Monday, November 26, 2012

काचेचे भांडे - शिरीष पै

... घार पिलांना नजरेनं पोसते म्हणतात. तशी आईही मुलींच्या अब्रूचं सारखं रक्षण करीत असते. त्या काळात तर समजाच्या तोंडी एकच वाक्य असे, 'स्त्रीची अब्रू म्हणजे काचेचं भांडं, एकदा फुटलं कि पुन्हा सांधायचं नाही.' मुलगी वयात आली की तिच्या बोलण्या-चालण्या-वागण्याला डोळ्यात तेल घालून जपायचं हे तिच्या आईचं परम कर्तव्य होऊन बसायचं. 'मुलगी म्हणजे बापाच्या छातीवरची जळती शेगडी,' वयात आलेल्या मुलीचे बाप तेंव्हा म्हणायचे. 
आणि आता...आता काय परिस्थिती आहे? तीच! किंवा त्याहूनही भयानक...आजच्या ह्या जगात माणसाचे प्राण कसे सुरक्षित राहतील हे एकच भय माणसाला ग्रासून राहिले आहे. मग बायकांच्या अब्रूची तर गोष्टच सोडा! त्यातून 'बायकांची अब्रू म्हणजे काचेचं भांडं!, एखादा पुरुष जेव्हा आजच्या जगात स्त्रीवर बलात्कार करतो तेव्हा त्याच्या अब्रूचे खोबरे होत नाही. पण तो ज्या स्त्रीवर - किंवा बालिकेवर बलात्कार करतो - तिच्याकडे पाहण्याची लोकांची दृष्टी मात्र बदलते. त्या स्त्रीचेही मन दुभंगते. तिचा आत्मविश्वास फाटतो. तिच्या डोक्यावर घडलेल्या घटनांचा दुष्परिणाम होतो.
..का आपलं मन हे असं घडलं आहे? का समाजाचे विचार तरी अशा दिशेनं धावत असतात? आज जग पुढं गेलंय, समाज सुधारलाय, स्त्री सुशिक्षित झालीय, बंडखोर झालीय, स्वच्छंदी झालीय, निर्भय झालीय, तरी तिच्या अब्रूचा प्रश्न आला की लोक तसाच आणि तोच विचार करतात, असं का?
निसर्गही पुरुषाच्या बाजूचाच आहे. त्यानं पुरुषाला स्त्रीहून अधिक बलदंड केलं आहे. स्त्रीचा उपभोग घेऊनही तो मुक्त राहतो आणि स्त्रीला मात्र गर्भाचे ओझे वहावे लागते. स्त्री मिळवती झाली, घराबाहेर पडली तरी घरी परत येताच घराची जबाबदारी तिच्यावर अधिक पडते. घर ही पुरुषाची विश्रांती आहे, तर स्त्रीचा कैदखाना आहे. निसर्गानंच तिच्यावर अपत्यसंगोपनाची, कुटुंबाची जबाबदारी अधिक लादली आहे. अशा परिस्थितीत स्त्री मुक्त होणार कशी आणि कधी? कायद्यानं गर्भपात संमत केला आणि गर्भधारणा होऊ न देण्याची उत्तम साधनं उपलब्ध झाली तरी...तरीही झालेल्या मुलाचं ओझं स्त्री फेकून देणार कशी?

