा गर्भ पाडून टाकायचा विचार कधी शिवला नसणार. म्हणून तर तू या देशात जन्माला येऊ शकलीस. तुझ्या आईवडिलांचं त्यासाठी कौतुकच करायला हवं. पण आता त्यांनाही वाटत असेल तू उगाचच जन्माला आलीस. त्यांनाही जाणवत असेल आता की आदिमाया, आदिशक्ती, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या सगळय़ा प्रतिमा आपल्या देशात फक्त पुजण्यापुरत्याच असतात. जे जे पूजनीय असतं त्याचं मातेरं करून टाकायचं ही आपली संस्कृती हे कळलं होतं का तुला कधी? आपण पृथ्वीला देव मानतो. तिच्यावरही असाच रोजच्या रोज बलात्कार करीत असतो. नद्यांनाही आपण देवच मानतो. पण सगळा प्रयत्न त्या कशा कोरडय़ाठिक्क होऊन नाहीशा होतील असाच. झाडांमध्ये, वेलींमध्येही आपण देवच बघतो. परंतु त्यांच्याही नशिबात हे असंच ओरबाडून घेणं. भूतदया हा तर आपल्या संस्कृतीचा पाया. पण ते सगळं नुसतं सांगण्यापुरतंच. प्रत्यक्षात समर्थानं असमर्थाला, धट्टय़ाकट्टय़ानं अशक्ताला, धनिकानं गरिबाला शक्य तितकं लुटणं हे वास्तव कळायच्या आतच तुझ्यावर माणसाची झूल पांघरून आलेल्या काळानं घाला घातला. तुला जे काही सहन करावं लागलं ते कळलं तरी हृदयाचा ठोका चुकतो. तू कसं सहन केलं असशील? या देशात स्त्रियांच्या अंगी बाकी काही गुण असो किंवा नसो. सहनशीलता मात्र असावीच लागते. या शब्दातसुद्धा आधी सहन करणं आहे आणि मग शील. तुला कळलं होतं का कधी ते? नाही ना. पोरी, तुझं चुकलंच..!
एक तर तू भारत नावाच्या देशात जन्माला आलीस. आलीस ते आलीस तेसुद्धा दिल्लीसारख्या शहरात. तुला काय वाटलं देशाची राजधानी इतर प्रांतांपेक्षा प्रगत असते? जगातल्या सर्वात मोठय़ा लोकशाहीचं सत्ताकेंद्र दिल्लीत आहे, म्हणून तुला मोठा अभिमानही वाटला असेल. पण आपल्याकडे लोकशाही म्हणजे ओरबाडणाऱ्या लोकांनी ओरबाडून घेणाऱ्या लोकांसाठी ओरबाडून राबवलेली व्यवस्था हे कधी आलं होतं का तुझ्या लक्षात? तुझी आई खेडय़ातली. तुझ्या वेळी ती बाळंत होताना दवाखान्यात वेळेला पोहोचू शकली. नाही तर तू मधेच आचके देत गेली असतीस. अगं खूप जण जातात असे आपल्याकडे तुला माहीतच असेल. तू मात्र आईच्या गर्भातून सुखरूप बाहेर आलीस. जन्मल्यानंतर तुला देवीच्या आजारानं नेलं नाही. गोवर किंवा टायफॉईड होऊन मेली नाहीस. काविळीनं तुझा बळी घेतला नाही. अ‍ॅनोफलिस डासाच्या मादीनं तुझं रक्त शोषलं नाही. त्यामुळे मलेरिया होऊन या जन्मातनं तुला कधी मुक्ती मिळाली नाही. पैसे भरून डॉक्टर झालेल्यानं चुकीचं औषध देऊन तुला मारलं नाही. त्यानं दिलेलं औषध बनावट निघालं नाही. अन्नातल्या विषबाधेनं तुझे प्राण घेतले नाहीत. शाळेला जाताना स्कूलबस होती का तुला? मग त्या स्कूलबस चालवणाऱ्यानं दारू पिऊन अपघातात तुला ठार केलं नाही. शाळेला सुटी असताना लहानपणी गावी गेली असशील. तिथं जीवजंतू चावल्यानं तुझा जीव गेला नाही. गावातल्या बेदरकार धनदांडग्यांच्या वाहनांनी उडवल्यावर तू कधी जायबंदी होऊन अपघातात गेली नाहीस. श्रीमंतांनी, मवाल्यांनी केलेले अन्याय मुकाट सहन करायचे असतात. कायद्याचं राज्य फक्त कागदावर असतं हे तुला कधी कळलं नसेल. त्यामुळे वाटलं असेल तुला आपली सुटका झाली. आपण वयानं मोठे झालो. अभ्यास करून चांगले गुण मिळवून हव्या त्या क्षेत्रात कारकीर्द करायची, असं ठरवलं असशील तू. पण तुला लक्षात आलं होतं का की चांगल्या कारकीर्दीसाठी, खूप पैसे मिळवून श्रीमंत होण्यासाठी इतके कष्ट करायची गरज नसते आपल्या देशात. तसं आलं असतं लक्षात तर कशाला गेली असतीस महाविद्यालयात. म्हणजे मग ती बसनं घरी जायची वेळच आली नसती तुझ्यावर. पोरी.. तुझं चुकलंच.
आता कळलं असेल तुला जिवंताला पायदळी तुडवायचं आणि तसा तो तुडवला गेल्यावर त्याच्या नावानं टिपं गाळायची ही आपली नवी मानवता आहे. म्हणून तर तुझ्यावरच्या अत्याचाराला वाचा फुटल्यावर आपण प्रयत्नात कमी पडलो नाही हे दाखवण्यासाठी सरकार तुझ्या मृतदेहासाठी खास विमान सोडू शकतं पण जिवंतांना मरणयातना देणारी व्यवस्था सुधारू शकत नाही. यामुळेच घरात हवे तितके दिवे लावून अंधार करण्याची ऐपत असणारे लोक इंडिया गेट, मुंबईतलं गेटवे ऑफ इंडिया वगैरे ठिकाणी तुझ्या नावानं मेणबत्त्या लावायला वेळ काढतात. पण आसपासच्या पददलितांसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. आता तर संसदेतले जागरूक प्रतिनिधी महिला रक्षणासाठी कडक कायदे करण्याची शपथ घेतायत. तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं ते बलिदान लादण्यासाठी जबाबदार असणारेच सांगू लागलेत. थोडक्यात काय, तुझ्यावर जी वेळ आली ती कोणावरही कधी येऊ नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत म्हणे. आता तुझ्या नावानं एखादा दिवस वगैरेही साजरा करण्याचं ठरवलं जाईल. स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याची शपथही घेतील सगळे. आणि हे होईल ते पाहायला तू नसशील. तेव्हा पोरी.. तुझं चुकलंच.

- लोकसत्ता (संपादकीय/अग्रलेख)
दि. ३१/१२/२०१२, सोमवार

Sunday, December 23, 2012

हाफ़ राईस... दाल मारके

आईला खेटून झोपण्याची सवय सोडण्याची शिकवणी दिपूला त्या रात्री पहिल्यांदाच मिळाली. आपले , सावत्र का असेना, पण आजवर आपल्याबरोबर असलेले बाळ कुठे असेल अन कसे झोपले असेल याची काळजी सुनंदाला नव्हतीच. नवीन क्षितीजे तिच्या संसारात आली होती. आता फ़क्त ती आणि मन्नू!

