Monday, November 5, 2012

चक्र - प्रकाश नारायण संत

वर्गातल्या आमच्या मित्रांच्याकडं पाहिलं तर पहिल्यांदा जोरदार,ठळकपणं आणि खणखणीत लक्षात येणारी गोष्ट म्हणजे जवळजवळ सगळ्यांचेच कपडे कुठं ना कुठं फाटलेले असणार. अगदी नवे असले तरी. मारामाऱ्या, काटेरी कुंपणांतून घुसाघूस, धुणं खच्चून बडवणारे घरचे गडी, असलं सगळं असल्यावर कपडे तरी काय करणार? फाटणारच बिचारे. ज्यांचे कपडे फाटलेले नसतात त्यांचे स्वतःपेक्षा एकदम मोठे तरी किंवा लहान तरी! मापानं काय नाहीच, असलं. परत शर्ट आणि चड्डीची बटणं म्हणजे काय विचारायची सोयच नाही. झाडावरच्या वाळलेल्या पानांसारखी, सारखी पडून जाणारी. बटणांचा हिवाळाच असणार शाळेत. सुताच्या गुंड्या घट्ट असणार पण त्यांची काजं वटारलेल्या डोळ्यांसारखी मोठी झालेली. त्यांतून त्या गुंड्यांचा सुळसुळाटच.आत गेलेली गुंडी बाहेर केव्हा आली समजणारच नाही. आत्ता आहे, आत्ता नाही, असलं.
बटणं जागेवर आणि आपल्या चड्ड्या पोटांवर ठेवणं यांत पोरांचा बराच वेळ जाणार. ड्रिलची पोरांना भीतीच. दोन्ही हात वर आले, कि चड्डी खाली गेलीच! खाली बसलेली पोरं हसतमुख, पण उभं राहिलेलं पोरगं कायम काळजीतच. असलं ते सगळं .

- चक्र (वनवास)
लेखक - प्रकाश नारायण संत.

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...