- काचेचे भांडे (सय)
लेखिका - शिरीष पै      

Sunday, November 18, 2012

पहाड प्रस्थान

बाळ केशव ठाकरे यांनी आयुष्यभर राजकारण केले, परंतु तरीही ते प्रचलित अर्थाने राजकारणी नव्हते. उमदा स्वभाव, दोन घ्यावे, दोन द्यावे ही वृत्ती आणि त्या जोडीला कलासक्त मन हे बाळासाहेबांचे वैशिष्टय़ होते. त्यामुळेच राजकारणात असूनही शिवसेना त्या अर्थाने राजकीय पक्ष नव्हता. ती एक संघटना होती. काळाच्या ओघात तयार झालेली. हा काळाचा ओघ बाळ ठाकरे यांनी अत्यंत तरुणपणी ओळखला हे त्यांचे वैशिष्टय़. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार हे प्रखर समाजसुधारणावादी. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ते एक प्रमुख अध्वर्यू. देशास स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली वैधानिक चाल पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने केली ती म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग. १९५६ सालच्या या विधेयकाने राज्यांच्या सीमा भाषिक तत्त्वावर नव्याने आखल्या जाणार होत्या, परंतु महाराष्ट्राच्या दुर्दैवाने मोरारजी देसाई आणि खुद्द पं. नेहरू हे मुंबईचा समावेश महाराष्ट्रात करण्यास अनुकूल नव्हते. काँग्रेसच्या राजकारणावर तेव्हा असलेल्या शेठजीच्या प्रभावामुळे असेल, परंतु मुंबई ही महाराष्ट्राला न देता गुजरातला देण्याचा घाट घालण्यात आला. त्या वेळचे काँग्रेसचे राज्यातले नेतृत्व इतके नतद्रष्ट होते की, स. का. पाटील यांच्यासारख्याने महाराष्ट्राच्या बाजूने उभे न राहता हे शहर केंद्रशासित करावे अशी भूमिका घेतली. त्यास पहिल्यांदा विरोध केला तो सी. डी. देशमुख यांनी. आपल्या बुद्धितेजाने तळपणारे सीडी हे रिझव्‍‌र्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते आणि नंतर पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीही. परंतु काँग्रेसच्या महाराष्ट्रद्वेष्टय़ा राजकारणाचा निषेध करीत देशमुख हे पंतप्रधान नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकत सरकारातून बाहेर पडले आणि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेस अचानक उंची आली. त्याच सुमारास मोरारजी देसाई यांच्या सरकारने संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार करून १०५ जणांचे जीव घेतले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावर अकारण रक्तशिंपण झाले. आंदोलनात रक्त सांडले की अस्मितेला खतपाणी मिळते. येथेही तसेच झाले. एरवी महाराष्ट्राची मागणी मान्य झाल्यावर आणि १९६० साली महाराष्ट्र मुंबईसह जन्माला आल्यावर हे आंदोलनाचे निखारे विझायला हवे होते. तसे झाले नाही. महाराष्ट्र निर्मितीनंतर अर्थातच संयुक्त महाराष्ट्र समितीचे जीवितकार्य संपुष्टात आले तरी महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या मुद्दय़ावर कायमस्वरूपी लढणारी एखादी संघटना असावी असा विचार बाळ ठाकरे या तरुणाने केला आणि 'फ्री प्रेस जर्नल'मधील आपली व्यंगचित्रकाराची चाकरी सोडून शिवसेना जन्माला घातली. संधी ओळखण्याचे कौशल्य हे ठाकरे यांचे वैशिष्टय़ होते.
त्या अर्थाने शिवसेना राजकीय पक्ष नव्हती. तिचे स्वरूप एकचालकानुवर्ती संघटनेचेच राहिले. सुरुवातीच्या काळात उनाडपणा करीत हिंडणाऱ्या बेरोजगार तरुणांना शिवसेना या संघटनेच्या झेंडय़ाखाली एकत्र यायची संधी मिळाली. बेरोजगारी, प्रगतीचा अभाव यामुळे समाजात साचलेले वैफल्य बाळ ठाकरे यांनी हेरले आणि अशा वैफल्यग्रस्तांना संघटनेखाली आसरा दिला. राज्यनिर्मितीनंतर शासकीय सेवेत रोजगाराच्या ज्या काही संधी होत्या त्या इंग्रजी भाषेच्या प्रभुत्वामुळे दाक्षिणात्यांनी मिळवल्या. अकुशल वा अर्धकुशल अशा मराठी तरुणास कोणी वाली नव्हता. राज्याच्या राजधानीतच आपण उपरे असल्याची भावना मराठी भाषकांत साचली होती. तिचा हिंसक निचरा करण्याची संधी शिवसेनेने दिली. 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' यांसारख्या टपोरी वर्गाला आकर्षित करणाऱ्या घोषणा देत शिवसेनेने मुंबईतील मराठी घरांतील असहाय्यता एकत्र केली आणि शिवसेनेच्या झेंडय़ाखाली अशांना संघटित केले. सुरुवातीच्या काळात सेनेस हेमचंद्र गुप्ते, सुधीरभाऊ जोशी, प्रमोद नवलकर असे नेमस्त नेते मिळाले. यातील नवलकर, जोशी आदी नंतरही सेनेत राहिले, परंतु सत्ताकारणाच्या रेटय़ात फेकले गेले. वास्तविक सेनेस मध्यमवर्गीय मराठी घरांत पोहोचवण्याचे काम केले ते सुधीरभाऊ जोशी वगैरेंनी. त्यांच्या नेतृत्वाखालील स्थानीय लोकाधिकार समितीने मराठी तरुणांना प्रशिक्षणाची सोय केली आणि सरकारी आणि खासगी आस्थापनांत नोकऱ्या मिळवून दिल्या. रिझव्‍‌र्ह बँक, एअर इंडिया, महिंद्र अँड महिंद्र, इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स आदी बडय़ा कंपन्यांत मराठी टक्का वाढला तो केवळ सेनेमुळे हे मान्य करावयास हवे. परंतु प्रसाराच्या नादात सेनेने पुढे आपले मूळ उद्दिष्ट हरवले आणि केवळ धुडगूस घालणाऱ्यांची संघटना असाच लौकिक प्राप्त केला. हे असे झाले याचे कारण कोणत्याही राजकीय पक्षास लागते ते आर्थिक प्रारूप शिवसेना कधीही देऊ शकली नाही. या संघटनेचा आर्थिक विचार वडापावच्या गाडीपलीकडे कधी गेला नाही. याची जाणीव एव्हाना बाळासाहेब झालेल्या ठाकरे यांना नव्हती असे नाही, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता आणि सुरुवातीला मराठी मध्यमवर्गीयांची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेनेची दहशत या वर्गात तयार झाली होती. हे असे झाले याचे कारण सेनेने दरम्यानच्या काळात स्वत:ला मुंबईतील कामगारांचे संप, आंदोलने तोडण्यासाठी वापरू दिले, त्यामुळे. वसंतराव नाईक असोत की वसंतदादा पाटील, सेना ही नेहमीच काँग्रेसशी मागच्या दाराने सौहार्दाचे संबंध ठेवणारीच होती. काँग्रेसच्या दिल्लीस्थित नेत्यांनी मराठी नेत्यांकडे सतत संशयानेच पाहिले. त्याचा प्रतिवाद काँग्रेसजनांनी सेनेची ढाल करून केला. अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांना हटविण्याचे प्रयत्न झाल्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावरून आपल्या पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला. त्यामुळे मधल्या काळात काँग्रेसचा उपसंघ असा सेनेचा लौकिक झाला होता. ठाकरे यांचे वैशिष्टय़ हे की, त्यांनी ही अवस्था ओळखली आणि सेनेला पुन्हा एकदा स्वत:चा चेहरा दिला. काँग्रेसला पर्याय म्हणून आपण एकमेव आहोत, असे चित्र त्यांनी निर्माण केले आणि केवळ एकटय़ाच्या जोरावर शिवसेनेला राज्यभर नेले. पुलोदच्या प्रयोगानंतर शरद पवार यांनी काँग्रेस सोडली होती तरी ते पुन्हा काँग्रेसमध्ये जातील, हे भाकीत पहिल्यांदा ठाकरे यांनी केले होते. त्याचप्रमाणे सोनिया गांधी याही सक्रिय राजकारणात येतील आणि नंतर पवारांनी आपला स्वत:चा राष्ट्रवादी पक्ष काढला तरी ते काँग्रेसशिवाय सत्ता स्थापन करू शकणार नाहीत हेही त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. दूरचे पाहण्याची सवय हे बाळासाहेब ठाकरे यांचे वैशिष्टय़ होते. १९९५ साली पहिल्यांदा महाराष्ट्रात काँग्रेसेतर सरकार येऊ शकले ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. त्यांचा त्या वेळचा प्रचाराचा झंझावात हा राजकारणाचा धडा होता. बाळासाहेबांनी त्या काळात शब्दश: महाराष्ट्र पिंजून काढला आणि आपल्याबरोबर भाजपला घेत एकहाती सत्ता आणली. परंतु पुढे सेनेच्या वाढत्या पसाऱ्याबरोबर केवळ मराठीची भूमिका तगणार नाही, हे त्यांनी जाणले होते आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वभावास अनुसरून सेनेला सौम्य करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे पुढे काय झाले आणि होत आहे, हे आता दिसत आहे.
परंतु या सगळ्याच्या वर दशांगुळे पुरून राहील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. स्वत: उत्तम व्यंगचित्रकार. बाळासाहेब केवळ व्यंगचित्रकार म्हणून राहिले असते तरीही ते मोठे झाले असते, इतकी ताकद आणि ऊर्जा त्यांच्या रेषेत होती. कलाकारांची गप्पांची मैफल जमवावी, हास्यविनोद करावेत आणि एकंदर वेळ मजेत घालवावा अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे राजकारणी बाळासाहेब आणि कलाकारांच्या गोतावळ्यातील बाळासाहेब या दोन भिन्न व्यक्ती होत्या. कोणत्याही सांस्कृतिक देवाणघेवाणीशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या सेना नेत्यास वा कार्यकर्त्यांस आणि उत्तम कवी कलाकारास बाळासाहेब एकाच वेळी आपले वाटत. हे त्यांचे आणखी एक वैशिष्टय़. कलाकारांत त्यांच्या इतकी ऊठबस असलेला नेता आज महाराष्ट्रात दुसरा कोणता नसेल.
या सगळ्यातून उठून दिसते ते बाळासाहेबांचे व्यक्त होण्याचे आणि संपर्क साधण्याचे कौशल्य. मोबाइल, इंटरनेट किंवा साधा फोनदेखील नव्हता त्या काळात या माणसाने एक गोळीबंद संघटना उभारली. त्यांच्या एका शब्दानिशी, कसलाही मागचापुढचा विचार न करता स्वत:ला झोकून देणारे हजारो तरुण तयार झाले हा एका अर्थी राजकीय चमत्कार होता आणि अचंबित व्हावे असेच काम होते. तिकडे मराठी वृत्तीशी साधम्र्य सांगणाऱ्या प. बंगालने केवळ राज्यपातळीवर राहूनदेखील राष्ट्रीय नेता होता येते हे ज्योती बसू यांच्या रूपाने दाखवून दिले, तर बाळासाहेबांनी कधीही महाराष्ट्राची वेस ओलांडली नाही. तरीही अनेक राष्ट्रीय प्रश्नांवर ते काय भूमिका घेतात याकडे राजकीय पक्षांचे लक्ष असे. मग तो पंजाबचा प्रश्न असो की अयोध्येतील राम मंदिराचा. 
बाळ ठाकरे यांनी नेहमी तगडे आणि उमदे राजकारण केले. लाखालाखांची सभा मारून मित्रांच्या गराडय़ात गप्पांचा फड रंगवणारा हा राजकारणी होता. त्यांचे कर्तृत्व स्वनिर्मित होते. दादरच्या चौपाटीवर उगवलेला हा राजकीय पहाड साऱ्या राज्याच्या राजकारणास कवेत घेऊन होता. आज तो कोसळला. या पहाडाचे प्रस्थान राज्यास चटका लावणारे आहे.