अंगणातून येणारे किड्यांचे आवाज, खाली एक जाड जाजम, अंगावर एक घोंगडी, आजूबाजूला गुणगुणणारे डास आणि घराचे आतून बंद केलेले दार! पहिल्यांदाच दिपूला समजले. आपण काही तितके लहान नाही राहिलो आता. एकटे झोपता येईल इतके मोठे झालो आहोत. पण हे जिला सांगायचे अन कौतूक करून घ्यायचे ती..................... आई... नव्हती इथे...!
घोंगडी भिजेपर्यंत दिपू रडत होता. डासांना हाताने हाकलत होता. पहाटे तीन वाजले असावेत जेव्हा त्याला कशीबशी झोप लागली. आणि त्याला आठवत होतं! झोपल्यानंतर अगदी काहीच वेळात, म्हणजे, जरासाच वेळ झाला असेल, कुणाच्यातरी हाका ऐकू येत होत्या आणि आपल्या शरीराला धक्के बसत होते. काकूने पहाटे पाचला त्याला उठवलं होतं! स्वयंपाकघर झाडताना दिपूला झाडू कसा धरतात हेही माहीत नव्हतं! पावणेसहाला विशाल उठला. त्याला दूध बिस्कीटे मिळाली. दिपू बघत होता. विशालने विचारले. काल खेळायला मजा आली की नाही? दिपूला त्यातही आनंद वाटला. आपण खेळात होतो याची ऎकनॊलेजमेंट विशालने देणे म्हणजे काय झाले? दिपू निरागस हसला. तोवर काकूने त्याला ताटात कालची पोळी अन भाजी दिली. दिपूने विचारले, मला बिस्कीट... ! त्यावर काकू जे बोलली त्यावरून त्याला इतकेच समजले की जी मुले शाळेत जातात त्यांनाच दूध अन बिस्कीटे मिळतात!
पंधरा दिवसात दिपू काळवंडला! पण रमला बिचारा त्या घरातही! रमण्याशिवाय पर्यायच नव्हता. मधेच कुणीतरी बाहेरचे येऊन चौकशी करून जायचे. त्याची बडदास्त मस्त ठेवली आहे असे मत होत असावे त्यांचे! मात्र त्याला शाळेत घातले नव्हते. कारण त्याच्या शिक्षणाची जबाबदारीही घेईन असे तुकारामने कबूल केलेलेच नव्हते.
जीवाने आवाक्यात असेल त्या जीवाचे शोषण करून जगणे या प्रक्रियेला जीवन असे म्हणतात वाटते. जो बळी तो कान पिळी ही म्हण बदलायला हवी. जो बळी तोच जगू शके अशी ती म्हण करायला हवी!
एक माणूस झिजला तरच दुसरा त्याच्या जीवावर उभा राहू शकत असावा.........



..............दिपू झोपायला पंक्चरच्या दुकानात गेला. रात्री त्याला झोपच येत नव्हती. सहज त्याने फ़टीतून बाहेर पाहिले तर कांबळे काका कुठेतरी घाईघाईत बाहेर जात होते. काहीतरी प्रॊब्लेम झाला की काय? आत्ता काका कसे काय बाहेर गेले? त्याने लक्ष ठेवले. दहा मिनिटे झाली तरी काका येईनात. मग स्वयंपाकघरातला दिवा लागलेला त्याने पाहिला. काय वाटले कुणास ठाऊक! तो पटकन बाहेर आला अन स्वयंपाकघराच्या खिडकीखाली जाऊन उभा राहिला. स्वातीताई काकूंशी बोलत होती.



स्वाती - पगाराचा प्रश्न होता का पण? आमच्या भावासारखा घरात राहात नव्हता का तो?
काकू - अगं मित्र सांगतात काहीतरी.. मग आपल्यालाही वाईट वाटतं की नाही??
स्वाती - त्याला एक दोन दिवसांनी देऊन टाकायचे मग... एवढे मनीषाचे एक्स रे झाल्यावर ... तो काही म्हणाला नसता...
काकू - तसं नाही गं! आपण असं उगाच राबवणं चांगलं आहे का एवढ्याश्या मुलाला?
स्वाती - आई? तू राबवतेस त्याला? तुझं तर मुलासारख प्रेम आहे.. आम्ही पण दोघी इतक्या प्रेमाने त्याला सगळं शिकवतो.
काकू - मग काय तर? एका मुलाला बरं वाटावं म्हणून माझ्या मुलीची तपासणी थांबली तर त्यात काय??
स्वाती - काहीच हरकत नाही आई.. पण... दिपूला नीट सांगीतलं असतंस तर त्याला समजलं असतं..
काकू - अंहं! त्या एवढ्याश्या मुलाला जेव्हा स्वत:च्या मनातून प्रेम वाटेल ना आपल्याबद्दल... तेव्हा तो आपोआप समजेल सगळं!
स्वाती - पण इतक्या उशीरा बाबांना काकांकडे जाऊन पैसे मागायला......
काकू - अगं उद्या सकाळी सहा वाजता न्यायचंय मनीषाला... म्हणून...
पायातला जोरच गेला होता. दिपू अक्षरश: मटकन बसला जमीनीवर! त्याचा एक हात खिशावर होता. दुसरा हात त्याने तोंडावर ठेवून जोरजोरात हुंदके द्यायला सुरुवात केली. त्याचा आवाज इतका झाला की आतमधे या दोघींनाही ऐकू गेला. बाहेर येऊन त्या पाहतायत तर दिपू रडतोय.
काकूंनी त्याला पटकन जवळ घेतला.



काकू - काय झालं दिपू? का रडतोयस? कुणी मारलं वगैरे का?? सांग ना? रडू नकोस... चल आत चल



दिपूने खिशातून शंभराच्या सगळ्या बारा नोटा काढून काकूंच्या हातात कोंबल्या व तो अजूनच जोराने रडू लागला.चांदवडला बसमधे बसल्यानंतर एका आजोबांच्या मांडीवर डोके ठेवून झोपताना त्याला जसे वाटले होते ...अगदी तसेच आज रडत रडत आवेगात काकूंच्या कुशीत शिरताना त्याला वाटले. चुकलो मी... काकू... चुकलो.. असे म्हणून तो आणखीनच त्यांना बिलगत होता. शेवटी स्वाती व मनीषाने खूप वेळ त्याला प्रेमाने समजून सांगीतल्यावर हुंदके देत देत तो बाजूला झाला. पहिल्यांदाच त्याने पाहिले... काकू अन दोन्ही ताया रडत होत्या....एक घर... मायेचं... तुटता तुटता वाचलं होतं...कांबळे काका आले. त्यांना सगळा प्रकार मनीषाने सांगीतला. दिपूला भीती वाटत होती. ते हसले. त्यांनी त्याला जवळ घेतले व म्हणाले...आत चल.. आजपासून समोर झोपायचं नाही...त्या रात्री... कित्ती कित्ती तरी वेळ ... काकूंच्याजवळ झोपलेल्या दिपूला... बरेच दिवसांनी सारखी त्याची आई आठवत होती.