- लोकसत्ता (संपादकीय/अग्रलेख)
दि. १८/११/२०१२, रविवार  

Thursday, November 15, 2012

पु. लं. - एक आधार

पु लंच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकसत्तेने एक लेख प्रकाशित केला होता ज्यामध्ये पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या या देण्याच्या आनंदाचं अतिशय निर्मळ विवरण स्वत: पु लंनी एका पत्रातून केलेलं आहे. या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं.

त्याचंच हे उत्तर -
 
१० जुलै १९५७,
प्रिय चंदू

रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का?

वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे.

तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस?

पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो.

तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो.

पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.

तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही?

तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.

तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे!

तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.

तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.

हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे.
तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?

जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षेत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो.

तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!

लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे.

तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified.

My dear boy, whose deaths are justifiable?

माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का?

ज्या दिवशी जन्माला येणं जस्टीफायेबल  होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.

जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.

तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.

कळावे,

भाई.


मूळ स्त्रोत - http://singletab.com/?p=1068

Saturday, November 10, 2012

गुलमोहर - शिरीष पै

          खिडकीबाहेर एक प्रचंड गुलमोहराचा वृक्ष आंपली दीर्घ छाया पसरून उभा होता. त्याच्या हिरव्यागार फांद्या थेट माझ्या खिडकीला भिडल्या होत्या. दिवसभर त्या वाऱ्यानं डुलत राहायच्या. जोराचा वारा आला की माझ्या टेबलावर असंख्य पिवळी पानं येऊन पडायची. पावसाचे दिवस होते ते. सारा गुलमोहर हिरवागार, अधिकाधिक हिरवागार होत चालला होता. मधून मधून मी त्या झाडाकडे बघत राहायची आणि मग आपल्या कामाकडे वळायची. तेवढंच मन टवटवीत होऊन जायचं. असे थोडे दिवस गेले आणि मग एके दिवशी पोपटी पोपटी राघूंचा एक थवाच्या थवाच त्या गुलमोहरावर राहायला आला आणि सारा दिवस कलकल करू लागला.
          असे बरेच दिवस गेले. पावसाळा संपला होता. राघूंचा कळप गुलमोहराचा निरोप घेऊन निघून गेला होता. आता त्याची पानं गळू लागली होती. हळूहळू त्याच्या फांद्या उजाड होत होत्या. शिशिरागम झाला आणि अवघ्या काही दिवसातच गुलमोहर पार उजाड होऊन गेला. त्या रोडावलेल्या, खंगलेल्या गुलमोहराकडे मला बघवेना. एके दिवशी मी माझ्या टेबलामागची खिडकी बंदच करून टाकली.
          थंडी संपली, हवा हळूहळू गरम होत चालली. माझी खिडकी बंदच होती. एके दिवशी फारच उकडत होतं म्हणून मी खिडकी उघडली तर काय! ओहो, माझ्या लाडक्या गुलमोहरावर लाल कळ्या फुटल्या होत्या. अरेच्या! अशी कशी विसरले मी त्याला? हे तर गुलमोहरांची झाडं बहरण्याचे दिवस. आता रस्तोरस्ती गुलमोहर फुलताहेत. काही काही गल्ल्या तर गल्लीभर बहरलेल्या गुलमोहरामुळे अथांग लाल होऊन गेल्या आहेत. जिवंत केलंय हे शहर गुलमोहरांनी.
          त्या वर्षी मी तो गुलमोहर पूर्ण बहरत गेलेला पहिला, पूर्ण फुलात गेलेला पहिला, पूर्ण जिवंत झालेला पहिला. ते वर्ष! एका गुलमोहराच्या सहवासात पूर्णपणे जागून घेतलेलं ते वर्ष. त्या वर्षानंच मला हे सांगितलं, हे शिकवलं कि इमारती जुन्या होतील, दगड झिजतात, विटा ढासळतात, पण त्यांच्याच बाजूला उभे असतात गुलमोहर, जे पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा नवा बहर धारण करतात, लाल लाल फुलांनी उमलून जातात आणि शेवटी त्या लाल फुलांचा सडा आपल्याच पायावर सांडत राहतात...


- गुलमोहर (सय)
लेखिका - शिरीष पै.  

Thursday, November 8, 2012

स्टेशन (२) - डॉ. अनिल अवचट

          या स्टेशनने मला अनेक प्रसंग दाखवले. पण रेल्वे ब्रिजवरच्या त्या प्रसंगाने मला खूपच अस्वस्थ केलं. एका कुटुंबानं ट्रंक, गाठोडं टाकून मुक्काम केला होता. एक फाटक्या कपड्यांतली बाई भिंतीकडे तोंड करून झोपली होती. लहान मूल पलीकडे खेळत होतं. तिचा नवरा दारू पिऊन तिच्यापाशी बसून तिला इकडे वळवायचा प्रयत्न करीत होता. त्याला आत्ताच्या आत्ता तिच्याशी शरीरसंबंध करायचा होता. तिला शरमेने मेल्याहून मेले झालं असणार. नवरा तोंडाने तिच्या सर्व अवयवांचा उद्धार करीत होता. तिचे कपडे ओढून काढायचा प्रयत्न करीत होता. ती कपडे अंगाभोवती घट्ट धरून ठेवायचा आटोकाट प्रयत्न करीत होती. जाणारे येणारे लोक  बघायला थांबले होते. कोणी हसत होते, तर कोणी त्याला प्रोत्साहनही देत होते. मला तिथं उभं राहवेना.
          हजारो वर्षांपूर्वी लिहिलेलं 'महाभारत' आजही घडतंय, हे या स्टेशनवरच पाहायला मिळालं. अशा विटंबना तटस्थपणे पाहणारे आपणही कोण आहोत, हेही इथंच समजलं.
         त्यामुळे या स्टेशनला कुणी घाणेरडं, बकाल म्हणोत, मला मात्र इथं यायला आवडतं, कारण ते आपल्याला दाखवतं, की आपण खरे कसे आहोत.

- स्टेशन (पुण्याची अपूर्वाई)
लेखक - डॉ. अनिल अवचट.

वैज्ञानिक पुलं

           साहित्य, संगीत,  नाटक  इ.  कला क्षेत्रांत रमत असताना,  पुलंना आप ल्या  संस्कृतीची, जुन्याची ओढ होती,   परंतु सनातनी  गोष्टींची चीड  होती.  समाजाला उपकारक असे  शोध, त्यामागची शास्त्रज्ञांची धडपड याचे त्यांन कौतुक वाटे. वैज्ञानिक उपक्रम राबवणाऱ्या संस्था, प्रयोगशाळा, पुण्यातील 'आयुका' सारख्या संस्थांना सुद्धा 'पु. ल. देशपांडे फाऊंडेशन' तर्फे देणग्या दिल्या होत्या. पुलंचा एक कमी परिचित पैलू म्हणजे, समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा, व विशेषतः मराठीतून विज्ञानाचा प्रसार व्हावा, याबद्दल त्यांना खूप आस्था होती.
            'मराठी विज्ञान परिषदेने' १९७१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'अस्मिता महाराष्ट्राची' या ग्रंथाला पुलंची प्रस्तावना होती! त्या प्रस्तावनेतील काही भाग....

            ...मी जीवनातील कोडी बुद्धीने आणि अभ्यासाने जाणून घेईन, ही जिद्द आणि मला ती जाणता येतील हा आत्मविश्वास म्हणजे वैज्ञानिक दृष्टी. माणसाला अज्ञात अशा असंख्य गोष्टी आहेत. परंतु त्या अज्ञाताचा भेद करून त्या मी ज्ञात करून घेईन, ह्या धडाडीने निसर्गाचे विराट स्वरूप जाणून घेणे हे वैज्ञानिकांचे कार्य आहे. आणि ते वैयक्तिक साक्षात्काराच्या समाधानात न राहता, त्या ज्ञानाभवती कसलीही गूढ वलये किंवा बुवाबाजी न करता, ते ज्ञानसोपान स्वच्छपणे ग्रंथातून दाखवणारे हे जगाचे खरे उपकर्ते आहेत. वैयक्तिक मोक्षाकडून सामाजिक मोक्षाकडे नेणारे विज्ञान हे जपतप - अनुष्ठानापेक्षा अधिक तारक आहे. विठ्ठलाला अठ्ठावीस युगात हटवता न आलेला पंढरपुरातला कॉलरा विज्ञानाने हटवला..नव्या मोटारीपुढे नारळ फोडून तिची गुलाल लावून पूजा करणारे मोटार नावाची एक नवीन देवता निर्माण करतात. ते मनाने वैज्ञानिक झालेले नसतात. खंडाळ्याच्या घाटात एक शिंगरोबाचे देउळ आहे. त्याला दहा पैसे ठवून प्रवास निर्विघ्न कर असे म्हणणाऱ्यांना दहा पैशाच्या जकातीवर देव खूष होतो, हा देवाचा अपमान आहे असे वाटत नाही. त्या शिंगरोबाला दहा हजार रुपये दिले तरी पेट्रोल शिवाय मोटार चालणार नाही...वैज्ञानिकांनी आता विज्ञान परिषद स्थापन केली आहे. खरे सांगायचे तर विज्ञानाच्या बाबतीत आमची पिढी ह्या पोरांसमोर साक्षात अडाणी आहे...चंद्रावरच्या स्वारीचे माझे शिक्षण माझ्या कुटुंबातील बालगोपालांनी केले आहे. आणि हे सारे ज्ञान त्यांनी मराठी पुस्तकांतून आणि लेखांतून मिळवले आहे. मराठी परिभाषेला हसणारे लोक मराठी भाषेला मिळणाऱ्या ह्या नव्या शक्तीकडे पाहतच नाहीत..