दिवाळी आली. जिकडे तिकडे नुसती जमेल तशी रोषणाई! फ़टाके! नवे कपडे! गोडधोड! आता विशालही बोलायला लागला होता. आता संध्याकाळी दररोज दोन तास खेळल्यामुळे दिपूचे शरीर चांगले तंदुरुस्त व्हायला लागले होते. आता तो पूर्ण दहा वर्ष तीन महिन्यांचा झाला होता.
घरोघरी लोक आपल्या घरचे फ़राळाचे नेऊ देत होते. तिकडचे घेऊन येत होते. एकमेकांच्या फ़राळाच्या चवीचे कौतुक चाललेले होते.



दिपूला एक नवीन शर्ट पॆंट काकूंनीच घेतली होती. आणखीन एक जोडी त्याला पुढारी येऊन देऊन गेले होते. तो आभाळातच होता. त्यातच त्याला चाळीस रुपयांचे हवे ते फ़टाके घे असे स्वातंत्र्य काकांनी दिले. आणलेले फ़टाके नुसते पाहण्यातच त्याचा वेळ जात होता.



त्याला आठवलं! मुहरवाडीची दिवाळी अशी नसायची. आणि... गेल्या वर्षीची आपली इथली... वडाळी भुईची दिवाळीही अशी नव्हती! या दिवाळीला म्हणजे आपण राजाच! फ़टाके काय, कपडे काय, चकल्या काय, करंज्या काय? त्यातच स्वातीताईला एका स्थळाने पसंती कळवल्याची बातमी आली. घरात नुसता उत्साह भरून वाहू लागला. मनीषाताई तिची थट्टा करू लागली. बुद्धीला जितके समजेल तितकी थट्टा मग दिपूही करू लागला. त्याने थट्टा केली की स्वातीताई त्याला मारायला धावायची. मग तो पळून जायचा.
मस्त धमाल चालली होती. दिपू बाहेर आला. रस्त्यावर मोठी मुले बाण लावत होती. तो मजा बघत बसला. चमनचिडी हा एक फ़टाक्याचा विचित्र प्रकार आहे हे त्याला समजलं! मोठ्या माळा कशा काय लोकांना परवडतात त्याला समजत नव्हतं! तो बाण लावत असलेल्या मोठ्या मुलांच्या अगदी जवळ उभा होता. त्यातला एक आला आणि बाण लावत असलेल्याला काहीतरी बोलला. वाक्य दिपूला ऐकू आलं! पण अर्थ कळला नाही. ’वो देख पटाखा जा रहा है, पटाखेपे पटाखा छोड’! यातला पहिला पटाखा मनीषाताईला म्हंटलं जातंय हे त्याला समजलं! पण तिच्या अंगावर कसा बाण सोडतील? नुसती थट्टा करत असतील! पण नाही. त्या मुलाने खरच बाणाची बाटली तिच्या दिशेला तोंड करून धरली. दुसरा एक जवळ आला. त्याने काही समजायच्या आतच बाणाची वात पेटवली. दिपूने मनीषाताईच्या नावाने जोरात हाक मारली तेव्हा ती पटकन दिपूकडे वळली अन सेकंदातच तिच्या लक्षात आले की काहीतरी विपरीत होत आहे. जोरात ती बाजूला सरकली. सरकली नसती तरी चाललं असतं! बाण नेमक्या दिशेने गेलाच नव्हता. पण मनीषाताई प्रचंड घाबरून घराकडे धावली. मुले जोरात हसू लागली. आणि दिपू मात्र पराकोटीचा संतापला. त्याने जवळ पडलेली एक बाटली उचलून जीव खाऊन त्या बाण लावत असलेल्या मुलाच्या डोक्यात घातली. बाटली हातातून सुटून त्या मुलाला नुसतीच चाटून गेलेली त्याला माहीतच नव्हते. त्याला वाटले ती जोरात त्याच्या डोक्यात आपटून फ़ुटली. कारण बाटली फ़ुटल्याचा आवाज आला होता. पण हे सगळं पाहायला तो थांबलाच नव्हता. आपल्या हातून तो कदाचित मेलेलाही असेल अशा वेड्या कल्पनेने दिपू तुफ़ान वेगात स्टॆंडवर धावला. समोर धुलिया-नाशिक बस निघाली होती. कसलाही विचार न करता तो बसमधे तीरासारखा घुसला. बस निघाली तेव्हा कंडक्टरने विचारले पैसे आहेत का? त्याने हो म्हणून सांगीतले. मात्र पंधराच मिनिटात समजले की त्याच्याकडे फ़ारच कमी पैसे आहेत. पाऊण तासाने जेव्हा पिंपळगाव (बसवंत) आणि शिरवाडच्या मधील एका ढाब्यावर बस जेवायला थांबली तेव्हा त्याला उतरवण्यात आले व इथे कुणी ओळखीचे भेटले की पुढचा प्रवास कर असे सांगण्यात आले.



दिपू उतरला. तो भयानक घाबरलेला होता. त्याची अशी कल्पना होती मागून लगेचच आलेली जी दुसरी बस होती त्यात पोलीस असण्याची शक्यता होती. एका हौदामागे तो लपून बसला. दोन्ही बस जेवून जायला जवळपास पन्नास मिनिटे लागली. पण दिपू जागचा हालला नाही. बसेस गेल्यावर मात्र ढाबा एकदमच सुनसान झाला. दोन, तीन कारमधून आलेले कस्टमर्स सोडले तर आता स्टाफ़शिवाय कुणीच नव्हते.
हळुच दिपू गल्ल्यावरील मालकासमोर जाऊन अपराधी मुद्रेने उभा राहिला.



मालक - कौन बे तू?
दिपूने मान खाली घातली होती.
मालक - बससे उतरा क्या? छुटगयी बस?
दिपुने नकारार्थी मान हलवली.
मालक - अरे कहॊंसे आया तू???
आता एक दोन पोरे तिथे जमा झाली.
मालक - कौनसे गाव का है?
दिपू - मुहरवाडी
मालक - ये कहापे आया रे पद्या?
पद्या - क्या?
मालक - मुहरवाडी सुना है?
पद्याने नकारार्थी मान हलवली. त्याला त्या मुलात काहीही इंटरेस्ट नव्हता.
मालक - अबे बोलता क्युं नही?
दिपू गप्पच होता.
मालक - भागके आया क्या? चोरी की है???
दिपूने खाडकन वर मान करून जोरजोरात नकारार्थी मान हलवली.
मालक - भूख लगी है क्या??
दिपू - ... हां!
मालकाने विचार केला. पोरगं लहान आहे. कामावर तर ठेवता येणार नाही कायद्याप्रमाणे! पण भटारखान्यात किरकोळ कामाला टःएवलं तर उपयोगीही पडेल अन जरा ताणही कमी होईल.
मालक - काम करेगा यहॊं?
दिपूने पुन्हा जोरात मान हलवली.. पण यावेळेस... होकारार्थी...
मालक - जा ... पहले खाना खाले