स्रोत - अज्ञात.

Tuesday, November 6, 2012

देवगडचो हापूस सगळ्या आंब्यांचो बापूस - पु. ल. देशपांडे

काही वर्षांपूर्वी देवगडकरांनी देवगडचे हापूस पु. लं. ना भेट म्हणून पाठवले होते. पहिला आंबा खाल्ल्यानंतर पु.लं.नी लगेच त्यांचे आभार ज्या पत्रातून व्यक्त केले ते हे पत्र.


मूळ स्रोत - http://devgadmango.com/blog/?p=122

लिहावसं वाटलं ...कारण - विठ्ठल कामत

रायबहादूरांशी ओळखबिळख काही नव्हती. ओळख असण्याचा काही सवालच नव्हता. संबंध असलाच, तर तो एवढाच की मी ज्या क्षेत्रात नवखेपणानं काही धडपड करत होतो, त्या हॉटेल इंडस्ट्रीचे ते अनभिषिक्त बादशाह होते. मला त्यांना भेटायचं होतं. पायात कोल्हापुरी चप्पल आणि साधीसुधी, किंचित गबाळी वेशभूषा, ह्यामुळे मला वॉचमननं अडवलं.
"ए SS उधर नहीं जानेका! उधर बडा साब बैठा है!"
"मी 'बडा साब'लाच भेटायला आलो आहे." मी म्हटलं.
रायबहादूर ओबेरॉय ह्यांच्यासमोर उभं राहून मी त्यांना अभिवादन केलं. त्यांनी विचारलं, "तुम कंत्राटदार है?"
मी म्हटलं, "नो सर! मैं हॉटेलवाला है!"
'हॉटेलचा मालक?' त्यांच्या नजरेत कौतुक उमटलं आणि किंचित अविश्वासही.
'वीसएकवीस वर्षांचा मुलगा हॉटेलचा मालक आहे?'
"किधर है तुम्हारा हॉटेल?"
"इधरही! चर्चगेट स्टेशन के पास!"
'अच्छा? क्या नाम है तुम्हारे हॉटेलका?"
"सम्राट, सर! फुल्ली एअर कंडीशन्ड हॉटेल है! बंबईमें पहली बार!"
माझ्या आवाजातून अभिमान उतू जात होता. रायबहादूर गोंधळात पडले.
"व्हॉट डू यू मीन बाय, फुल्ली एअरकंडीशन्ड?"
मग मी त्यांना 'हॉटेलमधला कसा, एखादाच छोटा पार्ट बंद करून  एअरकंडीशन्ड केलेला असतो.' वगैरे समजावून सांगितलं.
त्यावर सर्व समजल्यासारखी मान हलवून ते म्हणाले,
"ओह् यू मीन यू हॅव अ रेस्तराँ!"
त्या वेळपर्यंत मला हॉटेल आणि रेस्टॉरंट यामधला फरक ठाऊक नव्हता. आणि रेस्टॉरंटला उच्चभ्रू लोक 'रेस्तराँ' म्हणतात हेही ठाऊक नव्हतं.
मी मान डोलवून म्हणालो,
"येस, येस सर!"
मग मला न्याहाळीत त्यांनी विचारलं,
"क्या बनना चाहते हो?"
त्यांच्या नजरेत नजर मिळवून मी म्हणालो,
"आपसेभी बडा हॉटेलिअर बनना चाहता  हू़ँ!"
 रायबहादूर खरंच ग्रेट माणूस. माझ्यावर न रागवता, मला न हसता, ते मनापासून उद्गारले,
"हाँ हाँ, क्यों नहीं? जरूर बन सकते हो!".......


........ह्यानंतर बऱ्याच दिवसांनी मी रायबहादूर ओबेरॉय ह्यांना भेटलो. त्यांनीही माझं कौतुक केलं. मग म्हणाले,
"आयुष्यात मी इतर अनेक माणसांना विसरलो. पण तुला कधी विसरलो नाही. माझ्याच प्रॉपर्टीवर येऊन, माझ्यासमोर उभा राहून, तू माझ्यापेक्षा मोठा होण्याचं मनोगत व्यक्त केलंस. असा माणूस मला जन्मात भेटला नव्हता!"