दिपूला भटारखान्यात नेण्यात आलं! तिथल्या वासानेच त्याला गुदमरलं! रस्से, चिकन, दाल, बटाटे, मटार! सगळ्याचा एक नवीनचह वास तेथे भरून होता. कुणीतरी त्याला थाळीत काहीतरी रोटी अन सब्जी दिली.
दिपूने विचार केला. नंतर हाकलून दिलं तर माहीत नाही.. आत्ता तर खाऊन घ्यावं!
बकाबका तो खात होता. पण आणखीन मागीतलं नाही. नंतर पाणी पिऊन परत मालकासमोर उभा राहिला.
मालकाने आवाज दिला:



मालक - पद्या, ये लडका कलसे अंदर काम करेंगा.. अभी इसको ऒर्डर लेना सिखा...अभी कोई गाडी नही आनेवाली मालेगाव छोडके...
दीपक अण्णा वाठारे! आयुष्याला पूर्णपणे भिन्न वळण लागेल अशा उंबरठ्यावर उभा होता. आणि तो व्यवसाय त्याला तूर्त तरी मान्य होता. पद्या त्याला एका टेबलापाशी घेऊन गेला. कस्टमर काहीतरी बोलला. पद्याने दिपूला सांगीतले.
पद्या - सुना? ये वहॊं जाके बोल
दिपू - कहॊं??
पद्या - वो काउंटरपे... वो अंदर आदमी खडा है ना काला? उसको...



दिपूला तो आतला काळा माणूस अक्राळविक्राळच वाटला होता. मगाशी जेवताना हा कसा दिसला नाही? दिसला असता तर कदाचित दिपू जेवलाही नसता.
त्याच्याकडे एकदाच बघत चाचरत चाचरत दिपू म्हणाला. त्याचं नवं आयुष्य या क्षणाला सुरू होत होतं!
दिपू - ऒर्डर है...
तो - क्या???
दिपू - हाफ़ राईस... दाल मारके....

-----------------------------------------------------------------------------------------------------------
"हाफ़ राईस... दाल मारके" हे एक २३ भागांचं कथानक आहे..पूर्ण वाचण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा..
http://www.maayboli.com/node/15727
स्त्रोत - मायबोली 
लेखक - बेफ़िकिर 