- लिहावसं वाटलं ...कारण (इडली, ऑर्किड आणि मी)
लेखक - विठ्ठल कामत 

Monday, November 5, 2012

कराचीच्या लालाजींची आणि लोकमान्य टिळकांच्या आवाजाची गोष्ट

     बुधवार, दि. २२ सप्टेंबर, १९१५ची ही गोष्ट. त्या रात्री पंधरासोळा वर्षांचा एक तरुण आपल्या ध्वनिमुद्रणयंत्रासह थेट कराचीहून गायकवाडवाड्यात गाणं ऐकायला आला होता. या तरुणानं ध्वनिमुद्रिकेत कैद केलेला लोकमान्य टिळकांचा आवाज गेल्या महिन्यात केसरीवाड्यात पुन्हा एकदा निनादला. हे साध्य झालं ते हे ध्वनिमुद्रण करणार्‍या शेठ लखमीचंद ईसरदास नारंग यांच्यामुळे, हे ध्वनिमुद्रण जपून ठेवून ते जतन करणार्‍या श्री. मुकेश नारंग यांच्यामुळे आणि ते लोकांसमोर आणण्यासाठी प्रचंड कष्ट केलेल्या माधव गोरे, मंदार वैद्य व श्रीमती शैला दातार यांच्यामुळे.
          सेठ लखमीचंद ईसरदास नारंग हे कराचीतले धनवंत व्यापारी. आधुनिक कराचीचे एक शिल्पकार. १८९९ सालचा त्यांचा जन्म. वडिलांचा, म्हणजे ईसरदास नारंगांचा, हिर्‍यांचा व्यापार होता. कराचीतल्या मीठादर भागातल्या बावन्न खोल्यांच्या भल्यामोठ्या हवेलीत नारंग कुटुंबीय राहत असत. लालाजी, म्हणजे सेठ लखमीचंद, विलक्षण हुशार, हरहुन्नरी आणि कष्टाळू होते. त्या काळच्या शिरस्त्याप्रमाणे, आणि ईसरदास नारंगांचं वय होत आल्यामुळे, वयाच्या दहाव्या वर्षी ते वडिलांच्या व्यवसायात उतरले. वयाच्या पंधराव्या वर्षी लालाजींची ओळख कराचीतील एक प्रतिष्ठित, दयाळू आणि धनवान असामी म्हणून होती. एक मोठ्ठं साम्राज्य त्यांनी कोवळ्या वयात उभं केलं होतं. साहजिकच भारतातल्या तमाम संस्थानिकांशी, उद्योजकांशी आणि राजकीय नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते.
          ईसरदास नारंग व्यवसायाच्या कामांनिमित्त अनेकदा मुंबईला जात असत. या मुंबईभेटींमध्ये शास्त्रीय गायनाच्या बैठकींना, संगीतनाटकांना हजेरी लावणं ठरलेलं असे. अगदी लहानपणापासून लालाजी आपल्या वडिलांबरोबर मुंबईला अशा कार्यक्रमांना जात. या काळात कानी पडलेलं गाणं आणि एकुणातच गाण्याची असलेली उपजत आवड यांमुळे लालाजीही वयाच्या दहाव्याबाराव्या वर्षापासून बैठकींना हजेरी लावू लागले. हे संगीतप्रेम दृढमूल झालं ते अमेरिकेत लागलेल्या ध्वनिमुद्रिकांवर आवाज सुईच्या मदतीनं कैद करण्याच्या शोधामुळे.  
      त्या काळातल्या संगीताला आश्रय देणार्‍या धनवंतांपेक्षा लालाजी वेगळे होते. कलेइतकंच त्यांचं कलावंतांवर प्रेम होतं. प्रचंड पैसा मिळवला तरी कलावंताला, त्याच्या कलेला मान देणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटत असे. त्यामुळे बालगंधर्व, मा. कृष्णराव यांसारख्या गायकांबरोबरच, अब्दुल करीम खाँसाहेब, उस्ताद फैय्याजखाँसाहेब, सुरेशबाबू माने, केसरबाई केरकर अशा अनेक दिग्गजांशी त्यांचा स्नेहबंध निर्माण झाला. लालाजी या थोर गायकांच्या बैठकींना आवर्जून हजेरी लावत, किंवा त्यांना आपल्या घरी आमंत्रण देत. त्यांचं गाणं मनसोक्त ऐकत. या महान कलावंतांचं गाणं जतन करून ठेवणं अत्यावश्यक आहे, हे लालाजींनी ओळखलं होतं. प्रत्येकच कलावंत काही व्यावसायिक ध्वनिमुद्रणांसाठी अनुकूल नसे. शिवाय अशा खाजगी बैठकींची ध्वनिमुद्रणं बाजारात कशी उपलब्ध असणार? आपल्या दिवाणखान्यातल्या या मौल्यवान स्वरांचा आनंद नंतरही लुटता यायलाच हवा, म्हणून ते बैठकी ध्वनिमुद्रित करून ठेवत. खरं म्हणजे संगीतातली नजाकत, बारकावे आणि शुद्धता या ध्वनिमुद्रणयंत्रामुळे लोप पावतात, अशी तत्कालीन दिग्गजांना खात्री होती. त्यामुळे ध्वनिमुद्रणं करण्यासाठी ते नाखूश असत. पण लालाजींच्या संगीतप्रेमाबद्दल, त्यांच्या दिलदार वृत्तीबद्दल, त्यांच्यातल्या माणूसपणाबद्दल या कलावंतांच्या मनात यत्किंचितही किंतु नव्हता. त्यामुळे हे कलावंतही लालाजींसमोर गाताना भरभरून गात. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे ध्वनिमुद्रण करू देत. १९१० सालापासून लालाजींनी अशी ध्वनिमुद्रणं करायला सुरुवात केली होती. 
        लालाजी दरवर्षी चारपाच महिने पुण्यात येऊन राहत असत. गाणं ऐकण्यासाठी. लालाजी येणार त्याच्या महिनाभर आधी बसमधून त्यांचे सेवक पुण्यात दाखल होत. गणेशखिंड रस्त्यावर मफतलाल बंगल्याशेजारी डनलेवन हाऊस नावाचा मोठा बंगला होता. हा बंगला लालाजींनी भाड्यानं घेतलेला असे. तिथे लालाजींचे सेवक अगोदर सारी व्यवस्था लावत. मग एका ट्रकातून लालाजींची ध्वनिमुद्रण यंत्रं कराचीहून येत. मग विमानातून लालाजी पुण्याला येत. गणेशोत्सवाच्या जरा आधीच लालाजींचं आगमन होई. गणेशोत्सवात पुण्यात दररोज जलसे असत, आणि बालगंधर्व व मास्तर कृष्णराव यांचं गाणं या जलशांमध्ये ऐकायची संधी मिळत असे. शिवाय इतरही दिग्गज गायक गणरायाच्या चरणी आपली सेवा अर्पण करत असत. लालाजी क्वचित पाचगणीला जात. तिथे ’सकाळ’च्या संस्थापक-संपादक असलेल्या डॉ. नानासाहेब परुळेकरांच्या बंगल्यावर त्यांचा मुक्काम असे. या मुक्कामात रोजच गाण्यांच्या बैठकी होत. लालाजी गायकांना मोठ्या मानानं पुण्याला बोलावत. त्यांचा आदरसत्कार करत. त्यांच्या बैठकी आयोजित करत, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या बैठकींचं ध्वनिमुद्रण करत. पुण्यात किंवा आसपासच्या शहरात ’गंधर्व नाटक कंपनी’चा मुक्काम असेल, तर लालाजी नाटकांना हजेरी लावत. नाटक संपल्यानंतर कंपनीतल्या प्रत्येकाला चांदीची नाणी भरलेला चांदीचा तांब्या देत. 


- कराचीच्या लालाजींची आणि लोकमान्य टिळकांच्या आवाजाची गोष्ट
लेखक व संकलक - चिनूक्स (मायबोली)

संपूर्ण लेखासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.