Wednesday, December 19, 2012

स्वानंदी सतारिया

वाद्य आणि वादक यांचा स्वभाव जेव्हा मिळतो तेव्हा रविशंकर यांच्यासारखा कलाकार तयार होतो. मुळात सतार हे वाद्यच मोकळे आणि प्रसन्न. सरोद हेदेखील तंतुवाद्यच. सतारीची बहीण म्हणावे असे. पण सरोदच्या स्वराला एक प्रौढतेची किनार असते. व्याकूळ करणारी. सतारीचे तसे नाही.  ती आजन्म नवतरुणीच. जगात सर्वत्र फक्त आनंदच भरून राहिलेला आहे आणि त्या आनंदाचे तरंग आपणही अनुभवूया असेच जणू सतार सांगत असते. रविशंकर यांची सतार हे भरभरून सांगायची. याचे कारण रविशंकर आणि सतार हे समानधर्मी होते आणि दोघांत एक प्रकारचे अद्वैतच तयार झालेले होते. अल्लडपणाच्या सीमा ओलांडण्याच्या टप्प्यावर असलेली घरातली एखादी मुलगी उत्फुल्ल उत्साहात जिन्यावरून धावत उतरताना पैंजणांच्या मंजूळ नादाने घरास जशी भारून ठेवते तशी रविशंकर यांची सतार ऐकणाऱ्यास भारून टाकायची. ही नृत्यमयता रविशंकर यांच्या सतारीत होती याचे कारणच हे की रविशंकर हे मुळात नर्तक होते. आपले बंधू ख्यातनाम नर्तक उदयशंकर यांच्या नृत्यमेळ्यांत रविशंकर यांची पावले सुरुवातीस बराच काळ थिरकली होती. त्याचाही परिणाम रविशंकर यांच्या कलाविष्कारात सहज जाणवत असे. आनंदी माणसे मोकळी असतात. रविशंकर तसे होते. ज्या काळात फ्युजन वगैरे कल्पना जन्मालाही आलेल्या नव्हत्या, त्या काळात रविशंकर यांनी परदेशी वाद्य आणि संगीताशी हातमिळवणी करण्यात जराही मागेपुढे पाहिले नाही. रविशंकर यांच्या मोठेपणाची ही बाजू महत्त्वाची. याचे कारण असे की आपलेच संगीत थोर असे मानत हिंदुस्थानी संगीतातील दुढ्ढाचार्य आपापल्या मठीत आत्ममग्न होऊन राहिले होते त्या काळी कसलाही आगापिछा नसलेला रविशंकर हा तरुण जगाच्या सांगीतिक मुशाफिरीवर निघाला होता. रविशंकर यांनी कधीही प्रयोगात कमीपणा मानला नाही आणि संगीत हे पोथीनिष्ठच असायला हवे असेही त्यांना कधी वाटले नाही. पण ही नवी परंपरा जन्माला घालताना त्यांनी कधी बंडाचे निशाण फडकावले असेही झाले नाही. तो त्यांचा स्वभावही नव्हतो. शड्डू ठोकून नवीन काही करून दाखवतोच.. असा त्यांचा कधी आवही नसायचा. जे आवडले ते त्यांनी मुक्तपणे केले. त्यांच्या संपूर्ण सांगीतिक कारकिर्दीवर ही मुक्तानंदी छाया कायमच राहिलेली आहे.
रविशंकर हे खरे तर रोबींद्र शंकर चौधरी. बंगाली. जन्म गंगाकिनारी वाराणसी येथील. वडील भद्रलोकीय मान्यवर. वकील आणि त्याच वेळी संस्कृतप्रेमीही. त्या काळात इंग्लंडात कारकिर्दीसाठी गेले आणि तिकडेच राहिले. त्यामुळे रोबींद्राच्या पालनपोषणाची जबाबदारी भारतात मागे राहिलेल्या त्यांच्या पत्नीवर येऊन पडली. बालपण वाराणसीत गेल्यावर दहाव्या वर्षीच रविशंकर यांना बंधू उदयशंकर यांच्यासमवेत पॅरिसला जाण्याची संधी मिळाली. अवघ्या तेराव्या वर्षी रविशंकर हे उदयशंकर यांच्या मेळ्यातील उत्तम नर्तक म्हणून ओळखले जाऊ लागले होते आणि अर्धाअधिक युरोप त्यांचा त्या वर्षी हिंडून झाला होता. जाझ आदी पाश्चात्त्य संगीत आणि सिनेमाशी त्यांचा याच काळात परिचय झाला आणि फ्रेंच भाषेसह पाश्चात्त्य संस्कारही त्यांनी आत्मसात केले. लहान वयातच जग पाहायला मिळाले की एक प्रकारचा मोकळेपणा स्वभावात येतो. रविशंकर हे त्यामुळे मोकळे होते. युरोप दौऱ्याहून परतल्यावर कलकत्यात त्या वेळचे मेहेर दरबारचे कलाकार अल्लाउद्दिन खान यांचे सतारवादन दोघा शंकर बंधूंनी ऐकले आणि ते भारावूनच गेले. आपल्या पुढच्या दौऱ्यात अल्लाउद्दिन खान यांनी सतारीये म्हणूनच यावे अशी गळ उदयशंकर यांनी मेहेर संस्थानच्या महाराजांना घातली आणि त्यांच्याकडून होकार मिळवला. रविशंकर यांचा सतारीशी परिचय झाला तो याच काळात. पुढे या परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर मीलनात. या वेळी एखाद्या शिस्तप्रिय वधुपित्यासारखे अल्लाउद्दिन खान वागले आणि सतारीचा हात मागणाऱ्या रविशंकर यांना म्हणाले- सतार शिकायची तर नृत्य सोड. एव्हाना सतारीच्या प्रेमात पडलेल्या रवीने नृत्यत्याग केला आणि सतारीसाठी पहिले प्रेम- नृत्य सोडले. पुढे प्रेमात वाहून जायचा हा त्यांचा स्वभाव त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेकदा दिसून आला. त्या वेळी त्यांनी सतार हाती घेतली ती घेतलीच. तरुण रवी हे अल्लाउद्दिन खान यांच्या मुलामुलींसह गुरुकुल पद्धतीने सतार शिकू लागले. अल्लाउद्दिन यांचे चिरंजीव म्हणजे सरोदवादक म्हणून विख्यात झालेले अली अकबर खान. यांच्याचसमवेत रविशंकर यांनी जुगलबंदी वादन करून शास्त्रीय संगीतात एक नवा पायंडा पाडला आणि अली अकबर यांची बहीण अन्नपूर्णा देवी हिच्याशी काही काळ संसारही केला. 'सारे जहाँसे अच्छा.' हे नव्याने संगीतबद्ध करणे असो वा आकाशवाणीचा वाद्यवृंद. वेगवेगळे प्रयोग हेच त्यांचे वैशिष्टय़ बनले. दरम्यानच्या काळात न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात पाश्चात्त्य कलाकारांसह सतारवादनाचे निमंत्रण त्यांना आले. परंतु तोपर्यंत त्यांचा पहिला विवाह विभक्तिप्रत्ययाच्या फेऱ्यात सापडलेला असल्याने त्यांची ही संधी हुकली. रविशंकर यांनी अली अकबर खान यांना न्यूयॉर्कला पाठवले आणि त्यांच्या वादनास प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहून आकाशवाणीतील चाकरी सोडून परदेशात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यहुदी मेन्युहिनसारखा दंतकथा बनून गेलेला व्हायोलिनकार ते बीटल्सचा जॉर्ज हॅरिसन अशा अनेकांबरोबर रविशंकर यांनी पुढच्या आयुष्यात सतारवादनाचे प्रयोग केले. बीटल्सचा चमू तर त्यांच्या इतक्या प्रेमात होता की हॅरिसनदेखील सतार शिकला आणि हिंदुस्थानी रागदर्शनावर त्याने अनेक कार्यक्रम केले आणि ध्वनिमुद्रिका काढल्या.    भारतातही रविशंकर यांनी अनेक प्रयोग केले.  सत्यजित रे यांच्या 'पाथेर पांचाली'चे संगीत हा त्यातील एक लक्षणीय म्हणावा असा प्रयोग. यातून ज्या प्रमाणे सत्यजित रे यांचे संगीतप्रेम दिसून येते तशीच दिसून येते प. रविशंकर यांची साहित्य जाण. काबुलीवाला (बंगाली), मीरा, अनुराधा, गांधी आदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. शास्त्रीय संगीतातील बुजुर्गाना चित्रपट संगीत कमअस्सल वाटते. रवीशंकर यांनी असला शिष्टपणा कधीही केला नाही. संगीताच्या क्षेत्रात  ते विचाराने इतके मुक्त होते की राजीव गांधी यांच्या काळात भरलेल्या एशियाडच्या स्वागतम शुभस्वागतम या गीताचे संगीत देखील त्यांनी तितक्याच उत्साहाने बांधले.  पाश्चात्त्य देशात हिंदुस्थानी संगीताची ध्वजा उंच फडकवण्यात ज्यांना यश आले त्यात रविशंकर यांचे नाव अग्रक्रमाने येते ते याच गुणामुळे.
ते हे करू शकले याचे कारण त्यांची हिंदुस्थानी संगीतावरची पकड मजबूत होती आणि ते त्यांनी पूर्णपणे अंगी भिनवलेले होते.  घरचा श्रीमंती ऐवज लुटूनच ते विश्वसंगीताच्या मुशाफिरीस निघाले होते आणि त्यामुळे  या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच त्यांची संगीतशिदोरी मुबलक होती. अलीकडच्या काळात 'इंटरनॅशनल म्युझिक' करण्याच्या नशेत अनेक थिल्लर प्रयोग केले जातात. ना ते 'इंटरनॅशनल' होतात आणि ना 'नॅशनल'. हे प्रयोग वरवरचे राहतात याचे कारण देशी जे काही आहे ते अंगी न बाणवता, त्याचे मोठेपण न समजून घेता परदेशाचे अनुकरण केले जाते. रविशंकर यांचे मोठेपण हे की त्यांनी भारतीय संगीताची उंची जाणून, ती अबाधित ठेवून पाश्चात्त्य संगीताच्या अंगणात मुशाफिरी केली. रविशंकर यांच्यामुळे पाश्चात्त्यांना आपल्या संगीताची खोली कळून आली. हे सगळे करीत असताना कलेच्या क्षेत्रात पहिलेपणाचा एक विशेष मान असतो. तो नि:संशयपणे रविशंकर यांच्याकडे जातो. त्यांनी धाडसाने हे नवीन विश्व भारतीय संगीतास खुले करून दिले. विश्वमोहन भटसारखा गिटार या पूर्णपणे पाश्चात्त्य वाद्याचे हिंदुस्थानी सादरीकरण करणारा कलाकार असो वा झाकीर हुसेन यांच्यासारखा तबलिया. विश्वसंगीताच्या क्षेत्रात हे सर्व मुक्त मुशाफिरी करू शकले याचे कारण या हमरस्त्याच्या मुळाशी रविशंकर यांची पायवाट आहे.
एकाच कुटुंबातील अनेकजण ग्रॅमी पुरस्काराच्या शर्यतीत आहेत असे फार कधी झाले नसेल. ते रविशंकर यांच्या बाबत घडले. रविशंकर यांच्याच दोन कन्या अनुष्का आणि नोरा जोन्स या दोघींना एकाच वेळी याच पुरस्कारासाठी नामांकने होती. यंदा वडील आणि कन्या अनुष्का यांना आहेत. त्याचा निकाल जाहीर व्हायच्या आतच रविशंकर गेले. त्यांचे जगणे स्वानंदी होते. हा आतूनच भरून राहिलेला आनंद ते सतारीच्या तारांतून पेरत गेले. या स्वानंदमग्न सतारीयास दै. 'लोकसत्ता' परिवारातर्फे श्रद्धांजली.