स्टेशन - डॉ. अनिल अवचट

       लहानपणापासून मला रेल्वेतल्या टी. सी. या व्यक्तीविषयी कुतूहल आहे. आकर्षण आणि भीतीही. ट्रेनमध्ये टी. सी. तिकीटं तपासायला डब्यात आला,की माझ्या छातीत धस्स होतं. कल्पनेनंच मला वाटतं की, मी तिकीट घरी विसरलोय किंवा येताना कुठंतरी पाडलंय. खिशात शोधू लागतो आणि खिशात असूनही ते हाताला लागत नाही. मग आता, मघा कल्पना केली तसं खरोखरीच होणार. आता पेनल्टी किती भरावी लागते, कोण जाणे. ट्रेनमध्ये कुणी ओळखीचं भेटलं होतं का, की ज्याच्याकडे पैसे उसने मागता येतील. असा विचार सुरु. पुन्हा एकदा शांतपणे सगळं बघितल्यावर ते सापडतं आणि मग हुश्श.
         जेव्हा एखाद्या स्टेशनात गाडी थांबते, तेव्हा टी. सी. प्लॅटफॉर्मवर डब्याच्या दारासमोर उभा राहतो. लोक त्याला येऊन चिकटू लागतात. हा यादी बघत असतो. त्यावेळी मला  टी. सी. चा खूप हेवा वाटतो.
          एकदा एका  टी. सी.शी माझ्या निवांत गप्पा झाल्या होत्या.
      पुण्याहून नागपूरकडे महाराष्ट्र एक्स्प्रेसने निघालो होतो. रात्री साडेदहा-अकराला इथून सुटली. कुण्या संस्थेने बोलावलं असल्यानं  फर्स्टक्लासचं तिकीट काढलं होतं. डब्यात गर्दी नव्हती. दोन-चार कंपार्टमेंटमध्ये तुरळक माणसं होती. मी तर एकटाच होतो. पुणं सुटल्या सुटल्या काही वेळातच पन्नास-पंचावन्न वयाचे, काळा कोट, चष्मा घातलेले  टी. सी. माझ्या कंपार्टमेंटमध्ये येऊन बसले. यावेळी माझं तिकीट हातात तयार होतं. तिकीट बघून त्यांनी हातातील कागदावर खूण केली. ते उठू लागताच मी म्हणालो, "काम संपलं असलं तर बसा की इथंच." ते बसले. कुलकर्णी त्यांचं नाव.
       मी म्हटलं, "काय आपलं पुणं स्टेशन स्वच्छ होतं हो पूर्वी? आता मी पाहतो, तर इथं कितीतरी माणसं स्टेशनात उभ्या असलेल्या गाड्यांचे संडास वापरतात. स्टेशनात कसा वास येतो. काही उपाय नाही का यावर?"
         ते म्हणाले, "अहो, सात-आठशे माणसं या स्टेशनात राहतात. तुम्ही रात्रीच्या वेळी सहा नंबर प्लॅटफॉर्मवर जा. तिथं तर रेग्युलर स्वयंपाकच चाललेला असतो. काटक्या जमवून आणतात. तीन दगडांच्या चुली मांडतात आणि सुरु. बरं यांच्या गरजा कमी. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरवलं की, एकदा या सगळ्यांना बाहेर काढून यांच्यावर खटले भरायचे."
          "मग?"
          "आमचा सगळा स्टाफ एकत्र केला आणि पोलिसांच्या मदतीने आम्ही दोनशे लोक उचलले. अटक करून रेल्वे कोर्टापुढे उभे केले. त्यांना कोर्टाने तुरुंगात पाठवलं. लहान मुलं असली, तर रिमांड होममध्ये पाठवलं. ती मोहीम आम्ही पुढं चालूच ठेवली. दुसऱ्या दिवशी दोनशे पाठवले. तिसऱ्या दिवशी कोर्टाचा निरोप आला की, आता माणसं पाठवू नका, कारण तुरुंगातून, रिमांड होममधून आता जागा नसल्याचं कळवलंय. बोला आता. ठीक आहे. त्यांनी तरी कुठं जायचं? राहा बाबा हो."
          मी म्हटलं, "पण स्टेशनात काही असलं, तरी हा फर्स्टक्लासचा डबा चांगला वाटला मला. प्रशस्त आहे. स्वच्छ आहे."
          "अहो, हा काहीच नाही. पूर्वी ब्रिटीशांच्या काळात फर्स्ट क्लासचा काय रुबाब होता! आम्हीसुद्धा या डब्यात पाय ठेवायला घाबरायचो. इतकी स्वच्छता. इथले अटेंडंटसुध्दा अगदी तयार. आता ह्या आपल्या पुढाऱ्यांचं राज्य आलं. काही संस्कृती नाही हो यांना. यांच्याबरोबर दहा-वीस चमचे मंडळी. जेवतात कसे? कांदे हाताने फोडतात. त्यांच्या साली इथेच डबाभर उडत असतात. काही म्हणायला गेलं की डाफरतात. आईमाईचा उद्धार. यांच्यातल्या  पुढाऱ्याकडे फर्स्ट चा पास किंवा कूपन असतं. पण इतरांची सेकंडची तिकिटं. जागा मात्र इथल्या अडवतात."
          "मग तुम्ही काय करता?"
         "रागरंग पाहून करतो. एकदा मात्र मी त्यांची तिकिटं चेक केली. बाकी सगळे सेकंडचे निघाले. मी तिकडे जायला सांगताच सगळे वाघासारखे गुरगुरायला लागले. मी पुढाऱ्यांना हात जोडून सांगितलं की, 'आपल्या माणसांना तिकडे मी अॅडजस्ट करायला सांगतो. त्यांनी तिकडं जाण्यात तुमची शोभा आहे. मी इथं गाडी थांबवू शकतो. आमचे अधिकारी येतील. तुमची शोभा राहणार आहे का?' मग दिलं पाठवून त्यांनी इतरांना सेकंडमध्ये."
           "स्टेशनवर तुमचा पब्लिकचा संबंध येतो. तुम्ही पब्लिकला कसं हँडल करता?"
           "स्टेशन आलं की आम्ही खाली जाऊन उभं राहतो. पब्लिक येतंच. जागा असेल तर देऊन टाकतोच. पण जागा नसली, तर काय करायचं? आपल्याला जागा मिळणार नाही; असं लक्षात आलं, की आधी गोडीनं बोलणारे लोक आवाज चढवतात आणि शेवटी तर शिवीगाळही करतात."
           "मग तुम्ही काय करता?"
         "काय करणार? आपलं ऐकून घ्यायचं. आमचे इतर टी. सी. लोक यावर फार चिडतात. वैतागतात. मी त्यांना म्हणतो, 'अरे, रेल्वे खातं आपल्याला जो पगार देतंय ना, तो शिव्या खाण्यासाठीच आहे, असं समजायचं. नाहीतर इतरांसारखं आपल्याला कुठं कष्टाचं काम करावं लागतं? स्टेशनातून लिस्ट आणायची, त्याप्रमाणे लोक आहेत की नाही बघायचे, खुणा केल्या कि झालं काम. नंतर अधूनमधून येणारे प्रवासी चेक करायचे. दोन-चार तिकीटं फाडायची. संपलं. आपल्याला इतर क्लार्क लोकांसारखं पत्रांना उत्तरं द्यावी लागत नाहीत. फायलिंग करावं लागत नाही. एका जागी सात-आठ तास बसून रेटून काम करावं लागत नाही. मग सरकार हे कशाला पैसे देईल? शिव्या खायलाच की नाही?"
          मी हसू लागलो. म्हणालो, "पण या रात्री अपरात्रीच्या ड्यूट्यांमुळे तुमचं रोजचं जीवन खूप डिस्टर्ब नाही का होत?"
          "होतं न. रात्री जिथं ड्यूटी एंड होते, त्या स्टेशनात आमच्यासाठी झोपायची सोय असते. पण ती कशी, तर 'ही खोली आणि पसरा इथं' या टाइपची. तिथं एक पोरगा असतो. तो आम्ही मागितलं, तर जेवण आणून देतो. मग झोपायचं. पण या स्टेशनच्या गडबडीत झोप लागत नाही. परत काही तासांतच दुसरं कनेक्शन असलं, तर त्या गाडीला उठावंच लागतं. मुलाला सांगून ठेवतो उठवायला. समजा, दुसरी गाडी रात्री अडीचला आहे, तर उठवावं लागत नाही. आधीच टक्क जागे असतो."
           "आणि घर?"
           "इतक्या अपरात्री घरी जातो की आता आमची मुलंही ओळखीनाशी झाली आहेत. ती काय करतात, काय शिकतात हेही माहित नाही. मिसेस सगळं बघते. कधी सणवार, लग्नाला जाणं हे आम्हाला जमत नाही. आता आम्हाला घरचे लोक गृहीतच धरत नाहीत. हे येणारच नाहीत, तर यांना कशाला विचारायचं म्हणतात. समजा, आम्ही अमुक कार्यक्रमाला येतो म्हटलं तर त्यांनाच आता नको असेल. त्यामुळे नातेवाइकांच्या ओळखी नाहीत. मित्रमंडळी नाहीत. माझी रिटायरमेंट जवळ आलीय. नंतर काय करणार, कसं होणार ते माहित नाही. मुलीसाठी मिसेस बघतेय स्थळं. समजा लग्न जमलं आणि मी जर तिथं उभं राह्यलो, तर नातेवाईक मिसेसना विचारतील, 'हा कोण माणूस आहे?'"
           असं म्हणून ते हसू लागले.