- लोकसत्ता (संपादकीय/अग्रलेख)
दि. १३/१२/२०१२, गुरुवार 



" भारतीय असल्याचा मला फार अभिमान वाटला जेव्हा माझ्या डीपार्टमेंटमधल्या एका असिस्टंट प्रोफेसरनी पंडित रविशंकर यांच्या मृत्यूची बातमी मला सांगितली. रविशंकर यांविषयीचा त्याचा आदर त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. परमेश्वर रविशंकर यांच्या आत्म्यास शांती देवो."

Friday, December 7, 2012

रान - प्रशांत अणवेकर


"अरं ये अंत्या! कसली धावपळ चाल्लीय इतक्या रातच्याला?" राम्या
"अरं, आपला गण्या सकाळी गुरं चरायला घेऊन गेलता रानात... समंधी गुरं आली, पर गण्याचा काय पत्याच न्हाय अजून... आम्ही चार-पाचजण जरा बघून येतो रानात..." अंत्या

जांभळी गाव जवळच्या शहरापासून किमान १६ मैल दूर... ३०-४० घरांची वस्ती...  पावसाळ्यात पोटापुरता भात पीकतो आणि दुध, तुप, रानातला मध असं काहीतरी शहरात विकून गावकरी तिकट-मिठाची सोय करतात... गुरांना चरायला अख्खं रान आहेच... गावाच्या जवळपास लाकुडतोडी मुळं रान जरा कमी झालयं, पण जरा आत शिरलं की एकदम दाट रान लागतं... रानातुन वाहणारी कुकडी नदी म्हणजे रानाची नस... कातळ चिरत कुकडी डोंगरावरुन उडी घेते... कुकडीची दरी खूप खोल... सरळसोट तुटलेले कडे... दरीत डोकवावं तर नजर तळापर्यंत पोहचतच नाही...  एकदम दाट झाडी, हे उंच उंच रुख... त्यावर मनगटा एवढ्या जाड वेलींच जणू जाळंच पसरलयं रानभर... दिवसा-उजेडी सुध्दा प्रकाश किरण जमीनीला शिवत नाही, जणू ह्या रानात दिवस उजेडतच नाही... रान एकदम जिवंत... ससे, भेकरं, डुकरं, साप, अस्वल, तरस अशी सगळी जनावरं आहेत... वाघाचा पण वावर आहे... गेली कित्येक युगं हे रान असंच आहे... गावतलं कुणी ह्या रानात अजिबात फिरकत नाही...

सकाळी उठल्यावर राम्याला कळालं, की गण्या अजून सापडला नाही... हात-तोंड धुवून राम्या अंत्याच्या घरी पोहचला...
"अंत्या, काय रं... काय झालं रातच्याला?..."
"लय हुडकलं... पण गण्याचा काय मागमुसच न्हायी... कुठं गेलं काय म्हाईत..."
"आता! रान काय त्याला नवं न्हाय, रोजचच हाये... असं कुठं जाईल?... जनीला काय सांगून गेलता का?"
"हां! जनी म्हनली की पार रानात जानार हुता... अळंबी शोधाया... म्या म्हंतो, आपल्या हीरीच्या मागं आहे की बख्खळ अळंबी!... कश्यापाई जायाचं इतक्या रानात?..."
"म्हंजी पार आत रानात गेलता तर... मग वाघरु तर नसंल?..."
"काय सांगावं आता... पण जंगली जनावरं सोडून मानुस कश्यापाई?..."
"जखमी असंल वाघरु... माणुस म्हणजे आयती शिकार, मग कश्याला जनावरांच्या मागं पळतय वाघरु... नाहीतरी गण्या एकटाच व्हता... साधला असंल डाव त्यानं तवा..."
"असंल बी... आता परत चाल्लोय आम्ही सम्दी... तु पण चल ह्या खेपंला..."

पार अंधार पडे पर्यंत गावकऱ्यांनी रान पालथं घातलं, पण गण्याचा काहीच पत्ता नव्हता... कुठं कुठं म्हणून शोधणार?... आत पार रानात दरी जवळ जायला कुणी तयार होईना... अजून पुढचे दोन दिवस प्रयत्न करुन पण काही कळेना म्हंटल्यावर गावकऱ्यांनी शोध थांबवला... कुणी म्हणालं "कुठं दरीत पडला असणार..." तर कुणी "वाघानं खाल्ला असणार..." पण नक्की काय झालं हे कुणालाच कळेना... एक-दोन दिवस गावात चर्चा झाली आणि मग सगळे रोजच्या कामात व्यस्त झाले... पण वाघाचा विचार काय राम्याच्या डोक्यातून जात नव्हता...

‘राम गणपत वरे’ म्हणजे राम्या... अजिबात कश्याची डर नाही गड्याला... रानाची तर नाहीच... घरी म्हातारा-म्हातारी आणि हा, असे तिघेच... रानावर, झांडांवर, जनावरांवर त्याचा फार जीव... आपल्या पेक्षा हे सगळं वेगळं असं त्याला कधी वाटलंच नाही... खळखळणारे ओढे, वाऱ्यावर डुलणारी झाडं, पक्षी, जनावरं असं सारं रान आपल्याशी बोलतयं असंच त्याला वाटे... राम्याला रानाचं अभय आहे असं सारं गाव म्हणतं...

गावाच्या मागच्या बाजूला हनुमानाचं देऊळ... तिथून जवळच विहिर, मग जरा चढ आणि पुढे सगळं जंगल... पाण्यासाठी अंत्याची बायको सगुणा, तीची शेजारणींन रमा आणि गावच्या पाटलाची पोर राणी अश्या तिघी संध्याकाळी विहिरीवर आल्या... पाणी भरुन हांडे-कळश्या सावरीत गप्पा मारीत सगुणा आणि रमा घराकडे वळल्या... राणी अजून विहिरी जवळच होती... खाली वाकून कळशीत पाणी भरत होती आणि तितक्यात राणीच्या किंचाळण्याचा आवाज आला... सगुणा आणि रमानं मागे वळून पाहिलं तर ढाण्या वाघ राणीला ओरफडत जंगलात घुसत होता... "वाचवा! वाघ वाचवा!" ओरडत सगुणा आणि रमा गावात शिरल्या... लगेचच कोयते, कुह्राडी घेऊन राम्या आणि इतर गावकरी जंगला कडे धावले... विहिरीच्या मागे जंगलात शिरले... गावकऱ्यांच्या ओरडण्यानं सारं जंगल दणाणलं... खुणांच्या मागे धावत गावकरी झुडपात शिरले... तर झुडपात साधारण ३०-४० हात दुर राणीच शरीरं आणि त्याच्या बाजूला बसलेला वाघ दिसला... जिभलीनं मिश्या चाटीत वाघ रागात डुरकत होता... कसलाच विचार न करता राम्यानं कोयता उगारला आणि वाघाकडे झेप घेतली... राम्याच्या मागे गावकरी पण वाघाच्या अंगावर धावले... वाघ अजूनच जोरात गरजला... पण कुणी गावकरी माघार घेईना... मग वाघानेच माघार घेतली आणि लंगडत झुडपाच्या मागे नाहिसा झाला... राणी शुध्दीवर नव्हती पण श्वास मात्र चालू होता... डाव्या खांद्याच्या इथे वाघानं धरलं होतं... खांद्या ऐवजी मानगुट धरलं असतं तर राणी जगली नसती...