- स्टेशन (पुण्याची अपूर्वाई)
लेखक - डॉ. अनिल अवचट.
  
  

वीज - प्रकाश नारायण संत

परवा आम्ही झाडाखाली बसलो होतो तेव्हा ती असंच काहीतरी सांगत होती आणि मला तिच्याकडं पाहायची सारखी भीती वाटत होती म्हणून पाहतच नव्हतो...तर हातवारे करता करता ती एकदम थांबली आणि माझ्याकडं टक लावून पाहत म्हणाली,
"माझ्याकडं पाहत का नाहीस रे तू?"
तिनं तो प्रश्न विचारल्यावर मी अगदी गडबडूनंच गेलो. आज्जी एखादं काचेचं भांडं न फोडता वरती न्यायला सांगते तेव्हा ते नेताना वाटतं तसं वाटत होतं सारखं ...जरा वेळानं ती अगदी हळू आवाजात म्हणाली,
"बोलायलासुद्धा येत नाही वाटतं एका माणसाला..."
तरीही मी म्याडसारखा तसाच खाली पाहत राहिलो; तेव्हा ती अगदी माझ्याजवळ आली...आणि हळूच वाकून म्हणाली.
"ए..बघ ना .."
तिचा आवाज इतका छान वाटत होता की मी जास्तीच भिऊन गेलो आणि तसाच पळत सुटलो.

- वीज (वनवास)
लेखक - प्रकाश नारायण संत

चक्र - प्रकाश नारायण संत

वर्गातल्या आमच्या मित्रांच्याकडं पाहिलं तर पहिल्यांदा जोरदार,ठळकपणं आणि खणखणीत लक्षात येणारी गोष्ट म्हणजे जवळजवळ सगळ्यांचेच कपडे कुठं ना कुठं फाटलेले असणार. अगदी नवे असले तरी. मारामाऱ्या, काटेरी कुंपणांतून घुसाघूस, धुणं खच्चून बडवणारे घरचे गडी, असलं सगळं असल्यावर कपडे तरी काय करणार? फाटणारच बिचारे. ज्यांचे कपडे फाटलेले नसतात त्यांचे स्वतःपेक्षा एकदम मोठे तरी किंवा लहान तरी! मापानं काय नाहीच, असलं. परत शर्ट आणि चड्डीची बटणं म्हणजे काय विचारायची सोयच नाही. झाडावरच्या वाळलेल्या पानांसारखी, सारखी पडून जाणारी. बटणांचा हिवाळाच असणार शाळेत. सुताच्या गुंड्या घट्ट असणार पण त्यांची काजं वटारलेल्या डोळ्यांसारखी मोठी झालेली. त्यांतून त्या गुंड्यांचा सुळसुळाटच.आत गेलेली गुंडी बाहेर केव्हा आली समजणारच नाही. आत्ता आहे, आत्ता नाही, असलं.
बटणं जागेवर आणि आपल्या चड्ड्या पोटांवर ठेवणं यांत पोरांचा बराच वेळ जाणार. ड्रिलची पोरांना भीतीच. दोन्ही हात वर आले, कि चड्डी खाली गेलीच! खाली बसलेली पोरं हसतमुख, पण उभं राहिलेलं पोरगं कायम काळजीतच. असलं ते सगळं .

- चक्र (वनवास)
लेखक - प्रकाश नारायण संत.

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...