"माजलयं जणू!... सारं जंगल कमी पडलं व्हय चरायां?... माझ्या लेकीवर कश्यापाई त्याचा डोळा?..." पाटील
"पाटील, वाघरु जखमी हाये... लंगडत व्हतं... शिकार मिळत नसंल म्हणून गावाकडं फिरकलय..." अंत्या
"गण्याला जावून झालं ना ४-५ दिस?... परत भुक लागली आणि वाघरु गावाकडं वळालं..." राम्या
"आता आजच जातो तालुक्याला आणि साहेबाशी बोलतो... एखादा शिकारी येईल बंदुक घेऊन आणि लांवल त्याचा निकाल..." पाटील

"तालुक्याहून शिकारी येणार आणि सगळ हुणार म्हंजी अजून १०-१५ दिस जाणार... वाघरु भुकेलेलं हाये... इतके दिस थांबून जमायचं न्हाय... आपणच काय ते केलं पाहिजे..." असं राम्या अंत्याला सांगत होता...
दुसऱ्या दिवशी दुपार नंतर एक बकरु घेऊन राम्या आणि अंत्या रानात पोहचले... मोक्याची जागा निवडली... पठार संपून झाडी सुरु होते अशा जागी एका झाडाखाली बकरी बांधून ठेवली... राम्या त्याच झाडावर भाला घेऊन वाघाची वाट बघणार आणि अंत्या शेजारच्या झाडावर... वाघाने बकरीवर झडप घालताच राम्या वरुन भाला घेऊन वाघाच्या मानगुटीवर झेप घेणार... तोपर्यंत अंत्या शेजारच्या झाडावरुन वाघावर मागून वार करणार... असा बेत होता...

"पण माणसाचा वास लागल्यावर वाघरु जवळ येईल का?.." अंत्या.
"तं काय झालं... गावकडं नाही का फिरकलं?... सोपी शिकार नाही सोडणार त्यो..." राम्या

राम्या आणि अंत्या आपापल्या जागेवर तयार होते... हळूहळू सुर्य कलू लागला... जंगलात फार लवकर अंधारुन येतं... सुर्य मावळताच पक्ष्यांचे आवज बंद झाले आणि रातकिड्यांच्या आवाजानं रान घुमु लागलं... काळोख पडताच बकरीचं मेमणं वाढलं... जमीनीवर साप-सरड्यांची हालचाल सुरु झाली... राम्याचं सारं ध्यान भवतालच्या हालचालींवर होतं... जरा जरी कुठं आवाज झाला की राम्याच्या छातीची धडधड वाढत होती... भाल्यावरची पकड घट्ट होत होती... उडी घ्यायला राम्या सज्ज होत होता...
मग अचानक झाडाच्या मागे झुडपात थोडी हालचाल झाली... राम्याचं ध्यान तिथं गेलं... हालचाल जरा वाढली आणि लगेचच फडफड असा पंखाचा आवाज झाला... घरटं सोडून शिकारी साठी रातवा बाहेर पडला होता...
मधूनच कुठूनतरी तरस, भेकरं, कोल्ह्यांचा आवाज होत होता... तेवढ्या पुरता आवाज व्हायचा आणि मग परत किर्रर्र्र शांतता... मध्य रात्र उलटून गेली... बराच वेळ झाला तरी काहीच हालचाल नव्हती... आणि एकदमच बकरीच मेमणं वाढलं... सारं लक्ष एकवटून राम्या भवतालचा अंदाज घेऊ लागला... थोड्या दूर झाडीत हालचाल झाली... दोन डोळे चमकू लागले... राम्याच्या कपाळावर घाम साठलां, आठ्या पडल्या आणि घामाचे थेंब नाकावरुन खाली टपकू लागले... हलक्या पावलांनी ते दोन डोळे पुढे सरकले... बकरु धडपडू लागलं जिवाच्या आकांतानी ओरडू लागलं... राम्याच अंग जरा कापू लागलं... त्याला काहीच ऐकू येईना झालं, सारं ध्यान त्या दोन डोळ्यांवर एकवटलं होतं... पुढच्याच क्षणी वाघानं बकरीवर विजेप्रमाणं झेप घेतली... वाघाच्या जबड्यातून निसटण्यासाठी बकरीनं शेवटची धडपड केली आणि तितक्यात राम्यानं वाघाच्या मानगुटीवर उडी घेतली... वाघानं प्रचंड मोठी डरकाळी फोडली... वार एकदम अचूक बसला... भाला वाघाच्या मानेतून आरपार गेला, रक्ताच्या धारा वाहू लागल्या... वाघ वेदनेमुळे केवीलवाण्या आवाजात डुरकू लागला... जखमी अवस्थेत पुढच्या पंजांनी वाघ राम्यावर झेपावला... राम्या भाल्यानं वाघावर वार करतच होता आणि तेवढ्यात अंत्या पण वाघावर वार करु लागला... राम्याच्या छातीतून, दंडातून रक्त ओघळू लागलं... राम्याचं आणि वाघाचं रक्त मिसळू लागलं... वाघ आणि राम्या झगडत होते... वाघाच्या पंजानी राम्याच्या मनगटाचे, खांद्याचे पार चिंध्या केल्या तरीपण राम्या वाघावर वार करत होता आणि तेवढ्यात अंत्यानं पुन्हा एकदा वाघाच्या मानेतून भाला आरपार केला... वाघानं शेवटची डरकाळी फोडली आणि शरीर जमीनीवर भिरकावलं... तडफडला आणि शेवटचा श्वास सोडला... राम्या त्याच्या बाजूलाच पडला होता... वाघरासाठी राम्याच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली... ‘जनावरांवर राम्याचा भलता जीव... हा तर जंगलाचा राजा... जखमी झाला आणि गावाकडं फिरकला... गावतल्या लहानग्यांवर हल्ला केला... मारला नसता तर गावकऱ्यांच्या जिवाला धोका होता...’

राणीवर हल्ला करणारा वाघ मारला गेला म्हणून गावकरी जरा निर्धास्त झाले... पण गण्याला ह्या वाघानंच मारलं का?...

एका आठवड्यात राम्याच्या जखमा भरु लागल्या... एका दुपारी राम्या घराच्या पडवीवर निजला होता... राम्याचा म्हातारा सकाळीच गुरं चरायला घेऊन जंगलात गेलता... गुरं चरायला लावून म्हातारा झाडाखाली थोडावेळ आडवा झाला... उठल्यावर आवाज देऊन गुरं जमवली तर एक कालवड दिसेना... आवाज देत रानात शिरला... बरंच आत गेल्यावर कालवड दिसली... रानात गोंधळल्या मुळं केवीलवाण्या आवाजात हंबरत होती... तीला हाकत परतताना म्हाताऱ्यांन काहीतरी ऐकलं... तो दचकला आणि भलत्या घाईनं सगळी गुरं घेऊन घरी पोहचला... म्हाताऱ्याला अस्वस्थ बघून राम्यानं विचारलं...

"काय रं बा... काय झालं?... इतका कश्यापाई दचकलाईस्?..."
घडलेल्या घटने बद्दल म्हाताऱ्यानं राम्याला सांगीतलं, पण म्हातारा खूपच अस्वस्थ वाटत होता...
"कसला आवाज?... इतका का घाबरलाईस्?..." असं बरच काही राम्या विचारु लागला...
म्हातारा काही बोलला नाही... नुसती नकारार्थी मान हलवून पडवीच्या कोपऱ्यात जावून बसला... राम्यानं पुन्हा-पुन्हा विचारलं तरी म्हातारा काही बोलेना... ह्यापुर्वी देखील असंच काहीतरी घडलं होतं... त्यावेळी सुध्दा तो काहीच बोलला नव्हता... ‘असं काय आपल्या बानं ऐकलं की त्यो इतका घाबरलाय’ हे राम्याला जाणून घ्यायचं होतं...

दुसऱ्या दिवशी सकाळीच कोयती कंबरेला अडकवून राम्या रानाकडं निघाला... पाच-सहा तास चालल्यावर तो दरी जवळ पोहचला... दरी भोवतीच्या रानात गच्च झाडी, वेली, काटेकुटे, पालापाचोळा ह्यामुळं एक-एक पाऊल मोठ्या जिद्दीनं टाकावं लागत होतं... पावलोपावली अंग खरचडत होतं... रानाशी झगडत राम्या भटकत होता...  मधेच विचार आला की दरीत उतरुन बघायला हवं, पण ते शक्य नव्हतं... कारण दरीत उतरायला वाट नव्हती... असणार तरी कशी? अजून पर्यंत कुणीच दरीत उतरलं नव्हतं... जंगली जनावरांचे वेगवेगळे आवाज रानभर घुमत होते... बरेचसे आवाज राम्याला देखील नविन होते... कोयतीनं वेली, झुडपं छाटीत राम्या पुढं सरकत होता... वेगळीच शांतता राम्याला जाणवू लागली... तिथल्या रानव्यानं त्याला भुल घातली... वेळेचं भान त्याला राहिलं नाही... काळोख पडू लागलां तसं तो भानावर आला आणि झपाझप रान कापीत गावाच्या दिशेने चालू लागला... तसं पाहिलं तर राम्या म्हणजे रानातलंच पाखरु पण हे रान निराळं आणि अंधारल्यामुळे जणू सारं रान खायला उठलं होतं... रान तुडवीत राम्या गावाकडं सरकत होता आणि तितक्यात एकदमच त्याला शीळ ऐकू आली... राम्या जागीच घट्ट झाला, शीळेच्या दिशेने पाहू लागला, पण काहीच हालचाल दिसेना...  शीळ खूप दिर्घ आणि खोल होती... कोण्या पक्ष्याची असणं शक्यच नव्हतं... पुन्हा तशीच शीळ राम्याच्या कानी पडली... अंधारल्यामुळे राम्याला स्पष्ट दिसेना तरी तो शीळ येत होती त्या दिशेने चालू लागला... परत शीळ ऐकू आली... ह्या वेळेस फारच जवळून कुणीतरी शीळ घालत होतं... तेवढ्यात राम्याला पायाजवळ हालचाल जाणवली... काही कळायच्या आतच राम्याचे पाय वेटोळ्यात अडकले... राम्याची धडपड सुरु झाली, पण काहीच फायदा झाला नाही... विजेच्या गतीनं वेटोळ्यांनी राम्याला छाती पर्यंत जखडलं...  राम्याला श्वास घेता येईना, त्याची शुध्द हरपू लागली आणि तेवढ्यात राम्याला त्याचं प्रतीबिंब समोरच्या दोन डोळ्यात दिसलं... वेटोळ्यांची पकड वाढली... ते दोन डोळे राम्याच्या डोक्यावर स्थीरावले आणि तोंड संपुर्ण फाकवून नागीणीनं राम्याला गीळायला सुरुवात केली... राम्याचं डोकं नागीणीच्या जबड्यात होतं आणि हळूहळू राम्याच अख्खं शरीर नागीणीनं गीळलं आणि नागीण तिथंच पडून राहिली...

घरी राम्याची म्हातारी वाट बघत होती... रात्र उलटून गेली तरी लेकरु आलं नाही म्हंटल्यावर म्हातारा-म्हातारीचा जीव कासावीस झाला... म्हातारीचं रडणं सुरु झालं कारण आज पर्यंत त्या जंगलात रात्र काढून कुणीच परत आलं नव्हतं... म्हातारा स्वतालाच शिव्या देऊ लागला...
"म्या त्याला समंद सांगाया हवं होतं... आता रातीच्या येळी त्या वंगाळ रानात त्याचा निभाव कसा लागायचा... म्या काल शीळ ऐकली... ती नागीणीचीच व्हती... हा त्यांचा विणीचा काळ... विणीच्या काळात नर-माद्या शीळ घालून एकमेकांना शोधीत्यात... ह्या काळात त्यांची भुक पण वाढते... पण हे समंद त्याला सांगीतलं असतं तर त्यो रानात गेला असता... त्यानं रानात जाऊ नये अन् काई घडू नये म्हणून म्या गप्प व्हतो... तर समंद इपरीतच घडलं..."

पहाट होताच जंगलात ऊब वाढली आणि पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु झाला... हळुहळू राम्या शुध्दीवर येऊ लागला... सारं अंग चिकट झालं होतं... त्यातुन फारच उग्र वास येत होता... भानावर येताच राम्याला जाणवलं की पोट चिरुन मेलेल्या नागीणीच्या देहावर तो पडलाय... कालच्या रात्रीचं त्याला आठवलं, पण आपण जिवतं कसे हे त्याला उमगेना आणि ह्या नागीणीला कुणी मारलं? हे ही कळेना... जरा जमीनीचा आधार घेत राम्या उभा राहिला... त्याचं लक्ष कमरेवरच्या कोयती कडे गेलं आणि आपण का जगलो हे त्याला उमगलं... नागीण राम्याला गीळत असताना कमरेला अडकवलेल्या कोयतीनं नागीणीच पोट चिरत गेलं आणि राम्या वाचला... राम्याला रानाचं खरच अभय होतं...

गावाच्या दिशेने राम्या चालू लागला... घडल्या प्रकारा बद्दल तो फारच अचंबित होता, पण ‘नागीण शीळ घालते?... म्हाताऱ्यानं हीच शीळ ऐकली होती का?... ह्या रानात अजून काय काय असेल?... गण्याचं काय झालं?... वाघनं खाल्लं की नागीणीनं गीळलं?...’ अश्या अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात जन्म घेतला...

समाप्त

मूळ स्त्रोत - http://murkhanand.blogspot.nl/2010/03/blog-post_16.html


खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...